©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(कृपया ही पोस्ट पूर्वपरवानगी शिवाय मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)
तो पन्नाशीचा. नासिकमध्ये रहातो. त्याची लाडकी राजकन्या, त्याची मुलगी विशीची. शिकण्यासाठी मुंबईच्या एका उपनगरात रहाते. तिला एका बंगल्यात स्वतंत्र खोली भाड्याने घेऊन दिलेली. हेतू हा कि आई -बाबा तिच्याकडे गेले कि त्यानाही तिथे रहाता येईल. चांगल- चुंगल खाऊ घालता येईल. एरवी रोज ती जेवायला घर मालकांकडेच. घरमालक स्वभावाने अगदी चांगले. पूर्ण विश्वासू. आई किंवा बाबांचा रोज मुलीला खुशाली विचारण्यासाठी फोन होतो. मोबाईल मुळे हि फार चांगली सोय झालेली आहे. नेहमी प्रमाणे आजही त्यांनी फोन केला. मुलीने फोन उचलला नाही. संध्याकाळी सात ची वेळ. 'ती'आताच आली असेल घरी. आवरत असेल म्हणून पुनः पंधरा मिनिटानी फोन केला. उत्तर नाही. वाट बघून परत जरा वेळाने फोन केला. तरीही उत्तर नाही. बघता बघता आठ वाजले. मुलगी फोन उचलेना. साडे आठ वाजता घर मालकांना विचारले ती आली आहे का घरी? ते म्हणाले "हो, आतून कडी आहे. लाईट चालू आहे." आईला जरा चिंता वाटायला लागली. तिने तिच्या बाबांना फोन केला. योगायोगाने आम्ही सोबतच होतो. त्याने ही मग तिला फोन लावले पण उत्तर नाही. तिची रोजची जेवायची वेळ साधारणतः नऊ ची. आज ती जेवायलाही आली नाही. घरमालकांनी दार ठोठावले पण काहीच रीस्पोंस नाही. बघता बघता रात्रीचे दहा वाजले. तरीही ती फोन उचलेना कि काही उत्तर देईना.आम्ही वेगवेगळ्या मोबाईल वरून फोन लावले. फोन तर वाजत होता. पण काहीच उत्तर मिळत नव्हते.आता वाट बघून अकरा वाजले. अखेर रात्री आम्ही नासिकहून निघायचे ठरवले. तीन चार मित्र तयार झालो. घर मालकांना दार तोडण्यास सांगितले. आमच्या मित्राचा धीर हळू हळू खचू लागला. 'मन चिंती ते वैरी न चिंती' याचा प्रत्यय येऊ लागला.
बाहेर गावी शिकणाऱ्या मुला-मुलीनी घरून आलेला फोन स्वीकारला पाहिजे. त्यास निदान मेसेजने तरी उत्तर द्यायला हवं. साधारणपणे दर दोन तासांनी आपली खबर किमान व्हाट्सएप वर दिली पाहिजे. आपण आता काय करणार आहोत ते आई बाबांना सांगायला हवं. ज्यांना रूम पार्टनर नाहीयेत त्यांनी तर जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. आई बाबांची काय मानसिक अवस्था होत असेल त्याची या मुलांना कल्पना नाही. टेलेफोन, मोबाईल, सोशल मेडिया अशी अत्याधुनिक साधने हाताशी असूनही त्याचा वापर जर आई -बाबांशी संपर्क करण्यासाठी होत नसेल तर त्याचा काय उपयोग? मुलगा असो कि मुलगी, हल्ली त्यांचे आई बाबा प्रचंड मानसिक तणावाखाली असतात.
तिकडे रात्री अखेर दरवाजा तोडण्यात आला. ती डोकं दुखतय म्हणून गोळी घेऊन गाढ झोपून गेली होती. मुलं अभ्यासाच्या प्रेशरने इतकी दमून जातात कि त्यांच्यात बऱ्याच वेळा त्राणच रहात नाही. तशी तिची झोप सावध असते तरीही त्या दिवशी गाढ झोपेत तीला कोणतेच आवाज ऐकू आले नाहीत. ती जेव्हा स्वतः तिच्या बाबांशी फोनवर बोलली तेव्हा पहाडासारख्या असणाऱ्या बापाचा बांध फुटला. देवाचे आभार मानत तो मित्राच्या खांद्यावर डोक टेकून रडला. अश्रू दुःखाचे, भीतीचे, प्रेमाचे, चिंतेचे अन सुखाचेही होते. अश्रू हादरल्याचे अन सावरल्याचेही होते. आई बाबांना सर्व मुलं मुली सारखेच प्रिय असतात पण लेकीचं आणि बापाचं नातं ज..रा जास्तच घट्ट असतं हे आम्ही अनुभवत होतो.
(ही सत्यघटना संबंधितांच्या परवानगीने सामाजिक हितासाठी प्रकाशित)
-©लेखक- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (8087520521)
इमेल- mangeshp11@gmail.com
प्रतिक्रिया
18 Aug 2017 - 2:52 pm | धर्मराजमुटके
मस्त
18 Aug 2017 - 3:08 pm | विशुमित
आज माझी नर्सरी मध्ये शिकत असणारी मुलीची स्कूल बस अर्धा तास उशिरा आली हे समजले. तो ड्रायव्हर नवीन होता आणि तो तिला शाळेतच विसरून आला होता. मग काय तिच्या मिस, ड्राइवर आणि नंतर प्रिन्सिपॉल पण फोन केला.
लेकीचं आणि बापाचं नातं ज..रा जास्तच घट्ट असतं....
18 Aug 2017 - 7:20 pm | सुखीमाणूस
मन चिन्ती ते वैरी ना चिन्ती
खूप छान लिहीलय आणि शब्द नी शब्द पटला
मुले स्वताच्या विश्वात रमतात ह्यात चुकीचे काही नाही पण घरच्याना well informed ठेवले पाहिजे
18 Aug 2017 - 7:24 pm | रेवती
हम्म......
18 Aug 2017 - 8:40 pm | Rahul D
पण पोस्ट copyright का आहे ??
18 Aug 2017 - 8:47 pm | अमरेंद्र बाहुबली
पण काही वेळा अती होतं हो!!! पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला जड जात. मलाही माझी आई रोज दोन ते तीन वेळा फोन करायची. शेवटी एक दिवस आईला बोललोच. " मी युध्दावर गेलोय का? आज असेन तर उद्या नाही." तेव्हा कुठे कमी झालं :)
18 Aug 2017 - 8:58 pm | दशानन
ज्यांना यात आई-वडील यांचा दृष्टिकोन समजला नसेल, त्यांनी हे वाक्य परत परत वाचावे!
"लेकीचं आणि बापाचं नातं ज..रा जास्तच घट्ट असतं "
लेख आवडला व पटला देखील.