काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का?
ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का?
अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले
शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का?
रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची
नसणार सरळ, हे मानावया जमेल का?
चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू?
मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का?
हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने
धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का?
तोल साधता साधेना, हातवारे झाले कैक
हात हाती घेउनीया, सावराया जमेल का?
लख्ख प्रकाश दिवसा, पहाटेस स्वप्नाधार
अंधारून येता, धीर धरावया जमेल का?
दुसऱ्यांचे ऐकुनिया, कळा फिरवीत गेलो
कधी आतला आवाज, ऐकावया जमेल का?
रोज गुऱ्हाळही तेच, तोच नाद घुंगरांचा
त्या तालात नवा सूर, आळवाया जमेल का?
... संदीप लेले
प्रतिक्रिया
13 Nov 2017 - 12:03 am | तृप्ति २३
खूप मस्त कविता केली आहे.
तृप्ती
http://www.truptiskavita.com