बायको

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
18 Aug 2017 - 5:40 am

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

आमचा प्रेमविवाह झाला. आजही आम्ही आमच्या बायकोच्या खूपच 'प्रेमात' आहोत. ती 'पुण्याची' आणि आम्ही 'नाशिकचे'. 'पुण्यापेक्षा मोठं आणि भारी शहर जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही ' याबद्दल पुणेकरांना ठाम विश्वास असतो. त्यामुळं आमच्या सौ ना देखील 'पुण्याबद्दल' जबरदस्त प्रेम आहे. मी लग्नापूर्वी तिला भेटायला वारंवार पुण्यात जात असे. (आता आम्हा दोघांना एकमेकांत बोलायला फुकट फोन असूनही "आज गिळायला घरी येणार का बाहेरच हादडणार?" एवढाच काय तो संवाद होतो) त्यावेळी ती आम्हाला पुण्यातील एकेक महान ठिकाणं दाखवून 'तुमच्या 'नासिकला' असं काही आहे का ?' असं विचारून पुण्याचा जाज्वल्य अभिमान दाखवून देत असे . 'शनिवार वाडा, पर्वती, युनिव्हर्सिटी, लक्ष्मी रोड' असं काहीकाही दाखवून ती आम्हाला चकित करत असे. एकदा तर तिने मला (माझ्याच पैशाने) मस्तानी खाऊ घालून "नाशिकमध्ये मस्तानी आहे का?" असं विचारल्यावर "मस्तानी नाही पण नाशिकमध्ये बाजीराव आहे" असं उत्तर देऊन आम्ही नासिककरांची चुणूक दाखवली होती. नासिक हे अगदीच मागासलेले, जुनाट खेडे आहे असा पुणेकरांचा समज असतो त्यामुळे सौ जरी आमच्या प्रेमात असली तरी आमच्या होणाऱ्या सासूबाईंना एकूणच नासिकबद्दल बिल्कुलच आदर नव्हता. मी त्यांना नाशिकचे 'ऐतिहासिक' महत्व समजावून सांगताना "शुर्पणखेचे नाक इथे कापले म्हणून या ठिकाणाला 'नासिक' हे नाव पडलंय, तुमच्या पुण्याला आहे का अशी काही स्टोरी?" असं जरा आवाज चढवून विचारलं. तर सासूबाई म्हणाल्या "ती शूर्पणखा तरी बरी हो! तीने स्वतः चं नाक कापून घेतलं. आमच्या लेकीने तर तुमच्या प्रेमात पडून आमच्या सगळ्या घराण्याचे नाक कापून घेतलं!" शेवटी 'सासूबाई या सासूबाईच असतात' हे लक्षात ठेवा. आजच्या चाळीशी च्या बायकांनी 'आदर्श सासूबाई' कसं बनावं यासाठी आमच्या 'सासूबाई' कडे क्लासेस लावायला हरकत नाही.
यथावकाश आमचं लग्न झालं. आम्ही 'पंचाक्षरी' आणि ती माहेरची 'सातभाई'. दोघांच्या आडनावात आकडे आहेत. 'पाच' आणि 'सात' मिळून 'बारा' वाजल्यापासून 'नुमरॉलॉजी' वर आमच्या सौ चा गाढ विश्वास बसलाय. तरीही ती नेमाने 'वटसावित्री' ची पूजा करते. 'सात जन्म हाच पती मिळू दे' असा वर मागते. पूजेच्या दिवशी 'जीन्स आणि इतर फॅशन' करून पूजा करणाऱ्या काही 'वटसावित्री' आणि सोशल मीडियावर च्या काही चा'वट'सावित्री" पाहिल्यावर आम्हाला आमच्या गुणी, सुंदर, हुशार बायकोबरोबर सात जन्म घालवायला नक्कीच आवडेल. 'माझ्या सारख्या नवऱ्याला सहन करणारी, माझे लाड करणारी, संकटात पाठीशी उभी रहाणारी, मला सदैव धीर देणारी, सर्वतोपरी साथ देणारी' अशी बायको मिळणं हे माझं भाग्यच आहे. आता आमच्या घराजवळ सगळीकडे ब्लॉक्स, फरशा आणि सिमेंट चे रस्ते झाल्याने झाडांसाठी सुतभरही (की तसूभरही?) जागा शिल्लक राहिलेली नाहीये. तिथे पूजा करण्यासाठी 'वड' कुठून मिळणार? तरीही आमची सावित्री रोज मनोमन 'वड' पूजत असते. 'ती' च माझी आ'वड' आहे आणि मीच तीचा आधार'वड' आहे.
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
ई-मेल:- mangeshp11@gmail.com
(पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

18 Aug 2017 - 6:09 am | प्रमोद देर्देकर

मंगेश मिपावर स्वागत !
पहिलाच लेख आणि पुण्याबद्दल लिहलेत आता गोळीबाराला तयार रहा.

चामुंडराय's picture

18 Aug 2017 - 6:10 am | चामुंडराय

चुकून पूर्व परवानगीशिवाय वाचू नये असे वाचले :)

वाचू 'न' मनो 'रंज' न झाले. ले 'खात' 'सिंगल quote' चा 'अति' रेक 'झा' ला आ 'हे'.

चांदणे संदीप's picture

18 Aug 2017 - 8:13 am | चांदणे संदीप

लिहिताना, पाठीमागे लेखकाच्या सौ. उभा राहिलेल्या असा सौंषय येतोय. बाकी डबल क्वोटातल्या बायकोबद्दल लिहावं तितकं कमीच! पुलेशु!

Sandy

जव्हेरगंज's picture

18 Aug 2017 - 9:19 am | जव्हेरगंज

=))

ज्योति अळवणी's picture

18 Aug 2017 - 8:46 am | ज्योति अळवणी

सौ म्हणजे सौभाग्यवती! तुमच्याशी लग्न करून तुमच्या बायकोच भाग्य 'सौ' झालं असं तुम्हीच ठरवलत तर! आता तुमच्या बायकोला मिपाच सदस्यत्व घेण्याचा आग्रह करा आणि मग तुम्ही देखील 'सौ'भागवन्त आहात ते त्यांच्याकडून declear करून घ्या म्हणजे झालं

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2017 - 8:57 am | प्रकाश घाटपांडे

ते ज्योतिषी अरविंद पंचाक्षरी आपले कोण? साप्ताहिक राशी भविष्य लिहायचे ते.

मंगेश पंचाक्षरी's picture

18 Aug 2017 - 2:38 pm | मंगेश पंचाक्षरी

काका आहेत ते.

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 3:54 pm | मराठी कथालेखक

"नासिक" योग्य की "नाशिक" ?

मंगेश पंचाक्षरी's picture

19 Aug 2017 - 9:21 am | मंगेश पंचाक्षरी

नासिक... शूर्पणखेचे नाक कापले, नाकाला नासिका म्हणतात त्यावरून नासिक नाव पडले आहे.

रेवती's picture

18 Aug 2017 - 5:55 pm | रेवती

हीहीही. छान लिहिलय.
लेख प्रकाशित करण्याआधी बायकोची परवानगी घेतली होती का? ;)

जातवेद's picture

19 Aug 2017 - 7:02 pm | जातवेद

बायकोबद्दल बरेवाईट लिहिले असेल, आपण पण हात धुवावेत ह्या हेतूने येणाऱ्या पुरुषवर्गाचा आणि त्यांच्याशी हलकेच भांडण्याच्या हेतूने येणाऱ्या मिपाबायकांचा आपण अपेक्षाभंग केला आहात.

"मिपावरती नाशिकच्या लोकांवर नेहमीच अन्याय होतो" असे श्रीगुरूजी क्लिंटनला सांगताना कपिलमुनीने ऐकले असे आमचा सवंगडी सांगत होता.