काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता . त्याचे निमित्त साधून मी खालील कविता केली होती
ज्ञानियांचे राजे तुम्ही
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर
आळंदीचा स्वर्ग करूनी
दाविला आम्हां ईश्वर ||धृ||
पिता विठ्ठलपंत कुलकर्णी
संन्यास धर्म आचरती
ज्ञानदेव सोपान मुक्ताई
आणि थोरले पुत्र निवृत्ती ||१ ||
बाळपणी माता पिता हरपले
होती चार भावंडे अनाथ
जगी तारण्या तूंचि विठ्ठला
तूंचि असे श्री गुरुनाथ ||३ ||
ब्रह्मवृंदांनी शोषण करिता
दूर पळाली सर्व सुखे
वेद शास्त्र संपन्न पंडित
ऐकती वेद रेड्यामुखे ||४||
हठयोगी चांगदेव महाराज
लवाजम्यासह येती दर्शनास
ज्ञानदेव चालवीती निर्जीव भिंत
सृष्टी वरील सत्ता येई प्रत्ययास ||५||
पंचमहाभूतांवरी तुमचे असे प्रभुत्व
पंचाग्नी तप्त करिती शरीर ज्ञानोबा
मांडे भाजता मुक्ताई त्यावरी
पाय धरण्यासी आले खेचर विसोबा ||६||
अमृताहुनी रसाळ मराठी प्राकृत
लिहीले स्वये गीतेचे सार
भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी ही
पारायण करिता होई आत्मोद्धार ||७||
आजि असे संजीवन समाधी दिन
दर्शन घेण्या जमले भक्त वारकरी जन
अखंडानंदात न्हाती वर्षतो अमृताचा घन
ज्ञानेशाला वैभव करतो वंदन ||८||
--शब्दांकित (वैभव दातार )
१६ नोव्हेंबर २०१७
प्रतिक्रिया
17 Nov 2017 - 6:49 pm | सूड
आले इक्षुदण्ड बोर्डी
भय दाटतसे फार
काव्य कोणते घेऊनि
आले वैभव दातार ॥