तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?

राखीव खेळाडू's picture
राखीव खेळाडू in जनातलं, मनातलं
30 Jan 2018 - 7:23 pm

बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं..

सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे..
ते म्हणजे बारामती..

आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण..
निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..

मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं.. तसंच काहीसे बारामतीकाराचे पण आहे कारण अगदी मुंबईकरासारखी काट्यावरची कसरत नसली तरी ‘घड्याळ’ ज्या पंज्याला बांधलंय ते चालू आहे ना हे माहित असणे महत्वाचे आहे.. कारण काट्यावरची कसरत नसली म्हणून काय झालं? काटा नीट काढता आलाच पाहिजे...

पुणेकरासारखा अभिमान सुद्धा काही अंशी हवाच पण हा बऱ्याच वेळा एकाच गोष्टी वर येऊन थांबतो.. म्हणजे कोणी म्हणलं की तुमचा आवडता ऋतू कुठला तर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे सर्व साधारण ढोबळ वर्गीकरण करणारे लोक भारतात सापडतील.. जरा पुरातन (पुरोगामी नव्हे) लोकं, अगदी वसंत आणि ग्रीष्म सुद्धा म्हणतील... तसंच परदेशी लोक Autumn N Spring म्हणतील पण अस्सल बारामतीकर होण्या करता 'शरद' ऋतू आवडणे ही काळाची गरज समजावी...

कोजागिरी किंवा Full Moon सारख्या गोष्टी लोक करायला लागले किंवा अगदी दस्तुरखुद्ध NASA वाले तुम्हाला चंद्रावर नेऊन आणायला तयार झाले तरी सुद्धा वाह काय ते आमचे 'शरदा'चे चांदणे ही ओळ साधारण पौर्णिमा असो किंवा अमावस्या बोलत रहावी…

तसं बारामती ला अशी काही शेती मधली History किंवा Speciality नाही म्हणजे नागपूरकर जसे आपल्या संत्र्यांचे गुणगान गातात तसे इथे गरज नाही पण सर्वसामान्य असो किंवा शेतकरी टोमॅटो, कांदा, बटाटे किंवा ‘मुळे’ या भाज्यांचा हंगाम माहित नसेल तर चालेल पण 'ताई' साहेब यांचा नियोजित दौरा हा तोंडपाठ हवाच..

जसा पु.ल. म्हणतात की, टिळक - गांधी या मुंबई बाहेरच्या लोकांनी इंग्रज आणि मुंबईकरांचे संबंध बिघडवले, तसेच काका आणि पुतण्याचे संबंध बिघडवणारी आणि पुणेकर लोकांनी कंठलेली 'काका मला वाचवा' या अतिशय ह्रदयद्रावक कहाणी लोकांच्या मनातून पुसून टाकायला आणि ‘काका ने पुतण्या ला कसे घडवले’ पर्यंत संस्कारी कहाणी याची माहिती तुम्हाला माहित असेल कि तुम्ही बारामतीकर झालात म्हणून च समजावे…

मुळात मुंबईकरासारखे गनिमी काव्याने येणाऱ्या पाहुण्याला चुकवायचा इथे प्रश्नाचं येत नाही कारण पाहुण्याला आवडो अथवा ना आवडो आणि पाहुणा प्रादेशिक परिसरातला असला काय किंवा देश पातळी वरचा असला काय इथे एकदा पाहुणचाराला येऊन च जातो इतकं ‘पॉवर’फुल समीकरण बारामतीकर होण्याकरता कळणे फार महत्वाचे..

बाकी धरणांची संख्या, पाण्याची पातळी, सहकारी तत्व आणि पुरोगामी धोरण अशी काही विषयांची आपली पूर्ण तयारी झाली की बारामतीकर होण्याची Ph.D ची परीक्षा आपण पास झालात म्हणून समजायचं!!

कारण बारामतीकर होणे म्हणजे आपल्या शहरात फार रेल्वे येत नसताना ‘इंजिनाची’ अचूक माहिती, ‘पंजाचा’ वापर आणि ‘धनुष्यबाणाची’ कला अवगत नसताना सुद्धा ‘कमळ मुखी’ चेहरा करून, बिनचूक नेम साधता आला की आपण आजन्म बारामतीकर म्हणूनच ओळखले जाल हे नक्की..

विनंती आणि तळटीप : हे फक्त विनोद याच अर्थाने सुचलेले आहे. राजकारण किंवा कुठलीही टीका करणे हे उद्देश्य नाही..

विनोद

प्रतिक्रिया

उपेक्षित's picture

30 Jan 2018 - 7:29 pm | उपेक्षित

कोटया जरा जास्तीच झाल्या अस वाटतंय....

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:31 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादाबद्दल धन्यवाद _/\_उपेक्षित.. अजून शिकतोय लिहायला.. पण कदाचित वाचताना किंवा कथाकथन पाहताना punches किंवा विनोद जास्त पटकन लक्षात राहतात त्याचा परिणाम असावा की लिहिताना कोट्या किंवा त्या प्रकारचे जास्त लिहिले गेले.. प्रयत्न करेन नक्की की अजून थोडे माहितीपर आणि त्यात विनोदी लिहिणे...

अभिजीत अवलिया's picture

31 Jan 2018 - 7:15 pm | अभिजीत अवलिया

सहमत. नाही आवडलं.

ज्योति अळवणी's picture

30 Jan 2018 - 10:48 pm | ज्योति अळवणी

मस्त जमलंय. आवडलं बुवा आपल्याला

प्राची अश्विनी's picture

31 Jan 2018 - 7:34 am | प्राची अश्विनी

+11

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:24 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:23 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ ज्योति अलवनि

सुखीमाणूस's picture

30 Jan 2018 - 10:57 pm | सुखीमाणूस

लेखक तुम्ही बारामतीचे का? नाही अगदी खाचाखोचा ठाऊक आहेत तुम्हाला!!
बाकी विनोद आवडला

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:27 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ सुखीमाणूस ... नाही हो.. मी आपला MH-12

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Feb 2018 - 5:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हणजे बारामतीकर नाही तरी बाराचे आहात :) ह.घ्या.

श्रीगुरुजी's picture

30 Jan 2018 - 11:22 pm | श्रीगुरुजी

मस्त जमलंय!

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:22 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ श्रीगुरुजी

कंजूस's picture

31 Jan 2018 - 10:18 am | कंजूस

पुलंच्या तुम्हाला कोण व्हायचयमध्ये उगाच बसवलय. शरदाचं चांदणं लिंबोणीच्या झाडामागे( ही बरीच आहेत इकडे) ठीक आहे. नवीन बारामती नवीन मुंबईचा भास व्हावा असं बांधलय/विकसित केलय. बारामतीतले लोक नक्की कसे बोलतात याची झलक पाहिजे. कोल्हापुरकरांचा एक पिंड असतो पण त्यांना पुलंनी का गाळलं हे कळलं नाही.

राखीव खेळाडू's picture

31 Jan 2018 - 12:22 pm | राखीव खेळाडू

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ मी लेखाच्या सुरुवातीला म्हणल्याप्रमाणेच मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोण व्हायचंय पाहिलं आणि त्यावर सुचलं ते इथे टाकलं.. माझा खरंच हेतू नाही कि कुठल्या बारामतीकर आणि बारामती च्या प्रगती ची चेष्टा मस्करी करावी..
बारामतीकर, कोल्हापूरकर किंवा सोलापूरकर असे अनेक लोकानुभव किंवा तिथला स्थानिक लहेजा, लकबी यावर पु.लं.नी का लिहिले नाही किंवा भाष्य केले नाही माहित नाही पण जे त्यांचे कथाकथन उपलब्ध आहे ते पाहून तसेच आशयाचे लिहायला सुचले म्हणून हा लेख..

मुक्त विहारि's picture

31 Jan 2018 - 1:26 pm | मुक्त विहारि

आवडले.

कोट्या पण आवडल्या.

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 1:57 pm | पगला गजोधर

चांगला प्रयत्न आहे, लिहीत रहा. १+

बाकी तुम्ही, 'आर्ट ऑफ टगेगिरी', हा कोर्स पूर्ण केल्याशिवाय
एलिजीबाल नाही...कर होण्यासाठी

कोणती आणि कोणाचीच टगेगिरी काय जास्त काळ टिकली नाही बारामती मध्ये. त्यामुळे या पेपरला पण एक्सएम्पशन आहे. डोन्ट वोरी...!!

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 6:04 pm | पगला गजोधर

लैच राव पर्सनली घेतासा तुमिबी !
;)

विशुमित's picture

31 Jan 2018 - 6:22 pm | विशुमित

बरं बाबा विनोद तर विनोद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2018 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कोट्याधिश लेख !

अनिंद्य's picture

31 Jan 2018 - 3:09 pm | अनिंद्य

@ राखीव खेळाडू,

लेख हसवणारा.

मला तर तुमचे सदस्यनामही आवडले :-)

अभ्या..'s picture

31 Jan 2018 - 3:20 pm | अभ्या..

नही जम्या.

पुंबा's picture

1 Feb 2018 - 1:51 pm | पुंबा

++११
पुलेशु

प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ मुक्त विहारि, पगला गजोधर, डॉ सुहास म्हात्रे, अनिंद्य, अभ्या..

अनिंद्य - धन्यवाद!! इथे इतकी वेगळी unique सदस्यनामे आहेत, आपलं पण जरा वेगळं असावं म्हणून ठेवले... तसा मिपा चा offline सदस्य मी अनेक वर्षे आहे ( Especially IT company join) केल्यापासून पण आता थोडाफार लिहिता येईल किंवा प्रयत्न करावा म्हणून अकाउंट उघडले..

तुमचे मालदीव ची लेख मला अप्रतिम आहे.. सगळ्या वाचनखुणा करून ठेवल्या होत्या Notepad मध्ये.. आता इथे करून ठेवतो अकाउंट आहे तर..

अभ्या - प्रयत्न चालू आहेत... लेखनशैली नाही म्हणणार पण नीट लेखन कला करण्याच्या प्रोसेस मध्ये आहे..

विशुमित's picture

31 Jan 2018 - 5:56 pm | विशुमित

बारामतीकर या नात्याने मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण तुमच्या लिखाणाचा आदर ठेवून म्हणू इच्छितो की 'विनोद' काही सापडला नाही. असो ..!!
बाकी कोट्या म्हणाल तर त्या सगळ्या घिस्यापिट्या आहेत. चघळून चघळून चोथा झाला आहे.
तुम्ही बारामती भागात आले नसावेत बहुतेक म्हणून बऱ्याच कोट्या कपोलकल्पित आणि पूर्वग्रहदूषित वाटल्या. .
येऊन गेला असाल तर तुम्ही नीट निरीक्षण नाही केले आणि खुद्ध बारामतीकर असाल तर निवळ झ्याक्या करत आहेत असे वाटते.
प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे "माझा खरंच हेतू नाही कि कुठल्या बारामतीकर आणि बारामती च्या प्रगती ची चेष्टा मस्करी करावी." पण हेतू लपून राहिला नाही.
काही उदाहरणे देतो-
१. <<'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..>>>
==>> बारामती मध्ये राहण्यासाठी/कर होण्यासाठी बारा वेळा विचार वगैरे करायची मला नाही वाटत एवढी गरज असावी. हवामान चांगले आहे, भीमा आणि नीरा चे वापरायला /पेयाला मुबलक पाणी आहे, नोकरी साठी कल्याणी-पियाजो-डायनॅमिक्स सारख्या कंपन्या, मॉल, थिएटर, शाळा कॉलेजेस उच्च दर्जाची आहेत. एक NA प्लॉट किंवा फ्लॅट घेतला तर आरामशीर बारामतीकर होऊ शकता.
२.कारण काट्यावरची कसरत नसली म्हणून काय झालं? काटा नीट काढता आलाच पाहिजे...>>
==>> नाही ओ. येथील बहुसंख्य लोक सर्वसामान्य आणि सरळमार्गी आहेत. काटा वगैरे काढता येणे हे बारामतीकर होण्यासाठी पात्रता असावी असे वाटत नाही. लोक कष्टाळू तर आहेच आता स्मार्ट पण झाली आहेत.
३. कोजागिरी किंवा Full Moon सारख्या गोष्टी लोक करायला लागले किंवा अगदी दस्तुरखुद्ध NASA वाले तुम्हाला चंद्रावर नेऊन आणायला तयार झाले तरी सुद्धा वाह काय ते आमचे 'शरदा'चे चांदणे ही ओळ साधारण पौर्णिमा असो किंवा अमावस्या बोलत रहावी…>>
==>> शरदचं चांदणे म्हणत असतील काही लोक पण फक्त त्यावरच येथील लोक थांबलेले नाहीत. आमच्या तालुक्याच्या कन्येने नासा मध्ये सुद्धा गरुडझेप घेतली आहे. आणखी बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे स्वतःचे काम इमानेइतबारे करत राहावे. बारामतीकर होण्यासाठी शरद जप करायची काही गरज पडनार नाही. जिथे गरज पडली ती जगाच्या पाठीवर कधीच अडली नाही.
४. तसं बारामती ला अशी काही शेती मधली History किंवा Speciality नाही >>>
==>> पण अतिउच्च दर्जाचे कृषी विज्ञान केंद्र आहे की. बहुतांशी बारामतीकर (आणि बाहेरील शेतकरी देखील) तेथील ज्ञान, तंत्रज्ञान, सेवा आणि योजनांचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. अवश्य भेट देण्या जोगे ठिकाण आहे. मागच्या आठव्ड्यात आंतराष्ट्रीय कीर्तीचे कृषी प्रदर्शन भरले होते.
५. पण 'ताई' साहेब यांचा नियोजित दौरा हा तोंडपाठ हवाच..>>>
==>> गरज नाही आहे. नॉर्मल असतात ताईंचे दौरे. भपकेपणा जास्त नसतो. उलट ताईंमुळे स्थानिक प्रश्न चुटकीसरशी सुटतात. राजकारण एवढे तेवढे चालणारच. स्वतः खासदार प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालतात हे जनतेसाठी चांगलीच बाब आहे. आता वाहिनी देखील सक्रिय झाल्या आहेत समाजकारणात. त्यांचा तर आणखी दबदबा आहे प्रश्न सोडवण्यात.
६. ‘काका ने पुतण्या ला कसे घडवले’ पर्यंत संस्कारी कहाणी याची माहिती तुम्हाला माहित असेल कि तुम्ही बारामतीकर झालात म्हणून च समजावे…>>>
==>> त्रैमासिक कौटुंबिक मिटिंग बाबत बऱ्याच लोकांना माहित नसावे.
७. पाहुणचार--
==>> अथिति देवो भव:
८. बाकी धरणांची संख्या, पाण्याची पातळी, सहकारी तत्व आणि पुरोगामी धोरण अशी काही विषयांची आपली पूर्ण तयारी झाली की बारामतीकर होण्याची Ph.D ची परीक्षा आपण पास झालात म्हणून समजायचं!!
==>> धरणाच्या आणि पाण्याच्या पातळी हे शब्द वापरले की लगेच लेवल समजते. सहकारी तत्व मुले साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय जोरदार चालू आहे. पुरोगामी प्रतिगामी पेक्षा किंचित उजवी आहे. PHD ची गरज नाही ITI केला तरी पुरेसे आहे बारामतीकर होण्यासाठी.
९. विनंती आणि तळटीप : हे फक्त विनोद याच अर्थाने सुचलेले आहे. राजकारण किंवा कुठलीही टीका करणे हे उद्देश्य नाही..>>>
==>> तळटीप द्याची गरज नव्हती. उद्देश ओळखता आला नाही तो बारामतीकर कसला ?
कधी येताय मग बारामतीला ? शाल श्रीफळ देऊन बारामतीकर करून टाकू. हाय काय आणि नाही काय.
जास्त काळ राखीव खेळाडू राहू नका. 'संघात' खेळा. बाकी पुढील लिखाण आणि कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा...!!

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 6:00 pm | पगला गजोधर

राजे, दिलपे मत लो !

नाही साहेब, बारामतीकर दिल पे नही शिंगावर घेतात.
काटा वगैरे काढणारे म्हंटल्यावर गप कसे बसणार. तालुक्याचे नेते कानाडोळा करत असतील जनता कशी करेल.
ज्यांना बोलायचे आहे त्यांचे थेट नाव घेऊन बोलावे, बारामतीकरांवर कशाला घसरत्यात लोक.
म्हणून हा लेख प्रपंच.
राखीव राहण्यापेक्षा लिखाणाच्या मेन टीम मधे येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेतच.

धनावडे's picture

31 Jan 2018 - 7:00 pm | धनावडे

आणि दुसर्‍याच्या गावाला उडाणटप्पूच गाव म्हटल्यावर विनोद समजवा अशी तुमची अपेक्षा असते

विशुमित's picture

31 Jan 2018 - 7:09 pm | विशुमित

तुमचा रोख वाई बद्दल असेल तर त्याचे स्पष्टीकरण दिले होते. लिंक मिळाल्या की शेर करतो.

पगला गजोधर's picture

31 Jan 2018 - 7:43 pm | पगला गजोधर

जाऊ द्या पाटील, इग्नोर करा,
.
ग्रामपंचायत चा पुढचा एपिसोड आणा लवकर ...

पैसा's picture

31 Jan 2018 - 7:56 pm | पैसा

लेख आवडला. लिहीत रहा. सफाई येणार हळूहळू.

अभिदेश's picture

31 Jan 2018 - 9:45 pm | अभिदेश

काही लोकांच्या वर्मि बाण का लागला ते नाही कळलं ... लोक विनोद पण फार गंभीरपणे घेतात बुवा...

प्राची अश्विनी's picture

1 Feb 2018 - 7:54 am | प्राची अश्विनी

हेच म्हणायचं होतं.

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2018 - 10:22 am | चौथा कोनाडा

मस्तय .... झक्कास !

पु ले शु !

भारी लिहीलंय... तुम्ही टगेखोर आणि गुंठामंत्री असणं; टॉयलेटऐवजी अख्खं धरण वापरणं; दाखवायचे सुळे आणि खायचे दात वेगळे असणं हेही ओघाओघाने आलं.

पगला गजोधर's picture

1 Feb 2018 - 1:27 pm | पगला गजोधर

१+
आणि असं असूनही, एक पंप्र म्हणतात, बोटाला धरून शिकवलं, अश्या २०० बारामती भारतात हव्यात...
उगाचंच नै कै ते बारामती व बारामतीकरांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत...

गॅरी ट्रुमन's picture

1 Feb 2018 - 1:09 pm | गॅरी ट्रुमन

आवडले

यश राज's picture

1 Feb 2018 - 10:50 pm | यश राज

आवडले ...