जिसका पी संग बीते सावन

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
18 Dec 2017 - 11:35 pm

जिसका पी संग बीते सावन
उस बिरहन/दुल्हन की रैन सुहागन
- अमीर खुस्रो

तो पावसाच्या सरींनी भिजलेल्या अंगणात आला आहे,
आणि माझ्या डोळ्यांत एकाएकी पूर लोटला आहे. त्याला पाहून माझी नजर पुरती पाणावली आहे.
अंगावर पाऊस झेलत त्याची भिजलेली भारदस्त छाती माझ्या हृदयाच्या ठोक्यानिशी भरून येते आहे, आणि खोल जाते आहे तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकत आहे.
तशीच अचानक वीज कडाडली आणि तो परस्परांतला श्वासांचा बंध तुटला. पावसाला तो मुळीच भावला नसावा.
त्याचे डोळे माझ्यावर स्थिर होत आहे जणू या भर पावसातही अनामिक तृष्णा लागून राहावी आणि माझ्या डोळ्यांमध्ये त्या तृष्णेची अपरंपार तृप्ती असावी.
वेलीसारखे माझे अंग त्याच्याकडे ओढले जात आहे, त्याच्या ओल्या तजेलदार पावलांवर माझी नजर ही अशी खिळली आहे, म्हणून वरमलेल्या माझ्या पापण्यांतून अश्रू आणि तसाच वरून पाऊस चढाओढीने त्या पावलांवर निखळ झरतो आहे.
माझी काहिली काहिली विरहावस्था अशी पावसात भंग करून माझ्यासमोर तो स्वस्थतेने हसत उभा आहे, माझे मन त्याला दूषणं देत आहे; मी नजर उंचावतो आणि तो आणखीन अधिक हास्य विलसावत माझ्या भिजलेल्या शरीरावर उष्ण हातांचा स्पर्श करत आहे. मी डोळे गच्च मिटून तो स्पर्श मनात रूजवून घेत आहे, पुढे येणाऱ्या विरहाला सुसह्य करणारी स्मृती म्हणून आणि तेवढ्यात त्याची मिठी मला हा सभोवरचा पाऊस विसरायला लावत आहे. घनघोर पाऊसवाऱ्यात माझ्या प्रियकराच्या घनगंभीर आलिंगनाने सारे अस्तित्व केवळ त्याचे त्याचेच झाले आहे, मी पुरता पावसात विखरून गेलो आहे.
हा श्रावण आला आहे, माझा विरह लुटायला..

मांडणी