काय विचार करताय?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
9 Oct 2017 - 12:51 pm

नुकताच बोली आणि भाषा या लेखावर गापै यांची प्रतिक्रिया वाचून डोक्यात काही विचारचक्रे फिरू लागली.
त्यात एक मुद्दा असा आला कि भाषा हि एका व्यक्तीसाठी किती गरजेची आहे?

आपण लहानपणापासून काही भाषा शिकतो आणि हळूहळू त्याच भाषेत "विचारही" करू लागतो.
विचार करताना आपल्याला कोणाशीही चर्चा करायची नसते किंवा कोणाला मुद्दा समजून सांगायचं नसतो तरीही आपण आपल्याला शिकवलेल्या भाषेतच विचार करतो. का?
"रविवारी कुठे फिरायला जाता येईल" हा विचार आपल्या डोक्यात येतो "शब्दस्वरूपात" आणि मग आपण त्याचे परिणाम म्हणून ठिकाण शोधू लागतो.

शब्दांशिवाय विचार करणे शक्य आहे का? का शब्दच आपल्या विचारांना दिशा देतात?
"दिशा" हा शब्द इथे महत्वाचा आहे. भाषेला काही नियम असतात, त्यानुसार वाक्य तयार होतात आणि त्याचा एक साचा तयार होतो. त्या तयार झालेल्या साच्यावर आपण विचार करतो.
म्हणूनच "रविवारी कुठे फिरायला जाता येईल" आणि "कुठे फिरायला जाता येईल" या दोन प्रश्नांचे परिणाम म्हणून येणारी उत्तरे वेगवेगळी असतील. कारण आपण कोणता दिवस, सुट्टी, वेळ, अंतर या सगळ्याचा systematic अभ्यास आपल्या मनात करतो आणि त्यानुसार उत्तर काढतो. म्हणजे भाषा आपल्याला "विचारांची" एक दिशा देते.

जर आपण भाषेशिवाय विचार करायचा म्हटलं तर चित्रांच्या स्वरूपात करू शकतो पण तो abstract असण्याची शक्यता जास्त आहे. त्यातून शास्त्रीय असे काही मिळू शकते का याबाबत साशंकता वाटते.
आपल्या मेंदूला भाषेच्या स्वरूपात निर्देश मिळत राहतात आणि त्यानुसार तो काम करत राहतो असे मला वाटते.

पण मग भाषा हि केवळ संवादाचे माध्यम न राहता त्या पुढे गेली आहे का? ती आपल्या विचारांची आणि पर्यायाने आपल्या कृतींची अधिकारी झाली आहे का?
मग जर एखादी भाषा फारशी सशक्त नसेल अथवा कमी शब्दभांडार किंवा व्याकरणाच्या दृष्टीने कमकुवत असेल तर ती त्या व्यक्तींच्या विचारांवर देखील परिणाम करू शकेल का?
कमी शब्द असलेली भाषा व्यक्तीला त्या भाषेतून विचार करताना इतर भाषेपेक्षा कमी निवड स्वातंत्र्य देते. त्यामुळे मर्यादित विकल्प त्याच्यासमोर उपलब्ध राहतात. (अशी शक्यता मला वाटत आहे )
आपण आपल्या मेंदूतील विचारांना भाषेच्या नियमात अडकवत आहोत का? का ते नियमच आपल्याला विचार करायला मदत करत आहेत?

जर इतर प्राणीमात्रात पहिले तर त्यांची विचार करण्याची पद्धती दृश्यस्वरूपात असण्याची जास्त शक्यता वाटते. तसेच त्यांची भाषादेखील काही विशिष्ट आवाज आणि त्याचे ठराविक अर्थ इतपत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे त्यांना आजपर्यंत माणसाप्रमाणे भविष्याचा किंवा तंत्रज्ञानाचा विचार करता आला नसेल का?

आणि असे असेल तर भाषा हि फक्त संवादाचे माध्यम न राहता माणसाच्या महत्वपूर्ण शोधांपैकी अत्यंत महत्वाचा शोध मानायला हवा ज्याने माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले.
यातले सगळेच मुद्दे बरोबर नसतीलही पण विचार करण्यासारखे नक्कीच आहेत...
तर मग आपले मत काय आहे याच्यावर? विचार करून सांगा... कुठल्या भाषेत करताय? :)

भाषाविचार

प्रतिक्रिया

सोमनाथ खांदवे's picture

9 Oct 2017 - 9:21 pm | सोमनाथ खांदवे

नावा प्रमाणे च लेख लिहलाय राव

शब्दबम्बाळ's picture

9 Oct 2017 - 9:50 pm | शब्दबम्बाळ

धन्यवाद!
जर आपल्याला मुद्दा समजू शकला नसेल तर मीच लिहायला कमी पडलो आहे.
सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर... "विचार करायला भाषेची गरज आहे का?" हा गाभा आहे...

विचार करायला भाषेची गरज नाही ... भाषा न येणारी लहान मुले, प्राणी, पक्षी हे सुद्धा विचार करत असतात.

थॉर माणूस's picture

10 Oct 2017 - 12:41 pm | थॉर माणूस

सहमत, विचार करत असतीलच. पण मग भाषेशिवाय केलेला विचार हा कसा असेल हा एक मुद्दा रोचक वाटला. म्हणजे जर भाषाच नसेल तर एखाद्या परीस्थीतीचा/गोष्टीचा विचार करायला मर्यादा येत असतील का? इतर प्राण्यांच्या विचारात त्यांच्या भाषेच्या हिशोबात गुंतागुंत असेल का? म्हणजे भाषा जितकी कमी प्रगत तितके गुंतागुंतीचे विचार करण्याची क्षमता कमी अशी काही मर्यादा? असे कुठले संशोधन झाले असेल तर शोधायला हवे. इंटरेस्टींग आहे.

शब्दबम्बाळ's picture

11 Oct 2017 - 8:36 am | शब्दबम्बाळ

हेच सांगायचे होते...
भाषेशिवाय विचार करण्याची उदाहरणे म्हणून पटकन लहान मुले किंवा प्राणी/पक्षी यांची उदाहरणे आली.
आता प्राणी आणि पक्षी यांचीदेखील एक आवाजाच्या माध्यमातून भाषा असतेच पण त्यातून ते धोका, आनंद अश्या इंद्रियांना जाणवणाऱ्याच गोष्टीबद्दल संदेशवहन करतात.
म्हणजे ज्यांच्याकडे उन्नत भाषा नाही त्यांना आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे अवलोकन करून त्यातून स्वतःशी सूत्रबद्ध मांडणी करणे कठीण जात असावे. अर्थात हे अनुमानच...
एक चांगला लेख मिळाला यावर... त्यात मी वरती लिहिलेले मुद्दे देखील विचारात घेतलेले आहेत..
Do We Need Language to Think?

Language is important for developing extensive concepts and for abstract thinking, something humans have evolved into doing. Language provides a set of rules that helps us organize our thoughts and construct logical meaning with our thoughts.

However, basic thinking may not necessarily involve sentence structure in our mind. We still have some form of "inner voice" that we use to be self-aware of the world around us and apply our thinking to what we intend to do with that world.

कंजूस's picture

10 Oct 2017 - 12:31 pm | कंजूस

हा विषय राणा अन त्याच्या शिक्षिका बायकोला संवादासाठी द्यायला हवा.

शब्दबम्बाळ's picture

28 Jun 2018 - 11:53 am | शब्दबम्बाळ

काही दिवसांपूर्वी या विषयावरचे काही रोचक व्हिडीओ पाहण्यात आले. त्यापैकीच हा एक, सध्या वेळेअभावी फारसे लिहीत नाहीये पण "१९८४" हि कादंबरी वाचावी लागेल असे वाटत आहे.
त्यात बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत असे एकंदरीत वाटत आहे.
वरती लेखातसुद्धा मी मत व्यक्त केले होते कि एखादी भाषा कमी प्रगत असेल तर ती विचार करण्याची क्षमता कमी करू शकते का?

इथे या पुस्तकात देखील हुकूमशहाने "न्यूस्पिक" नावाची कमी शब्द असलेली भाषा तयार करवून घेतली आहे जेणे करून लोकांची दिशाभूल करणे आणि त्याच्या विचारांना मर्यादित करणे शक्य व्हावे.
पण ते वैज्ञानिक पद्धतींनी सिद्ध करता येईल का, या गोष्टींवर हा व्हिडीओ भाष्य करतो. ज्यांना रस असेल त्यांनी नक्की पहा!

गामा पैलवान's picture

28 Jun 2018 - 12:45 pm | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

"विचार करायला भाषेची गरज आहे का?" हा गाभा आहे...

स्वानुभवाने सांगतो की निदान एका क्षेत्रात तरी विचार करायला भाषेची गरज नाही. ते म्हणजे गणित. मात्र संकल्पना समजून घ्यायला तसेच इतरांपाशी व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज पडते.

आ.न.,
-गा.पै.