भवताल
भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे
आणि अस्वस्थ वर्तमान
नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की,
स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं
संस्कृती केवळ एक शब्द नाही
प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात
माणसाच्या अस्तित्वाचा
पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी
कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह
अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके
कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी
सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला
क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला
सुंदरतेची परिमाणे शोधत
दिशा बदलली वाऱ्यांनी
अन् पडले मर्यादांचे बांध
कणा कणाने निसटतो आहे हातून वर्तमान
वाहत्या प्रवाहांना पायबंद घातले आहेत
परंपरांनी, कधी प्रसंगांनी तर कधी प्राधान्यक्रमांनी
सगळेच पदर उसवत आहेत एकेक करून
काळाच्या गणिताची सूत्रे राहिली नाहीत
जेवढी वाटतात तेवढी सहज, सुगम
गणिते आधी आखून तयार करता येतात
हवी तशी सूत्रे अन्
मिळवता येतात अपेक्षित उत्तरे
सूत्रांनुसार साच्यात ओतून आकडे
प्रश्न माणसाला नवे नाहीत
काल होते, आज आहेत, उद्याही असतील;
पण त्यांचा चेहरा तेवढा बदलायला हवा
प्रश्नांचे धागे हाती घेऊन हव्या त्या
दिशेने वळवता येतात
खरंतर प्रश्न हासुद्धा नाहीच,
प्रश्न आहे धागे वळवणारे हात
कोणाच्या आज्ञेने चालत आहेत याचा