|| देवीची शेजारती ||
नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची
अंबे शेज फुलांची
पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.||
पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती
अंबे नवविधा भक्ती |
ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ ||
षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो
अंबे वारा घालितो |
पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ ||
दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला
अंबे नाजूकसा शेला |
सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३||
सहस्रकोटी सूर्य तेज असे हास्यमुद्रा
अंबे असे हास्यमुद्रा |
वेळ झाली निजावयाची सुखे करी निद्रा ||४ ||
जागे कराया येऊ आम्ही पहाटेच्या प्रहरी
अंबे पहाटेच्या प्रहरी |
चरणदास वैभव प्रार्थितो अंबे कृपा करी ||५ ||
-- शब्दांकित