हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
15 Nov 2017 - 9:49 am

आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी. लाल रंगाच्या या प्रथिनामुळेच त्या पेशी आणि पर्यायाने आपले रक्त लाल रंगाचे झाले आहे.

शरीरातील प्रत्येक पेशीला तिचे काम करण्यासाठी सतत ऑक्सीजनची गरज असते आणि त्यासाठी हिमोग्लोबिनला सतत, न थकता ऑक्सीजनच्या वाहतुकीचे काम करावेच लागते. सर्व पेशी त्यांचे काम करताना कार्बन डाय ऑक्साइड सोडतात आणि तो फुफ्फुसांकडे पोचवायाचे कामही या हिमोग्लोबिनने पत्करलेले आहे. त्याच्या या जगण्याशी संबंधित मूलभूत कामावरून त्याची महती आपल्या लक्षात येईल.

हिमोग्लोबिनची मूलभूत रचना, त्याचे प्रकार, त्याचे रक्तातील योग्य प्रमाण टिकवण्यासाठी घ्यावा लागणारा आहार, ते प्रमाण बिघडल्यास होणारे आजार आणि वाढत्या प्रदूषणाचा हिमोग्लोबिनवर होणारा परिणाम याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
हिमोग्लोबिनचा शोध १८४०मध्ये Friedrich L. Hunefeld या जर्मन वैज्ञानिकांनी लावला. एका गांडूळाच्या रक्ताचा अभ्यास करताना त्याना हा शोध लागला. नंतर १९३५मध्ये Linus Pauling या दिग्गजाने त्याचा सखोल अभ्यास करून त्याच्या रचनेवर शिक्कामोर्तब केले.
आपण त्या रचनेबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

हिमोग्लोबिन = हीम + ग्लोबीन

१. ग्लोबीन हे प्रथिन असून त्याचा एक भलामोठा सांगाडा असतो. त्याला नंतर हीम जोडले जाते.
२. हीम हा ही एक गुंतागुंतीचा रेणू असून त्यात मध्यभागी लोहाचा (Iron) अणू विराजमान झालेला असतो.
थोडक्यात ही रचना अशी आहे, की ग्लोबीनचा सांगाडा ही जणू एक शानदार अंगठी आहे आणि त्यातील लोह हे त्या अंगठीच्या कोंदणात बसलेला हिरा आहे!
यावरून हिमोग्लोबिनच्या रचनेत लोहाचे महत्व किती आहे हे लक्षात येईल. पेशींना नवे हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाच्या पुरेश्या साठ्याची सतत गरज असते. त्यासाठी आपल्या आहारात पुरेश्या प्रमाणात लोह असणे आवश्यक आहे.

आपल्या आहारातील लोह, त्याचे प्रकार आणि त्याचे पचनसंस्थेतून होणारे शोषण हा एक गुंतागुंतीचा आणि रोचक विषय आहे. आहारातील लोह हे दोन प्रकारच्या स्त्रोतांमधून मिळते:

१. शाकाहारातून मिळणारे लोह हे ‘फेरिक क्षारां ’ च्या रुपात असते. त्याचे शोषण होण्यासाठी मात्र ते ‘फेरस’ स्वरूपात करणे आवश्यक असते. याकामी ‘क’ जीवनसत्व हे मोलाची भूमिका बजावते. म्हणून जेवणामध्ये लिंबाचा समावेश नेहमी आवश्यक आहे.
२. याउलट मांसाहारातून मिळणारे लोह हे हीम (फेरस) स्वरूपात असते. त्याचे शोषण हे सहजगत्या व अधिक प्रमाणात होते.
समजा आपण १० मिलिग्रॅम इतके लोह आहारात घेतले आहे. तर शाकाहाराच्या बाबतीत त्यातले १ मिलिग्रॅम तर मांसाहाराच्या बाबतीत मात्र २ मिलिग्रॅम एवढे शोषले जाईल.

शाकाहारातील सर्वांना परवडणारा लोहाचा एक स्त्रोत म्हणजे पालक आणि तत्सम पालेभाज्या. आता हा पालक लोहाने गच्च भरलेला आहे खरा, पण त्यात एक गोची आहे. या पानांत जे oxalic acid आहे ते त्यातील लोहाला घट्ट बांधून ठेवते. आता ते लोह सुटे करण्यासाठी आपण ती भाजी शिजवतो तसेच खाताना त्याबरोबर लिंबाचाही वापर करतो. पण तरीही ते लोह आतड्यात फारसे शोषले जात नाही. म्हणजे ‘आडात भरपूर आहे पण पोहऱ्यात फारसे येत नाही’ असा प्रकार इथे होतो. म्हणून शाकाहारातून व्यवस्थित शोषले जाईल असे लोह मिळवायचे असेल तर पालकापेक्षा सुकामेवा (मनुका, बेदाणे इ.) हा स्त्रोत सरस ठरतो.

शरीराला लोहाची जी गरज आहे ती बघताना त्यातील लिंगभेद ध्यानात घेतला पाहिजे. तरुण स्त्रीच्या शरीरातून मासिक रक्तस्त्रावामुळे लोह निघून जाते. त्यामुळे तिला पुरुषापेक्षा दीडपट अधिक लोह आहारातून लागते. या मुद्द्याकडे समाजात खूप दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळे अपुऱ्या हिमोग्लोबिननिशीच असंख्य स्त्रिया त्यांचे आयुष्य कंठीत असतात.

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय (anemia) समाजात खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. आज जगभरात सुमारे १०० कोटी लोक याने बाधित आहेत. गरीब देशांमधील परिस्थिती तर अधिक दारुण आहे. आपल्या देशात अंदाजे निम्म्या स्त्रिया आणि दोन तृतीयांश बालके रक्तक्षयाने बाधित आहेत. गरीबी आणि आहारविषयक अज्ञान ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. तसेच अन्नातील लोहाचे अपुरे शोषण हाही मुद्दा महत्वाचा आहे. समाजाच्या सर्व थरातील लोकांना माफक प्रमाणात का होईना पण नियमित लोह मिळावे या उद्देशाने ‘लोहयुक्त मिठाची’ निर्मिती करण्यात आलेली आहे.

प्रौढ माणसात जे हिमोग्लोबिन असते त्याला Hb A1 असे म्हणतात. त्याच्या रचनेत थोडे बदल होऊन काही सुधारित हिमोग्लोबिनस तयार होतात. त्यातील Hb A1c हा प्रकार आपण समजून घेऊ
. आपल्या रक्तात ग्लुकोज संचार करत असतो. त्यातला काही लालपेशीमध्ये शिरतो आणि हिमोग्लोबिनच्या काही मोजक्या रेणूंना जोडला जातो. या संयुगाला Hb A1c असे नाव आहे. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यास Hb A1c चेही प्रमाण वाढते. म्हणूनच मधुमेहींमध्ये Hb A1c हे वाढलेले असते. सध्या या रुग्णांमध्ये Hb A1c ची रक्तचाचणी नियमित केली जाते. त्यानुसार उपचारांमध्ये फेरफार करावे लागतात.

हिमोग्लोबिन हे ऑक्सीजन व कार्बन डाय ऑक्साइडची रक्तात वाहतूक करते ते आपण वर पाहिले. या दोघांव्यतिरिक्त ते अजून एका वायुला जबरदस्त आकर्षून घेते आणि तो आहे कार्बन मोनो ऑक्साइड ( CO ). त्या दोघांचे जे संयुग तयार होते त्याला ‘कार्बोक्सीहिमोग्लोबिन’ (HbCO ) म्हणतात. निसर्गाने मानवाला जी मूळ हवा दिलेली होती तिच्यात CO चे प्रमाण नगण्य होते, तर ऑक्सिजनचे भरपूर. पण माणसाच्या अनेक ‘उद्योगां’मुळे जे हवा-प्रदूषण झाले त्याने CO चे प्रमाण बेसुमार वाढलेले आहे. ते होण्यास वाहनजन्य प्रदूषण मुख्यतः जबाबदार आहे. गेले महिनाभार आपण या संबंधीच्या राजधानी दिल्लीतील बातम्या वाचत आहोत. त्यावरून या प्रश्नाची तीव्रता कळेल.
यातली मूलभूत कल्पना आता समजावून घेऊ. हिमोग्लोबिनच्या जवळ जर O2 आणि CO हे दोन्ही वायू ठेवले, तर त्याचे CO बद्दलचे आकर्षण हे O2 बद्दलच्यापेक्षा २१० पटीने अधिक आहे.

एक मजेदार उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करतो. समजा हिमोग्लोबिन हा एक पुरुष आहे. O2 ही त्याची बायको तर CO ही प्रेयसी आहे! आता प्रेयसीबद्दलचे आकर्षण जर बायकोपेक्षा २१० पट जास्त असेल तर त्याचे परिणाम आपण सगळे जाणतोच !! तोच प्रकार आता आपल्या रक्तात झाला आहे. प्रदूषणाने आपण पर्यावरणातील CO चे प्रमाण बरेच वाढवले. परिणामी बराच CO श्वसनातून रक्तात गेला आणि HbCO चे प्रमाण खूप वाढले. हे HbCO ऑक्सीजन चे रक्तात
वहन करण्यास असमर्थ असते ( एकदा प्रेयसी खूप आवडू लागली की बायको नकोशी होते तसेच!)

शेवटी पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याचे दुष्परिणाम आपण सगळे भोगतो.

सध्या शहरांमध्ये वाढलेल्या CO चे दुष्परिणाम सर्वात जास्त भोगायला लागतात ते चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांना. त्यावर उपाय म्हणून त्यांना कामाच्या दरम्यान मधूनमधून शुद्ध ऑक्सीजन श्वसनातून दिला जातो. अशा “ऑक्सिजन बूथ्स” ची संकल्पना अलीकडे विकसित होत आहे. हे म्हणजे रोगावर मुळापासून उपाय करण्याऐवजी आपण महागडी मलमपट्टी तयार करत आहोत.

हिमोग्लोबिनच्या संबंधित काही महत्वाचे आजार आपण वर पाहिले. आता जनुकीय बिघाडांमुळे (mutations) होणाऱ्या त्याच्या दोन आजारांना ओझरता स्पर्श करतो :
१. सिकल सेलचा आजार आणि
२. थॅलसीमिया
हे जन्मजात विकार जगभरात कमीअधिक प्रमाणात आढळून येतात. भारतात आदिवासीबहुल भागांमध्ये त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा रुग्णांना रक्तक्षय होतो आणि त्यांची शारीरिक वाढ खुंटते.
तर असे आहे हे जीवनावश्यक आणि संरक्षक हिमोग्लोबिन. त्याची मूलभूत माहिती आपण घेतली. हा लेख संपवताना दोन मुद्दे अधोरेखित करतो:

१. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय हा आपला मोठा सामाजिक आरोग्य-प्रश्न आहे. त्याला ‘आजार’ न समजून दुर्लक्ष करणे हे घोर अज्ञान आहे. आपण पूर्णपणे कार्यक्षम असण्यासाठी आपले हिमोग्लोबिन हे उत्तम हवे.
२. वाहनजन्य प्रदूषणामुळे बेसुमार वाढलेला पर्यावरणातील CO आणि रक्तातील HbCO हा गंभीर विषय आहे. त्यावर मुळापासून ठोस उपाय करणे हे आपल्याच हातात आहे.
********************************************************************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

शाकाहारी मासाहारी फरक नसावा अथवा हत्ती, घोडे, हरणं रोड झाले असते अनिमियाने. सतत शिजलेले पदार्थ खाण्यामुळे होत असावा हिमोग्लोबिनचा र्हास.

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 10:08 am | कुमार१

कंजूस, वैद्यकीय पाठ्यपुस्तकांनुसार तो फरक आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी. एखादा माणूस वरून 'रेड्या' सारखा दिसणे आणि त्याच्या रक्तातले हिमो. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

भरपूर कर्बोदके खाउन पोटे सुटलेले खूप जण असतात. पण आहार-अज्ञानामुळे त्यांचे हिमो. कमी असलेले पाहिले आहे.

बरोबर. रोड म्हणजे निस्तेज म्हणतो. डोळ्यांखालची चामडी/त्वचा किंवा नखांच्या बुडाशी निर्जिवपणा दिसणे ही सोपी टेस्ट आहे ना हिमोग्लोबिन पाहण्याची?

तो प्रकार गवतखाऊ प्राण्यांमध्ये दिसत नाही.

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 11:42 am | कुमार१

हा माणसातील गुंतागुंतीचा विषय आहे.शाकाहारातील खाल्लेल्यापैकी जेमतेम १०% शोषले जाते.
प्राण्यांबाबत माझा अभ्यास नाही. कदाचित शोषण जास्ती असेल.

सुबोध खरे's picture

15 Nov 2017 - 12:54 pm | सुबोध खरे

An appropriately planned well-balanced vegetarian diet is compatible with an adequate iron status. Although the iron stores of vegetarians may be reduced, the incidence of iron-deficiency anemia in vegetarians is not significantly different from that in omnivores. Restrictive vegetarian diets (eg, macrobiotic) are associated with more widespread iron-deficiency anemia. Western vegetarians who consume a variety of foods have a better iron status than do those in developing countries who consume a limited diet based on unleavened, unrefined cereals. Whereas phytates, polyphenolics, and other plant constituents found in vegetarian diets inhibit nonheme-iron absorption, vitamin C, citric acid, and other organic acids facilitate nonheme-iron absorption.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/8172127

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 1:26 pm | कुमार१

थोडक्यात, समजून उमजून केलेला संतुलित शाकाहार हवा.
निव्वळ "आमच्याकडे आठवड्यात तिनदा पालकाची भाजी असते, किंवा आम्ही भाजीत गूळ घालतोच" अशी मोघम विधाने कामाची नाहीत.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख.
HbCO च्या निर्मीतीला चालना देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे धूम्रपानाचे व्यसन. आणि चुलीच्या धूरातून देखिल कार्बन मोनॉक्साईड तयार होत असेल ना?

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 11:33 am | कुमार१

पुंबा, आभार.
बरोबर. कुठल्याही अर्धवट ज्वलनातून तो तयार होतो.

आनन्दा's picture

15 Nov 2017 - 11:22 am | आनन्दा

लेख अपुरा वाटला.. काहीतरी राहून गेल्यासारखे वाटतंय

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 11:37 am | कुमार१

शक्य आहे. पण, इथे लिहीताना असा दृष्टीकोन आहे की सामान्य माणसाला आवश्यक व पेलेल इतकेच लिहावे.
जास्त माहितीचा भरणा केल्यास वाचक 'बोअर' होईल असे वाटते.
म्हणून महत्वाच्या मुद्द्यांपुरतेच सिमित ठेवले आहे.
शंकांच्या अनुषंगाने अजून लिहीन.

सुबोध खरे's picture

15 Nov 2017 - 11:35 am | सुबोध खरे

anemia ला पांडुरोग ( पांडुर --पांढरे पडणे यावरून) हा शब्द हि वापरला जातो.
रक्तक्षय हा शब्दप्रयोग बरोबर आहे पण काही लोक त्याचा क्षयरोगाशी (tuberculosis) संबंध जोडतात.

वकील साहेब's picture

15 Nov 2017 - 11:52 am | वकील साहेब

माहितीपूर्ण लेख. धन्यवाद

दीपक११७७'s picture

15 Nov 2017 - 12:12 pm | दीपक११७७

असे एकले आहे की, 0+ tv ह्या रक्त गटाच्या व्यक्तिंचा हिमोग्लोबिन स्तर हा नॉर्मल रेंजच्या लोअर साईडला व त्या खालीच असतो तर A+ tv ह्या रक्त गटाच्या व्यक्तिंचा हिमोग्लोबिन स्तर हा नॉर्मल रेंजच्या अप्पर साईडला असतो व लोह युक्त पदार्थ जास्त खाल्ल्याने या गटाच्या लोकांना हिमोग्लोबिन कमी करावे लागतो.
हे खरं आहे क?

थोड फार अजुबाजुला निरिक्षण केल्यावर मला तथ्य आढळले.

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 12:30 pm | कुमार१

माझ्या वाचनात तरी नाही.
बघावे लागेल

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2017 - 12:23 pm | अत्रुप्त आत्मा

सांत्पणे वाचितो एकदा..

सुबोध खरे's picture

15 Nov 2017 - 12:49 pm | सुबोध खरे

anemia (पांडुरोग) याचे कृमी(hookworm) आणि जंत (roundworm) होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
कृमी (hookworm) हे आतड्याच्या आतील आवरणाला चावून पकडून ठेवतात त्यामुळे होणाऱ्या जखमेतून रक्तस्त्राव होतो आणि त्यातून पांडुरोग anemia होण्याचे प्रमाण फार मोठे आहे.
उघड्यावर शौचास जाण्यामुळे आणि अनवाणी पावलाने अशा जमिनीवर चालण्यामुळे कृमीचा प्रादुर्भाव होतो. भारतात ग्रामीण भागात हे प्रमाण ८५ ते ९५ % लोकसंख्येत आढळते. यामुळे भारतात ग्रामीण भागात स्त्रिया आणि मुलांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारा पंडुरोग मोठ्या प्रमाणावर आढळतो.
भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये २० % ते ५० % माणसांमध्ये जंत आणि कृमीं चा प्रादुर्भाव आढळला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने वर्षातून एकदा जंतविरोधी औषधे सर्वाना द्या अशी शिफारस केली आहे.
Major morbidity associated with hookworm infection is caused by intestinal blood loss, iron deficiency anemia, and protein malnutrition.[13] They result mainly from adult hookworms in the small intestine ingesting blood, rupturing erythrocytes, and degrading hemoglobin in the host.
https://en.wikipedia.org/wiki/Hookworm_infection
जंतां(roundworm) मुळे आतड्यात अन्न नीट शोषले जात नाही आणि भूकही नीट लागत नाही तसेच जंतांच्या ऍलर्जी मुळे आतड्यातील आतल्या आवरणाचा र्हास होतो आणि त्यामुळे कुपोषण होते आणि पंडुरोग होतो
https://en.wikipedia.org/wiki/Ascariasis

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 12:57 pm | कुमार१

वरील सर्व जाणकार वाचकांचे प्रतिसाद आणि पूरक माहितीबद्दल आभार !

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 12:57 pm | कुमार१

वरील सर्व जाणकार वाचकांचे प्रतिसाद आणि पूरक माहितीबद्दल आभार !

उत्तम माहिती मिळते आहे. धन्यवाद. सिकल सेल ऍनिमियाबद्दल अजून लिहा ही विनंती.

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 2:52 pm | कुमार१

@एस , सिकल सेल आजार : थोडक्यात माहिती:

१. जनुकीय बिघाडाने झालेला अनुवंशिक आजार

२. दोन प्रकारचे रुग्ण:
अ) खुद्द आजारी . याच्यात दोन्ही पालकांकडून दोष येतो.याला खूप त्रास
ब) आजाराचा वाहक : याच्यात एकाच पालकाकडून दोष येतो. याला त्रास नाही. चांगले जगतो.

३. खुद्द आजारी हा सदोदित अनिमिक कारण त्याच्या लालपेशीचे आयुष्य नेहमीपेक्षा फक्त एक षष्ठांश असते आणि त्या कोयत्याच्या आकाराच्या.

४. या पेशी विविध अवयवांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ करतात. त्याने रुग्ण ‘क्रायसिस’ मध्ये जातो. तेव्हा तो असह्य वेदनेने तळमळतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2017 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेखमाला.

डॉ सुहास म्हात्रे , मनापासून आभार !
चर्चाही चांगली होत आहे.

पंडुरोग उर्फ रक्ताल्पता पोटातल्या कृमिंमुळे शक्य आहे. हिमोग्लोबिनला मारणारे विषाणू हाडे,यकृत अथवा रक्तामध्येच असावेत. निरनिराळे तापांमध्ये हिमो० कमी होण्याचे हेच कारण असेल.

तेजस आठवले's picture

15 Nov 2017 - 3:37 pm | तेजस आठवले

लोहाचे शोषण शरीरात होण्यासाठी जीवनसत्त्व क लागते ना ? लिंबू तसेच इतर आंबट पदार्थातून ते मिळवता येऊ शकते.
तसेच जर १% लोहाचे शोषण होत असले तर ते वाढवण्यासाठी काय करता येईल ? लोखंडाची कढई/फोडणीचे पातेले वगैरे वापरून हे प्रमाण खरंच वाढते का?(लोखंडी भांड्यात केलेले पदार्थ खमंग होतात.)
तसेच जास्त लोह पोटात गेले तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ?त्याची दृश्य स्वरूपाची काही लक्षणे असतात का?

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 3:59 pm | कुमार१

चांगला प्रश्न.
लोहाच्या बाबतीत शरीराचा समतोल फार सुंदर आहे. रोज १ मिलिग्राम लोह शौचावाटे निघून जाते. म्हणून फक्त १ मिलिग्राम च शोषले जाते.
जास्त शोषले जाऊ नये अशीच ही तरतूद आहे. मेलेल्या
लाल पेशी मधल्या लोहाचा पुनर्वापर होतो.
शेवटी तो धातू आहे. जास्त शोषल्यास महत्वाच्या अवयवांना इजा होते .( Hemochromatosis)

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 4:33 pm | कुमार१

तेजस, शोषण दहा % होते.
१० मिलिग्राम खाल्ले की एक मि. शोषण

लाल मनुकांपेक्षा काळ्या मनुकांमध्ये लोह जास्त असते का?

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 7:27 pm | कुमार१

वरवर गुगलून असे सापडले की सर्व raisins सम-पोषक आहेत.
तरी आहारतज्ज्ञ व्यक्ती चे मत घ्यावे हे बरे

कुमार१'s picture

15 Nov 2017 - 7:27 pm | कुमार१

वरवर गुगलून असे सापडले की सर्व raisins सम-पोषक आहेत.
तरी आहारतज्ज्ञ व्यक्ती चे मत घ्यावे हे बरे

कुमार१'s picture

16 Nov 2017 - 12:40 pm | कुमार१

बहुतेक इच्छुकांचा हा लेख वाचून झाला असल्याने आता समारोपाच्या निमित्ताने थोडे मनोगत व्यक्त करतो.

याआधी माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ च्या लेखावर आपण सर्वांनी चांगली चर्चा केलीत. त्यानंतर एक विचार मनात आला तो असा. ‘कोलेस्टेरॉल’ हा जरी प्रतिसाद-खेचक विषय असला तरी तो काहीसा fancy आणि कळत नकळत ‘इंडिया’चा विषय आहे. तेव्हा असे ठरवले की पुढचा आरोग्य-विषय निवडताना तो खऱ्याखुऱ्या ‘भारता’चा असावा.

त्यासाठी फार विचार करायची गरज नव्हती. कुपोषण ही आपली मूलभूत समस्या आणि त्यात स्त्रिया व मुले हे त्याचे प्रमुख बळी. लोहाची कमतरता तर त्यांच्या पाचवीला पुजलेली.म्हणूनच ‘हिमोग्लोबिन’ वर लिहायचे ठरवले.

काही वर्षांपूर्वी जेव्हा लोहयुक्त मीठ बनवण्याचा धोरणात्मक निर्णय झाला तेव्हा भारतीयांच्या लोह-कमतरतेबाबत दोन कारणे चर्चेत होती :
१. गरीबी आणि
२. अन्नातील लोहाचे अपुरे शोषण

२०१५ पासून तसे मीठ आपल्या बाजारात आले. त्याच्या वापरातून माणसाची निदान रोजची निदान निम्मी गरज भागावी हा विचार आहे. तरीही ते मीठ अदयाप फारसे वापरात दिसत नाही.

आता दुसरा मुद्दा. गेले महिनाभर दिल्लीतील प्रदूषणाने जो हाहाकार माजवला आहे ते वाचून HbCO ची माहिती सर्वांना व्हावी असे वाटले.अर्थात लोहाच्या कमतरेतेइतका हा विषय चर्चेस आला नाही हेही जाणवले.

आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन चांगली चर्चा केल्याचे समाधान आहे.
धन्यवाद !

अमितदादा's picture

18 Nov 2017 - 2:54 pm | अमितदादा

उत्तम लेख डॉक्टर साहेब। हा प्रतिसाद विशेष आवडला।

कुमार१'s picture

18 Nov 2017 - 3:06 pm | कुमार१

अमितदादा, तुमच्या बहुमोल प्रतिसादाबद्दल आभार!

जागु's picture

18 Nov 2017 - 11:53 am | जागु

खुप छान माहिती.

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2017 - 12:54 pm | स्वाती दिनेश

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण!
सगळी लेखमालाच खूपच माहितीपूर्ण आहे.
स्वाती

कुमार१'s picture

18 Nov 2017 - 1:02 pm | कुमार१

जागु व स्वाती , आभार
वाचकांना लेख आवडल्या चे समाधान आहे

लोहाचे शोषण कमी करणारा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे चहातील tannins.
म्हणून जेवणानंतर ३ तास तरी चहा पिऊ नये.

वन's picture

14 Nov 2018 - 11:51 am | वन

अगदी बरोबर आहे. चहा खूप उकळणे ही पण एक वाईट सवय आहे. त्याने tannins व इतर त्रासदायक रसायने त्यात उतरतात .

कुमार१'s picture

14 Nov 2018 - 12:40 pm | कुमार१

सहमत.

चहा शास्त्रीय पद्धतीने करायचा झाल्यास पाण्याचे तापमान ७० C इतकेच असावे. उकळते पाणी अयोग्य आहे. पण बरेच जण सवयीचे गुलाम असल्याने चहा उकळत बसतात.
असो.
इथे मुद्दा लोहाचे शोषण कमी होण्याचा आहे.

सुबोध खरे's picture

14 Nov 2018 - 8:58 pm | सुबोध खरे

चहातील टॅनिन मुळे अपाय होतो याला शास्त्राधार नाही.
उलट चहातील टॅनिन हे अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुले उकळलेला चहा हा बिन उकळलेल्या चहा पेक्षा जास्त गुणकारी आहे.
केवळ चहाच्या स्वादा साठी हवा असेल तर चहा जास्त उकळू नये कारण त्यात चहा पट्टीतील टॅनिन उतरते आणि चव तुरट होते.(टॅनिन ऍस्ट्रिंन्जन्ट आहे) त्याने
उकळलेला चहा हा जेवणाच्या अगोदर किंवा नंतर घेंऊ नये कारण हेच टॅनिन आपल्या पाचक रसांवर परिणाम करते टॅनिन ऍस्ट्रिंन्जन्ट असल्यामुळे पाचक रसातील विकरे (enzymes) विघटन (degrade) पावतात आणि अन्न पचन कठीण होते.
अन्यथा चहा आपल्याला हवा तसा चवीनुसार(उकळून/ न उकळता) प्यावा. चहा दिवसात पाच कपापर्यंत प्यायल्यास फारसा अपाय होत नाही असे आजवरचे संशोधन दाखवते.
गमतीची गोष्ट म्हणजे कॉफी पेक्षा चहा मध्ये जास्त कॅफिन असते पण एक कप करण्यासाठी चहाची पत्ति कॉफीच्या पावडर पेक्षा कमी वापरली जाते त्यामुळे अखेरीस कॉफीच्या एका कपात चहा पेक्षा जास्त कॅफिन येते.

नागवेलिच्या पानाने हिमोग्लोबिन वाढ्ते का? तसेच डाळिंब व बीट़ खाल्ल्याने सुद्धा वाढ्ते खरे का?

बीटमध्ये मध्यम प्रमाणात (म्हणजे मनुकांच्या निम्मे)
डाळिंबात बीटाच्या निम्मे
नागवेली ची कल्पना नाही

पैसा's picture

4 Dec 2017 - 7:37 pm | पैसा

उत्तम लेख. भारतीय आहारातील वेगवेगळ्या पदार्थातून मिळणार्‍या लोहाचा तुलनात्मक तक्ता दिला असता तर अधिक छान!

सुचिता१'s picture

16 Dec 2017 - 11:27 am | सुचिता१

माहीतीपूर्ण लेख. शक्य झाल्यास लोह युक्त मीठा ची आणि आहारा संबधी अधीक माहीती द्या .

कुमार१'s picture

16 Dec 2017 - 12:29 pm | कुमार१

ज्यांना चौरस आहार नियमित मिळतो त्यांनी लोह आहारातून मिळवावे. ज्यांना ते शक्य होत नाही ते नियमित मीठ वापरू शकतात. त्यातून निदान रोजची निम्मी गरज भागते.

टाटा' ने लोह व आयोडीन असे दोन्हीने युक्त मीठ बनवले आहे 2015 मध्ये.

कुमार१'s picture

16 Dec 2017 - 12:29 pm | कुमार१

ज्यांना चौरस आहार नियमित मिळतो त्यांनी लोह आहारातून मिळवावे. ज्यांना ते शक्य होत नाही ते नियमित मीठ वापरू शकतात. त्यातून निदान रोजची निम्मी गरज भागते.

टाटा' ने लोह व आयोडीन असे दोन्हीने युक्त मीठ बनवले आहे 2015 मध्ये.

रुपी's picture

16 Dec 2017 - 2:59 am | रुपी

छान माहितीपूर्ण लेख.

कुमार१'s picture

16 Dec 2017 - 9:40 am | कुमार१

पैसा व रुपी , आभार !

रंगीला रतन's picture

16 Dec 2017 - 6:21 pm | रंगीला रतन

पण तरी अपुरी वाटते आहे.

चाणक्य's picture

18 Dec 2017 - 11:55 am | चाणक्य

धन्यवाद डॉक्टर.

कुमार१'s picture

18 Dec 2017 - 1:17 pm | कुमार१

रंगीला व चाणक्य, अभिप्रायाबद्दल आभारी आहे

स्मार्टफोनच्या साहाय्याने हिमोग्लोबिन घरच्या घरी मोजण्याचे तंत्र पुण्यातील वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. ती बातमी :

http://www.esakal.com/pune/marathi-news-hemoglobin-health-pune-agharkar-...

गुल्लू दादा's picture

15 Mar 2018 - 12:03 pm | गुल्लू दादा

आरोग्यपूर्ण माहिती

कुमार१'s picture

15 Mar 2018 - 1:03 pm | कुमार१

बऱ्याच दिवसांनी मिपावर आगमन झालेले दिसतंय तुमचे.
स्वागत !

कुमार१'s picture

1 Nov 2022 - 12:12 pm | कुमार१

लोहाच्या कमतरतेमुळे जो रक्तक्षय होतो त्याने बाधित असणारी मुले बऱ्याचदा माती खात असताना दिसतात. त्याच्या जोडीने काही जणांना खूप बर्फ खावासा वाटणे हे देखील एक लक्षण असते.

पोषणमूल्य नसलेले असे पदार्थ खावेसे वाटणे याला pica हा शास्त्रीय शब्द आहे.

सागरसाथी's picture

1 Nov 2022 - 9:44 pm | सागरसाथी

छान माहीती,हल्ली हिमोग्लोबिन कमी असण्याचे आणि पांढऱ्या पेशी वाढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
लेख शेवटी घाईत संपवल्यासारखा वाटला,मराठी सिरियल्स सारखा.

सागरसाथी's picture

1 Nov 2022 - 9:45 pm | सागरसाथी

छान माहीती,हल्ली हिमोग्लोबिन कमी असण्याचे आणि पांढऱ्या पेशी वाढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
लेख शेवटी घाईत संपवल्यासारखा वाटला,मराठी सिरियल्स सारखा.

सागरसाथी's picture

1 Nov 2022 - 9:45 pm | सागरसाथी

छान माहीती,हल्ली हिमोग्लोबिन कमी असण्याचे आणि पांढऱ्या पेशी वाढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
लेख शेवटी घाईत संपवल्यासारखा वाटला,मराठी सिरियल्स सारखा.

कुमार१'s picture

2 Nov 2022 - 8:46 am | कुमार१

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

लोह कमतरता असलेल्या सर्व रुग्णांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या वाढत नाही मुळात त्यांची व्याप्ती (4500-11,000/µL) मोठी आहे.
काही रुग्णांमध्ये ती थोडी वाढलेली असू शकते.

माझ्या एका सहकाऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त, अतिरिक्त हिमोग्लोबिन असण्याचा आजार आहे (तो लालबुंद दिसतो ).
ऐसा भी होता हैं क्या? - मला पडलेला प्रश्न.

त्याला रेड मीट खाण्यास डॉक्टरांनी प्रतिबंध केला आहे आणि फिश त्याला आवडत नाही त्यामुळे खाण्यासाठी त्याच्याकडे फारसे पर्याय नाहीत.

कुमार१'s picture

2 Nov 2022 - 8:50 am | कुमार१

+1
बरोबर.
अतिरिक्त हिमोग्लोबिन
> .
तुमच्या मित्राला Polycythemia हा आजार असू शकेल.

कुमार१'s picture

27 May 2023 - 7:29 am | कुमार१

कुठलीही सुई न टोचता रक्तातील हिमोग्लोबिन मोजण्याचे तंत्रज्ञान प्रगतीपथावर आहे. भारतीय लष्कराच्या डीआयएटी या संस्थेने prickless hemoprobe या उपकरणाची निर्मिती करून त्याचा स्वामित्व हक्क घेतलेला आहे.

सध्या त्या उपकरणाचे मूल्यांकन चालू आहे. या उपकरणात LED प्रकाशावर निव्वळ बोट ठेवून हिमोग्लोबिन मोजले जाते.

(छापील सकाळ, 27 मे 2023)