मानवी ज्ञानभांडार: यनावाला
पृथ्वीवरील चराचर सृष्टी निसर्गनियमांनुसार निर्माण झाली आहे. सर्व नैसर्गिक घटना या नियमांनुसारच घडतात. हे निसर्गनियम कोणी बदलू शकत नाही. त्यांचे अतिक्रमण म्हणजे उल्लंघन कोणी करू शकत नाही. मात्र हे निसर्गनियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे. हे निसर्गनियम सर्व ठिकाणी, सर्वकाळी सारखेच असतात. भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, अशा विविध ज्ञान क्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्न करून अनेक निसर्गनियम शोधले. त्या नियमांची सत्यासत्यता ठरविण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित केली . तदनुसार हे नियम तपासले. पुन:पुन्हा पडताळले. त्यांतील सत्यनियमांचा संग्रह म्हणजे मानवी अर्जितज्ञानभांडार. अर्जित म्हणजे (निसर्गातून) प्राप्त केलेले. हे नियम मानवाने निर्माण केले नाहीत. निरीक्षणे, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती आणि अपोहन (तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची बुद्धीची क्षमता) यांच्या आधारे निसर्गातून शोधले.
केवळ सत्यासत्यतेच्या वैज्ञानिक कसोट्यांना उतरणार्या तत्त्वांचा, नियमांचा मानवी ज्ञानभांडारात समावेश असतो. त्यामुळे या भांडारातील सर्व नियम आणि तत्त्वे विश्वसनीय असतात. या तत्त्वांच्या आधारे निर्माण झालेले तंत्रज्ञान इच्छित कार्य करतेच, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे मानवाच्या या अधिकृत ज्ञानभांडाराची विश्वासार्हता वादातीत आहे. आपण शाळा-कॉलेजांत मानवअर्जित ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवितात. या ज्ञानावर कोणाचा एकाधिकार (मोनापॉली) नाही. (तंत्रज्ञानावर असू शकतो.) सर्वांना ते मुक्तपणे उपलब्ध आहे. या भांडारातील तत्त्वे, नियम सत्य मानणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य मानणे नव्हे.
खगोलशास्त्राच्या पुस्तकात ग्रह-तारे यांची माहिती असते. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह, प्रत्येकाचे वस्तुमान, आकारमान, भ्रमणकक्षा ,भ्रमणकाळ, सूर्यापासून अंतर अशा सर्व गोष्टी या पुस्तकात असतात. नक्षत्रे, राशी, सूर्य-चंद्राची ग्रहणे यांविषयी परिपूर्ण माहिती असते. पण खगोलशास्त्राच्या कोणत्याही अधिकृत पुस्तकात शनीची साडेसाती, मंगळाची बाधा, गुरुपुष्ययोग, कालसर्पयोग, त्रिकोणयोग, लाभयोग अशा गोष्टींचा उल्लेख कधीही नसतो. माणसाच्या जीवनावर ग्रह-तार्यांचा काही परिणाम होतो असेही कुठे लिहिलेले नसते. कारण हे (शनीची साडेसाती इ.) सत्यज्ञानाचे विषय नाहीत. ते भ्रमित ज्ञानाचे म्हणजे अज्ञानाचे विषय आहेत. त्यांना अधिकृत मानवी ज्ञानभांडारात स्थान नाही.
जीवशास्त्राच्या पुस्तकात उत्क्रांतिवादाचे विवरण असते. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याविषयी लिहिलेले असते. पण ,"ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली." असे विधान जीवशास्त्राच्या कुठल्याही अधिकृत पुस्तकात नसते. ईश्वर या शब्दाचा उल्लेखही नसतो. तसेच शरीरशास्त्राच्या पुस्तकात हृदय, मेंदू, यकृत अशा सर्व इंद्रियांविषयी सांगोपांग लिहिलेले असते. पण त्यात तथाकथित हृदयस्थ आत्म्याचा उल्लेख कुठेही नसतो.
आपण शाळा-कॉलेजात शिकलेले ज्ञानविषय आठवा. म्हणजे हे पटेल. थोडक्यात म्हणजे देव-धर्म-श्रद्धा, आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष अशा कुठल्याही गोष्टीचा अंतर्भाव मानवाच्या सत्यज्ञानभांडारात नाही. तसेच जगात वैज्ञानिक शिक्षणाच्या अनेक संस्था आहेत. त्यांतील कुठल्याही संस्थेच्या ग्रंथालयात बायबल, कुराण, वेद, गीता, ब्रह्मसूत्रे अशा कुठल्याही धर्मग्रंथाला स्थान नाही.
यावरून देव-धर्म-श्रद्धा-आत्मा-पुनर्जन्म, मोक्ष -परलोक हे ज्ञानाचे विषय नाहीत हे स्पष्ट होते. तसेच मेंदुविज्ञानाच्या पुस्तकात अतींद्रिय शक्ती, परामानसशास्त्र, दिव्यदृष्टी, सूक्ष्म देह अशा कोणत्याही कल्पनेला स्थान नसते. म्हणून तेही ज्ञानाचे विषय नव्हेत.
हे सर्व इतके स्पष्ट असताना अनेक सुशिक्षित माणसे फलज्योतिषाच्या नादी का लागतात ? आत्मा, पुनर्जन्म मोक्ष अशा भ्रामक कल्पनांवर श्रद्धा का ठेवतात ? अन्त्यसंस्कारांत दहावे- बारावे-तेरावे- मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात ? ज्यावर काही निरर्थक अक्षरे कोरली आहेत असा वीस रुपये किंमतीचा निरुपयोगी पत्रा ५००/रु.ना विकत घेऊन श्रीयंत्र म्हणून त्याची पूजा का करतात? अशी पूजा केल्यावर आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल असे त्यांना कशाच्या आधारे वाटते ? अशी लक्ष्मीकृपा होत असती तर समाजात इतके दारिद्र्य कसे दिसले असते? असे सोपे प्रश्न त्यांच्या डोक्यात कधीच कसे येत नाहीत ? माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते ? खरोखर आता आपण अज्ञानाचा त्याग करून ज्ञानाची कास धरायला हवी.
*****************************************************************************
मानवी ज्ञानभांडार
गाभा:
प्रतिक्रिया
2 Jan 2018 - 2:55 pm | माहितगार
:)
2 Jan 2018 - 6:16 pm | गामा पैलवान
यनावाला,
लेखाबद्दल काही शंका आहेत.
१.
साफ चूक. हे नियम बदलू शकतात. किंबहुना हा बदल कसकसा होतो हे वर्णन करून सांगणे हेच विज्ञानाचे काम आहे.
२.
तंत्रज्ञान कार्य करते म्हणजे नियम ठाऊक असतीलंच असे नव्हे. ट्रान्झिस्टरमधील जंक्शन काम कसं करतं ते पूर्णपणे ठाऊक नाही. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस या घटनांमध्ये नक्की काम कसं होतं ते माहीत नाही. पण तरीही या दोन्ही घटना नियंत्रित करता येतात. तुम्ही ज्या संगणकावर बसून हा लेख लिहिला आहे त्यात दशकोट्यावधी ट्रान्झिस्टर्स आहेत. आणि ते अचूक काम करताहेत.
सांगायचा मुद्दा काये की तंत्रज्ञानावर प्रभुत्व असूनही त्यामागील विज्ञानाचे आकलन परिपूर्ण नसू शकते.
३.
नसणारच मुळी. कारण की खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांचे हेतू वेगळे आहेत.
४.
म्हणून तो होतंच नाही हे कशावरून? सूर्याचा होतोच ना परिणाम?
५.
हीच तर नेमकी त्रुटी आहे.
६.
डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी अनेक बालकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पुनर्जन्माविषयी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. यावरून पुनर्जन्म हा ज्ञानाचा व अन्वेषणाचा विषय आहे हे दिसून येतं.
७.
मेंदुविज्ञानाच्या पुस्तकाबाहेरही ज्ञान असू शकतं ना?
८.
कागद देऊन पत्रा घेतला तर एव्हढा गहजब कशासाठी? रुपयांच्या नोटा म्हणजे शेवटी कागदच ना?
आ.न.,
-गा.पै.
2 Jan 2018 - 7:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
मागच्या लेखाच्या वेळेस जराशी स्तूती काय झाली, यनावालांनी अनेक बरोबर -चूक विधानांची खिचडी करणे परत सुरु केले ! =))
पण, यनावाला त्यांच्याशी सहमत असणार्यांना धन्यवाद देण्यासाठी प्रतिसाद देतात (याचा अर्थ ते त्यांच्या लेखावरचे प्रतिसाद वाचतात असेच दिसते). मात्र, सुसंगत व तार्कीक प्रश्नांना उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे, त्यांच्या लेखनातल्या विसंगतींवर लिहून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही असे मत बनले आहे.
तरीही, काही दावे करण्यापूर्वी त्यांनी त्यासंबंधी किमान अभ्यास करणे जरूर होते इतकेच नमूद करत आहे... तसे केले असते तर तर बर्याच बर्या ठरू शकणार्या या लेखाची विश्वासार्हता, "तार्किक-अतार्किक तळ्यात-मळ्यात उड्या आणि पर्सनल लॉजिकवर आधरित अनेक सरसकट विधाने" अशी झाली नसती ! :)
3 Jan 2018 - 11:28 am | सुबोध खरे
मागच्या लेखाच्या वेळेस जराशी स्तूती काय झाली, यनावालांनी अनेक बरोबर -चूक विधानांची खिचडी करणे परत सुरु केले !
+१००
१०० वर्षांपूर्वी वैद्यकीय विज्ञानाच्या पुस्तकात हिस्टेरिया म्हणजे स्त्रीचे गर्भाशय हलत असल्यामुळे होणारा आजार असे समजले जात असे. तो एक मनोविकार आहे हे नंतर समजले. म्हणजे विज्ञानात सुद्धा अनेक अंधश्रद्धा होत्या.
आजही अनेक रोगांची मूळ कारणे माहित नाहीत.त्याबद्द्लचे आजचे वैज्ञानिक ज्ञान हे कदाचित उद्या अंधश्रद्धा म्हणून सिद्ध होऊ शकेल.
नुसती प्रच्छन्न टीका करून काय निष्पन्न होणार (सवंग लोकप्रियता सोडून)
3 Jan 2018 - 12:55 pm | आनन्दा
खरेतर मी असे बोलणे उचित नाही, पण तरीही.
मला असे वाटते की अश्या धाग्यांचा टीआरपी वाढवणे उचित नाही. तस्मात प्रतिक्रिया देण्याची देखील तसदी घेऊ नये.
इति लेखनसीमा.
3 Jan 2018 - 9:32 am | चामुंडराय
आला आला यनावाला सरांचा नवीन धागा आला.
चला, दोन्हीकडची मंडळी शस्त्रे परजून तयार व्हा !
3 Jan 2018 - 11:09 am | ज्ञानोबाचे पैजार
याच्याशी सहमत.... त्या पुढेही जाउन असे म्हणावेसे वाटते की...
खर्या ज्ञानार्थ्याने ज्ञानाची व्याख्या संकुचित करुन घेउ नये, कोणत्याही ज्ञानी व्यक्तीला गुरु करुन घेण्यास लाजू नये,
काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याचे अधिकार गुरुला द्यावे व आपण नि:संदेह मनाने ज्ञानार्जन करावे,
असलेल्या ज्ञानाचा व्यर्थ गर्व करु नये, ते परिपूर्ण नाही याची सदैव खात्री बाळगावी,
आपले ज्ञान आद्ययावत करण्यासाठी अखंड सावधान असावे
पैजारबुवा,
4 Jan 2018 - 10:08 am | प्रकाश घाटपांडे
२००८ मधे मिपाच्या अतिथी संपादकीय मधे यावर लिहिले होते. या ज्योतिषाच काय करायचं? http://www.misalpav.com/node/2655
4 Jan 2018 - 11:58 am | arunjoshi123
हे सगळं निसर्गात टनाटनाने पडून असतं जळी स्थळी काष्ठी पाषाणी.
4 Jan 2018 - 12:16 pm | arunjoshi123
या विधानाचे वैचित्र्य देखील तितकेच वादातीत आहे.
4 Jan 2018 - 12:27 pm | arunjoshi123
उत्क्रांतीचा प्रारंभ हे जीवशास्त्र जो कोणी वाचेल तो लगेच ईश्वरावर विश्वास ठेवणे चालू करेल.
------------------
रादर, उत्क्रांतीचे जीवशास्त्र वाचलेले नसणे हेच नास्तिक्याचे गमक आहे.
4 Jan 2018 - 12:37 pm | arunjoshi123
स्टॉक मार्केट मधे डे ट्रेडिंग का होते?
हे ट्रेडर सुशिक्षित असतात का?
हे सरकारमान्य ट्रेड्स आहेत काय?
दिवसभरात कंपनीचे मूल्य कशामुळे कोणत्या बाजूने किती बदलते?
=================================================
विज्ञानाला सजीव म्हणजे काय ते माहित नाही.
त्याच्या दृष्टीने "जैविक" असा कोणताही गुणधर्म नसतो.
4 Jan 2018 - 12:39 pm | arunjoshi123
फक्त ३१ डिसेंबर चा उल्लेख असतो.
4 Jan 2018 - 12:42 pm | arunjoshi123
माणसाची बुद्धी रसातळाला जाते हा निसर्गाचा नियमच आहे. सगळं निसर्गाच्या नियमानीच होतं असं तुम्हीच म्हणालात ना? मग असे प्रश्न पडतात कसे तुम्हाला? वापरा ज्ञानाचे अथांग भांडार नि काढा उत्तरे. आम्हालाही प्रबोधित करा.
4 Jan 2018 - 12:54 pm | arunjoshi123
ज्यावर निरर्थक तीन रंगांचे पट्टे मारलेत अशा निरुपयोगी कपड्याला ५०० रु ला विकत घेऊन त्याला सलाम का ठोकावा? कपड्याला कळतं का आपल्याला कोणी सलाम ठोकत आहे म्हणून? असला निरर्थक निरुपयोगी कपडा कुठेही फडकताना उर अभिमानाने वैगेरे भरून येणारांस यनावाला "बुद्धी रसातळाला गेलेले" म्हणून कुत्सितपणे हसत असणार. आणि या कपड्याच्या इज्जतीपायी ज्या लोकांनी जीव दिला त्यांना तर यनावाला दहाडून हसत असतील.
==================
कशाला अर्थ आहे हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला प्रश्न आहे. तसं पाहिलं तर ब्रह्मांडात फक्त इथेच असली तरी आपल्या जीवसृष्टीला काय अर्थ आहे? उद्या नसली तर काय फरक पडतो? जिवंत राहणं किंवा न राहणं, काय फरक पडतो? चांगलं यनावाला टाईप अश्रद्धेत सुखात नि आनंदात राहणं किंवा त्या २८ लाखवाल्या वैद्यासारखं श्रेद्धेमुळे किंवा दु:खात नि शोकात राहणं? ब्रह्मांडात असणं वा नसणं? फरक काय पडतो?
4 Jan 2018 - 12:55 pm | arunjoshi123
यनावाला यांचे लेख मंजे आम्हाला पर्वणीच! यनावाला तुम आगे बढो, हम आपका टीआरपी बढाने को है इधर.
7 Jan 2018 - 3:21 pm | nishapari
भारतातील महत्वाचे वैज्ञानिक म्हणून गणल्या जाणाऱ्या , ज्यांनी भारतीय वैज्ञानिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे अशा ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा देव या संकल्पनेवर गाढ विश्वास होता याबाबत यनावालांचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल .
10 Jan 2018 - 8:36 pm | यनावाला
या संदर्भात "आस्तिक वैज्ञानिक " हा लेख याच संस्थळावर लिहिला आहे. तो कृपया वाचावा.
11 Jan 2018 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे
ही त्याची लिंक http://www.misalpav.com/comment/779379