बोली भाषा 'नगरी'

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
13 Nov 2017 - 10:30 am

लेखक : चंद्रशेखर अवटी
*अहमदनगरची आवडती 'बेक्कार' बोली*

नगरी बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. उत्तर बाजूने खान्देश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा अशा काही तालुक्यांवर आहे.

मराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक ग्रंथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले. शेख महंमद, चाँद बोधले अशा सुफी संप्रदायींचं लेखनही इथं झालं. शिवकाळातला मोजका काळ वगळता मध्ययुगीन काळापासून निजामाच्याच राज्याचा हा भाग होता. ख्रिश्चनांची पहिली मंडळी अहमदनगरला सर्वात आधी येऊन धडकली आणि मिशन कम्पाउंडमधील वेगळी मराठी इथेच कविवर्य ना. वा. टिळक, ख्रिस्तपदनिर्माते कृ. र. सांगळे यांनी पुण्यमय करून सोडली.

अहमदनगर जिल्ह्यातील लोकांसाठी ‘नगरी’ हा शब्द वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्यातील बोलीच्या वेगळेपणात आहे. चहुबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्याला शेजार आहे आणि मोगलांच्या काळापासूनची मुस्लिम वस्ती असल्यानं या सर्व मिश्रणातून ‘नगरी बोली’चं एक वेगळंच रसायन तयार झालं आहे. शब्दांवर दाब देत व हेल काढत बोलण्यापासून मराठी-हिंदीची सरमिसळीपर्यंत अनेक गोष्टी मिसळून गेल्या आहेत. त्यामुळे इथल्या भाषेला संमिश्र रूप प्राप्त झालं. स्वत:ची फार वैशिष्ट्यपूर्ण बोली वगैरे असे काही येथे नसून खेडूत लोकांनी जपलेली भाषाच तिला म्हणावे लागेल. दिवसेंदिवस सुशिक्षित बनत चाललेल्या नव्या वर्गाला इथली मूळ बोली सहजी उमगत नाही. नागर भाषा वेगळी ठरते. मात्र, जिल्ह्यातील काही अल्पशिक्षित नेतृत्व फक्त या भाषेचा वापर करतात. त्यांना बऱ्याच गोष्टी ‘म्हाईती’ नसतात. आजुबाजूच्या माणसाला सहजच ‘भावड्या’ म्हणून पुकारणे त्यांना वावगे वाटत नाही. नातेवाचक शब्दात बहिणीऐवजी ‘भयीन’, तर आईला ‘बय’, ‘बई’ म्हणून संबोधतात. वडिलांना ‘दादा’ म्हटले जाते. आत्याला ‘मावळण’ हा शब्द वापरला जातो. ‘क्काय राऽऽ व’, ‘अय भ्भोव’, ‘तर्रऽऽ मऽऽ ग’, ‘लयऽऽ भारी’, ‘त्या माह्यचा’, ‘ब्वॉ ऽऽ कसं सांगावं?’ अशी येथली बोलण्याची सुरुवात असते.

‘माझं-तुझं’ हे इथे ‘माव्हं-तुव्हं’ बनतं. कर्जत-जामखेड तालुक्यांत तेच ‘मपलं-तुपलं’ बनतं. ‘माह्यावलं, तुह्यावलं’ हे शब्दप्रयोग होत राहतात. बऱ्याच वेळा ‘र’ अक्षरावर अनावश्यक जोर देऊन बोलण्याची प्रथा आहे. गोदावरी, मुळा, प्रवरा या नद्यांच्या काठावर, सीनेच्या उगमापासून प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलण्यानं नगरची बोली आकाराला आली आहे. दुग्धोत्पादनाचा मूळ व्यवसाय असल्याने व गवळी समाजाच्या सोबतीनं इतरही अनेकजण तो करीत असल्याने गाईच्या (गावडीच्या) आचळावर दाब देऊन दूध काढण्याची रीत बोलण्यातही अवतरली असावी. जनावरांनाही- म्हशीला ‘म्हसाड’, गाईला ‘गावडी’, शेळीला ‘शेरडी’, कुत्र्याला ‘कुत्ताडी’ असे न्यारेच प्रयोग इथे आहेत. ‘मी’ इथे ‘म्या’ बनतो, तर ‘मला’चा ‘माला’ होतो. ‘ड’च्या जागी ‘ढ’ होतो, ‘हा’च्या जागी ‘वा’ होतो. म्हणून ‘डोहात’चा ‘डवात’ होतो.

नगर जिल्ह्यात ‘इर्जिका’ची परंपरा जुनीच आणि हा शब्द इथूनच इतरत्र गेला असावा. शेतीची नवनवीन तंत्रं आली, पण मोट-नाडा होत्या त्याकाळची काही शब्दांची जागा, त्या वस्तू जाऊनही या-ना त्या कारणाने उच्चारात आहेत. मोट, नाडा, चऱ्हाट, कासरा, सौंदर, येसन, येठन, खुर्दर, हातनी, जू, शिवळ, धुरा असे शब्द आजही इथं ऐकायला मिळतात. आदिवासी-कोळी, ठाकर यांची स्वतंत्र बोली बोलणारे समूह कोकणकड्याच्या अकोले, संगमनेर व निकटच्या राहुरी तालुक्यात आढळतात. त्याविषयी गोविंद गारे आदी प्रभृतींनी मोठे काम केले आहे. मात्र, तेथील इतर समाजघटकांची भाषा त्यामुळे बदलली आहे. दया पवारांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनात त्याचा नमुना सापडतो. कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या बोली-उच्चाराचा वेगळा अभ्यास केल्यास बराच उलगडा होईल. ‘खायलाच’ म्हणताना ‘य’ लोप पावून ‘खालाचं’, तसेच ‘जालाचं’, ‘प्यालाचं’ अशी रूपे इथे वापरात आहेत. राम नगरकर यांचा ‘रामनगरी’ हा एकपात्री प्रयोग संपूर्ण नगरी बोलीत आहे. त्यामुळे नगरची भाषा सर्वदूर गेली. ‘मी तो हमाल’ हे अप्पा कोरपे यांचे आत्मचरित्र नगरी बोलीचा उत्तम नमुना होय. दादासाहेब रूपवते यांचे फर्डे वक्तृत्व अकोल्यातल्या बोलीचे वैशिष्ट्य होते. रंगनाथ पठारे यांच्या काही कादंबऱ्यांत नगरच्या बोलीचे पडसाद आहेत. ‘गोधडी’ हे आत्मकथन लिहिणाऱ्या अण्णासाहेब देशमुखांच्या कादंबरीत या बोलीचं वळण आढळतं. त्यातील करतानी, जातानी, खातानी, पितानी, येती, जाती, उठती, बसती, खाती, पिती, चालती, येयेल हे, जायेल हे, पाहेल हे- ही रूपेदेखील ऐकायला गोड वाटतात.

सहकारी कारखान्यात ऊस गेटावर नेऊन मोजून देणे आणि तिथेच पैसे घेऊन मोकळे होणे याला ‘गेटकेन’ म्हणतात. तीच पद्धती आता विवाहात आली आहे. आता विवाहही ‘गेटकेन’ होतात. म्हणजे एकाच दिवशी पाहणी, बोलणी आणि लग्न असे तिन्ही कार्यक्रम उरकण्याला ‘गेटकेन लग्न’ येथे म्हणतात. काही म्हणी फक्त इथेच सापडतात. त्या काहीशा शिवराळ, नगरी लोकांच्या प्रकृतीला धरून असाव्यात. ‘येळंला केळं न् वनवासाला सीताफळं’, ‘उखळात घालायचं, मुसळात काढायचं’, किंवा ‘नगर-भिंगार’ असे म्हणण्याची आणि उगाच हेलपाटा पडला म्हणण्याला ‘पुण्याहून पुणतांबा केलं’ असं म्हणण्याची इथं रीत आहे. विशेष म्हणजे कान्हेगाव, पुणतांबा ही गावे शेजारीच आहेत. ती बोलीत अशी फिट्टं बसली आहेत.

इथे विहीर पुरुषभर मापात नाही, तर ‘परसा’त मोजली जाते. मापाला बाजारात ‘मापटं’ म्हणतात, तर मोजणीची परिमाणं अजूनही खंडी, मण, शेर, आदशेर, आच्छेर, पावशेर, अदपाव, आतपाव, छटाक अशी उतरत्या क्रमाने आहेत. प्रहाराला ‘पारख’ ठरवले आहे. कालव्याचा पूल ‘तवंग’ असतो. ‘ठेचणे’ हे क्रियापद ‘चेचणे’ बनते. कुणीकडं म्हणताना ‘कुंकडं’ असे म्हटले जाते. ‘ओरडा’ शब्दास ‘आरोड’, ‘लई लामण लाऊ नको’सारखे वाक्प्रयोग येथेच समजले जाऊ शकतात. एखाद्या गोष्टीत जास्त आशय वाढू लागला की ‘लांबण’चे ‘लामण’ होते. अहमदनगर शहराची भाषाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणतीही चांगली गोष्ट वर्णन करायची तर इथे ‘बेक्कार’ असे म्हटले जाते. बाजारपेठेत एक वडा-पावचे दुकानही ‘बेक्कार’ नावाचे होते. एखादी व्यक्ती आपले काय वाकडे करणार, यावरून ‘काय घंट्या करून घेणार’, ‘गडबडला’ यासाठी ‘भांबाळला’, ‘गडबड- गोंधळा’साठी ‘हुंबल’ असे मजेशीर शब्द आहेत.

नव्या पॅगो रिक्षांना येथे तिच्या आवाजावरून ‘टमटम’, हालण्यावरून ‘डुगडुगी’, दिसण्यावरून ‘डुक्कर’ अशी नावे आहेत. जीपला ‘जीपडं’ म्हटलं जातं. मोटारसायकलीला आवाजावरून ‘फटफटी’ अशी रंजक नावे होती. उर्दूचा प्रभाव इथल्या भाषेवर आजही आढळतो. ‘घम ना पस्तावा’ (गम ना पछतावा) ही म्हण, पेस्तर (चालू साल), गुदस्ता (गुजिश्ता) असे काही शब्द उर्दू, फारसी शब्दांची आठवण देतात. हेल आणि बोलावरून नगरी बोली वेगळी काढता येईल, परंतु ती आता नष्ट पावत चालली आहे. त्याला वाढते नागरीकरण हे एक कारण आहे.

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

13 Nov 2017 - 11:21 am | माहितगार

रोचक , आणि प्रतिसाद देण्यात मी पयला ?

ओरायन's picture

13 Nov 2017 - 11:31 am | ओरायन

धन्यवाद माहितगार !

मराठी_माणूस's picture

13 Nov 2017 - 12:01 pm | मराठी_माणूस

बोली भाषेची छान ओळख.

ओरायन's picture

13 Nov 2017 - 3:54 pm | ओरायन

प्रस्तुत लेख हा लेखकाने सुंदर पद्धतीने मांडला आहे.

भीडस्त's picture

14 Nov 2017 - 12:41 pm | भीडस्त

चंद्रशेखर अवटी ह्ये ओरायन नाहित का..... पघा आता हा गुताडा......

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 12:02 pm | अनिंद्य

@ ओरायन,

या भागातली काही मंडळी ओळखीत आहेत, त्यामुळे एकदम रिलेट झाले. त्यांच्या भाषेत थोडे हैद्राबादी शब्द आणि स्टाईल येते.

पु ले शु,

अनिंद्य

ओरायन's picture

13 Nov 2017 - 3:59 pm | ओरायन

मला असे वाटते की प्रत्येक भागातील भाषेच्या बोलीतील विविधता ही तेथील ऐक वैशिष्टच आहे.

धर्मराजमुटके's picture

13 Nov 2017 - 1:00 pm | धर्मराजमुटके

मस्त !
माझा तालुका अकोले. जिल्हा नगर असला तरी तो इतका लांब आहे की त्यापेक्षा नाशिक, मुंबई वगैरे ला जाणे सोप्पे पडते. संगमनेर ला जिल्हा करावे म्हणून मागे मागे बरीच आंदोलने होत. आता मात्र ती थंड पडली आहेत. कोणे एकेकाळी संगमनेर शहर हिंदू मुस्लीम दंग्यांसाठी प्रसिद्ध होते. नगर जिल्ह्यात सहकारमहर्षींपेक्षा साखरमहर्षी जास्त झाले होते एकेकाळी. अक्ख्या महाराष्ट्राच्या तळहातावरच्या भाग्यरेषा ज्यांनी पुसायला लावल्या ते "गाय छाप" वाले मालपाणी इथलेच.

जुनी माणसं 'इथं' ला 'इढं' आणि 'तिथं' ला 'तिढं' म्हणतात.
मागच्या पिढीपर्यंत आई ला "बाई" आणि वडिलांना "बापा" म्हणणारी मंडळी अजुनही सापडतात. आता मात्र पप्पा आणि मम्मे शिवाय बात होत नाही.
गुंतागुंतीच्या गोष्टींचा इथे "कुटाणा" होऊन बसतो.
पुर्वी भावाच्या पोरी सर्रास मावळणीच्या (आत्याच्या) मुलांना दिल्या जात त्यामुळे सासुबाईंना सर्रास "आत्याबाई" म्हणायची पध्दत होती. त्यामुळे खरोखरची आत्या नसेल तरी ती सासु "आत्याबाई"च असायची.

कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख सुरुवाती सुरुवातीला खुपच फेमस होते मात्र बर्‍याच ठिकाणी दहाव्याच्या कार्यक्रमात नकोय ती उदाहरणे दिल्यामुळे, कार्यक्रमाच्या वेळा न पाळण्यामुळे मार देखील खाल्लेला आहे. मात्र त्यांना किर्तनकार म्हणण्यापेक्षा समाजप्रबोधनकार म्हटले तर जास्त बरोबर ठरेल.

लेख आवडला.

ओरायन's picture

13 Nov 2017 - 4:07 pm | ओरायन

आपण जी नविन माहितीची भर टाकली आहे ,ती आवडली. संगमनेर काय किंवा श्रीरामपुर काय ,नविन जिल्हाची मागणी अचानक मागे पडली व त्यामुळेच नगर जिल्हा राज्यात आकाराने सर्वात मोठा राहिला व आहे.

विनिता००२'s picture

13 Nov 2017 - 5:23 pm | विनिता००२

तिथ्थलं / इथ्थलं हे शब्द नगरीच ना??

ओरायन's picture

13 Nov 2017 - 5:58 pm | ओरायन

हो.ते शब्द नगरीच. मला आठवतय की माझे पुण्यातील चुलत भाऊ बहिण लहानपणी मला याच शब्दांनी गमतीत चिडवत असत.

पगला गजोधर's picture

13 Nov 2017 - 5:27 pm | पगला गजोधर

व्हाय ?

कमून ??

ओरायन's picture

13 Nov 2017 - 6:02 pm | ओरायन

आहेत ,हे शब्दपण काहींच्या बोलण्यात येतात.

बबन ताम्बे's picture

13 Nov 2017 - 5:42 pm | बबन ताम्बे

पुणे जिल्हा ग्रामीण आणि नगरी मधे फारसा फरक नाही असे वाटते.
http://www.misalpav.com/node/38930

ओरायन's picture

13 Nov 2017 - 6:53 pm | ओरायन

ग्रामीण भाषा मिळतीजुळती आहे तरी बोलण्यातील हेल व काही शब्द वेगळे वाटत आहेत.

babu b's picture

14 Nov 2017 - 9:53 am | babu b

छान

यकदम टापोटाप. माव्हं एक मित्र ह्येत. त्येसुदी भाशेचा आब्भ्यास करीत आस्त्याय. त्यान्नाबी हा लेख लयीच आवडंन आसं वाटातंय... त्यान्नाबी लेखाची लिन्क पाठुन्सनि दिलेलि ह्ये.
प्रा संतोष पद्माकर पवार नाव ह्ये त्यान्च्यावालं. काय म्हन्त्याय ते, त्ये सांगन म्या तुम्हाला इथं

भीडस्त, आभारी आहे. अवटी माझ्या परिचयाचे आहेत. ऐकाच जिल्ह्याचे हो आम्ही ..माझा भाषाविषयक अभ्यास वगरै काही नाही. केवळ त्यांचा लेख आवडला,म्हणून पाठवला.