आभाळ उरी फुटते
रात्र उठे अंधारी
प्राणात पेटे वादळ
क्षितीजाचे रंग असुरी
शुभ्र चांदण्या जाळून
काळोख पसरे चहुकडे
प्रकाशाच्या तुकड्यासाठी
एक छाया तडफडे
पानांच्या हिरव्या देहातून
हुंकारते वाऱ्याचे काळीज
घायाळ त्या सुरांभोवती
श्वासांचा हलतो आवाज
मंद शुक्राचा भास
भुलते चंद्राची वाट
निद्रेत आज फुलांच्या
उसळते दु:खाची लाट