भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५
आज काही मॉन्युमेंट्स पाहावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने कुच केले. आजही हवेत गारवा जाणवत होता. सतत चालत राहिल्यामुळे खूप जाणवत नव्हते. गारठा जरी पुन्हा परतला असला तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि काही ठिकाणी फुललेले ट्यूलिप्सनी वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होते.वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या थोडे अलीकडेच थांबून लांबून काही फोटो काढले आणि मग मॉन्युमेंटच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. जवळून ही वास्तू अतिशय भव्य अशी वाटत होती कारण एक तर आजूबाजूला कैक मैल इतक्या उंचीची दुसरी कुठलीही इमारत अथवा वास्तू नाहीये.
तसे पाहिले तर या ट्रीप मध्ये आम्ही जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ तिसरे स्मारक पाहत होतो. त्यापैकी हे मॉन्युमेंट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. लिंकन मेमोरियलच्या पूर्व दिशेला हे बांधलेले आहे. ही वास्तू जवळजवळ ५५४ फूट उंच आहे. या वास्तूचे बांधकाम १८४८ साली सुरू झाले. मात्र थोड्याच अवधीत म्हणजे १८५४ पासून १८७७ पर्यंत हे काम थांबवले गेले कारण पुरेसा निधी नव्हता. त्यात काही काळ याच्या बांधकामास सिव्हिल वॉरचाही फटका बसला. अखेर हे बांधकाम पूर्ण झाले १८८५ साली. लोकांसाठी ते खुले केले गेले सन १८८८ साली. बांधकाम पूर्ण झाल्यावर ही वास्तू जगातील सर्वात उंच होती. हा पहिला मान १८८९ सालापर्यंत अबाधित राहिला मग मात्र हा मान आयफेल टॉवरने पटकावला!!
या वास्तुसंबंधित इतिहासात डोकावण्यासाठी आपण काही वर्ष मागे जाऊयात. म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या मृत्यू नंतरच्या काही घटनांकडे. त्या काळी काँग्रेसने वॉशिंग्टन मेमोरियल व्हावे असे ठरवले. पण मग काँग्रेस मध्ये बहुमत बदलले. डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पार्टीकडे बहुमत आले. त्यांनी वॉशिंग्टन यांचे मेमोरियल व्हावे हा काँग्रेसचा निर्णय बदलला. त्यावेळी त्यांना कोणाचेच मेमोरियल/मॉन्युमेंट असावे हे वाटत नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांनी वॉशिंग्टन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र असलेल्या नाण्यांच्या छपाईला बंदी आणली.
कालांतराने हा विरोध मावळला. बांधकामासाठी सुमारे २८ हजार डॉलर्स इतका निधी जमा झाला. त्यांनंतर मेमोरियलच्या डिझाइनसाठी स्पर्धा आयोजित केली गेली. गमतीचा भाग म्हणजे ही स्पर्धा चालू झाली १८३६ साली आणि रॉबर्ट मिल्स याने ही स्पर्धा १८४५ साली जिंकली. मात्र त्या काळी मिल्सच्या डिझाइनचे विरोध करणारे अनेक होते. मुख्य म्हणजे त्याच्या प्रस्तावित मेमोरियलच्या बांधकामाचा खर्च सुमारे १ दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक होता. मात्र या डिझाइन प्रमाणे बांधकाम होणे अवघड होते. कारण तेवढा निधी नव्हता. म्हणून मग नाइलाजाने फक्त स्तंभ उभारायचे नक्की झाले.
रॉबर्ट मिल्सच्या प्रस्तावित वॉशिंग्टन मॉन्युमेंटची डिझाइन. हा फोटो विकीवरून साभार.
मॉन्युमेंटचे बांधकाम चालू असताना १८६० साली मॅथ्यु ब्रेडी यांनी काढलेला हा फोटो विकीवरून साभार.
सध्या मॉन्युमेंट आतून पाहायला बंद आहे कारण लिफ्टची दुरुस्तीचे काम चालू आहे. ते चालेल २०१९ सालच्या वसंत ऋतू पर्यंत. त्यामुळे आम्हाला मॉन्युमेंट बाहेरुन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याप्रमाणे आम्ही बाहेरचे आणि आजूबाजूचे काही फोटो काढले.
काही लोक असे मोठे पतंग उडवण्याच्या तयारीत होते.
तेथून दिसणारे युएस कॅपिटॉल.
लांबवर दिसणारे लिंकन मेमोरियल.
मंडळी, डिसीच्या सहलीदरम्यान हाती भरपूर वेळ असेल तर मॉन्युमेंट्स सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यावर अवश्य पाहा. हा एक अलौकिक सोहळा असतो. त्याची ही एक झलक.
हा सूर्योदयाच्या वेळचा फोटो जालावरून साभार.
सूर्यास्तानंतरचा हा फोटो जालावरून साभार.
माहितीचा स्रोत विकी
क्रमशः
प्रतिक्रिया
14 Sep 2017 - 4:12 pm | पद्मावति
अरे वाह! खुप दिवसांनी या मालीकेचा पुढचा भाग आला.
उत्तम लेखन आणि फोटोज.
14 Sep 2017 - 5:31 pm | दुर्गविहारी
कडक फोटो आणि मस्त वर्णन. पु.भा.प्र.
14 Sep 2017 - 5:34 pm | पैसा
खूपच छान! फोटोही मस्त!
15 Sep 2017 - 1:38 am | रुपी
मस्त! हाही भाग छान झालाय.
15 Sep 2017 - 5:43 am | एस
अत्यंत देखणे फोटो आहेत! फार सुंदर भटकंती.
15 Sep 2017 - 9:14 am | प्रचेतस
सुंदर लेख आणि छायाचित्रे.
वॉशिंग्टन मॉन्युमेंटचा सीन स्पायडरमॅन होमकमिंग ह्या चित्रपटात पाहिला होता त्याची आठवण झाली.
17 Sep 2017 - 11:55 am | चौकटराजा
हा परिसर अनेक हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांची लाडकी जागा आहे.