तुफान आलंया !!
हिरव्यागार शेताचा मालक मी जरी
सोबत होती फक्त रणरणती सावली ,
खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी
भरलेली विहीर तर कधीच आटली ,
ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी
ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली
…पण उजळेल आता तिची कुस
……उद्या पडेलच की पाऊस …!!!
एक सर झाली की पेरणी करेन ,
गुरांबरोबर चार दिस मीही राबेन ,
तरारेल मग शेत जोमाने ,
डाव सगळा मांडेन मी नव्याने,
भुईला करून टाकेन हिरवं शिवार ,
बैल गाडीवर मग होईल सवार ,
.....कापडं नवीन घालेन, असेल माझाच कापूस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
मातीत मिसळले बरेच
आधीच हाय खाऊन ,
प्रश्न सुटतील का पण
अशी आत्महत्या करून ,
विठू उभा राहील पाठीशी बनून ढग
वाहतील झरे गावातून बघ !
....तोरण म्हणून बांधू आपण ऊस
.....उद्या पडेलच की पाऊस !!!
पाऊसराजाच्या स्वागताला करू सज्ज धरणी
घामाच्या धारांनी श्रमून अडवु थेंब थेंब पाणी !
गाऊ दऱ्याखोऱ्यांमध्ये अंकुरांचे गीत,
एकजुटीने करूया साकार आपले हित ,
श्रमदान कराया लेकरू बी सज्ज झालंया,
गावात आता उमेदीचं तुफान आलंया !!
गावात आता उमेदीचं तुफान आलंया !!
हे तुफान म्हणजे जणू गावाचा उरूस
विठुराया आता पडू दे जोरदार पाऊस !
---फिझा