जगणं कळेल तेव्हा ........

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
25 Feb 2018 - 10:16 am

जगणं कळेल तेव्हा ... ........

रोजचा दिवस नव्याने उगवायचा
पण जगायचं तसंच रोज रोज
दिवसामागून दिवस अन कैक वर्ष
कोरडेच पावसाळे अन बेचैन उन्हाळे
कशासाठी ? जगण्यासाठी ?

एक एक क्षण फक्त जगून निघालेला,
प्रत्येक श्वास ओढून घेतलेला
हा जगण्याचा अट्टहास तरी किती ?
ना कुणी सखा ना कुणी सोबती
एकट्याने चालायची ही अखंड वाट
कशासाठी ? जगण्यासाठी ?

उद्या कधी उगवूच नये अशी रात्र
अंधार आत आहे कि बाहेर रुक्ष
दुरून एखादं पाखरू कोलाहल करेल
तर जिवंत आहोत असं जाणवेल
त्या इवल्या जीवाचाही हेवा वाटावा
कशासाठी ? जगण्यासाठी ?

खोल खोल आतल्या जखमा
आता सलतही नाहीत आणि सतावतही नाहीत
मग
मातीतून आलेलं सगळं मातीत जाणारे जाणून घ्यावं
अन ओंजळीत भरलेलं आता सांडून द्यावं
इतक्यात
ती अलगद मायेची झुळूक, फुंकर घालून जाते काय
अन वाळवंटात पुन्हा अंकुर फुटतो काय ………...

मग
रहाटगाडगं पुन्हा एकदा चालू करावं
पाणी पुन्हा एकदा भरून सांडून द्यावं
आता परत नवीन दिवस येतील, मागून रात्री येतील
कोरडे आणि फुलपाखरी ऋतूही आणतील
वर्षामागून वर्ष सरतील, “जगायचंय का ?” विचारतील .......

भरल्याशिवाय सांडता येत नाही ,
सांडल्याशिवाय वाहता येत नाही .......
वाहिल्याशिवाय जगता येत नाही ,
अन जगल्याशिवाय जगणं कळत नाही .........

जगणं कळेल तेव्हा ……..
आपण मायेची फुंकर बनून, कुणाला तरी जगण्यासाठी आधार बनावं ........ ...

-----------------------------------फिझा

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

25 Feb 2018 - 11:08 pm | चांदणे संदीप

प्रचंड आवडली!! वाखूसाआ!!

Sandy