बौंड्रीपार जाताना – डेस्टिनेशन पुणे

इनिगोय's picture
इनिगोय in भटकंती
24 Oct 2017 - 1:20 pm

अचानक पाठ दुखू लागणं, पोट दुखू लागणं, डोकं जड वाटणं.. झालंच तर बॅगमध्ये आपलं सामान मावणारच नाहीये इथपासून ते अलार्म बिघडलाय बहुतेक, जागच कशी येणार असली कैच्याकै कारणं डोक्यात उगवू लागणं.. आणि अधून मधून गाण्यातल्या धृवपदासारखं “जाऊ दे रद्दच करू” हे वाटत राहणं....... एखादा अत्रंगी प्रकार करण्याच्या आदल्या रात्री होणारे हे असे सगळे प्रकार आता माझे मला सवयीचे झाले आहेत. त्यामुळे यावेळी हे सगळं एन्जॉय करतच मी माझी सॅक भरून घेतली, सकाळचा अलार्म ते नाश्ता या दोन टोकात करायच्या सगळ्या गोष्टींची सोय आणि पूर्वतयारी केली, आणि तय्यार झाले एका नव्या उद्योगासाठी!

झालं असं की या वर्षीच्या पावसाळ्यात एक मस्त रोड ट्रीप पार पडली आणि “असं आपलं आपल्याला फिरता आलं पाहिजे” हे डोक्यात आलं. चारचाकी चालवायला मला तितकंसं आवडत नाही, त्यात फारसं थ्रील नाही, आणि माझ्याकडे बाईक नाही. त्यामुळे माझ्याकडे फक्त होंडा अॅक्टिवाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मुंबईमध्ये इथे ठाण्यापासून तिथे पार फोर्टपर्यंत गाडी अनेको वर्षं पळवलेली असल्याने आणि तिच्यावर बागडणं हा माझा पार थेरपी लेव्हलचा नितांत आवडता प्रकार असल्याने तेही चाललं असतं. पण लॉंग ट्रीपसाठी बाईकशी तुलना केली तर अॅक्टिवाचे लहान टायर्स, एका बाजूला असलेलं इंजिन, एकुणातच छोटा जीव.. असं सगळं असताना त्या गाडीवर कितीसं फिरता येणार असं वाटलं आणि माझा रोड ट्रीपचा विचार आला तसा कोपऱ्यात गेला.

हे सगळं सुरू होतं सप्टेंबर मध्ये. आणि एक दिवस फेसबुकवर एका पोस्टमध्ये ‘निशा राव’, ‘होंडा अॅक्टिवा’ आणि काश्मिर ते कन्याकुमारी’ हे सगळे शब्द सलग वाचायला मिळाले. मी ती पोस्ट वाचत असताना तोंडाचा आ वासणे, डोळे विस्फारणे, खुर्चीतून तीनताड उडणे या सगळ्याचा डेमो अवतीभवती असलेल्या लोकांना मिळाला असणार हे नक्की!! ते जे काही तपशील होते, ते इथे वाचता येतीलच. पुण्याच्या या मुलीबद्दल वाचल्यावर आधी तिची मुलाखत घ्यायचाच विचार डोक्यात आला. पण मग तो रद्द केला, कारणं वेगवेगळी होती. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे... नुसती मुलाखतच काय घ्यायची.. हे!! एवढं अफाट काहीतरी केलेल्या मुलीला “आता कसं वाटतंय” छाप प्रश्न विचारणं साफच नामंजूर होतं मला. पण तरी तिला भेटावंसंही वाटत होतं. वेगळं काहीतरी करायला हवं... पण काय?

केदार ओकने त्या पोस्टमध्ये अखेरीस म्हटलं होतंच की - खरंच, तुम्ही ह्याला आवड म्हणा, क्रेझ म्हणा, ध्यास, पॅशन, वेड, किडा, भुंगा - काय वाट्टेल ते म्हणा. पण बॉस, ह्यातलं काहीतरी, मग ते कशाच्याही बाबतीतलं असूदे; आपल्या गाठीशी हवं म्हणजे हवंच. हे किडे प्रत्येकाला चावले पाहिजेत.

मग म्हटलं लहर आलीच आहे तर कहर करूयाच - किडा मला आधीच चावलाय.. तो पक्का नीटच चावून घ्यावा आता. एकटीनं भटकायला जायचं, तेही आपल्या अॅक्टिवावरूनच. अशा तऱ्हेने त्या दिवशी माझी स्वतःची पहिली सोलो रोड ट्रीप मला चावली!

पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपसाठी रूट ठरवताना दोनच पर्याय होते – कोकण किंवा पुणे. आधीची रोड ट्रीप कोकणातलीच होती म्हणून आणि पुणं तसं माहितीचं, सवयीचं म्हणून. पैकी पुणे नक्की केलं, दिवाळीनंतर तिथे करियर कौन्सिलिंगच्या नेहमीच्या कामासाठी खेप करायची होतीच हे एक कारण आणि निशा पुण्यात असते, तिला भेटता येईल हेही. दिवस ठरला २२ ऑक्टोबरचा. मग तिच्याच त्या पोस्टच्या मदतीने घरी सुतोवाच करून टाकलं.

मग हे सगळं डिस्कस करायला मुंबई-पुणे ये जा करणाऱ्या मित्रांना विचारायला सुरुवात केली. खरं सांगते – जेवढ्या जणांना विचारलं त्या सगळ्यांनी “वेडी आहेस का?” हा प्रश्न इतक्यांदा आणि असा काही एकमताने विचारला; की अजून काही वेळा ऐकलं असतं तर मी वेडीच आहे अशी माझीच खात्री पटली असती कदाचित. अगदी नेमाने सोलो ट्रीप करणाऱ्या मित्राचाही याला अपवाद नव्हता. अर्थात अशा उत्तरांनी माझा प्लान जास्तच पक्का केला हेही खरं. रिस्की आहे, अॅक्टिवावर नाही जमणार – एक ना दोन... धड काही उत्तरं मिळेनात त्यामुळे निघायच्या आदल्या संध्याकाळपर्यंत काहीही नीट ठरलं नव्हतं... पुण्यालाच तर जायचंय म्हणून असेल पण मी फार चिंतेत नव्हते.

काही फिरस्त्या लोकांना जवळून ओळखत असल्याने आणि स्वतःही लॉंग ट्रिप्स करत असल्याने प्रवासाची तयारी हा भाग नवा नव्हता, वस्तूंच्या याद्या तयार असतातच. फक्त यावेळी दुचाकीवरून एकटीनेच जायचं असल्याने मोजकं, लागेल तेच सामान हा क्रायटेरिया होता, आणि जास्तीचं असं फक्त टूलकीट असणार होतं – जे मला वापरता येत नाही... :( बाईकच्या तुलनेत अॅक्टिवाचा फूटबोर्ड आणि डिकी ही एक सोयीची गोष्ट असते. खांदे मोकळे राहतात आणि सामान नजरेसमोर राहतं. घरून निघाल्यापासून पोचायला फार तर पाच तास लागतील हे माहीत असल्याने फार काटेकोर तयारीही करायची गरज नव्हती.

आता आली गाडीची आणि माझी स्वतःची सर्विसिंग – पैकी गाडीचं काम सोपं होतं, ते सप्टेंबर अखेरीस करून घेतलं. पण मी म्हणजे शरीरात किती सांधे असतात हे त्यांच्या दुखत असण्यावरून अचूक सांगू शकेन असं मॉडेल आहे, शिवाय खांदे आणि गुडघे आपटून, मोडून घेणे हे माझं जन्मसिद्ध कर्तव्य असल्यासारखं तेही मी पार पाडत असते. कशाकशाचं सर्विसिंग करणार ना? त्यामुळे तो विचारच न करता आपल्याला पाच, लागलेच तर सहा तास गाडी चालवायचीच आहे एवढं स्वतःला बजावून मेंटल सर्विसिंग करून टाकलं.. संपला विषय!

दुसरीकडे बाईकिंगला वाहिलेल्या साईट्सवरून माहिती गोळा करणं सुरू होतंच. एका साईटवर आयता रोडमॅपच हाती लागला. मी “फ्रॉम व्हीनस” जमातीची असूनही मॅप वाचता येण्यात कैच अडचण येत नाही मला. शिवाय गुगल मॅप वापरण्याचा दिल्ली, बंगळूर, गुजराथ अशा ठिकाणांचा यशस्वी अनुभव असल्याने हे तर सोपंच होतं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला न लागता जुन्या रस्त्याला जाण्यासाठीचा एक्झिटच काय तो महत्वाचा होता, तो डोक्यात बसवला – कारण दुचाकी चालवत असताना मोबाईलचा उपयोग शून्य, ऐनवेळी गाडी बाजूला घ्या, थांबा हे मला नको होतं. त्यासाठी वाटेवरच्या मोठमोठ्या लँडमार्क्सची नावंही पाहून ठेवली. पुण्यात पिंपरीचिंचवडच्या दिशेने शिरायचं असं त्या रोडमॅपवरून दिसत होतंच.

निघायच्या आठवडाभर आधी नेमकं स्पीडोमीटर बंद पडलाय असं लक्षात आलं, शिवाय अगदी बारीक असा खुळखुळ्यासारखा आवाज यायला लागला. परत गाडी देऊन आले.... इथे मात्र – जाऊ दे, कशाला, उगाच उद्योग कोणी सांगितलेत.. असे संवाद असलेला आणि कोणती तरी केबल तुटलीय, नाहीतर गाडी पंक्चर झालीय, आपण ती ढकलत नेतोय, वगैरे सीन असलेला सिनेमा डोक्यात सुरू झाला. यावर सोपा उपाय असतो तो केला – चॅनल बदलणे ;) त्यापुढचा अजून घोळ म्हणजे मी पुण्यात जिथे मुक्काम करणार होते ती मंडळी दिवाळीसाठी बाहेर गेली होती. ती काही कारणाने रविवार सकाळ ऐवजी संध्याकाळी परत येणार होती. मी दुपारी पुण्यात पोचणार होते. त्यामुळे आदल्या चार दिवसात जास्तीच्या चार तासांची सोय करणं भाग पडलं. मग चक्क त्यांच्या घराजवळचा सिनेमा हॉल मुक्रर केला.. भले सिनेमा पाहू, नाहीतर चक्क झोप काढू; पण काय वाटेल तरी हा अनुभव घ्यायचाच आहे हे इतकं पक्कं केलं होतं की सगळे शंकेखोर मुद्दे, अडथळे ऑप्शनलाच टाकत गेले.

शनिवारी दुपारनंतर फायनल तयारीला लागले. सामान भरलं. फार लवकर नाही आणि फार उशिरा नाही असं निघायचं ठरवलं होतं. रात्री नऊनंतर आठवलं, टाकी फुल केलेली नाही. मग तेवढ्यासाठी बाहेर पडायचा कंटाळा केला, आणि आवरून दहालाच झोपायला गेले. तर उत्साह आणि टेन्शन या जालीम कॉम्बिनेशनमुळे साडेअकरा वाजले तरी झोप येईना. शेवटी एकदाची झोप लागली केव्हातरी.

सुरूवात
सुरूवात

सुरूवात
हे आपलं उगाच पद्धत है म्हणून ;)

ठरवल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे आवरून ठरवल्या वेळेला – ८.१५ ला घराबाहेर पडले. पेट्रोल टाकायला गेले तर “नेहमीचा” पंप बंद होता, मग दुसरीकडे जाऊन सोपस्कार पूर्ण केले – मात्र प्लानपेक्षा हा जास्तीचा वेळ लागूनही मी नऊ वाजेपर्यंत सायन पनवेल हायवेला लागले. तिथून सरळसोट पनवेलच्या मॅकडोनाल्डस् पर्यंत जायचं होतं. हे तसं विस्तारित मुंबईच असल्याने कोणतेही नयनरम्य दृश्यांचे अडथळे न येता गाडी सुसाट पळवली. नऊ वीसला मी चक्क एक्प्रेस वे च्या एक्झिटच्या जवळ पोचले होते. तिथे एक सरकारमान्य ब्रेक घेतला.
मिनीब्रेक
मिनीब्रेक

मग एक्प्रेसवेच्या “दुचाकींना प्रवेशबंदी”च्या पाटीला टाटा करत फ्लाय ओव्हर खालून उजवी घेतली. शेडुंगचा एक्स्प्रेसवे साठीचा एक्झिट मागे पडला, मजल दरमजल करत “खोपोली – २७” दिसलं, मुंबई मागे राहिलं हे एकदम जाणवलं आणि मग सकाळपासून पळवत आणलेली गाडीही आपोआपच रमत गमत चालवायला लागले. तो रस्ता एकदम मस्त झाडांच्या हिरव्यागार कमानींचा, जेमतेम वर्दळ असलेला असा आहे. त्यामुळे इथे काही ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडीचेही काही सेल्फी काढले.
सेल्फी

Selfie ticha
आमचे सेल्फी

नेहमी पुण्याची वाट ही गारेगार शिवनेरीतून पाहत असल्यामुळे आजची मजा वेगळीच होती. एका पॅचला तर मी आणि माझी गाडी फक्त दोघीच बराच वेळ पळत होतो, बाकी रस्ता पूर्ण रिकामा.... या निवांत रस्त्यावर मी अर्ध्या तासाहून जास्त वेळ घालवला असेल.

खोपोलीतून रस्ता गावातून जाणार की बाहेरूनच हे माहीत नव्हतं. तो जरासा गावातून जात बाहेर पडला आणि मग सुरू झाला घाट रस्ता. इथल्या वळणांवर मागच्या पुढच्या गाड्यांचे वेग बघून जागा देत देत दुचाकी चालवण्याची माझी पहिलीच वेळ.... नाही म्हटलं तरी जरा धडधडत होतंच. मग मुंबईचा बम्पर टू बम्पर ट्राफिक डोळ्यापुढे आणला आणि तिथं जमतंय मग हे जमेलच म्हणत घाट चढत गेले.

अशा प्रवासाची एक मजा असते, नशा असते.. तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या सहवासात असता.. मनाला आलं तर स्वतःशी गप्पा माराव्या, नाहीतर आजूबाजूला पाहत गाडीची लय पकडावी.. काही मस्त संदर्भ आठवतात, कविता, गाणी आठवतात, ती एन्जॉय करावी.. आपलीआपलीच मैफल मस्त जमत जाते. नुकताच मी भारताच्या भूरचनेवर शंकराच्या संदर्भाने लिहिलेला ‘मौज’ मधला लेख वाचला होता, अश्विन पुंडलिकांनी त्यात सह्याद्रीचे खूप छान उल्लेख केले आहेत. रस्त्याच्या पलीकडे नजर गेली की त्यातली अप्रतिम वर्णनं जणू चित्रमय होत होती. लेखातला लाखो वर्षांपूर्वी जन्माला आलेला रौद्र सह्याद्री मनात होता आणि आज आता माणसाळलेला सह्याद्री नजरेसमोर होता. तो सगळा लेखच मी या टप्प्यात “पाहिला” असेन..

हळूहळू रिसोर्ट्सच्या पाट्या दिसायला लागल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढत राहिली आणि मी लोणावळ्यात प्रवेश केला. इथे तर व्यवस्थित ट्रॅफिकच लागला. इथून बाहेर पडताना दोन तीन ठिकाणी एक्स्प्रेस वे बाजूने किंवा वरून जातो, मुंबई पासिंगच्या गाड्या काढून सकुसप फिरायला बाहेर पडलेले, सेल्फी काढणारे, उत्साही वाटून घेणारे तुंदिलतनु लोक दिसत राहतात. इथून अगदी जराशा पट्ट्यात एक्स्प्रेस वेवरून जावं लागतं.

राजमाची पॉईंटच्या अलीकडे ही कृष्णसुंदरी रस्त्याकडेला उभी होती. अतिशय आवडती गाडी असल्याने त्या डेंजर वळणावरही थांबून फोटो घेतलाच.
कृष्णसुंदरी
कृष्णसुंदरी

थोडं पुढे माझ्या “डर के आगे जीत है” या स्टोरीच्या पहिल्या एपिसोडचा नायक ड्युक्स नोज नजरेला पडला, त्याला हात करून पुढे निघाले. (तो एपिसोड पुन्हा कधीतरी.)

लोणावळा, खंडाळा मागे पडलं की पुढे तसा सपाटीचाच रस्ता आहे. इथं मग मी एका कानात हेडफोन खुपसले आणि गाणी ऐकत ऐकत रस्ता संपवला. आतापर्यंत नसलेलं ऊन आता जरा जाणवायला लागलं होतं. सोबतच्या गाड्यांवर आता लेंगे टोप्या घातलेले बाप्ये, एका बाईकवरून चाललेले तिघंचौघं स्वार दिसायला लागले – आलं, पुनवडी जवळ आलं!

तेवढ्यात देहूची पाटी दिसली. देहू म्हटलं की आर्मीचं कँटॉनमेंट डोक्यात येतंच, पण मध्येच तुकारामाबावासुद्धा एका कमानीवर बसलेले दिसले आणि मला स्वतःचंच हसायला आलं... आर्मीच्याही आधी ते आठवायला हवे होते, देहू आधी त्यांचं नाही का! कँटॉनमेंटच्या आसपासचा २-४ किमी रस्ता अगदीच वाईट आहे. तिथं गाडी स्लो ठेवत आणि पाट्यांवरही लक्ष ठेवत पुढे आले.

चिंचवडपाशी विनोद झाला.. चालत्या गाडीवरूनच शेजारच्या एका बाईक स्वाराला विचारलं, पुण्यात अभिरुचीला जायचंय, हाच रस्ता जात राहिल ना? तो फार धक्का लागल्यासारखा चेहरा करून म्हणे – अहो केवढं लांब आहे ते इथून, कस्काय जाणार तुम्ही? मनात आलं, फार लांब?? मग काय गाडी इथंच ठेवा नि बसने जा म्हणणार की काय हा..! वाकडेवाडीच्या जवळ एक राईट टर्न घेऊन शिवाजीनगर गाठायचं होतं, तिथे सिग्नलवर बाजूच्याला एकदा विचारलं, तर तेही तसंच.. “इकडून राईट घ्या नाहीतर पुढून घ्या, आपल्याला काय, कुठलातरी राईट घ्यायचाच है”...

असल्या मनरंजक सहप्रवाशांसोबत सफर काटत काटत यावेळी मी माझ्या अॅक्टिवासोबत "निशा रावच्या पुण्यात" प्रवेश करती झाले. तिथून मग म्हात्रे पूल का लकडी पूल, हा राईट की तो लेफ्ट, येणारा सिग्नल की त्यानंतरचा अशा आट्यापाट्या खेळत फायनली मुक्काम गाठला तेव्हा घड्याळात दुपारचे पावणेदोन वाजले होते!

आणि युरेक्क्का असं ओरडत मी माझ्या मनातलं पुढचं डेस्टिनेशन ठरवलंही होतं..!

(सुमारे दीडशे किलोमीटरचं हे अंतर एकटीने दुचाकीवर पार पाडण्यात मी फार काही विशेष केलंय असं नक्कीच नाही... पण तरीही हे मुद्दाम इथे लिहावंसं वाटलं. साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो!! पण त्याऐवजी त्या न करण्यासाठी आपण कितीतरी कारणं देत असतो, कारणांनाच कायम चिकटून राहतो. या बाउंड्रया आपणच स्वतःला घालून घेतल्याने दुसऱ्याने केलेल्या अचाट गोष्टींवर तोंडात बोट घालणं इतकंच होत राहतं. खरंतर ते अचाट काहीतरी प्रत्येकजण करू शकतो – प्रश्न फक्त इच्छेचा असतो.

हे स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास दिसतं. माझ्या अनेक मैत्रिणींना दुचाकी न चालवण्यासाठी “भीती वाटते, “हे” नको म्हणतात” अशी तीच ती निमित्तं पुढे करताना मी नेहमीच ऐकत असते. आणि बरेचसे “हे” सुद्धा आपापल्या बायकांना बाईका चालवायला चक्क नकार (!) वगैरे देत असतात. पण दुचाकी चालवण्यात केवढीतरी सोय आहे आणि त्यापुढे जाऊन असलं काहीतरी करण्यात अचिव्हमेंटचा आनंद तर अपार आहे! माझ्या बाबतीत निशामुळे मला तो मिळाला. माझ्या या लेखातून दहातल्या चौघींना जरी गाड्या चालवायचा हा किडा चावला, तरी माझा (लेखाचा) खटाटोप सफल झाला असं मला वाटेल.)

प्रतिक्रिया

टेक महिन्द्राच्या गल्लीत अजुबामध्ये :D

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2017 - 4:40 pm | श्रीरंग_जोशी

दुचाकी चालवून केलेल्या पहिल्या मोठ्या प्रवासाबाबतचे अनुभवकथन + प्रकटन आवडले. दहावीत असताना वर्गमित्रांबरोबर शहराबाहेर लुना व सनीसारख्या गाड्यांवर केलेल्या पहिल्या सहलीच्या आठवणी ताज्या झाल्या.

A journey of a thousand miles begins with a single step.

हे मूळचे चिनी बोधवाक्य इथे लिहून लेखिकेच्या पुढील मोहिमांना शुभेच्छा देतो.

दिपस्तंभ's picture

1 Nov 2017 - 2:36 am | दिपस्तंभ

मी सुद्धा मिसेस साठी नवी ऍक्टिवा घेतली होती या दिवाळी ला, सरप्राईस देण्यासाठी डायरेक्ट सासुरवाडी गाठली ऍक्टिवा वर... पिंपरी चिंचवड - पुणे - सातारा - कराड-सांगली-कोल्हापूर- पुणे असा प्रवास केला.. शिवाय टू व्हीलर म्हंटलं की वाटेत येणारी कैक ठिकाणे करता येतात.. हवे तिथं हॉटेलिंग, शॉपिंग इ. .. या आधी बाईक ने प्रवास केला होताच असा बरेचदा ... पण ऍक्टिवा जास्त निवांत अन कम्फर्टेबल वाटली

इनिगोय's picture

1 Nov 2017 - 6:56 am | इनिगोय

वा मस्तच,आवडलं. नियमित चालवायचाआग्रह करा त्यांनाही. टू व्हिलर हाताशी असणं ही फार मोठी सोय आहेच.

जेम्स वांड's picture

2 Nov 2017 - 10:19 am | जेम्स वांड

ओल्ड बॉम्बे पूना रोड वर अजूनही तो जीवघेणा केमिकल्सचा वास येतो का हो रासायनी जवळ?

अफलातून ट्रिप केलीत तुम्ही तुमचं खूप कौतूक आणि अभिनंदन