अचानक पाठ दुखू लागणं, पोट दुखू लागणं, डोकं जड वाटणं.. झालंच तर बॅगमध्ये आपलं सामान मावणारच नाहीये इथपासून ते अलार्म बिघडलाय बहुतेक, जागच कशी येणार असली कैच्याकै कारणं डोक्यात उगवू लागणं.. आणि अधून मधून गाण्यातल्या धृवपदासारखं “जाऊ दे रद्दच करू” हे वाटत राहणं....... एखादा अत्रंगी प्रकार करण्याच्या आदल्या रात्री होणारे हे असे सगळे प्रकार आता माझे मला सवयीचे झाले आहेत. त्यामुळे यावेळी हे सगळं एन्जॉय करतच मी माझी सॅक भरून घेतली, सकाळचा अलार्म ते नाश्ता या दोन टोकात करायच्या सगळ्या गोष्टींची सोय आणि पूर्वतयारी केली, आणि तय्यार झाले एका नव्या उद्योगासाठी!
झालं असं की या वर्षीच्या पावसाळ्यात एक मस्त रोड ट्रीप पार पडली आणि “असं आपलं आपल्याला फिरता आलं पाहिजे” हे डोक्यात आलं. चारचाकी चालवायला मला तितकंसं आवडत नाही, त्यात फारसं थ्रील नाही, आणि माझ्याकडे बाईक नाही. त्यामुळे माझ्याकडे फक्त होंडा अॅक्टिवाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मुंबईमध्ये इथे ठाण्यापासून तिथे पार फोर्टपर्यंत गाडी अनेको वर्षं पळवलेली असल्याने आणि तिच्यावर बागडणं हा माझा पार थेरपी लेव्हलचा नितांत आवडता प्रकार असल्याने तेही चाललं असतं. पण लॉंग ट्रीपसाठी बाईकशी तुलना केली तर अॅक्टिवाचे लहान टायर्स, एका बाजूला असलेलं इंजिन, एकुणातच छोटा जीव.. असं सगळं असताना त्या गाडीवर कितीसं फिरता येणार असं वाटलं आणि माझा रोड ट्रीपचा विचार आला तसा कोपऱ्यात गेला.
हे सगळं सुरू होतं सप्टेंबर मध्ये. आणि एक दिवस फेसबुकवर एका पोस्टमध्ये ‘निशा राव’, ‘होंडा अॅक्टिवा’ आणि काश्मिर ते कन्याकुमारी’ हे सगळे शब्द सलग वाचायला मिळाले. मी ती पोस्ट वाचत असताना तोंडाचा आ वासणे, डोळे विस्फारणे, खुर्चीतून तीनताड उडणे या सगळ्याचा डेमो अवतीभवती असलेल्या लोकांना मिळाला असणार हे नक्की!! ते जे काही तपशील होते, ते इथे वाचता येतीलच. पुण्याच्या या मुलीबद्दल वाचल्यावर आधी तिची मुलाखत घ्यायचाच विचार डोक्यात आला. पण मग तो रद्द केला, कारणं वेगवेगळी होती. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे... नुसती मुलाखतच काय घ्यायची.. हे!! एवढं अफाट काहीतरी केलेल्या मुलीला “आता कसं वाटतंय” छाप प्रश्न विचारणं साफच नामंजूर होतं मला. पण तरी तिला भेटावंसंही वाटत होतं. वेगळं काहीतरी करायला हवं... पण काय?
केदार ओकने त्या पोस्टमध्ये अखेरीस म्हटलं होतंच की - खरंच, तुम्ही ह्याला आवड म्हणा, क्रेझ म्हणा, ध्यास, पॅशन, वेड, किडा, भुंगा - काय वाट्टेल ते म्हणा. पण बॉस, ह्यातलं काहीतरी, मग ते कशाच्याही बाबतीतलं असूदे; आपल्या गाठीशी हवं म्हणजे हवंच. हे किडे प्रत्येकाला चावले पाहिजेत.
मग म्हटलं लहर आलीच आहे तर कहर करूयाच - किडा मला आधीच चावलाय.. तो पक्का नीटच चावून घ्यावा आता. एकटीनं भटकायला जायचं, तेही आपल्या अॅक्टिवावरूनच. अशा तऱ्हेने त्या दिवशी माझी स्वतःची पहिली सोलो रोड ट्रीप मला चावली!
पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपसाठी रूट ठरवताना दोनच पर्याय होते – कोकण किंवा पुणे. आधीची रोड ट्रीप कोकणातलीच होती म्हणून आणि पुणं तसं माहितीचं, सवयीचं म्हणून. पैकी पुणे नक्की केलं, दिवाळीनंतर तिथे करियर कौन्सिलिंगच्या नेहमीच्या कामासाठी खेप करायची होतीच हे एक कारण आणि निशा पुण्यात असते, तिला भेटता येईल हेही. दिवस ठरला २२ ऑक्टोबरचा. मग तिच्याच त्या पोस्टच्या मदतीने घरी सुतोवाच करून टाकलं.
मग हे सगळं डिस्कस करायला मुंबई-पुणे ये जा करणाऱ्या मित्रांना विचारायला सुरुवात केली. खरं सांगते – जेवढ्या जणांना विचारलं त्या सगळ्यांनी “वेडी आहेस का?” हा प्रश्न इतक्यांदा आणि असा काही एकमताने विचारला; की अजून काही वेळा ऐकलं असतं तर मी वेडीच आहे अशी माझीच खात्री पटली असती कदाचित. अगदी नेमाने सोलो ट्रीप करणाऱ्या मित्राचाही याला अपवाद नव्हता. अर्थात अशा उत्तरांनी माझा प्लान जास्तच पक्का केला हेही खरं. रिस्की आहे, अॅक्टिवावर नाही जमणार – एक ना दोन... धड काही उत्तरं मिळेनात त्यामुळे निघायच्या आदल्या संध्याकाळपर्यंत काहीही नीट ठरलं नव्हतं... पुण्यालाच तर जायचंय म्हणून असेल पण मी फार चिंतेत नव्हते.
काही फिरस्त्या लोकांना जवळून ओळखत असल्याने आणि स्वतःही लॉंग ट्रिप्स करत असल्याने प्रवासाची तयारी हा भाग नवा नव्हता, वस्तूंच्या याद्या तयार असतातच. फक्त यावेळी दुचाकीवरून एकटीनेच जायचं असल्याने मोजकं, लागेल तेच सामान हा क्रायटेरिया होता, आणि जास्तीचं असं फक्त टूलकीट असणार होतं – जे मला वापरता येत नाही... :( बाईकच्या तुलनेत अॅक्टिवाचा फूटबोर्ड आणि डिकी ही एक सोयीची गोष्ट असते. खांदे मोकळे राहतात आणि सामान नजरेसमोर राहतं. घरून निघाल्यापासून पोचायला फार तर पाच तास लागतील हे माहीत असल्याने फार काटेकोर तयारीही करायची गरज नव्हती.
आता आली गाडीची आणि माझी स्वतःची सर्विसिंग – पैकी गाडीचं काम सोपं होतं, ते सप्टेंबर अखेरीस करून घेतलं. पण मी म्हणजे शरीरात किती सांधे असतात हे त्यांच्या दुखत असण्यावरून अचूक सांगू शकेन असं मॉडेल आहे, शिवाय खांदे आणि गुडघे आपटून, मोडून घेणे हे माझं जन्मसिद्ध कर्तव्य असल्यासारखं तेही मी पार पाडत असते. कशाकशाचं सर्विसिंग करणार ना? त्यामुळे तो विचारच न करता आपल्याला पाच, लागलेच तर सहा तास गाडी चालवायचीच आहे एवढं स्वतःला बजावून मेंटल सर्विसिंग करून टाकलं.. संपला विषय!
दुसरीकडे बाईकिंगला वाहिलेल्या साईट्सवरून माहिती गोळा करणं सुरू होतंच. एका साईटवर आयता रोडमॅपच हाती लागला. मी “फ्रॉम व्हीनस” जमातीची असूनही मॅप वाचता येण्यात कैच अडचण येत नाही मला. शिवाय गुगल मॅप वापरण्याचा दिल्ली, बंगळूर, गुजराथ अशा ठिकाणांचा यशस्वी अनुभव असल्याने हे तर सोपंच होतं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला न लागता जुन्या रस्त्याला जाण्यासाठीचा एक्झिटच काय तो महत्वाचा होता, तो डोक्यात बसवला – कारण दुचाकी चालवत असताना मोबाईलचा उपयोग शून्य, ऐनवेळी गाडी बाजूला घ्या, थांबा हे मला नको होतं. त्यासाठी वाटेवरच्या मोठमोठ्या लँडमार्क्सची नावंही पाहून ठेवली. पुण्यात पिंपरीचिंचवडच्या दिशेने शिरायचं असं त्या रोडमॅपवरून दिसत होतंच.
निघायच्या आठवडाभर आधी नेमकं स्पीडोमीटर बंद पडलाय असं लक्षात आलं, शिवाय अगदी बारीक असा खुळखुळ्यासारखा आवाज यायला लागला. परत गाडी देऊन आले.... इथे मात्र – जाऊ दे, कशाला, उगाच उद्योग कोणी सांगितलेत.. असे संवाद असलेला आणि कोणती तरी केबल तुटलीय, नाहीतर गाडी पंक्चर झालीय, आपण ती ढकलत नेतोय, वगैरे सीन असलेला सिनेमा डोक्यात सुरू झाला. यावर सोपा उपाय असतो तो केला – चॅनल बदलणे ;) त्यापुढचा अजून घोळ म्हणजे मी पुण्यात जिथे मुक्काम करणार होते ती मंडळी दिवाळीसाठी बाहेर गेली होती. ती काही कारणाने रविवार सकाळ ऐवजी संध्याकाळी परत येणार होती. मी दुपारी पुण्यात पोचणार होते. त्यामुळे आदल्या चार दिवसात जास्तीच्या चार तासांची सोय करणं भाग पडलं. मग चक्क त्यांच्या घराजवळचा सिनेमा हॉल मुक्रर केला.. भले सिनेमा पाहू, नाहीतर चक्क झोप काढू; पण काय वाटेल तरी हा अनुभव घ्यायचाच आहे हे इतकं पक्कं केलं होतं की सगळे शंकेखोर मुद्दे, अडथळे ऑप्शनलाच टाकत गेले.
शनिवारी दुपारनंतर फायनल तयारीला लागले. सामान भरलं. फार लवकर नाही आणि फार उशिरा नाही असं निघायचं ठरवलं होतं. रात्री नऊनंतर आठवलं, टाकी फुल केलेली नाही. मग तेवढ्यासाठी बाहेर पडायचा कंटाळा केला, आणि आवरून दहालाच झोपायला गेले. तर उत्साह आणि टेन्शन या जालीम कॉम्बिनेशनमुळे साडेअकरा वाजले तरी झोप येईना. शेवटी एकदाची झोप लागली केव्हातरी.
सुरूवात
हे आपलं उगाच पद्धत है म्हणून ;)
ठरवल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे आवरून ठरवल्या वेळेला – ८.१५ ला घराबाहेर पडले. पेट्रोल टाकायला गेले तर “नेहमीचा” पंप बंद होता, मग दुसरीकडे जाऊन सोपस्कार पूर्ण केले – मात्र प्लानपेक्षा हा जास्तीचा वेळ लागूनही मी नऊ वाजेपर्यंत सायन पनवेल हायवेला लागले. तिथून सरळसोट पनवेलच्या मॅकडोनाल्डस् पर्यंत जायचं होतं. हे तसं विस्तारित मुंबईच असल्याने कोणतेही नयनरम्य दृश्यांचे अडथळे न येता गाडी सुसाट पळवली. नऊ वीसला मी चक्क एक्प्रेस वे च्या एक्झिटच्या जवळ पोचले होते. तिथे एक सरकारमान्य ब्रेक घेतला.
मिनीब्रेक
मग एक्प्रेसवेच्या “दुचाकींना प्रवेशबंदी”च्या पाटीला टाटा करत फ्लाय ओव्हर खालून उजवी घेतली. शेडुंगचा एक्स्प्रेसवे साठीचा एक्झिट मागे पडला, मजल दरमजल करत “खोपोली – २७” दिसलं, मुंबई मागे राहिलं हे एकदम जाणवलं आणि मग सकाळपासून पळवत आणलेली गाडीही आपोआपच रमत गमत चालवायला लागले. तो रस्ता एकदम मस्त झाडांच्या हिरव्यागार कमानींचा, जेमतेम वर्दळ असलेला असा आहे. त्यामुळे इथे काही ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडीचेही काही सेल्फी काढले.
आमचे सेल्फी
नेहमी पुण्याची वाट ही गारेगार शिवनेरीतून पाहत असल्यामुळे आजची मजा वेगळीच होती. एका पॅचला तर मी आणि माझी गाडी फक्त दोघीच बराच वेळ पळत होतो, बाकी रस्ता पूर्ण रिकामा.... या निवांत रस्त्यावर मी अर्ध्या तासाहून जास्त वेळ घालवला असेल.
खोपोलीतून रस्ता गावातून जाणार की बाहेरूनच हे माहीत नव्हतं. तो जरासा गावातून जात बाहेर पडला आणि मग सुरू झाला घाट रस्ता. इथल्या वळणांवर मागच्या पुढच्या गाड्यांचे वेग बघून जागा देत देत दुचाकी चालवण्याची माझी पहिलीच वेळ.... नाही म्हटलं तरी जरा धडधडत होतंच. मग मुंबईचा बम्पर टू बम्पर ट्राफिक डोळ्यापुढे आणला आणि तिथं जमतंय मग हे जमेलच म्हणत घाट चढत गेले.
अशा प्रवासाची एक मजा असते, नशा असते.. तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या सहवासात असता.. मनाला आलं तर स्वतःशी गप्पा माराव्या, नाहीतर आजूबाजूला पाहत गाडीची लय पकडावी.. काही मस्त संदर्भ आठवतात, कविता, गाणी आठवतात, ती एन्जॉय करावी.. आपलीआपलीच मैफल मस्त जमत जाते. नुकताच मी भारताच्या भूरचनेवर शंकराच्या संदर्भाने लिहिलेला ‘मौज’ मधला लेख वाचला होता, अश्विन पुंडलिकांनी त्यात सह्याद्रीचे खूप छान उल्लेख केले आहेत. रस्त्याच्या पलीकडे नजर गेली की त्यातली अप्रतिम वर्णनं जणू चित्रमय होत होती. लेखातला लाखो वर्षांपूर्वी जन्माला आलेला रौद्र सह्याद्री मनात होता आणि आज आता माणसाळलेला सह्याद्री नजरेसमोर होता. तो सगळा लेखच मी या टप्प्यात “पाहिला” असेन..
हळूहळू रिसोर्ट्सच्या पाट्या दिसायला लागल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढत राहिली आणि मी लोणावळ्यात प्रवेश केला. इथे तर व्यवस्थित ट्रॅफिकच लागला. इथून बाहेर पडताना दोन तीन ठिकाणी एक्स्प्रेस वे बाजूने किंवा वरून जातो, मुंबई पासिंगच्या गाड्या काढून सकुसप फिरायला बाहेर पडलेले, सेल्फी काढणारे, उत्साही वाटून घेणारे तुंदिलतनु लोक दिसत राहतात. इथून अगदी जराशा पट्ट्यात एक्स्प्रेस वेवरून जावं लागतं.
राजमाची पॉईंटच्या अलीकडे ही कृष्णसुंदरी रस्त्याकडेला उभी होती. अतिशय आवडती गाडी असल्याने त्या डेंजर वळणावरही थांबून फोटो घेतलाच.
कृष्णसुंदरी
थोडं पुढे माझ्या “डर के आगे जीत है” या स्टोरीच्या पहिल्या एपिसोडचा नायक ड्युक्स नोज नजरेला पडला, त्याला हात करून पुढे निघाले. (तो एपिसोड पुन्हा कधीतरी.)
लोणावळा, खंडाळा मागे पडलं की पुढे तसा सपाटीचाच रस्ता आहे. इथं मग मी एका कानात हेडफोन खुपसले आणि गाणी ऐकत ऐकत रस्ता संपवला. आतापर्यंत नसलेलं ऊन आता जरा जाणवायला लागलं होतं. सोबतच्या गाड्यांवर आता लेंगे टोप्या घातलेले बाप्ये, एका बाईकवरून चाललेले तिघंचौघं स्वार दिसायला लागले – आलं, पुनवडी जवळ आलं!
तेवढ्यात देहूची पाटी दिसली. देहू म्हटलं की आर्मीचं कँटॉनमेंट डोक्यात येतंच, पण मध्येच तुकारामाबावासुद्धा एका कमानीवर बसलेले दिसले आणि मला स्वतःचंच हसायला आलं... आर्मीच्याही आधी ते आठवायला हवे होते, देहू आधी त्यांचं नाही का! कँटॉनमेंटच्या आसपासचा २-४ किमी रस्ता अगदीच वाईट आहे. तिथं गाडी स्लो ठेवत आणि पाट्यांवरही लक्ष ठेवत पुढे आले.
चिंचवडपाशी विनोद झाला.. चालत्या गाडीवरूनच शेजारच्या एका बाईक स्वाराला विचारलं, पुण्यात अभिरुचीला जायचंय, हाच रस्ता जात राहिल ना? तो फार धक्का लागल्यासारखा चेहरा करून म्हणे – अहो केवढं लांब आहे ते इथून, कस्काय जाणार तुम्ही? मनात आलं, फार लांब?? मग काय गाडी इथंच ठेवा नि बसने जा म्हणणार की काय हा..! वाकडेवाडीच्या जवळ एक राईट टर्न घेऊन शिवाजीनगर गाठायचं होतं, तिथे सिग्नलवर बाजूच्याला एकदा विचारलं, तर तेही तसंच.. “इकडून राईट घ्या नाहीतर पुढून घ्या, आपल्याला काय, कुठलातरी राईट घ्यायचाच है”...
असल्या मनरंजक सहप्रवाशांसोबत सफर काटत काटत यावेळी मी माझ्या अॅक्टिवासोबत "निशा रावच्या पुण्यात" प्रवेश करती झाले. तिथून मग म्हात्रे पूल का लकडी पूल, हा राईट की तो लेफ्ट, येणारा सिग्नल की त्यानंतरचा अशा आट्यापाट्या खेळत फायनली मुक्काम गाठला तेव्हा घड्याळात दुपारचे पावणेदोन वाजले होते!
आणि युरेक्क्का असं ओरडत मी माझ्या मनातलं पुढचं डेस्टिनेशन ठरवलंही होतं..!
(सुमारे दीडशे किलोमीटरचं हे अंतर एकटीने दुचाकीवर पार पाडण्यात मी फार काही विशेष केलंय असं नक्कीच नाही... पण तरीही हे मुद्दाम इथे लिहावंसं वाटलं. साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो!! पण त्याऐवजी त्या न करण्यासाठी आपण कितीतरी कारणं देत असतो, कारणांनाच कायम चिकटून राहतो. या बाउंड्रया आपणच स्वतःला घालून घेतल्याने दुसऱ्याने केलेल्या अचाट गोष्टींवर तोंडात बोट घालणं इतकंच होत राहतं. खरंतर ते अचाट काहीतरी प्रत्येकजण करू शकतो – प्रश्न फक्त इच्छेचा असतो.
हे स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास दिसतं. माझ्या अनेक मैत्रिणींना दुचाकी न चालवण्यासाठी “भीती वाटते, “हे” नको म्हणतात” अशी तीच ती निमित्तं पुढे करताना मी नेहमीच ऐकत असते. आणि बरेचसे “हे” सुद्धा आपापल्या बायकांना बाईका चालवायला चक्क नकार (!) वगैरे देत असतात. पण दुचाकी चालवण्यात केवढीतरी सोय आहे आणि त्यापुढे जाऊन असलं काहीतरी करण्यात अचिव्हमेंटचा आनंद तर अपार आहे! माझ्या बाबतीत निशामुळे मला तो मिळाला. माझ्या या लेखातून दहातल्या चौघींना जरी गाड्या चालवायचा हा किडा चावला, तरी माझा (लेखाचा) खटाटोप सफल झाला असं मला वाटेल.)
प्रतिक्रिया
24 Oct 2017 - 1:39 pm | अनिंद्य
@ इनिगोय
ज्जे ब्बात ! ब्रॅव्हो !
साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो !! अगदीच पटले.
24 Oct 2017 - 2:09 pm | तुषार काळभोर
बाईने (पहिला !) मुंबई ते पुणे ( दुसरं !!) ऍक्टिवावर (तिसरं !!!) एकटीने (चौथं !!!!) प्रवास....
एखादी गोष्ट ठरवली तर ती करायची, या जिद्दीसाठी कौतुक.
कॉलेजातले दिवस आठवले. मी घरी न सांगता (खरंतर निघताना मलाही माहिती नसताना) पुणे सातारा (युनिकॉर्न), पुणे मुंबई (1st gen cbz), पुणे कोल्हापूर (स्प्लेंडर), पुणे कराड(युनिकॉर्न), पुणे शिर्डी(पल्सर) असे प्रवास केलेत.
पण वीस ते बावीस वयात हे उपद्व्याप केल्याने(आणि मुलगा असल्याने) आताही काही वाटत नाही. पण आता नाही जमणार हे.
24 Oct 2017 - 10:16 pm | इनिगोय
विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद! हेच बॅरिकेड्स ओलांडायची माझी नेहमीच धडपड असते :)
2 Nov 2017 - 4:01 pm | चंबा मुतनाळ
पैलवान्साहेब,
तस काही नसतय हो! मी साठीला पोचून पन बुलेट वरून गोव्याला जातोय. आपल्याला आवडत असेल तर खुशाल जाव की बाईक बरून
24 Oct 2017 - 3:04 pm | एस
टाळ्या!
फोटो दिसत नाहीयेत.
24 Oct 2017 - 3:10 pm | किसन शिंदे
क्रोमवर दिसत नाहीत पण फाफॉवर दिसत आहेत.
24 Oct 2017 - 3:42 pm | इनिगोय
मलाही क्रोमवरून दिसत नाहीत, काय करता येईल?
24 Oct 2017 - 4:31 pm | एस
पब्लिक ऍक्सेस नाहीये.
24 Oct 2017 - 4:58 pm | इनिगोय
फाफाॅवर दिसतायत. अॅक्सेसचा इश्यू नसावा.
24 Oct 2017 - 3:12 pm | मोदक
अभिनंदन. असेच भटकत रहा.. दुचाकीवर / सोलो केलेल्या प्रवासात अनेक नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अगदीच लांबचा प्रवास असेल तर लोकांचे भन्नाट प्रश्न आणि चेहरे अगदी बघण्यासारखे असतात.
निशिगंधा सारोळकर हे नांवही गुगलून बघा.
फोटो दिसत नाहीत.
24 Oct 2017 - 10:29 pm | इनिगोय
येस वाचलंय हिच्याबद्दलही, अर्थात ऍक्टिवामुळे निशा राव जास्त कनेक्ट झाली.
फोटोंसाठी काय करता येईल? गुगल ड्राइव्ह वरून पब्लिक ऍक्सेस दिला आहे, तरी दिसेनात.
24 Oct 2017 - 11:23 pm | मोदक
फ्लिकर वापर. फ्लिकर सर्वात सोपे आहे आणि नंतर लिंका बदलत नाहीत.
25 Oct 2017 - 12:53 am | इनिगोय
हुश्श झाले दुरुस्त. फ्लिकर वापरलं नाही कारण नवं अकाउंट बनवायला लागेल. गुगल फोटोज मधूनच जमलं.
आणि हो! मिपाच्या बुलेटराजाकडून मिळालेल्या शुभेच्छा विशेषच.. मनापासून आभार :)
24 Oct 2017 - 3:32 pm | अभिजीत अवलिया
लिखाण आवडले. फोटो दिसेनात.
24 Oct 2017 - 4:40 pm | सूड
वाह, एका मित्राने बाईकने का येत नाहीस मुंबैला विचारलं होतं; तेव्हा सुखेनैव झोपा काढत येण्याचा आनंद का सोडू हे उत्तर दिलं होतं. आता प्रयत्न करुन बघायला हवा असं वाटतंय.
सुरंगीतैंच्या लेखाने इन्स्पायर होऊन स्विमिंग शिकलो आता हा लेख रोड ट्रिप करायला भाग पाडणार असं दिसतंय.
24 Oct 2017 - 10:24 pm | इनिगोय
क्या बात! जास्त लांबच्या ट्रिपाच करा की मग.
24 Oct 2017 - 5:40 pm | सिरुसेरि
मस्तच . लेख वाचुन "मुंबई - पुणे" बाइकवरुन प्रवास किती सोपा आहे असे एक मिनीट वाटुन गेले .
24 Oct 2017 - 10:22 pm | इनिगोय
असं आता मी नक्कीच म्हणेन :)
24 Oct 2017 - 6:01 pm | पगला गजोधर
पुढच्या वेळेस ऍक्टिवावर येताना बॅकसपोर्ट लावून या..
मला कोपरखैरणे ते पुणे ऍक्टिवावर येताना खूप त्रास झालेला पाठीचा ...
3 Nov 2017 - 8:48 pm | mayu4u
तीन चाकी सायकलीला असतोय की!
24 Oct 2017 - 6:17 pm | सुबोध खरे
मी मेडिकल कॉलेज मध्ये असताना अनेक वेळा( प्रत्येक सुटीत) पुणे मुंबई पुणे असा दुचाकी वर प्रवास केला आहे. एकदा (१९९१) तर माझ्या कायनेटिक होंडावर बरोबर संध्याकाळी ४ वाजता बसलो आणि घरी (मुलुंडला) पोहोचलो तेंव्हा साडे सातच्या बातम्यांचे संगीत वाजत होते. साडे तीन तास अजिबात न थांबता ए एफ एम सी ते मुलुंड प्रवास केला आहे. आता जर तुम्ही सकाळी सकाळी सहा वाजता निघालात तरच ( रहदारी वाढण्याच्या अगोदर किंवा सुटीच्या दिवशी) दुचाकीवर मुंबई पुणे प्रवास हा अतिशय सुखकर होऊ शकतो.
24 Oct 2017 - 6:28 pm | सुबोध खरे
ज्याने कधीच असा प्रवास केला नाही त्याला थोडी अनामिक भीती वाटू शकते. विशेषतः स्त्रियांना:-- कारण वाहन रस्त्यात बंद पडले तर काय? ही भिती असते पण मुंबई पुणे रस्ता हा कायम रहदारीचा आहे आणि आता तर संपूर्ण रस्त्यावर आपल्याला मोबाईल ची रेंज मिळतेच. तेंव्हा मुंबई आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी आपण मदत करू शकतील अशा मित्र मैत्रिणींना कळवून ठेवले तर निर्धास्तपणे प्रवास करता येईल.
दुचाकी वर प्रवास करताना महत्त्वाचे म्हणजे पूर्ण प्रवास दिवसाच करावा आणि प्रवास संध्याकाळी ४ पर्यंत संपेल या बेताने नियोजन करावे. कारण दुचाकी बंद पडली तर आपल्याला अंधारात काही करता येणे कठीण असते.
बाकी आता आपल्याला अधिक दुचाकीच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
24 Oct 2017 - 6:30 pm | स्रुजा
आई गं !! २ व्हीलर च्या आठवणीने कळ आली छोटीशी. २ व्हीलरची मजा कारला नाही यावर अगदी सहमत ! कॉलेज मध्ये असताना, नंतर ऑफिस सुरु केल्यावर भणभणलेलं डोकं शांत करायला अनेकदा नुसतीच पुण्यात गाडीवर फिरुन यायचे ते आठवलं. हा प्रवास तर फार च भारी! खास करुन ओल्ड हायवे अगदी आवडीचा. तिथे वडापाव वगैरे खाल्ला की नाही? रस्त्यात खादाडी काय केली? त्याचे पण फोटो हवे होते...
24 Oct 2017 - 6:43 pm | आदूबाळ
भारीच! फोटो दिसंना पण...
24 Oct 2017 - 6:47 pm | दिपस्वराज
क्या बात है !...... सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन ! आत्ताच मोदकाचा कन्याकुमारी प्रवास पाहिला आणि लगेच तुमचा प्रवास. मुंबई - पुणे . मज्जा आली. तुमचा हा सोलो प्रवास असाच संपूर्ण भारतवर्षात चालत राहो. .....लगे रहो !
24 Oct 2017 - 10:33 pm | इनिगोय
पुढची ट्रीप नकाशावर तर ऑलरेडी नक्की केली आहे, पाहू कधी होतेय ते. :)
24 Oct 2017 - 9:10 pm | अजया
इने, *** पुण्यातले नातेवाईक येईपर्यंत सिनेमा हाॅलला वगैरे वाचले नाहीये मी ***
जुन्या हायवेवर कोणी ओळखीचे नाही काय तुझ्या ***
( आता भरतकाम कर फुल्यांचे) भेटच जरा!
24 Oct 2017 - 10:37 pm | इनिगोय
अगं, म्हणून तर विचारलं ना तुला गेल्या आठवड्यात... मोजून साडेसहा लोकांना हे सगळं माहीत होतं, बाकीच्यांना सरप्राईझ.. म्हणूनच ओल्ड पूना रोडवरच्या बाकी लोकांना काय्येक बोलले नव्हते. ;)
24 Oct 2017 - 10:38 pm | इनिगोय
@अनिंद्य, @एस, @अभिजीत अवलिया, @सुबोध खरे, @आदूबाळ.... बहुत बहुत धन्यवाद!
@पगला गजोधर, नेमाने प्रवास सुरू करेन तेव्हा सपोर्ट लावून घ्यायचं डोक्यात आहेच.
@स्रुजा, वाटेत खादाडी केली नाही काहीच, ते एक मिसलंच.
24 Oct 2017 - 10:44 pm | इनिगोय
आज सिंहगड रोड ते खडकी फिरून आले. पुढच्या दोन दिवसात दुनियादारी कादंबरीतली ठिकाणं (पुण्याला येण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण होतं) बाकी आहेत.
और एक.. उद्या निशा रावला भेटायचं नक्की होतंय बहुतेक, बरंच इंटरेस्टिंग काय काय ऐकायला मिळेल. तेव्हा तोही अपडेट इथे देईनच.
24 Oct 2017 - 10:51 pm | दशानन
एक जुनाच प्रतिसाद चिटकवतोय,
"लाईफ इज नॉट अप्पल"
जिओ!!! धाडस आणि ते पूर्ण करण्याची मनाची तयारी पाहून आंनद वाटायला.
*मी आताच दिवाळीत बायको व जवळपास 1वर्ष वयाची पोर सोबत घेऊन एका दिवसात 700किमी प्रवास केला, बायको आडवी आहे आणि पोर खिदळत आहे ;)
25 Oct 2017 - 1:57 pm | इनिगोय
पिलियनवर हाल होतातच, म्हणून तर मीही पुढची सीट पकडली ;)
एका दिवसात फॅमिलीसह सातशे फारच झाले पण.
25 Oct 2017 - 1:05 am | आनंदयात्री
अभिनंदन. साहसाचा वृत्तांत आवडला.
25 Oct 2017 - 7:12 am | बाजीप्रभू
चपलख विधान _/\_
3 Nov 2017 - 8:48 pm | mayu4u
सुंदर अनुभव.
25 Oct 2017 - 8:15 am | स्पा
अंदाज आलेलाच तु असे कायतरी किडे करणार म्हणुन( पवना अॅक्टिवा राईड वरची उत्सुकता ;) ), चला रायडिंग ला अजुन एक मेंमबर अॅड झाला
25 Oct 2017 - 10:41 am | गवि
झकास अनुभव. आपण शक्य तेवढे नवीन अनुभव घेत रहावं.
एकेकाळी पुणे मुंबई प्रवास फक्त फटफटीनेच करत असे. अगदी सरावाचा रस्ता झाला होता. थांबण्याची ठिकाणं वगैरे ठरुन गेली होती.
लोणावळ्यात ठराविक ठिकाणी साग्रसंगीत चिक्की खरेदी वगैरे.
पहाटे, दिवसा, रात्री ( ते ही मुसळधार नॉन स्टॉप वादळी पावसात ) अशा सर्व वेळी हा प्रवास केला आहे.
पण आमचं सगळं जुनं..
या तुमच्या ताज्या नव्या अनुभवाने रम्य आठवणी जाग्या झाल्या. आता मात्र दुचाकीशी संबंध संपला आहे. आता प्रयत्न केला तर बुडाची अवस्था मुंबई ते खोपोलीपर्यंतच बिकट चुरगाळलेली होऊन खंडाळा प्राप्त होईस्तो आम्ही द्विचक्रीनिवृत्त होत्साते जो आहे तो देह धरणीतलावर टाकून मोकळे होऊ ऐसा अंदाज आहे.
अशाच अनेक प्रवासांसाठी सदिच्छा. लगे रहो.
25 Oct 2017 - 1:30 pm | इनिगोय
धन्यवाद गवि. अजून पावसात गाडी चालवायला तितकंसं आवडत नाही, पण साग्रसंगीत तयारी करून तशी एक लांबची ट्रिप करायचा विचार आहेयच.
बाकी अशा प्रवासाची चटक लगेच लागते असं आता लक्षात आल्याने लवकरच पुढचे प्रवास होतील हे नक्की.
25 Oct 2017 - 10:50 am | पाटीलभाऊ
एकट्याने फिरण्यात एक वेगळीच मजा असते....फक्त गाडी काळजीपूर्वक चालवा.
भटकते राहो...!
25 Oct 2017 - 12:09 pm | कंजूस
मोदकच्या तीनहजार किमीपेक्षा भारी आहे प्रवास.
नेहमी एकट्यानेच प्रवास करावा. कुणाला काही समजावायचे,स्पष्टिकरण द्यायचे ही कटकट नसते. शिवाय कुठे जातो त्याची जाहिरातही करू नये.
फोटो दिसताहेत सर्व.
25 Oct 2017 - 12:50 pm | मोदक
काय काका.. कशी आहे तब्बेत..?
25 Oct 2017 - 1:34 pm | इनिगोय
अॅक्टिव्हा के कंधे परसे बुलेट पे बंदूक काय हो काका? ;)
1 Nov 2017 - 10:24 pm | दशानन
जुने दुखणं असेल!
25 Oct 2017 - 2:23 pm | कपिलमुनी
किती किमी , किती स्पीडने , किती अंतर यासारख्या पॅरॅमीटरकडे फारसे लक्ष ना देता प्रवास एंजॉय केलात हे महत्वाचे !
पुढील आनंदयात्रेला शुभेच्छा !
25 Oct 2017 - 3:33 pm | इनिगोय
:) यांच्याऎवजी वर पैलवान यांनी म्हटलेत ते पॅरामीटर्स लावले होते.
25 Oct 2017 - 3:30 pm | इनिगोय
@बाजीप्रभू, @आनंदयात्री - आभार्स हो!
@पाटीलभाऊ, नक्की.. थँक्यू :)
@स्पा - हो काय? :D
(ते वरचे चार प्रतिसाद उडवून मिळतील काय?)
25 Oct 2017 - 3:31 pm | सस्नेह
पुढचा दौरा पुणे कोल्हापूर कर आणि ये इकडे !
25 Oct 2017 - 3:39 pm | इनिगोय
नक्की! सांगलीचं एक निमंत्रण लावून घेतलंय माझं मीच, तशीच येते तुझ्याकडेही. ठरेल तसं सांगते.
25 Oct 2017 - 4:04 pm | अभ्या..
अरे वा, इनितै जोरातच की, एकच लंबर ट्रीप मारली.
.
.
एक उगी जाता जाता: हायवे तरी सोडा की आम्हाला सुखाने चालवायला. ;)
25 Oct 2017 - 5:02 pm | सस्नेह
हायवे ? तो पब्लिकसाठी हो !
तुमच्यासाठी एक्ष्प्रेस वे :D
25 Oct 2017 - 5:00 pm | विखि
कॉलेजात असताना चहा साठी, पुणे-दादर च्या बाइक ट्रिपा आठवल्या
25 Oct 2017 - 6:02 pm | पद्मावति
वाह, मस्तच!
25 Oct 2017 - 10:01 pm | अजया
इनि बाउंड्रीपार करुन पुण्यात पोहोचली.
मग मिलना जरूरी था! संध्याकाळी ती निशाला भेटणार होती. चल तू पण म्हणून घेऊन गेली. निशाने लेह ते कन्याकुमारी अॅक्टिव्हावर सहा दिवसात प्रवास करुन रेकॉर्ड केला आहे. तिच्या प्रवासाने प्रेरित होऊन इनिने मुंबई पुणे अॅक्टिव्हावर प्रवास केला. या दोघींच्या बरोबर मी गप्पा मारणे म्हणजे अगदीच काय म्हणतात तशातली गत! कोथरूड ते डेक्कन असा प्रवास वेगोवरुन करणे इतपत पण विचार करायची शारीरिक मानसिक ऐपत नाही माझी :)
निशा दिड दोन वर्ष हा प्रवास प्लॅन करत होती. त्यासाठी कोणती गाडी वापरावी ,गाड्यांचे येऊ शकणारे प्राॅब्लेम,प्रॅक्टिस ट्रिप्स, खाणेपिणे तयारी,जाताना लागणारे पेट्रोल थांबे एक नाही अनेक गोष्टींचा विचार करुन हा प्रवास आखला होता.
लेहला जाताना बर्फाळ पाण्यात गारठणारे पाय, दक्षिणेत वार्यामुळे हलेडुले चालणारी गाडी, उत्तरेतले बायकांना तु क देणारे लोक ,कधी धो धो पावसातून मार्गक्रमण तर कधी ऊन्हातून पण पोरगी मागे हटली नाही. दिवसाला आठशे ते नऊशे किमी गाडी चालवून पेट्रोल पंपावर बॅकप कारमध्ये तीन चार तास विश्रांती अशी अविरत यात्रा. पूर्ण प्रवास मात्र हिचा एकटीचाच. बॅकपमध्ये सामान असायचे. कधीकधी बॅकप कार मागे पडायची अगदी वीस वीस किमी. एकटी प्रवास करताना मागून आपले कोणीतरी पंधरा मिनिटात पोहचेल एवढी आश्वासक भावना एवढाच उपयोग तिने गाडीचा केला. त्यामुळे तिचा प्रवास तसा एकलच.
सलग गाडी चालवताना लागणारी तंद्री मोडायला निशाने छान उपाय शोधला.ती गाडीत कायम पाण्याची बाटली ठेवते. थांबून पाणी पिऊन तंद्री मोडून पुढे जायची. कानात म्युझिक सुरु ठेवून तिने गाडी कधीच चालवली नाही.
गाडीवरुन तासनतास फिरताना जेवणखाण मात्र अगदी हलके असायचे. एकच वेळेस पूर्ण जेवण . एरवी सोबतचे ड्रायफ्रुट्स खिशातून तोंडात टाकायला सोपे. आईकडून मिळालेल्या गूळपोळी, शेंगदाणेकूट पोळीची शिदोरी पेट्रोलपंपावरच्या थांब्यावर खाऊन पुढे जात रहायचे. हे पुढे जायचे, जात रहायचे स्पिरिट तिला आपण हे कसे पार करणार,जमेल का आदि मेंटल ब्लाॅक न आणता तिच्या ध्येयापर्यंत घेऊन गेले. हे धाडस करताना अतिशय बारकाईने केलेले प्लॅनिंग तिच्या उपयोगी पडले. सहा दिवसाच्या एवढ्या प्रवासात तिच्या गाडीने activa 125cc अमोल साथ दिली. कधी गरम झाली,चढावर कुरकुरली पण गेली पुढे! सगळा प्रवास संपताना अगदी शेवटी कन्याकुमारीला पंक्चर झाली. गंमत म्हणजे निशा ही गाडी घ्यायला गेली तर होंडावालेच तिला ये नही चलेगी,गरम होगी म्हणून नाउमेद करत होते!
पण ती पोहोचलीच.
निशाला आता देशाची पूर्ण कोस्टल लाइन खुणावतेय. ते ती लीलया पार करेल काही शंकाच नाही! पुढच्या वाटचालीसाठी तिला शुभेच्छा.
तिच्याकडून प्रेरणा घेऊन कोकण दौर्यााची स्वप्न पडायला लागलेल्या इनिला all the best.
आता इनिकडून प्रेर्ना घेऊन मीही कोथरुड ते डेक्कन स्कुटीवरुन जायचा निदान विचार तर करायला लागते ;)
25 Oct 2017 - 10:21 pm | गवि
लेह ते कन्याकुमारी फक्त सहा दिवसांत?
पण का?
ही शंका प्रामाणिक आहे. खोचक नाही. आणि यापूर्वीही कोणी कोणी असंच कमीतकमी वेळात आसेतुहिमाचल किंवा तत्सम प्रवास पूर्ण केला अश्या बातम्या वाचून हीच शंका आली होती.
26 Oct 2017 - 7:44 am | अजया
गवि,
निशा जेव्हा या ट्रीपचे प्लॅनिंग करत होती त्यासाठी अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की अॅक्टिव्हावरुन एकटीने आसेतुहिमाचल असा प्रवास करणारी निशा पहिलीच स्त्री असणार आहे. म्हणजे हा रेकाॅर्ड होणार होता. जेव्हा रेकॉर्ड होण्याची शक्यता असते तेव्हा तो कमीतकमी वेळात केल्याने तो अगदी लगेचच मोडला जात नाही अशी काहीशी मानसिकता असते. त्यामुळे कमी दिवसात पार पाडले जाते.
दुसरे असे की हा उद्योग पर्यटन म्हणून न करता एक लाँग ड्राइव्ह म्हणून ते बघत होते. बघत रेंगाळत जाणे हा त्यांचा या ट्रिपचा हेतू नव्हता. त्यामुळे जास्तीत जास्त अंतर एका दिवसात कसे संपवता येईल याप्रमाणे प्लॅनिंग होते.
1 Nov 2017 - 10:27 pm | दशानन
फक्त सलाम!!
25 Oct 2017 - 10:05 pm | पद्मावति
अजया, सुंदर प्रतिसाद. कमाल आहे निशाची __/\__
25 Oct 2017 - 10:17 pm | अजया
इनि आणि निशाचे फोटो इनिला नेटवर्क मिळत नसल्याने मीच टाकते आहे.
25 Oct 2017 - 11:20 pm | इनिगोय
वृत्तान्त आणि फोटोंसाठी धन्स गं.
ही इतकीशी दिसणारी मुलगी एवढं मोठ्ठं काहीतरी करूनही कसलाही आव न आणता तासभर आमच्याशी गप्पा मारायला म्हणून आली, तेही हडपसर-कोथरुड आणि परत जाताना निगडी अशी यात्रा करून. तिचे एकेक अनुभव ऎकणं हाच एक अनुभव झाला आमच्यासाठी....
तयारी म्हणजे किती करावी महाराजा? या प्रवासासाठी घेतलेलं तिचं हेल्मेटच अडीच तीन किलोचं असेल! ते ती घेऊनच आली होती.
अफाट नि काटेकोर प्लॅनिंग - अगदी गाडीच्या पार्टस् च्या चार्टपासून ते एकुणेक रस्त्यांच्या (पेट्रोलपंपासकटच्या) मॅप्स पर्यंत... स्पेअर पार्टस् पासून खाण्यापिण्यापर्यंत बारीकसारीक गोष्टींचं... तरीही ऎनवेळी आलेल्या अडचणींचा बाऊ न करता काढलेले मार्ग... कमाल टाईम मॅनेजमेंट...
हायवे हिप्नाॅसिस हा मला स्वतःला जाणवलेला प्राॅब्लेम, त्यावरही आम्ही बोललो. आमच्या सगळ्याच प्रश्नांची दिलखुलास उत्साहाने उत्तरं दिली तिने. माझ्या पुढच्या ट्रिप्सबद्दल विचारून त्यावरही अनुभवाच्या चार टिप्स दिल्या. वर इतकं सगळं करून पठ्ठी म्हणते, तुम्ही अशा माझ्याशी बोलायला म्हणून आलात याचं मलाच भारी वाटतंय!
26 Oct 2017 - 9:05 pm | एस
ग्रेट!
26 Oct 2017 - 12:17 am | जुइ
एकटीने केलेली सफर आवडली. तेवढे इयर फोन्स कानाला लावून गाडी चालवणे टाळले असते तर आणखीन चांगले वाटले असते.
26 Oct 2017 - 12:56 am | जव्हेरगंज
वाह!!!
26 Oct 2017 - 1:17 am | रेवती
छान चाललय की! ग्रेट वाटतय वाचून आणि फोटू पाहून.
26 Oct 2017 - 10:29 am | इनिगोय
हे सगळं का?
तर मी माझ्यापुरतं शोधलेलं आणि निशाच्याही बोलण्यातून अधोरेखित झालेलं (तिच्या मते रेकॉर्डपेक्षाही महत्त्वाचं) उत्तर हेच आहे -
ठराविक साच्यातलं आयुष्य सगळ्यांना जगावं लागतंच. तिथे आपण काय असायला हवं, कसं असायला हवं हे ठरलेलं असतं. मात्र त्यात "आपण नेमके काय आहोत आणि काय होऊ शकतो" ही उत्तरं मिळायला फारसा वाव नसतो.
ज्यांना हे प्रश्न पडतात ते स्वतःची लिमिट्स जोखून पाहणारी अशी आव्हानं समोर ठेवून ती उत्तरं मिळवतात. ती कोणीही ठरवून न ठेवलेली आपली स्वतःची सापडलेली उत्तरं असतात. कोणी ती प्रवासातून शोधेल, कोणी उतारवयात नवं काहीतरी शिकून शोधेल, कोणी नोकरीच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडून समाजसेवा / व्यवसाय असं काही करून शोधेल. कोणत्यातरी प्रकारे चौकटीपलीकडे जाऊन शोधेल. यातल्या कोणत्याच गोष्टीला "का"चं ठाम आणि प्रत्येकाला पटेल असं उत्तर देणं शक्य नाही. ते मुळातच ज्याचं त्याला शोधावसं वाटलं पाहिजे.
अन्यथा घरी जेवण बनत असतानाही बाहेर जाऊन वेगळ्या पदार्थांची चव "का" घ्यावीशी वाटते इथपासून ते घेतलेल्या अनुभवांवर लेख, पुस्तकं "का" लिहावीशी वाटतात, अशी ही यादी कितीही लांबवता येईलच. तसंच हे आहे.
26 Oct 2017 - 10:56 am | गवि
माझ्या प्रश्नाविषयी असेल तर "हे सगळं का?" असं प्रश्नाचं इंटरप्रिटेशन चुकीचं आहे.
माझा प्रश्न फक्त झापड लावल्याप्रमाणे अगदी एका अदृश्य बोगदयातून फक्त "लवकरात लवकर" हे संपवणं / उरकणं.. कुठेच न थांबता अगदी त्यासाठी प्रसंगी सुकामेवा तोंडात कोंबत भागमभाग करत एकदाचं डेस्टिनेशनला "लवकरात लवकर पोचून टाकायचं" ही रेकॉर्ड ब्रेकिंग छाप मेंटेलिटी मला एकवेळ रनिंग, सायकलिंग, स्विमिंग याबाबत समजू शकते. पण ऑटोमेटिक वाहनावरुन प्रवास करताना मात्र समाजू शकत नाहीये..
गरज वाटली तर अधिक स्पष्ट करता येईल.
1 Nov 2017 - 10:34 pm | दशानन
हे सगळे का?
आपल्यासाठी! खरचं सांगतो हा प्रश्न समोर पण उभा करू नका, हे सगळे आपल्यासाठी, अगदी मनाच्या कोपऱ्यात बसलेल्या मी साठी! फक्त आंनद घ्या व काळजी बाकी तुम्ही आहात की समर्थ!
26 Oct 2017 - 12:15 pm | सुबोध खरे
फक्त "लवकरात लवकर" हे संपवणं / उरकणं..असं असू नये याबद्दल गविंशी सहमत.
केवळ विक्रम करणे किंवा विक्रम मोडणे हा हेतू नसेल तर असं असू नये असं वाटतं.
मी ज्या बजाज डॉमिनार ग्रुप मध्ये आहे त्यातील काही पट्ठे मुंबई कन्याकुमारी २४०० किमी ३८ तासात गेले. त्यातील ३ तास तर ते सतत ताशी ११० किमी चालवत होते. हे तरुण अर्थात वेगाची नशा म्हणून इतक्या वेगाने जात होते. मी पण डॉमिनर १२० किमी वेगाने ताशी चालवून पाहिली( हा वेग वाढवण्याची माझी आत्ता तरी हिम्मत झाली नाही). असे करताना केवळ वेगाची नशा सोडले तर बाकी इकडे तिकडे देखावा पाहणे किंवा निसर्गाचा अनुभव घेणे इ अनुभव काहीच मिळत नाही.
माझ्या स्वतःच्या अंदाजाने दुचाकीवर रोज साधारण ३०० किमी( जास्तीत जास्त ४००) एवढा पल्ला ठेवला तर आपल्याला फार कष्ट न होता सर्व ठिकाणे एन्जॉय करता येतात.
पण तरीही केवळ आपल्या गंतव्य स्थानावर लवकरात लवकर पोहोचणे केवळ हाच हेतू असेल तर ऍक्टिव्हापेक्षा दुसरी मोठी क्षमतेची मोटारसायकल घ्या. अर्ध्या वेळात पोहोचाल.
26 Oct 2017 - 12:41 pm | कपिलमुनी
अवांतर होतय त्याबद्दल क्षमस्व आणि निशा राव यांनी केलेल्या धाड्साचा पूर्ण आदर ठेवून सांगतो ,
आजकाल केवळ वेग किंवा रेकॉर्ड करण्यासाठी खूप जण अतिशय वेगात गाडी चालवतात. काहीजण सुवर्ण चतुष्कोण करतात,काहीजण कश्मिर कन्याकुमारी !
पण यात प्रवासाची मजा येते का ? मी ज्या राईड केल्या आहेत , त्या ओल्ड स्कूल राईडर्स सोबत केल्या आहेत . तिथे आम्हाला सुरक्षितता प्रथम हेच शिकवले जायचे.
रेकॉर्ड , अचिव्हमेंट हे नंतर. सुरक्षित रहा , प्रवासाची मजा घ्या , स्थानिक लोकांशी बोला , तिथले जेवण घ्या. अंतरापेक्षा अनुभवाला महत्व द्या !
काही रायडर्स ७-८ तासात पुणे - गोवा करतात , पण मधे सातारचे पेढे ,कोल्हपूरची मिसळ , बेळगावचा कुंदा किंवा आंबोलीमधे घावन खाल्ले नाही तर या राईडचा किमी लॉग करण्याशिवाय काय उपयोग ?
इनिगोय यांनी या राईडचा निसर्गसौन्दर्याचा आनण्द घेत राइड केली तशीच राईड हवी.
26 Oct 2017 - 1:37 pm | गवि
भरून आलं कपिलमुनी.. धन्यवाद.
26 Oct 2017 - 1:54 pm | मोदक
रेकॉर्ड , अचिव्हमेंट हे नंतर. सुरक्षित रहा , प्रवासाची मजा घ्या , स्थानिक लोकांशी बोला , तिथले जेवण घ्या. अंतरापेक्षा अनुभवाला महत्व द्या !
काही रायडर्स ७-८ तासात पुणे - गोवा करतात , पण मधे सातारचे पेढे ,कोल्हपूरची मिसळ , बेळगावचा कुंदा किंवा आंबोलीमधे घावन खाल्ले नाही तर या राईडचा किमी लॉग करण्याशिवाय काय उपयोग ?
+११११
26 Oct 2017 - 1:59 pm | गवि
मोदका, प्रश्नाचा खरा गर्भितार्थ समजलयाबद्दल धन्यवाद..
26 Oct 2017 - 3:49 pm | संजय पाटिल
पुर्ण पणे सहमत!!
26 Oct 2017 - 12:46 pm | संजय पाटिल
वा! मस्त भटकंति आणि अजयाताईंचा व्रूतांत पण छान ! आता मला पण अॅक्टीवा बाहेर काढावी असं वाटायला लागलय...
26 Oct 2017 - 1:52 pm | स्वाती दिनेश
इनि, मस्तच ग.. अभिनंदन! निशाचेही खूप कौतुक..
स्वाती
26 Oct 2017 - 1:54 pm | स्वाती दिनेश
निशाचेही खूप कौतुक.. आणि अभिनंदन!
अजया, हे इथे सांगितल्याबद्दल धन्यु.
स्वाती
26 Oct 2017 - 3:51 pm | इनिगोय
माझ्या आणि निशाच्या राईडमागचा उद्देश आणि लागू पडलेला अनुभव वेगवेगळा आहे.
वर अजयाने निशाबद्दल, आणि रेकाॅर्डबद्दल लिहिलं आहेच. 60-80 हा वेग नाॅर्मल कंडिशनमध्ये अॅक्टिव्हाला धोकादायक नाही, आणि बाकी सुरक्षिततेची काळजी अर्थातच तिने घेतली होती (हेल्मेट, स्पेअर पार्टस् वगैरे तपशील..), तिचा पुणे ते लडाख हा प्रवास आधीही झालेला असल्याने प्रवासाची मजा हा भाग या मोहिमेचा नव्हता. हा प्रवास मुलीने (1) अॅक्टिव्हावरून (2) ठराविक वेळात (3) पूर्ण करणं हे तिचं लक्ष्य होतं. (..हे वर उल्लेखलं असतानाही अॅक्टिव्हा ऎवजी बाइक वापरा हे म्हणजे सगळं रामायण ऎकल्यावर रामाची सीता कोण हे विचारल्यासारखं वाटलं - कृहघ्या हो सुबोध खरे. बाईकने हेच अंतर 61 तासात, आणि अरुणाचल ते कच्छ 66 तासात पूर्ण केल्याचं रेकाॅर्ड आहेच, अजूनही असतील)
या प्रवासात सलग अमूक तास ड्रायव्हिंग करू शकणं, वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरून आणि हवामानातून गाडी चालवू शकणं - त्यात - लेहचे बेभरवशी, वाॅटर क्राॅसिंगसहितचे विरळ हवामानातले रस्ते, मक्खन असलेला यमुना एक्स्प्रेस, ते साऊथचे धोधो पावसातले पुढची गाडीही दिसू न देणारे रस्ते, अगदी साऊथचे गाडी तिरपी करून टाकणारे सोसाट्याच्या वा-यातले रस्ते - एवढी रेंज होती - असा बराच कस लागत गेला.
मला असं वाटतं.. की "हे सगळं मी करू शकतेय/शकतोय" हे जे फीलिंग आहे, ते आणि रमतगमत प्रवास करताना येणारं जे फीलिंग आहे ते, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्याच राहू द्याव्या.
शिवाय आता हेही वाटतंय.. की खरंच निशाची तपशीलवार मुलाखत केली तर हे सगळं कुतूहल शमू शकेल!
27 Oct 2017 - 1:37 pm | सुबोध खरे
60-80 हा वेग नाॅर्मल कंडिशनमध्ये अॅक्टिव्हाला धोकादायक नाही,
ऍक्टिव्हा ला साठ वेग खूप जास्त आहे आणि ती ८० वेगाने जाईल का हि शंकाच आहे. ऍक्सिलरेटर पिळून ठेवला तर जाईल. पण या वेगाने जाताना मध्ये एखादा दगड किंवा कुत्रा किंवा खड्डा आला किंवा एखाद्या वळणावर वाळू पडलेली असेल तर गाडी नक्कीच घसरेल आणि अशा स्थितीत फक्त हेल्मेट हे पुरेसे सुरक्षित नाही. आपल्याला पूर्ण रायडींग गियर असण्याची आवश्यकता आहे. गुढघे आणि कोपरावर भर येऊन अस्थिभंग होणे किंवा डोके आपटून मेंदुत रक्तस्राव होणे इ गोष्ट सहज होतात. आपण तासन तास जर गाडीच्या जास्तीत जास्त वेगाने चालवता तेंव्हा आपली एकाग्रता टिकवणे शक्य होत नाही आणि एका विशिष्ट दुर्दैवी वेळेस एकाग्रता भंग झाली असताना अपघात होतो. जे चालक लांबच्या सहली करतात त्यांना हा "थोडक्यात वाचलो" हा अनुभव नवीन नाही
गाडी बंद पडली तर ट्रक मध्ये टाकून आणता येईल.या पण अपघात झाला तर फार कठीण होते.
माझ्या कडे आजमितीला ऍक्टिव्हा सीबीएस आहे. होंडा युनिकोर्न आहे आणि आता बजाज डॉमिनार आहे४०० सी सी ३४ BHP.
डॉमिनारचा टायर साईझ ऍक्टिव्हाच्या दीडपट आहे शिवाय त्याला पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स आहेत आणि ABS(अँटी लॉक ब्रेक सिस्टीम) पण आहे. ९० वरून ० वेगाने आल्यावरही गाडी अजिबात घसरत नाही. असे असूनही ८० च्या वेगाने सतत तासन तास चालवणे हे सुरक्षित नाही. मग ऍक्टिव्हा तर नाहीच नाही.
"हे सगळं मी करू शकतेय/शकतोय" हे जे फीलिंग आहे. हे इतर बरेच लोक करून पुढे गेले आहेत.
निशा ताईंना हे कौतुक मिळते आहे ते स्त्री म्हणून मिळते आहे असे लिहायचे नव्हते तरी खेदाने लिहावे लागत आहे. याचे कारण ऍक्टिव्हा चालवायला सोपी आहे म्हणून हा लेख वाचून कोणी दुसरी मुलगी अनाठायी धाडस करू नये असेच माझे मत आहे.
क्ष किरण तज्ज्ञ म्हणून मी असंख्य दुचाकीचे अपघात पाहिले आहेत. आणि ते का होतात आणि कसे होतात याची बरीच कारण मीमांसा आणि उहापोहा आमच्या वैद्यकीय जर्नल मध्ये वाचायला मिळतात.
एवढे अवांतर लिहिण्याचे कारण-- सुरक्षितता वाऱ्यावर सोडून कोणतेही धाडस करू नये एवढेच मी म्हणेन.
ऍक्टिव्हा ऐवजी बाईक वापरा हा सल्ला एवढेच एक वाक्य म्हणून घेऊ नका. जास्त मोठ्या इंजिन क्षमतेची आणि सुरक्षित उपकरणे असलेली दुचाकी विकत घ्या म्हणजे ऍक्सिलरेटर पिळून असुरक्षित रित्या चालवावी लागणार नाही असा अर्थ आहे.
बाकी जो तो काय करावे ते करण्याला मुखत्यार आहेच.
कृपया हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये. (माझा प्रतिसाद निशा ताईंना दाखवला तरी चालेल.)
27 Oct 2017 - 2:39 pm | कपिलमुनी
बातमी
वरील बातमीमधे एका प्रथितयश बाईकर्सच्या आपघाताची माहिती आहे. संपूर्ण रायडीन्ग गियर असताना बाइक स्किड होउन अंर्तगत रक्त्स्त्रावामुळे मृत्यू झाला.
ब्रेकींग डिस्टन्स : तुमच्या बाइकचा
ब्रेकींग डिस्टन्स ही सर्व बाईकर्स नी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
८० च्या स्पीडमधे कुत्रा किंवा माणूस अचानक पुढे आला किंवा समोरच्या गाडीने ब्रेक मारले.
अचानक खड्डा आला तर आपली बाईक स्किड ना होता किती अंतरावर थांबते हे महिती पाहिजे.
८० च्या स्पीड मधे डोमिनार सहज जागीच स्किड ना होता थांबते पण अॅक्टीवा घसरते सो तो वेग सेफ नाही.
त्याचप्रमाणे बॅलन्स , टायर्स मधे सुधा अॅ़तीवा टूर बाइकस च्य तुलनेत सेफ नाही.
26 Oct 2017 - 5:10 pm | मोदक
प्रत्येकाचा त्या त्या राईडचा उद्देश आणि अनुभव वेगळा असतो तसेच राईडकडे पाहण्याचा दृष्टीकोनही* वेगळा असतो.
हे सगळे का करायचे..?आणि असे करण्यापेक्षा तसे केले असते तर चालले असते की..! हे सनातन मुद्दे आहेत. जितक्या असतील तितक्या बाजू ती ती भूमीका मांडणार्याच्या दृष्टीने बरोबर असतात. त्यामुळे कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर हे न ठरवता निव्वळ निशाने जे साध्य केले आहे त्यावर एक फर्मास मुलाखत वाचायला आवडेल.
इतके अंतर रोजच्या रोज कापताना काय काय काळजी घेतली..?
सलग १८ - १९ तास गाडी चालवून खांदे आणि मनगटाच्या ठरावीक स्नायुंना विलक्षण रग लागते त्या अंगदुखीचे काय केले..?
वेळेचे आणि पाण्याचे शेड्युल कसे मॅनेज केले..?
झोप आणि दमणूक कशी लांब ठेवली..?
हे सगळे नक्की वाचण्यासारखे असेल कारण ३ दिवस मिळून १३ तास झोपणे आणि अडीच हजार किमी अंतर कापणे ही अचाट कामगिरी आहे.
*मी वर कपिलमुनीला सहमती दर्शवली आहे, माझ्या मते आदर्श राईड तशी असावी. तशी राईड कोणी करत नसेल तर त्याला चुकीचे म्हणण्याचा मला अधिकार नाही याची जाणीव आहे.
** तसेच हे गवि, डॉ खरे आणि कपिलमुनीसारखे लोकांचे मुद्दे आहेत म्हणून मुलाखतीचा आग्रह...
"वडीलांच्या बुलेटवर देशभर फिरलो" असल्या बढाया किंवा कंजुसकाका छाप अनावश्यक तुलना असेल तर मी ही फाट्यावरच मारले असते.
26 Oct 2017 - 5:35 pm | अजया
:)
बर्याच दिवसांनी मिपाश्टाइल चर्चा वाचली. मजा आली ! प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद हो गविकाका ;) नाहीतर पुढचे वाचायला नसते मिळाले!!
निशाची सविस्तर मुलाखत जरुर घेऊ.
26 Oct 2017 - 7:27 pm | गामा पैलवान
इनिगोय,
पहिल्याप्रथम तुमचं अभिनंदन. केवळ एक अडसर असतो. तेव्हढा दूर झाला की आकाश मोकळं झालंच म्हणून समजा.
निशा राव यांची मुलाखत घ्याच म्हणतो मी. वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : वरील चित्रात एमेच-०२ ला खेटून आहेत त्या तुम्ही आणि एमेच-१२ च्या जवळ आहेत त्या निशा राव. हा अंदाज बरोबर आहे का?
27 Oct 2017 - 3:30 pm | असंका
12?,
14!
बाकी बरोबर!
26 Oct 2017 - 7:53 pm | टवाळ कार्टा
सविस्तर प्रतिसाद नंतर लिहीन...तोपर्यंत बाब्बो...लय भारी
27 Oct 2017 - 6:54 am | मनिमौ
जियो. खूप खूप आवडली तुझी सफर. काॅलेजात असताना सायकल वरंन लांब लांब जायचे मी त्यांची आठवण आली. तुझा लेख वाचून उत्साह वाढला आहे. येणार्या थंडीच्या मोसमात एक ट्रिप तो बनती है.
27 Oct 2017 - 3:27 pm | चांदणे संदीप
इन्स्पायरिंग!
Sandy
31 Oct 2017 - 11:59 am | इनिगोय
नमस्कार... पुण्यात शेवटचे दोन तीन दिवस पुण्यातल्या पार अनोळखी वाटा धुंडाळण्यात गेल्याने फारसा वेळ मिळाला नाही. आणि उरलेल्या वेळात नेटवर्क चा मिस्टर इंडिया होत राहिल्याने लॉगिन केलं नाही. वर आलेले प्रश्न निशाकडे पाठवले आहेत, तिची उत्तरं येतील तेव्हा इथे पोस्ट करेनच.
सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार..
बाकी २९ तारखेला (परवा) असाच परतीचा प्रवास करून मुंबई गाठली आहे. एकूणच या एका आठवड्याच्या आगळ्यावेगळ्या ब्रेक ने दोन तीन वर्षांचा शीण पार घालवला. येताजाता केलेला प्रवास, दिवसाला एक पुस्तक या गतीने केलेलं वाचन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "मला जसं पाहायचं होतं तसं" पाहता आलेलं पुणं, ... या सगळ्यामुळे तुडुंब खुश होऊन परत कामाला लागले आहे.
31 Oct 2017 - 12:11 pm | इनिगोय
मला पाहायचं होतं त्या पुण्याची काही स्मरणचित्रं -
भाऊ रंगारींचा वाडा. हा आवर्जून पहा असं सांगण्यात आलं होतं, थोडी शोधाशोध करून सापडला आणि तो आतून पाहताही आला. ट्रस्टींपैकी एकांची भेट झाली आणि त्यांनी तिथे असलेली शस्त्रास्त्रं, गुप्त जागा, भुयार इ. दाखवलं, माहितीही दिली. अक्षरशः इतिहासाच्या पुस्तकात फिरून आल्यासारखं वाटलं हा वाडा पाहिल्यावर...
मागे कै. भाऊ रंगारी गणपतीची कागदाची मूर्ती घडवतानाचं वाड्यातलं चित्र. ही कागदी मूर्ती उत्सवात ठेवली जाते अजूनही. आणि पुढ्यात त्यांची स्वतःची मोठी मूर्ती. हिची अजून एक लहान प्रतिकृती वाड्यात आहे, जी कागदाची असून भाऊंनी स्वतःच ती घडवलीय अशी माहिती मिळाली.
1857 चं बंड पुण्यात ज्याच्या समोर सुरू झालं तो हा बंडातला म्हसोबा.. हा शोधूनही सापडला नसता, रंगारी ट्रस्टचे खजिनदार कुसुरकर यांची गाठ पडल्यामुळे सापडला!
बादशाही बोर्डिंग!! दु.दा.मधल्या बाकी सगळ्या जागांपैकी समहाऊ हाच एक फोटो बरा आला.
आणि ही अफलातून कॉफी..... पुण्यात चक्क रात्री उशिरा मिळाल्यामुळे जास्तच छान लागली.
31 Oct 2017 - 1:10 pm | गवि
बादशाही बोर्डिंगच्या फोटोत सूचनापाट्या न दिसल्याने भडभडून आलं.
-पूर्वाश्रमीचा बादशाही अनालिमिटेड आमटीपोळी कुस्करण चाहता गवि
31 Oct 2017 - 2:09 pm | इनिगोय
:D पुढच्या ट्रिपमध्ये नक्की.
बाकी "...हवा काढण्यात येईल" सारख्या पाट्यांचे फोटो काढण्याची फर्माईश पूर्ण केली आहे.
1 Nov 2017 - 7:12 am | अभिजीत अवलिया
कुठे मिळाली ही अफलातून कॉफी? पत्ता द्या की.