सावळ्या रानाच्या कुशीतून शिवार मोहरले
उभ्या शेतात निळे आभाळपक्षी उतरले
राईराईत सूर्यदूतांचा पदर उलगडला
झाडाझाडातून कोवळा गंध ठिबकला
भिरभिरणाऱ्या ऊन्हाची झुळूक भवताली नाचली
बहरलेल्या फांदीवरील पालवी हळूच कुजबुजली
तांबड्या पायवाटेने दूर गवतात पाय पसरले
वाऱ्याचे रुपेरी सूर पानात रुमझुमले
बाभळीच्या हिरवट सावल्या पिकात सांडल्या
दाण्यादाण्यात रानपाखरांच्या चोची बुडाल्या
रंग पिकल्या झुडुपाचा बांधावरती देह झुकला
चहुकडे हिरव्या नक्षत्रांचा मळा फुलला
प्रतिक्रिया
24 Oct 2017 - 3:10 pm | एस
चपखल वर्णन!