बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Dec 2017 - 10:01 am

बिलिरूबिन – हा शब्द काहीसा परका वाटला असेल ना? मला कल्पना आहे की सामान्यजनांना ग्लुकोज, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल हे शब्द खूप परिचित आहेत. पण बिलिरूबिन तसा पटकन लक्षात येत नाही. आता मी जर ‘कावीळ’ हा शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळे पिवळे झालेला रुग्ण येतो की नाही? मग सोप्पंय. हा जो पिवळेपणा येतो तो बिलिरूबिन या शरीरातील रंगद्रव्यामुळे.

निरोगी अवस्थेत हे बिलिरूबिन आपल्या रक्तात अल्प प्रमाणात असते. त्यामुळे त्याचा पिवळा रंग आपल्या अवयवांत बिलकूल दिसत नाही. पण काही रोगांमध्ये जेव्हा ह्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा हळूहळू विविध पेशी पिवळ्या होऊ लागतात. हा पिवळेपणा डोळ्यांमध्ये अगदी सहज दिसून येतो आणि यालाच आपण ‘कावीळ’ म्हणतो. कावीळ जसजशी तीव्र होत जाते तसे रुग्णाची जीभ व नंतर त्वचाही पिवळी पडते.

काविळीच्या मुळाशी असणारे हे बिलिरूबिन शरीरात तयार कसे होते, त्याचा चयापचय कसा होतो आणि या यंत्रणेत बिघाड झाल्यास कावीळ कशी होते, हे सर्व आपण या लेखात समजून घेणार आहोत.

आता लेखाचे तीन भाग करतो:
१. बिलिरूबिनचे उत्पादन
२. बिलिरूबिनवरील प्रक्रिया व उत्सर्जन आणि
३. काविळीचा आढावा

बिलिरूबिनचे उत्पादन
सुरवात करुया आपल्या परिचित हिमोग्लोबिनपासून. हे प्रथिन रक्तातील लालपेशीमध्ये असते. प्रत्येक लालपेशी ही तिच्या जन्मानंतर १२० दिवसांनी मरते. त्यानंतर त्यातील हिमोग्लोबिन बाहेर येते आणि त्याचे हीम + ग्लोबीन असे विघटन होते. मग हीममधील लोह सुटे होते आणि ते शरीरातील Jलोहाच्या साठ्यात जमा होते.

नंतर हीमच्या अवशेषाचे विघटन होऊन बिलिरूबिन तयार होते. शरीरात रोज काही अब्ज लालपेशी मरत असल्याने बिलिरूबिन बऱ्यापैकी प्रमाणात तयार होते. मात्र ते रक्तात खूप साठून राहणे चांगले नसते. जर का ते प्रमाणाबाहेर साठले तर ते थेट मेंदूत घुसू शकते आणि तिथे गंभीर इजा करते. म्हणूनच त्यावर प्रक्रिया करून त्याला सौम्य करण्याची जबाबदारी आपल्या यकृताने घेतलेली आहे.

बिलिरूबिनवरील प्रक्रिया व उत्सर्जन
बिलिरूबिन हे पाण्यात विरघळू शकत नसल्याने त्यावर यकृतात काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. यकृताच्या पेशींमध्ये बिलिरूबिनचा अन्य रसायनाशी संयोग होतो आणि ‘संयुगित बिलिरूबिन’ तयार होते. ते पाण्यात विरघळणारे असते हा मोठा फायदा.
पुढे ते पित्तनलिकेत सोडले जाते. काही प्रमाणात ते पित्तरसात(bile) राहते. शेवटी ते मोठ्या पित्तनलिकेमार्फत आतड्यांमध्ये पोचते. तिथे त्यावर अजून प्रक्रिया होऊन stercobilin हे पिवळसर तपकिरी रसायन तयार होते आणि ते शौचावाटे बाहेर पडते. या stercobilin च्या रंगामुळेच आपल्या विष्ठेला तो रंग येतो. निरोगी अवस्थेत विष्ठा नेहमी या रंगाची असते.

बिलिरूबिनचे अशा प्रकारे शरीरातून उत्सर्जन झाल्यामुळे आपल्या रक्तात ते अल्प प्रमाणात राहते. त्यामुळे निरोगी अवस्थेत त्याचा पिवळा रंग हा आपल्या आपल्या बाह्य अवयवांमध्ये दिसू शकत नाही. काही आजारांमध्ये जर बिलिरूबिनचे रक्तातील प्रमाण नेहमीपेक्षा किमान अडीच ते तीनपट झाले तरच बाह्य अवयव पिवळे दिसतात. यालाच आपण कावीळ म्हणतो.

काविळीचा आढावा
सर्वप्रथम एक लक्षात घेतले पाहिजे की ‘कावीळ’ हे शरीरातील काही आजारांचे बाह्य चिन्ह (sign) आहे. ‘पेशी पिवळ्या होणे’ हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. हा पिवळेपणा रक्तातील वाढलेल्या बिलिरूबिनमुळे येतो. तसे होण्यास यकृताचे किंवा लालपेशींचे काही आजार कारणीभूत ठरतात.

एक प्रकारची कावीळ मात्र ‘आजार’ समजला जात नाही. ती म्हणजे तान्ह्या बाळाची अल्प मुदतीची कावीळ.
बऱ्याच बाळांच्या जन्मानंतर तिसऱ्या ते दहाव्या दिवसापर्यंत त्यांना सौम्य काविळ असते. याचे कारण म्हणजे बिलिरूबिनवर प्रक्रिया करणारी यकृतातील यंत्रणा तोपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसते. त्यामुळे रक्तातील असंयुगित बिलिरूबिनचे प्रमाण काहीसे वाढलेले राहते. दहाव्या दिवसानंतर ती यंत्रणा कार्यक्षम झाल्याने कावीळ दिसेनाशी होते. जर ती टिकून राहिली तर मात्र दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घ्यावे लागतात.

मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांमध्ये मात्र ही कावीळ तीव्र होण्याची शक्यता वाढते. त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते कारण या काविळीतील असंयुगित बिलिरूबिन जर प्रमाणाबाहेर वाढले तर थेट मेंदूला इजा करते.

आता विविध आजारांमुळे होणाऱ्या काविळीकडे वळूयात. तिच्या कारणानुसार तिचे तीन प्रमुख गटांत वर्गीकरण केले जाते:
१. लालपेशींच्या आजाराने होणारी
२. यकृतातील बिघाडाने होणारी आणि
३. पित्तनलिकेत अडथळा झाल्याने होणारी
आता या प्रत्येक गटातील एका आजाराचे उदाहरण घेऊन संबंधित कावीळ समजून घेऊ.

लालपेशींच्या आजाराने होणारी कावीळ
लालपेशींमधील हीमचे विघटन होऊन बिलीरुबिन तयार होते ते आपण वर पाहिले. शरीरात रोज ठराविक लालपेशी नष्ट होतात आणि त्या प्रमाणात बिलीरुबिन तयार होते. समजा एखाद्याला या पेशींचा ‘सिकलसेल’ आजार आहे. यात त्या पेशींचे आयुष्य नेहमीच्या फक्त एक षष्ठांश असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा नाश होतो. त्यानुसार आता खूप मोठ्या प्रमाणात बिलीरुबिन तयार होते.
आता मात्र त्यावर प्रक्रिया करण्याची यकृताची क्षमता (अधिक काम करुनही) अपुरी पडते. त्यामुळे संयोग न झालेले बिलीरुबिन रक्तात साचते आणि रुग्णास कावीळ होते. हे बिलीरुबिन पाण्यात विरघळणारे नसल्याने ते लघवीवाटे उत्सर्जित होत नाही. अशा रुग्णामध्ये डोळे पिवळे पण लघवी मात्र नेहमीच्याच (normal) फिकट रंगाची असे वैशिष्ट्य दिसून येते.

यकृतातील बिघाडाने होणारी कावीळ
या गटात ‘हिपटायटीस –ए’ या विषाणूमुळे होणारा संसर्ग हे आपल्या आणि अन्य अविकसित देशांमधले महत्वाचे कारण आहे. हा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतून हे विषाणू पसरवले जातात. आपल्याकडे दाट लोकवस्ती, गलिच्छ राहणीमान आणि मैलावहनाच्या सदोष यंत्रणा हे सर्व एकत्रित आढळून येते.
त्यामुळे हे विषाणू अन्न व पाण्याला दूषित करतात. त्यातून पसरणाऱ्या या आजाराच्या साथी हा काही वेळेस गंभीर विषय असतो. या रुग्णांमध्ये डोळे व लघवी दोन्ही पिवळ्या रंगाचे असतात. दर पावसाळ्यात अनेक सरकारी रुग्णालये ही या काविळीच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतात. या साथींच्या दरम्यान सार्वजनिक निवासांतून राहणारे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी यांनी विशेष सावधगिरी बाळगायची असते.

पित्तनलिकेत अडथळा झाल्याने होणारी कावीळ
या गटात ‘पित्तखडे’(gallstones) हे उदाहरण बघूया. हे खडे आपल्या पित्त यंत्रणेत काही कारणांमुळे तयार होतात. ते जर पुरेशा मोठ्या आकाराचे झाले तर ते नलिकेत मोठा अडथळा आणतात. त्यामुळे पित्ताचा प्रवाह थांबतो आणि यकृतातून सोडलेले संयुगित बिलिरूबिन आतड्यांत पोचत नाही. मग ते रक्तात साठते आणि कावीळ होते. हे बिलिरूबिन लघवीतून उत्सर्जित होते.
या रुग्णांमध्ये आतड्यात stercobilin तयार न झाल्याने त्यांच्या विष्ठेचा रंग हा पांढुरका असतो. जर खूप मोठ्या खड्यांमुळे नलिका पूर्ण बंद झाली तर हा रंग चक्क चुन्यासारखा असतो. थोडक्यात पिवळे गडद डोळे, पिवळीजर्द लघवी मात्र पांढुरकी विष्ठा ही या रुग्णांची वैशिष्ट्ये होत.
पित्तखड्यांचा आजार हा समाजातील सधन वर्ग आणि विकसित देशांमध्ये तुलनेने अधिक आढळतो. रिफाईन्ड साखरेचे पदार्थ भरपूर खाण्याशी त्याचा जवळचा संबंध आहे.

वरील विवेचनावरून काविळीचे मूलभूत प्रकार आणि त्यांच्यातील फरक वाचकांच्या लक्षात यावेत. त्या प्रत्येक प्रकाराची अनेक कारणे असतात पण त्यांची जंत्री करणे हा या लेखाचा उद्देश नाही. आपल्या शंकांच्या अनुषंगाने योग्य ती पूरक माहिती प्रतिसादांतून देता येईल.

समारोप
हिमोग्लोबिनच्या ‘हीम’चे विघटन होऊन बिलिरूबिन तयार होते. त्यावर यथायोग्य प्रक्रिया करण्याचे महत्वाचे काम यकृत करते. निरोगी अवस्थेत ते रक्तात अल्प प्रमाणात असल्याने जणू गोगलगायीसारखे गरीब असते. पण जेव्हा काही आजारांमध्ये त्याचे प्रमाण वाढू लागते तेव्हा मात्र ते नागासारखा फणा वर काढते ! असंयुगीत बिलिरूबिन जर रक्तात खूप वाढले तर ते मेंदूला गंभीर इजा करते. हे लक्षात घेता काविळीच्या रुग्णाने कुठल्याही अशास्त्रीय उपचाराच्या नादी न लागता तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. समाजात ‘हिपटायटीस –ए’मुळे नित्यनेमाने होणारी कावीळ ही सार्वजनिक आरोग्यरक्षण फसल्याचे निदर्शक असते. तर तान्ह्या बाळाची औट घटकेची सौम्य कावीळ हा सामान्यजनांसाठी कुतूहलाचा विषय असतो.
**********************************
विनंती : या आरोग्य लेखमालेचा उद्देश "सर्वांसाठी हसत खेळत सामान्यज्ञान" हा आहे. या लेखनासाठी मी अधिकृत पाठयपुस्तके आणि जालावरील फक्त डॉक्टरांना उपलब्ध असणारी संस्थळे यांचा वापर केला आहे. चर्चेदरम्यान आपण एक पथ्य पळूयात का? संस्थळांचे भरमसाठ दुवे इथे देणे किंवा जालावरचे मोठमोठे इंग्लिश परिच्छेद इथे डकवणे या गोष्टी टाळल्यास बरे होईल. शोधनिबंध लिहायचे हे ठिकाण नाही हे तर आपण जाणतोच. लेखनातून 'मिपा'चे मराठीपण जपणे हेही आपल्याच हातात आहे. धन्यवाद!

आरोग्यलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

20 Dec 2017 - 11:02 am | आनन्दा

सुंदर माहिती आहे

विजुभाऊ's picture

20 Dec 2017 - 11:05 am | विजुभाऊ

छान माहिती दिलीत हो.
या बेलरुबीनचा आपल्या शरीराला नक्की काय उपयोग होतो? ते अगदीच नसेल तर काय होईल?

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 12:04 pm | कुमार१

आनंदा व विजुभाऊ, आभार
बिलिरुबिन हा मुळात हीम च्या विघटना तील उत्सर्जित पदार्थ आहे.
तो पेशींमध्ये antioxidant असे काम करतो असे गृहितक आहे. पण त्याला तितकेसे महत्व नाही

रंगीला रतन's picture

20 Dec 2017 - 12:26 pm | रंगीला रतन

छान माहिती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2017 - 12:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

अ‍ॅलोपथी मधे काविळीवर उपाय नाही पण या काविळीवर झाडपाल्याचे औषध देणारे अनेक जण आहेत असे बरेचदा ऐकण्यात येते. त्या बद्दल पण तुमचे मत वाचायला आवडेल.

तसेच काविळीत उसाचा रस प्या असा एक सल्ला दिला जातो त्याचा काय फायदा असतो?

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

20 Dec 2017 - 8:08 pm | सुबोध खरे

काविळीवर झाडपाल्याचे औषध देणारे अनेक जण आहेत
अन्न किंवा पाण्यातून जाणाऱ्या विषाणूमुळे होणारी कावीळ "हिपॅटायटीस ए आणि इ" याचे प्रमाण भारतात जास्त आहे. अधिकृत आकडेवारी प्रमाणे हे प्रमाण दरवर्षी २ ते ३ लाख आणि अनधिकृत अंदाजाप्रमाणे ५ लाखाच्या आसपास आहे. म्हणजे सरकारी किंवा खाजगी डॉक्टरकडे न जाता झाडपाल्याची औषधे करणाऱ्यांचे प्रमाण अधिकृत आकड्याइतकेच आहे. http://ncdc.gov.in/writereaddata/linkimages/NewsLtr0103_20146480274026.pdf
या पैकी ९९% लोक स्वतःहून बरे होतात (म्हणजेच ४ लाख ९५ हजार)
हिपॅटायटीस बी चे प्रमाण तर याहूनही फारच जास्त आहे जगात २०० कोटी लोकांना याचा संसर्ग होतो यापैकी ३५ कोटी लोकांनाच हा आजार जुनाट(CHRONIC) होतो. त्यातील भारतात हिपॅटायटीस बी चे प्रमाण ५ कोटी एवढे आहे. यापैकी ८० लाख लोक (CHRONIC) जुनाट हिपॅटायटीस बी मध्ये जातात बालकांमध्ये (CHRONIC) जुनाट हिपॅटायटीस बी होण्याचे प्रमाण जास्त आहे ३० % तर ५ % प्रौढ लोक (CHRONIC) जुनाट हिपॅटायटीस बी मध्ये जातात. प्रौढापैकी २ कोटी लोकांना हिपॅटायटीस बी होतो
याचाच अर्थ असा आहे कि १ कोटी ९० लाख प्रौढ लोकांची कावीळ "बरी" होते https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5606974/
या तुलनेत इतर काविळीचे प्रमाण लाखात नसून दहा हजारात आहे.
एकंदर विषाणूसंसर्गामुळे होणारे काविळीचे रुग्ण ५ कोटी ५ लाख इतके आहेत यापैकी ४ कोटी लोकांची कावीळ स्वतःहून बरी होते.
( जशी सर्दी हा विषाणू जन्य रोग आहे तसाच विषाणूजन्य कावीळ हाही आहे आणि जशी सर्दी स्वतःहून बरी होते तसेच बहुसंख्य विषाणूजन्य कावीळीचे रुग्ण स्वतःहून बरे होतात. मग त्यासाठी तुम्ही तुळशीच्या पाल्याचा काढा घ्या नाहीतर कोंबडीच्या विष्ठेचे कढण करून घ्या.
काही दश सहस्त्र कावीळ (जी विषाणूजन्य नाही) आणी जिच्या साठी उपचाराची गरज आहे विरुद्ध काही कोटी जे स्वतःहून बरे होणार आहेत.
म्हणून गावो गावी असे कुडबुडे उगवतात जे काविळीवर औषध देतात. यातील काही लोक फुकट औषध देतात( त्यांना फुकट प्रसिद्धी मिळते). इतर लोक कमीजास्त पैसे घेऊन देतात.( भारतीय मनोवृत्ती अशीच आहे --स्वस्त ते मस्त आणि फुकट ते पौष्टिक)
आपली कावीळ काहीही न घेता प्रौढात ९५ % ते ९९% बरी होणार आहे मग तुम्ही औषध घ्या नाहीतर घेउ नका. त्यांना एवढ्या मोठ्या संख्येत फुकटचे श्रेय मिळणार आहे.
याचा साधा अर्थ असा आहे कि जर आपल्याला कावीळ झाली तर आपल्या डॉक्टरांकडे जा आणि चाचण्या करून घ्या. बहुसंख्य वेळेस आपली कावीळ बरी होणारीच आहे. ( मारवाडी वृत्तीच्या लोकांनी चाचण्या करण्यासाठी एक महिना थांबले तर ९५-९९ % काहीही नुकसान होणार नाही).पण तुम्ही या ९५-९९ टक्क्यात आहेत कि उरलेल्या १-५ टक्क्यात आहात हे चाचणीशिवाय डॉक्टर सांगू शकत नाहीत.
जर एक महिन्यात काविळ बरी झाली नाही तर मामला गंभीर आहे समजून उपचार करणे आवश्यक आहे

जागु's picture

20 Dec 2017 - 1:03 pm | जागु

खुप माहितीपूर्ण लेख.
लहान मुलांमधली कावीळ पाहीली आहे. तेव्हा डॉ. मुलांना कोवळे उनही द्यायला सांगतात. ह्या बद्दल थोड स्पष्टीकरण द्या.

अ‍ॅलोपथी मधे काविळीवर उपाय नाही >>≥≥ अर्धवट विधान.
काविळीची खूप कारणे आहेत आणि त्यानुसार योग्य उपाय जरूर आहेत. 'हिपटायटीस- ए' साठी खास औषध नाही हे मान्य.
लक्षात घ्या की 'कावीळ' हर केवळ विविध आजारांचे बाह्य चिन्ह आहे. ते' निदान' नव्हे!
झाडपाला>>≥> माझा अभ्यास नसल्याने पास.…..
उसाचा रस >>>> त्यातील ग्लुकोज पचायला हलके म्हणून.
यकृत बरे नसताना मेद पदार्थ पचणार नाहीत

नेहमीप्रमाणे छान माहिती.

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 1:54 pm | कुमार१

तेव्हा डॉ. मुलांना कोवळे उनही द्यायला सांगतात. >>>

शास्त्रीय उपाय असा आहे:
त्याला phototherapy (blue light) म्हणतात. या प्रकाशाने बिलिरुबिनचे अन्य सौम्य रसायनांमध्ये रुपांतर होते व ती उत्सर्जित होतात.
आता सूर्यप्रकाश की कृत्रिम प्रकाश हा भरपूर संशोधन झालेला विषय आहे.
Phototherapy ची सोय नसलेल्या ठिकाणी हा नैसर्गिक पर्याय उपयुक्त ठरतो

वकील साहेब's picture

20 Dec 2017 - 2:15 pm | वकील साहेब

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. आवडला.
आमच्याकडे ही काही जण कावीळी वर हमखास इलाज करेल असे झाडपाल्याचे औषध देतात. अनेक जणांना गुण हि येतो. याबाबत संशोधन व्हायला हवे.

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 3:14 pm | कुमार१

सर्वांचे आभार !
@वकील साहेब, संशोधन जरूर व्हावे . मात्र रोगनिदान न करता उपचार कधीही करू नयेत

सचिन काळे's picture

20 Dec 2017 - 4:20 pm | सचिन काळे

माहितीपूर्ण लेख! बऱ्याचशा गोष्टी नव्याने कळल्या.

दीपक११७७'s picture

20 Dec 2017 - 4:25 pm | दीपक११७७

छान लेख,
धन्यवाद!

गावठी फिलॉसॉफर's picture

20 Dec 2017 - 4:38 pm | गावठी फिलॉसॉफर

लयभारी

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 5:17 pm | कुमार१

सचिन, दीपक व गा फि : उत्साहवर्धना बद्दल आभार !

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 5:17 pm | कुमार१

सचिन, दीपक व गा फि : उत्साहवर्धना बद्दल आभार !

सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती समजावणारा लेख. पुभाप्र.

सुबोध खरे's picture

20 Dec 2017 - 8:18 pm | सुबोध खरे

पित्तनलिकेत अडथळा झाल्याने होणारी कावीळ
या काविळीला अडथळ्याची (OBSTRUCTIVE) /सर्जिकल जॉन्डिस असेही म्हणतात. याचे एक सर्वात जास्त असणारे उदाहरण (MOST COMMON) म्हणजे पित्तनलिकेतील खडे आहे यांनतर जास्तीत जास्त आढळणारे उदाहरण म्हणजे पित्तमार्गाचा किंवा यकृताचा कर्करोग.
आपल्या काविळीची चाचणी केल्यावर जर अशी अडथळ्याची कावीळ आढळली तर त्यावर ताबडतोब इलाज करणे आवश्यक आहे.
वर म्हटल्याप्रमाणे आपली कावीळ जर दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत असेल किंवा (फारतर) एक महिन्यात बरी होत नसेल तर त्याच्या चाचण्या आणि उपचार करणे आवश्यक असते.
पाच महिने एक आयुर्वेदाचार्य काविळीवर औषध देत होते आणि शेवटी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनोग्राफी साठी पाठवल्यावर या गृहस्थांना स्वादुपिंडाचा कर्करोग (मोठ्या लिंबाएवढा) असल्याचे आढळले. हे महाशय मला म्हणाले कि अहो तुम्ही दिवाळीच्या तोंडावर काय बातमी दिलीत? आता रुग्णाची दिवाळी चांगली कशी जाणार? मी गप्प बसलो
(फक्त मनात म्हणालो पुढच्या वर्षीची दिवाळी त्यांना दिसण्याची शक्यता फार कमी आहे कारण सत्यं आपि अप्रियं न ब्रूयात)
http://www.telegraph.co.uk/technology/apple/8841347/Steve-Jobs-regretted...

सतिश गावडे's picture

20 Dec 2017 - 9:23 pm | सतिश गावडे

काविळीवर झाडपाल्याचे औषध देणारे अनेक जण आहेत

आमच्या गावी खूप पूर्वी एक बुजुर्ग व्यक्ती घोटविलीच्या* वेलीचे तुकडे गरम करुन त्याचे कावीळ झालेल्या व्यक्तीस डाग देत असे. डाग घेणारी व्यक्ती ठोठो बोंबलत असे. मात्र या "उपचारानंतर" कावीळ बरी होत असे त्यामुळे खुप दुरुन कावीळ झालेले लोक डाग घ्यायला येत असत.

*ही वेल कोकणात सर्वत्र आढळते.

कुमार१'s picture

20 Dec 2017 - 9:33 pm | कुमार१

मित्रहो,
पुन्हा एकदा लक्षात घ्या की "कावीळ" एवढाच शब्द हे 'निदान' होत नाही.
रोगनिदान असे असते :
१. हिपटायटीस A मुळे झालेली कावीळ
२. पित्तखड्यांमुळे झालेली का. इत्यादी

निदान न करता "झाडपाला" देणे हा अशास्त्रीय उपाय होय.

गामा पैलवान's picture

21 Dec 2017 - 12:47 am | गामा पैलवान

कुमारेक,

दोन अनुभव आहेत.

१. भावकीतला नातेवाईक. ठाण्यात वास्तव्य. वय अंदाजे चाळीस. सुरतेहून साड्या आणून ठाण्यात विकायचा धंदा. व्यवस्थित चालला होता. बायको एलायसीत मुलगी नववीत वगैरे. मोठी बहीण दूरगावी तिच्या नवऱ्याच्या नोकरीच्या ठिकाणी. या माणसाला अचानक कावीळ झाली. बहुतेक सुरतेचा प्रसाद! त्यावेळी सुरत गलिच्छपणासाठी प्रसिद्ध होतं. पंधरा दिवस नामांकित अलोपाथी रुग्णालयात भरती (ठाण्यातलं प्रसिद्ध देवधर हॉस्पिटल). पण उतार शून्य. उत्तरोत्तर कावीळ बळावली आणि शेवटी देहांत. आम्हाला कळला तो थेट मृत्यूच. पुढच्याच आठवड्यात ते लोकं आमच्याकडे चहाला येणार होते.

२. दुसरी गोष्ट तीन चार वर्षांनी घडली. अगदी घरचीच. माझा धाकट्या भाऊ, वय वर्षे दहाचा असतांना. अचानक पोट दुखायला लागलं. कौटुंबिक डॉक्टर आयुर्वेदिक (बीएएमेस). त्याने अलोपथी रुग्णालयात दाखल करायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्याला चरईतल्या एका रुग्णालयात दाखल केलं. दोन दिवस सलाईनवर ठेवला. पोट दुखायचं थांबलं. पण जरा काही खाल्लं की परत दुखणं सुरू. काविळीचं निदान नाही. कावीळ कुठेही 'दिसंत' नव्हती. तिसऱ्या दिवशी आलयमुक्ती (डिसचार्ज) मिळाली. पण पोटदुखी कायम. मात्र निदान काही नाही.

माझा एक मित्र सहज म्हणून घरी आला होता. त्याने काविळीचा संशय व्यक्त केला आणि एका औषधवाल्याचा पत्ता सांगितला (गोखले रोडावरच्या मधुमालती सोसायटीतले कुलकर्णी). काविळीचा पहिला अनुभव गाठीशी असल्याने ताबडतोब हालचाली केल्या आणि तिकडे आम्ही चौघेही पोहोचलो. माणूस अगदी भला, सगळे कुटुंबीय अगदी सालस. त्यांच्या मुलीने तर मला समर्थ भांडारच्या नाक्यावर असतोस ना, म्हणून ओळखलं सुद्धा.

बुवांनी दुसऱ्या दिवशी दही घेऊन यायला मला सांगितलं. त्यात औषध कुटून घालणार होते. नुकत्याच झालेल्या रुग्णालयवारीमुळे आम्हांस कुणाला घरी लक्ष द्यायला जमलं नव्हतं. त्यामुळे घरात दही नव्हतं. तेव्हा त्यांनी स्वत:च्या घरचं दही द्यायचं कबूल केलं. बाजारचं नको म्हणाले. भावाला बघून सांगितलं की काविळीची सुरुवात आहे. आजून डोळ्यांत उतरली नाहीये. त्यामुळे तीन दिवसांचं औषध पुरेसं आहे, पण त्यानंतर चार महिने कडक पथ्य पाळावं लागेल. पुढे बोलता बोलता असंही म्हणाले की पिवळा रंग नसल्याने भावाला तिथे आणायची गरजही नव्हती. विश्रांती घेऊ द्यायची होती. पण आणलात तर ठीक आहे.

मग दुसऱ्या दिवशी गेलो आणि दह्यात घातलेलं एक वाटीभर औषध आणलं. तीन दिवसांत पोटदुखी थांबली. अर्थात पुढचे चार महिने त्यांनी सांगितलेलं पथ्य कसोशीने पाळलं.

कुलकर्ण्यांनी एक छदामही घेतला नाही.

असो.

काविळीचा संशय आला तर काय करायचं ते माझ्यापुरतं मी ठरवलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

पित्तखडे हे बायकांमध्ये जास्त होतात .
हे खडे कोणात जास्त होतात याचे मजेदार उत्तर 4 'F' मध्ये देता येते:
Fat Fertile Females of Forty !
त्यांचा स्त्री-हॉर्मोन्स शी संबंध आहे. गरोदरपणात ही शक्यता वाढते

संजय पाटिल's picture

21 Dec 2017 - 1:29 pm | संजय पाटिल

तुमचे सगळे लेख वाचले. अतिशय सोप्या भाषेत फारच उपयुक्त माहिती देत आहात. पुढिल लेखाच्या प्रतिक्षेत....

अस्वस्थामा's picture

21 Dec 2017 - 3:14 pm | अस्वस्थामा

छान माहिती.
एक विनंती, तुमचे आत्तापर्यंतचे इतर रिलेटेड लेख (इन्सुलिन, हिमोग्लोबिन, इ.) एकत्र करून एकाच अनुक्रमणिकेबरोबर लेखमाला म्हणून संग्रहित करता आले तर खूप छान होईल. कल्पना आवडल्यास संपादकांशी बोलून कसे जमेल ते बघता येइल तुम्हाला.

अस्वस्थामा's picture

21 Dec 2017 - 4:14 pm | अस्वस्थामा

संपादक अथवा साहित्य संपादक यांच्याशी संपर्क कराल तर लगेच होईल.

अस्वस्थमा, तुमच्या सूचनेनुसार संपर्क केला आहे
आभार

कुमार१'s picture

21 Dec 2017 - 3:35 pm | कुमार१

संजय, आभार
तुमच्या सारख्या जाणकार वाचकांच्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत
अस्वथामा, आभार. कल्पना चांगली आहे
त्यासाठी काय करू ते सांगता का?

अभिजीत अवलिया's picture

21 Dec 2017 - 3:55 pm | अभिजीत अवलिया

लेख आणि डाॅॅ. खरेंंचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

अभिजित, अभिप्रायाबद्दल आभार !

सर्व वाचक व प्रतिसादकांचे आभार. आपल्या सहभागाने चर्चा चांगली झाली. सध्या लिहीत असलेल्या या लेखमालेच्या निमित्ताने हे मनोगत.

सध्या अनेक माध्यमांतून बरेच आरोग्य लिखाण चालू असते. त्यातील बरेचसे हे 'आजार-केंद्रित' असते. या मालेत मी थोडा वेगळा प्रयोग करत आहे. आतापर्यंतचे विषय ( इन्सुलिन, कोलेस्टेरॉल, हिमोग्लोबिन व बिलिरुबिन) पाहता हे लक्षात येईल. शरीरातील एखाद्या महत्वाच्या रासायनिक पदार्थाला मध्यवर्ती भूमिका दिली आहे. म्हणजेच ही माला 'पदार्थ-केंद्रित' आहे. त्या पदार्थाची मूलभूत माहिती, इतिहास आणि मग संबंधित आजार असा येथे दृष्टीकोण आहे.

तर मग असाच एक महत्त्वाचा पदार्थ (biomolecule) घेऊन भेटूयात नववर्षात !
धन्यवाद

गामा पैलवान's picture

23 Dec 2017 - 11:22 am | गामा पैलवान

धन्यवाद कुमारेक. माहिती व चर्चा रोचक असेल. :-)
आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

23 Dec 2017 - 2:41 pm | अमितदादा

उत्तम लेख डॉक्टर. खूप चांगली माहिती.
कालच एक बातमी सकाळ वर वाचली की एका रुग्णाच सर्व रक्त काडून शरीराचं तापमान 18 c आणून हृदयावर शस्त्रक्रिया केली, या तापमानास मेंदू कमी ऑक्सजन वर काम करतो वैगेरे. थक्क झाले बातमी वाचून. त्या बातमी खाली एक कॉमेंट होती की कमी तापमानात शरीर श्वसन यंत्रणा बंद करते आणि मेंदू ला ही कमी तापमानात कमी ऑक्सिजन लागतो ज्याचा शोध युरोप मध्ये अनवधानाने लागला. त्याची लिंक सापडत नाही आणि एक्साक्ट डिटेल आठवत नाहीत. परंतु तुमच्या भाषेत यावर एक स्वतंत्र लेख वाचायला आवडेल.
याच्या अगोदर सुद्धा पाण्यात बुडून श्वसनक्रिया बंद झालेल्या व्यक्तीस तुम्ही वाचवू शकता असा काहीसा शोध स्विस डॉक्टर ने याच संबंधाशी लावलेला वाचलं होतं आता आठवत नाही. अर्थात याला काही time लिमिट आहे.

अमितदादा's picture

23 Dec 2017 - 2:47 pm | अमितदादा

तुम्ही लेखाच्या शेवटी केलेल्या विनंती नुसार जर माझा प्रश्न अयोग्य असेल तर कृपया इग्नोर मारावा. फक्त माहिती घेणे हा त्या प्रश्न बाबतचा उद्देश होता।

कुमार१'s picture

23 Dec 2017 - 2:58 pm | कुमार१

अमित, आभार.
तुमचा प्रश्न व कुतूहल मस्त आहे.
अर्थात त्या विषयावर माझे वाचन नाही
पण सवडीने बघू

कुमार१'s picture

7 Oct 2020 - 3:03 pm | कुमार१

यंदाचे ‘नोबेल’ हिपटायटीस- C या विषाणूच्या शोधाबद्दल मिळालेले आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या यकृतदाहाची माहिती :

* जागतिक व्याप्ती : १७ कोटी जणांना संसर्ग; त्यापैकी ७ कोटी लोकांचा हजार दीर्घकालीन होतो.

* संसर्गाचे मार्ग:
१. इंजेक्शन द्वारा अमली पदार्थ घेणे( सुया निर्जंतुक नसल्याने )
२.पुरुष समलैंगिकता; गुदसंभोग

३. गोंदणे, दाढीच्या वस्तर्यांचा सामायिक वापर
4.Acupuncture (दूषित सुया)
५.गर्भवती कडून बाळास

*आजाराचे स्वरूप : 75 टक्के लोकांमध्ये तो दीर्घकालीन होतो. त्यातून यकृत कठिणता (cirrhosis) आणि पुढे कर्करोग होऊ शकतो.

* रोगनिदान : रक्तावरील अँटीबॉडीज व आरएनए चाचण्या

* भवितव्य : प्रभावी विषाणूविरोधी औषधांमुळे बरा होऊ शकतो.