दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख:-
आम्ही लहानपणी एक शेर वाचला होता. " मैने उससे प्यार किया अबला समज कर, लेकींन उसकी बाप ने मुझे पिटा 'तबला' समझकर". असले आचरट शेर कोण लिहितं हे काही कळत नाही. पण या शेर मूळे आम्हाला 'तबल्या' बद्दल कुतूहल जागृत झालं. बरेच पालक आपल्या लहान मुलाला तबला शिकायला क्लास मध्ये घेऊन जातात. पालकांचा पहिला प्रश्न असतो "याला किती दिवसात तबला वाजवता येईल?" यासारखा अज्ञानमूलक प्रश्न जगात दुसरा कोणताच नसेल. आधी च पालकांनी मुलाचं नाव सचिन ठेवलेलं असतं. पण शहरातील मैदानांची कमतरता, टीव्ही मुळे लहानपणीच लागलेला चष्मा, मुलाने कायम टॉपर असावे म्हणून बालवाडीपासून लावलेल्या ट्युशन अशा कारणांनी या सचिनचा क्रिकेट शी फारसा संबंध येत नाही . आता आपला मुलगा सहा महिन्यात 'उस्ताद झाकीर हुसेन' बनावा असं बहुसंख्य पालकांना वाटायला लागतं. मग एक दोन दिवसातच शेजारच्यांनाही 'आमचा मुलगा तबला शिकतो' अशी फुशारकी मारून पालक भाव खातात. शेजारी ही " अरे वा, उस्ताद सचिन आपल्या कॉलनीचं नाव काढणार बुवा, ख्याक...ख्याक...." असं बोलत सचिनच्या आई कडून चहा वसूल करतात. मुलगा चार आठ दिवसांतच घरात दादरा, त्रिताल, झपताल असे शब्द बोलायला लागतो. 'तक तिरकीट तक', घिडनग तीट तीट' असे रेले घोटायला लागतो. जेवताना डायनिंग टेबलवर, घरातल्या गोल डब्यांवर तो बोटांनी ताल धरायला लागतो. त्याचे 'तिरकीट, तिरकीट' हे घरातल्यांना 'थालीपीठ, मारपीट' असं ऐकू यायला लागतं. भावाचे लाड आणि कौतुक बघून बहीण पण मग गाण्याचा किंवा पेटीचा क्लास लावायचा हट्ट करते.
लवकरच पालकांना काहीच कळेनासं होतं. कोणत्याही तबला क्लास मध्ये गाण्याला साथ कशी करावी, हे शिकवलं जात नाही. क्लास मध्ये जे 'सोलो' तबला वादन शिकवलं जातं त्याचा नक्की काय फायदा आहे ते पालकांना माहीत नसतं. त्यातच मुलगा आठवीत गेला की 'दहावी'ची परिक्षा होई पर्यंत तबला क्लास बंद केला जातो. अशा प्रकारे बळजबरी 'पाचवी'ला पुजलेला तबला आठवी ला थांबतो. आणि हौसेने विकत घेतलेला तबला- डगा फक्त दिवाणखाण्याचा कोपरा व्यापून रहातो. (आणि त्याची हातोडी घरात खिळे ठोकायला वापरली जाते) भावी उस्ताद सचिन फक्त "तिसरी परीक्षा दिलीय !" एवढ्या वाक्यापुरताच उरतो. तबल्यात 'उस्ताद' बनणे म्हणजे काही खायचं काम नाहीये. कदाचित दहावी, बारावी पास होण्यापेक्षा ते खूप जास्त अवघड असते . एक एक ताल घोटून घेणं म्हणजे सोपं नसतं. केवळ बोल आणि मुखडे पाठ करणं म्हणजे तबला नाही. ताल म्हणजे काळाचे सूत्रबद्ध तुकडे असतात. ती लय मेंदूत, शरीरात भिनली पाहिजे. मनगटावर एक- एक किलोचे 'कडे' बांधून कडक तबल्यावर किंवा त्या आकाराच्या दगडावर तासनतास रियाझ करावा लागतो. तबला चिल्ला करावा लागतो. तबल्यास गणितही चांगले हवे. तिहाई वाजवून समेवर येता आले पाहिजे. एकताल, चौताल, रूपक, झपताल सारख्या तालाचे बोल, कायदे, पलटे वाजवता आले पाहिजेत. सोलो वादन करता आले पाहिजे. इन्स्ट्रुमेंटल ला साथ संगत करता आली पाहिजे. यासाठी केवळ पालकांकडे पैसा असून चालत नाही, मुलाला त्याची आवड असली पाहिजे. एकदा तबला शिकणे सुरू केले की त्यात खंड पडायला नको. दहावी ची परीक्षा असली तरी मुलाचा तबल्यावर हात फिरत राहिला पाहिजे. उलट अभ्यासाच्या तणावातून तासभर 'तबला' वाजवणे हा मुलासाठी उत्तम 'विरंगुळा' असू शकतो.
वर्षानुवर्ष तबला शिकण्याची मानसिक तयारी करून च मुलाला तबला क्लास ला घाला. तबलाच काय पण कोणतीही 'कला' इतकी सोपी नसते. भारतीय संगीत शिकणे हे आपले या जन्मातील सर्वोत्तम भाग्य आहे. आजच्या तणावाच्या काळात असा 'छंद' असणे ही गरज आहे. तुमच्या संगीत शिक्षकावर विश्वास ठेवा. केवळ परीक्षांच्या मागे लागू नका. मुलाला तबला वाजवून आनंद मिळेल, हे बघणे महत्वाचे आहे. खरं तर संगीत कोणत्याही वयात शिकावे. ते अतीव आनंद देते. पं जसराज, पं शिवकुमार शर्मा हे मूळचे तबलजी च आहेत. अनावश्यक अपेक्षांचं ओझं डोक्यावर ठेऊन मुलांना क्लास ला पाठवू नका आणि त्यांची इतरांशी 'तुलना' ही करू नका. 'कला' म्हणजे बाजारू वस्तू नाहीये की पैसे फेकले आणि विकत घेतली. कला शिकताना पेशन्स, मेहनत, सातत्य, आवड, आनंद, अभ्यास यांची नितांत आवश्यकता असते. पालकांनी याचा जरूर विचार करावा... आता तुमच्या लक्षात आलेच असेन की पालकांचा 'रोल' यात खूप महत्वाचा आहे. त्यांनी जर त्यांचा 'रोल' निभावला तरच घराघरांत उ. झाकीर, लता, हरिप्रसाद, शिवकुमार, रविशंकर निर्माण होऊ शकतात.
- ©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
E-mail: mangeshp11@gamil.com
प्रतिक्रिया
18 Aug 2017 - 6:36 am | कंजूस
लेख आवडला. हौसेला मोल नसते.
18 Aug 2017 - 7:07 am | सुखीमाणूस
कुठलिही कला शिकणे ही एक साधना आहे.
मुलीच्या कथक शिकण्याच्या निमीत्ताने समजले की संगीत, वाद्य वादन आणि गायन ह्या कला साध्य करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो.
चांगला गुरू मिळणे देखिल तितकेच महत्वाचे आहे
18 Aug 2017 - 2:40 pm | मंगेश पंचाक्षरी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, या भिंतीवर नवीन आहे. जरा शिकत आहे.
18 Aug 2017 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली
मलाही माऊथ आँर्गन शिकण्याची आवड होती. पण काही जमल नाही. :(
20 Aug 2017 - 1:25 pm | धर्मराजमुटके
आवडला.
22 Aug 2017 - 8:22 am | बाजीप्रभू
मंगेश पंचाक्षरी सर तुम्ही मिसळपावचे आधिकारीक धोरण एकदा डोळ्याखालून घालावे असा सल्ला द्यावासा वाटतोय.
http://www.misalpav.com/node/13199
विशेष:,
२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.
तुम्ही सदर लेख "नादतरंगिनी" ब्लॉगवरून उचलेला दिसतोय.
22 Aug 2017 - 9:39 am | सुबोध खरे
हा लेख
नावाऐवजी
या नावाने प्रसिद्ध केला असता तर जास्त बरोबर ठरले असते काय?
22 Aug 2017 - 11:47 am | बाजीप्रभू
११११+
22 Aug 2017 - 12:01 pm | जागु
चांगल लिहिल आहे.