घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती! भाग २
खेड च्या घराच्या पुढील दारी अस्मिचा एक फोटो काढला. तेव्हढ्यात विलास आला ( खेड चे घर साफसुफ ठेवायचे काम गेली ९ वर्षे विलास करतोय) सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अगदी प्राथमिक सुविधा ही कशाबशा सुरु आहेत खेडच्या घरात. तरीही विलास व त्याच्या कुटुंबियांच्या प्रेमादरामुळे खेड चे अल्पसे वास्तव्य सुखावह झाले. सचैल स्नान करून ताजातवाना झालो, विलासच्या घरी जाऊन चहा घेतला. उद्या केव्हा निघणार असा प्रश्न आला. पहाटे सहा ला निघणार, मी चहा घेऊन येतो साडेपाचलाच इति विलास. रात्री जवळच्या खानावळीत साधेच जेवण घेतले, बालवाडी पासूनचा मित्र गप्पा मारायला रात्री आला होता. साडेनऊच्या आसपास झोपलो. मध्ये मोबाईल , सायकल चे दिवे , बॅटरी बँक हे सर्व एकाच चार्जर वर चार्ज करायचे असल्याने एकदोन वेळा उठावे लागले, आपणहूनच जाग आली तरीही छान झोप झाली , शेवटी घरची झोप ती घरची. पाचलाच तयार होतो निघायला, इतक्यात विलास आला, फक्त चहा असे सांगून देखील ताजा उपमा व छान चवीची गावठी केळीही आणली होती, त्याच्या प्रेमळ आग्रहाचा मान ठेऊन थोडा उपमा खल्ला व बाकी ऐवज बांधून घेतला. तुमच्या सर्व वस्तू घ्या नीट बाकी घर मी आवरतो असे सांगून विलास ने निरोप दिला. काळकाई मंदिराबाहेर सायकल लावली तेव्हा सहा वाजायचे होते, मंदिराच्या रोषणाईचा एक फोटो घेतला व निघालो. आता लक्ष होते कशेडी घाट. बरोब्बर सात वीस ला कशेडी घाटाच्या पायथ्याशी पोहोचलो. एक कॉलेज युवक माझा फोटो काढू इच्छित होता, थांबून त्याला फोटो काढू दिला. घाट चढाई ला प्रारंभ केला.
आजची चढाई थोडी उभी असल्याने कठीण जाईल असे वाटत होते पण छान हवा व सुंदर निसर्ग यामुळे काहीच त्रास न होता फक्त एकदाविश्रांती साठी व एकदा फोटो साठी थांबून कशेडी चा माथा गाठला. विश्रांतीच्या वेळी तीन सुतार पक्षाची पिल्ले दिसली एका ऐनाच्या झाडाभोवती मस्त बागडत होती, मोराची केकावली ही छान ऐकू आली. फोटोसाठी थांबलो तेव्हा, युवकांचा एक गट ही तेथे येऊन थांबला, भिडे गुरुजींनी घडवलेले हे शिवभक्त युवक, रायगड दर्शनाला निघाले होते, नायक होता अजय भोसले. माझा ही नमस्कार सांगा रायगडाला व राजांना, असे सांगून, जय शिवराय अशी गर्जना करून त्यांनी माझा व मी त्यांचा निरोप घेतला. चला काल, वाहतूक कोंडी मुळे रायगडाला नमस्कार राहिला होता, आज त्याची भरपाई झाली, आता खेड ला रहायला गेलो कि एकदा तरी सायकल ने जायचे या पवित्र ठिकाणी असा निश्चय केला मनात. घाटमाथा गाठला तेव्हा फक्त ८:२३ झाले होते, व अजिबात त्रास न होता पोहोचलो होतो, अंबरनाथ ला फोन करून सांगितले, झाला कशेडी सर, आता मस्त बारा किमी चा उतार व त्यानंतर पोलादपूर ला कालच्याच ठिकाणी मस्त न्याहारी. सुसाटत पोहोचलो पोलादपूरला. वेळेचे गणित चांगलेच सुटले होते. न्याहरी करून पाणी बाटली भरून निघालो, महाड गेले, आता हिशेब करू लागलो, आजचा मुक्काम परत माणगावजवळ करण्यात काहीच अर्थ नव्हता कारण, एकतर उद्या साठी बरेच अंतर राहिले असते व आज दुपारी पोहोचून उरलेला दिवस काय करायचे,हा ही सवाल होताच. कशेडी अपेक्षेपेक्षा कमी श्रमात व कमी वेळात सर झाला होता. पॅडल मारता मारता नवे गणित मांडू लागलो. काल खेड ला असताना ट्रेक मित्र आदित्य ने खेड ते पाली हे अंतर १३१ च्या आसपास आहे असे फोनवर सांगितले होते, त्यात अजून चाळीस ची भर घालून,मला आता भर उन्हात वरदविनायक महड येथे वस्ती करण्याची स्वप्न पडू लागली होती. लोणेरे येथे थांबलो. मस्त नारळ पाणी घेतले.थोडा उपमा होता तो ही संपवला. आता मात्र रहदारीचा त्रास जाणवू लागला. डांबरीकरणाचे थरावर थर, खोल साइड पट्टी, मागून येणारी भरधाव वाहने, यामुळे वेग मंदावला. मळभ ही आले. रस्त्यावर चिरडल्या गेलेल्या एका सापाकडे लक्ष गेले, त्याच्या पार्थिवाची अजून विटंबना टाळण्यासाठी थोडा वेडावाकडा झालो इतक्यात रस्त्या शेजारच्या गवतातून एक साप वळवळत रस्त्यावर आला, पण लगेच माघारी ही वळला, कदाचित तापलेल्या रस्त्यामुळे असे झाले असावे, या सर्व गडबडीत माझी ही त्रेधा उडाली, नशीबाने मागून वाहन येत नव्हते. थोडा पुढे जाऊन सावलीत थांबलो. समोर एक गॅरेज दिसले. चेन ला थोडे तेल टाकून घेतले, गॅरेजमालकाने पैसे घेतले नाहीत, थोडी चौकशी करून शुभेच्छा दिल्या. अशा शुभेच्छा मिळत असल्यानेच आत्तापर्यंतचा प्रवास छान झाला होता.इंदापूर च्या थोडे अलीकडे एका गुजराती/जैन शाकाहारी हॉटेल जवळ आलो तोपर्यंत, केव्हा ही पाऊस येईल अशी काळोखी झाली होती. भुकेची जाणीव नव्हती झालेली तरी थांबलो, रिकामेच होते हॉटेल, अगदी सायकल ला ही सावली मिळाली व सर्व पसारा ही मांडता आला. दहीभात सांगितला, येईपर्यंत जोरात पावसाला सुरुवात झाली, दीड वाजला होता, पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. शेवटी ३ वाजले कि निघायचे असे ठरवून, पावसापासून बचाव होईल अशी सर्व बांधाबांध करून तयार झालो, मी जेवत असताना हॉटेल मालक आले, त्याच्या काही प्रश्नांनी छान करमणूक झाली, मालक परत गेले गाडीने व थोड्यावेळाने पुन्हा आले तरी मी तेथेच, मी रेनकोट घालून तयार होतो निघायला व हॉटेल मालक एसी गाडीतून हॉर्न वाजवून नोकरांना छत्री आणण्या साठी पुकारत होता. “क्या मिलता है इतना सायकल चलाके” या प्रश्नाचे उत्तर मी सांगून काय कळणार याना, असो. मगाशी पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरचे खड्डे तुडूंब भरले होते. खड्ड्यांची भूमिती समजत नसल्याने खड्ड्यात चाक गेले तर सुरक्षेचे गणित साफ चुकायची दाट शक्यता होती, त्यामुळे वेग मंदावला. मागून पुढे जाणाऱ्या वाहनाच्या डाव्या चाकावर नजर ठेवायची, व ते चाक हेच खड्ड्याची भूमिती मोजायचे साधन म्हणून वापरून त्यावरून आपला मार्ग व सुरक्षेचे गणित सोडवायचे, असा नवाच प्रकार लक्षात आला. त्याचा वापर करून बरेच अंतर पार केले. पाऊस थांबला व रेनकोट हा एक कुकर असून आपण त्यात शिजतो आहोत अशी भावना होऊ लागली, तरीही पुढे जात राहिलो तसाच कारण, वरुन पडणारे शुद्ध जल जरी थांबले होते तरी रस्त्यावरून उडणाऱ्या अतीपवित्र जलापासून ही रेनकोट संरक्षण देत होता. सुक्खा रस्ता केव्हा येतोय असे झाले होते, एकदाचा सुक्खा रस्ता दिसला व रेनकोट रुपी कुकर मधून बाहेर आलो. आता रस्ता ही चार पदरी होता त्यामुळे वेग वाढला. सुकेळीची खिंड आली रस्ता पुन्हा आक्रसला, तरीही वेग कायम राखत खिंडी चा चढ व उतार पार केला, सकाळी कशेडी घाटाच्या चढाईने खूपच आत्मविश्वास दिला होता. इतका की यापुढे कोणताही घाट आला तरी त्याचा योग्य तो सन्मान राखत, त्याच्या सोन्दर्याचा आस्वाद घेत त्याला नक्की सर करू शकेन. वाकण फाट्यापर्यंत पोहोचलो तेव्हा ४:४५ झाले होते. हनुमान हॉटेल च्या मालकिणीने हसत हसत विचारले ,आलात पण? हो, फक्त चहा द्या आज असे सांगून विसावलो. थांबलेल्या दोन तीन ग्राहकांनी सायकल भोवती गराडा घातला, त्यांच्या प्रश्नांना माझ्या वतीने मालकीण बाईनीच उत्तरे दिली परवा गेले होते खेड ला, वगैरे वगैरे, मग त्यांचे, सायकल व प्रवास याविषयीचे कुतुहूल चहाचा आस्वाद घेत शमवले. त्यातील एका ने माझे चहा चे पैसे आपल्या बिलातून देऊन टाकले माझ्या नकळतच. नोट बाहेर काढलीच होती मग त्यातून एक मस्त पान कोंबले तोंडात व निघालो. पावसाने आज ही आपले ब्रीद राखले होते, सारे वादे इरादे बरसात आके धो जाती है चे, जवळजवळ २ तास फुकट घालवून . आता वरदविनायक महड पर्यंत दिवसा उजेडी पोहोचणे शक्य नव्हते. अर्थात पाली ला ही छान सोय होतीच भक्त निवासात रहायची. वाकण ते पाली या आवडत्या रस्त्याचा आनंद घेत उरलेलं ९ किलोमीटरचे अंतर मजेत पार करून साडेपाच ला भक्त निवासात पोहोचलो. खोलीचा ताबा घेऊन, सायकलिंग नंतर करायचे काही व्यायाम प्रकार करून , थंड पाण्याच्या शॉवर खाली दहा मिनिटे उभा राहीलो,सर्व शीण गेलाय याची खात्री होई पर्यंत. जरा पाय मोकळे करायला? व बाहेरून का होईना पण देव दर्शन करावे म्हणून बाहेर पडलो, चौकशी केली, होटेल्स दहा अकरा पर्यंत असतात सुरु अशी माहिती मिळाली. खोलीवर येऊन एक दोन फोन केले व जेवायला पुन्हा बाहेर गेलो. नाचणीची भाकरी असलेली थाळी घेतली. दीड भाकरीतच तृप्तीचा ढेकर आला, अर्धी भाकर व थोडी चटणी घेतली बांधून उद्याच्या न्याहारीची मस्त सोय झाली.
भक्त निवास च्या व्यवस्थापकांना विनंती केली सायकल ही खोलीत ठेवण्यासाठी, त्यानी, कुलूप लावून ठेवा खालीच, पहारेकरी असतो रात्री ,काही काळजी करू नका, असे सांगून विनंती अमान्य केली, कुलुपाची लांबी मोठी होती त्याचा वापर करून एका खांबाला बांधली सायकल व पंप,दिवे अशा सर्व वस्तू काढून घेऊन , थोड्या नाखुशीनेच गेलो झोपायला. उद्या सकाळी हे सर्व पुन्हा नीट अडकवायला लागणार होते सायकल ला. मग सामानातून डोक्यावरचा दिवा आठवणीने बाहेर काढून ठेवला झोपण्या पूर्वी, हो उद्या पहाटे निघताना मंडपातील दिवा सुरु नसेल तर ही सर्व बांधाबांध पक्की करण्यासाठी दिवा आवश्यक होता.
‘उद्या घरा कडून घराकडे सफर पूर्ण होणार’ या खुशीत बराच वेळ झोप नाही आली, गेल्या तीन दिवसांचा सर्व पट डोळ्यांपुढे सरकत होता. पहाटे चारलाच जाग आली. पावणे सहा ला सर्व बांधाबांध करून, पहारेकऱ्याच्या घोरण्यात व्यत्यय न आणता खोलीची किल्ली ठेऊन निघालो. आता सुमारे 40 किमी मग महड, वाटेत एका ओढ्यापाशी बसून नाचणीची अर्धी भाकर खाऊन निघालो. सह्याद्रीत केलेल्या भटकंतीत अशा अनेक जागी अशाच छान न्याहरी केल्या आहेत त्यांची आठवण आली. शांत निर्जन जागा, खळाळते पाणी, शुद्ध हवा, पक्षांची किलबिल, जीवाभावाचे मित्र, व अस्सल गावरान खादाडी, सुख सुख म्हणतात ते हेच. आजूबाजूच्या झाडांचे विविध आकार न्याहाळताना बोरकरांची “झाड गूढ” ही कविता आठवली, “झाड पाताळ फोडीते झाड आकाश वेढीते’ असे काहीसे शब्द असलेली, अफाट प्रतिभेचा कवी. मनोमन नमस्कार करून हाती पुन्हा हॅन्डल धरले व निघालो. महड ला आलो तेव्हा नऊला दोन तीन मिनिटे कमीच होती. परवाच्याच हॉटेल ला थांबलो. घरी फोन केला, सर्व सुरळीत चाललय, असेच सूरु राहिले तर दुपारी दोन पर्यंत येतो घरी, उशीर झाला तरी आजचे दुपारचे जेवण घरीच घेणार.
मग मात्र दिलेल्या शब्दाला जागुया असे म्हणत फारसा न थांबता थोड्या अधिकच वेगाने घराच्या ओढीने पुढेजात राहिलो. भिवपुरी ला पाटलांना रस्त्यावरूनच हात केला न थांबता. नारळपाणी घेण्यापुरता वांगणी ला थांबून, दोन ला पाच मिनिटे कमी असतानाच घरची बेल दाबली. अस्मिला डोक्यावर उचलली, एक फोटो काढ असे सौ ला सांगितले, किती काळा झाला आहेस चार दिवसात असे म्हणत एक फोटो निघाला.
फारा दिवसांचे एक स्वप्न पूर्ण झाले होते. घराकडून घराकडे 480 किमीची सायकल सफर एकट्याने पूर्ण केली होती. एकही अपघात किंवा आजारपण न होता मला व अस्मिला ही.
या सर्व प्रवासाला परवानगी दिल्या बद्दल स्मिता व आई यांचे खास आभार, २१ तारखेला पाऊस असल्याने नको नीघू असा प्रेमळ सल्ला वजा आज्ञा देणाऱ्या, व रोज खुशालीची बातमी मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे ही खास आभार. वाटेत भेटलेल्या जुन्या व नव्या सर्वांचे खास आभार. व खास आभार ,मी ज्या आस्थापनेत काम करतो त्या आस्थापनाचे कारण, “आरोग्य सुरक्षा पर्यावरण” या सर्वांविषयी जी काही जागरूकता, संस्कृती माझ्यात भिनली आहे ती तिथल्या संस्कारांमुळेच.
पहिला भाग प्रकाशित केल्यावर दुसरा केव्हा येणार असे विचारून तुम्ही सर्वानी माझा उत्साह वाढवलात त्यामुळेच एव्हढ लिहू शकतोय. असेच प्रेम कायम राहूद्या .. अजून काय मागणे.
भटक्या खेडवाला
प्रतिक्रिया
30 Sep 2017 - 11:42 am | भ ट क्या खे ड वा ला
30 Sep 2017 - 12:49 pm | संग्राम
मिपावरती इतक्या छान सायकल वाल्या लेखमालिका वाचून मला पण सायकल सुरु करु वाटत आहे ....
आधी वाटलं अस्मि कोण म्हणून ...नंतर कळाले :-)
30 Sep 2017 - 1:11 pm | एस
_/\_ अशीच भटकंती चालू ठेवा!
30 Sep 2017 - 2:56 pm | धडपड्या
मिपा वरच्या अवली व्यक्तीमत्वांमध्ये तुमचा नंबर फार वरचा आहे काका...
30 Sep 2017 - 3:44 pm | अभिजीत अवलिया
मस्त झाली राईड.
30 Sep 2017 - 7:07 pm | कंजूस
आनंदापुढे नंबर बिंबर काही नसते. फार हळवे केलं वाचताना.
30 Sep 2017 - 7:41 pm | देशपांडेमामा
हे समजायला तुमच्यासारखा सायकलींगचा उत्साह आणि वेड असाव लागत !
आधीम् हटल्याप्रमाणे तुमची प्रत्येक राईड म्हणजे वाचाणार्यांना मेजवानी असते. हे प्रवासवर्णन पण त्याला अपवाद नाही. भारी ट्रिप आणि त्याहुन भारी वर्णन !
देश
1 Oct 2017 - 11:24 pm | डॉ श्रीहास
अगदि खरय हो .....
3 Oct 2017 - 11:39 am | sagarpdy
+१०००
1 Oct 2017 - 4:12 am | प्रविन ९
हे समजायला तुमच्यासारखा सायकलींगचा उत्साह आणि वेड असाव लागत !
हे माञ खरं..... पुढील सायकल सवारी साठी शुभेच्छा.....
1 Oct 2017 - 5:48 am | मोदक
झक्कास वर्णन हो काका!!!
मागून पुढे जाणाऱ्या वाहनाच्या डाव्या चाकावर नजर ठेवायची, व ते चाक हेच खड्ड्याची भूमिती मोजायचे साधन म्हणून वापरून त्यावरून आपला मार्ग व सुरक्षेचे गणित सोडवायचे, असा नवाच प्रकार लक्षात आला.
दिवसा समोरच्या वाहनांचे टायर आणि रात्री टेल लाईट बघत बघत प्रवास करावा.
1 Oct 2017 - 3:15 pm | मार्गी
अभिनंदन!!!!! प्रेरणादायी!!
1 Oct 2017 - 11:23 pm | डॉ श्रीहास
+११११११११११
2 Oct 2017 - 11:28 am | पैसा
खूप छान लिहिता तुम्ही
3 Oct 2017 - 9:28 pm | सोमनाथ खांदवे
कस जमत हो तुम्हा लोकानां ?, खरच ग्रेट आहात .