स्थळ : PINK LOTUS BREAST CENTER , LOS ANGELES
Dr. Kristi Funk च्या कन्सल्टिंग रूममध्ये अँजेलीना जोली तिचा BRCAचा ( BReast CAncer ) जेनेटिक्स रिपोर्ट काळजीपुर्वक वाचत होती, तपासणीमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये म्युटेशन आढळले होते. अशा पेशंटला सल्ला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा Dr. Kristi Funk ना दांडगा अनुभव होता, त्यामुळे हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री अँजेलीना जोली निश्चिंत होती. जोलीच्या चेहर्यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही तिच्याशी संवाद साधायला सोपे जाणार होते. रिपोर्ट वाचून झाल्यावर जोलीने डॉक्टरांना आपल्या शंका विचारायला सुरवात केली,
जोली : शरीरातील BRCA जीनमधील बदलामुळे काय धोके संभवतात?
डॉक्टर : शरीरात कॅन्सरला रोखण्याचे काम सामान्य BRCA जीन करत असतात. काही कारणाने त्या जीनमध्ये म्युटेशन होते व अशा कुटुंबातील व्यक्तीकडून ते पुढील पिढीकडे वाहीले जातात. अशा mutated BRCA1 आणि BRCA2 वाहक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता ८७% व बीजांडाचा कॅन्सर होण्याची शक्यता ५४ % इतकी असते. परंतु सर्वसामान्य लोकसंख्येत ब्रेस्ट कॅन्सर व बीजांडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अनुक्रमे १२% व १% पेक्षा कमी असते.
जोली : माझ्याही रिपोर्टमध्ये BRCA1 आणि BRCA2 मध्ये म्युटेशन आढळले , अशावेळी मी नेमकी काय काळजी घ्यायला हवी?
डॉक्टर : आमच्या केंद्रात BRCA म्युटेशन वाहक व्यक्तींची नियमित तपासणी केली जाते. ज्यात त्या व्यक्तीच्या वयानुसार व फॅमिली हिस्टरीनुसार तपासण्या केल्या जातात .जसे,
महिना १ : वयाच्या १८ वर्षा पासून अल्ट्रासाऊंडने ब्रेस्टची संपूर्ण तपासणी.
२५ वर्षाच्या व्यक्तीची mammography .
महिना ४ : ब्रेस्ट स्पेशालिस्ट कडून ब्रेस्टची तपासणी.
महिना ७ : Breast MRI किंवा Contrast Enhanced Spectral Mammography (CESM).
महिना १० : ब्रेस्ट स्पेशालिस्ट कडून ब्रेस्टची तपासणी.
वयाची पस्तीशी सुरु झाल्यावर दर ६ महिन्यानी Ovarian च्या निरीक्षणासाठी Transvaginal Pelvic ultrasound , CA-125 blood marker test आणि स्त्रीरोग तज्ज्ञाकडून ओटीपोटीची तपासणी केली जाते.
जोली : माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता व नंतर बीजांडाचा कॅन्सर होऊन तिचा मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यात मलाही ब्रेस्ट कॅन्सर किंवा बीजांडाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे , तो कमी करण्यासाठी काही उपाय आहेत का ?
डॉक्टर : हो आहे, अशा रुग्णाला आम्ही Prophylactic (Preventive ) mastectomy surgery चा सल्ला देतो. ह्यात रुग्णाचे एक किंवा दोन्हीही ब्रेस्ट शस्त्रक्रियेने काढून टाकले जातात.
जोली : ह्या शस्त्रक्रियेनंतर भविष्यात ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका पूर्णपणे टळतो का?
डॉक्टर : पूर्णपणे नाही ,परंतु ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका १०% इतकाच राहातो.
जोली : दोन्ही ब्रेस्ट संपूर्ण काढूनही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका का राहातो?
डॉक्टर : ह्याचे मुख्य कारण असे की, ह्या शस्त्रक्रियेने कितीही प्रयत्न केले तरी ब्रेस्टचे १०० % tissue काढणे शक्य नसते , छातीच्या भिंतीला चिकटलेले tissue पुर्णपणे काढता येत नाही आणि जेव्हा एखादी स्त्री आपले नैसर्गिक सौंदर्य टिकविण्याचा आग्रह करते तेव्हा ब्रेस्टचे tissue पूर्णपणे काढणे व ब्रेस्टचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे हे आव्हानात्मक काम असते. त्यामुळे शरीरात उरलेल्या ब्रेस्ट tissue ला भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जोली : ह्या शस्त्रक्रियेने ब्रेस्टचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे टिकून राहाते का? पुढे भविष्यात गुंतागुंत निर्माण होऊ शकते का?
डॉक्टर : ह्याबाबत कोणीही १००% खात्री देऊ शकत नाही, कारण ही शस्त्रक्रिया करताना ब्रेस्टची संपूर्ण त्वचा टिकवली जाते, कधीकधी ब्रेस्टच्या अग्रभागाच्या रक्तपुरवठ्यात काही कारणाने अडथळा आल्यास ब्रेस्टचा अग्रभाग निकामाही होऊ शकतो. परंतु आता ह्या शस्त्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अशी शक्यता २ % इतकी नगण्य असते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास भविष्यात गंभीर अशी गुंतागुंत होत नाही, काही रुग्णांना सुरवातीला ब्रेस्टच्या अग्रभागाला संवेदना जाणवत नाही किंवा कमी जाणवतात, परंतु वर्षभरात संवेदना पूर्ववत होतात.
जोली : ह्या शस्त्रक्रियेनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी झाल्याने बीजांडाचा कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते असेल ना? कारण माझ्या आईला प्रथम ब्रेस्ट कँसर झाला व नंतर ovarian ...
डॉक्टर : तुला काय म्हणायचं ते समजलं मला. रजोनिवृत्तीपूर्वी स्त्रीच्या शरीरातील बीजांड estrogen नावाचा hormone तयार करतात. हे estrogen ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढीला हातभार लावतात, estrogen ची शरीरातील पातळी कमी केल्यास ब्रेस्ट कॅन्सरची वाढ कमी करता येते. bilateral prophylactic salpingo-oophorectomy हा त्यावर उपाय आहे. ह्यात शस्त्रक्रियेने दोन्ही बीजांडे आणि fallopian tubes काढल्या जातात, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरबरोबर बीजांडाच्या कॅन्सरचाही धोका बराच अंशी कमी होतो.
जोली : ह्या शत्रक्रियेनंतर अचानक estrogen ची शरीरातील पातळी कमी झाल्याने शरीरात काही बदल जाणवतात का?
डॉक्टर : रजोनिवृत्तीपूर्वी ही शस्त्रक्रिया केल्यास रजोनिवृत्तीनंतरची सर्व लक्षणे दिसू लागतात, शस्त्रक्रियेनंतर अशा रुग्णांना hormone replacement therapy दिली जाते, ज्याने ही लक्षणे आटोक्यात येतात.
जोली : माझ्या स्ट्रॉंग फॅमिली हिस्टरीमुळे मी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतल्यास योग्य ठरेल का?
डॉक्टर : असा स्वहिताचा निर्णय तुम्ही घेतल्यास स्वागतच आहे.
२ फेब्रु .२०१३ ला अँजेलिना जोली Pink Lotus Breast Centre मध्ये preventive double mastectomy च्या वैद्यकीय प्रक्रियेसाठी दाखल झाली आणि २७ एप्रिल २०१३ ला ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली.
१४ मे २०१३ , स्थळ : वाराणसी , स्वामींचा दरबार .
स्वामींच्या पट्टशिष्याने लॅपटॉपवर न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रातील एका बातमीकडे स्वामींचे लक्ष वेधले. जोलीने त्यात आपल्या preventive double
mastectomy बद्दल तपशीलवार माहिती सार्वजनिक केली होती. बातमी वाचताना स्वामींचा चेहरा उग्र झाला, कपाळावर घाम जमा झाला, संपूर्ण बातमी वाचून
झाल्यावर स्वामींनी रागाने लॅपटॉप भिरकावून दिला . रागाने त्यांचे शरीर थरथरत होते. मूर्ख बाई! शरीराला इतक्या दुखापती करून घ्यायची काय गरज होती? अन तेही लाखो डॉलर खर्चून? मी तिला शरीराला कुठलीही इजा न करता बरे केले असते... केवळ काही लाख रुप... स्वामी संपूर्ण वाक्य पूर्ण करण्यापूर्वी खाली कोसळले. पट्टशिष्याने स्वामींची नाडी तपासली , त्याला नाडीचे ठोके जाणवले नाही . पट्टशिष्याने लागलीच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी स्वामींना तपासले, स्वामींच्या शेजारी बसलेल्या पट्टशिष्याच्या कानात काहीतरी कुजबुजले. पट्टशिष्य ताडकन उभा राहिला , हे कसं शक्य आहे ? मागच्याच महिन्यात स्वामींची एकसष्ठी साजरी केली तेव्हा स्वामींनी आपण वयाची १०० वर्षे पूर्ण करणार असे ठामपणे सांगितले होते . स्वामी कसे चुकतील? असं म्हणताना त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. त्याने डॉक्टरांची बॅग उचलली व डॉक्टरांना दरबाराबाहेर गाडीपर्यंत सोडण्यासाठी निघताना हळूच स्वामींच्या गादीकडे बघितले.
दुसऱ्या दिवशी ' दै. गुलाबी कमळ' मध्ये स्वामींनी काल 'देहत्याग' केल्याची बातमी आली. स्वामींनी देहत्याग केला तेव्हा आश्रमात एक कोल्ह्याचे पिल्लू आढळून आले. ज्या आश्रमात मुंगीलाही प्रवेश करणे शक्य नव्हते तेथे हे कोल्ह्याचे पिल्लू कुठून आत आले असावे ? हा आश्रमातील सर्वाना प्रश्न पडलाय. स्वामींच्या भक्तांच्या मते स्वामींनी देहत्याग केल्यानंतर ते आश्रमात कोल्ह्याच्या रूपात आले असावेत असं त्या बातमीत म्हटले आहे.
प्रतिक्रिया
31 May 2017 - 11:04 pm | पैसा
:)
31 May 2017 - 11:04 pm | एस
चांगली माहिती मनोरंजक पद्धतीने दिली आहे.
1 Jun 2017 - 1:23 pm | अनिंद्य
@ मार्मिक गोडसे,
मार्मिक !
आऊट ऑफ ऑल थिंग्स, 'कोल्हा'च ! :-))
1 Jun 2017 - 4:22 pm | भिंगरी
+++
29 Jul 2018 - 8:01 am | मार्मिक गोडसे
भारतीय ' अँजेलीना जोली '.
https://m.timesofindia.com/city/mumbai/woman-with-oncogene-gets-it-edite...
29 Jul 2018 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
या दोन केसेसमध्ये खूप खूप... अगदी जमीन अस्मानाचा म्हणता येईल इतका... फरक आहे.
१. स्त्रीला भविष्यात कर्करोग होऊ नये यासाठी कर्करोग्रस्त होऊ शकणारे अवयव काढून टाकण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया :
भविष्यात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची शक्यता असलेली जनुके अॅजेलिना जोली व तिच्या कुटूंबातील इतर स्त्रीयांत असल्याने तिला या अवयवांचे कर्करोग होण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे, तो धोका टाळण्यासाठी तिने स्वतःचे दोन्ही स्तन आणि गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले आहेत. यामुळे, अँजेलिनाच्या शरिराच्या, (जीनोम नसणार्या काही अपवादत्मक पेशीसमुह सोडून इतर) सर्व पेशींत कर्करोग निर्माण करणारी उत्परिवर्तने असलेली BRCA1 व BRCA2 जनुके शरिरात पूर्वीसारखी तशीच आहेत. फक्त ते कर्करोग होऊ शकणारे अवयव गायब आहेत... यातही, (अ) त्या अवयवांच्या सूक्ष्म अश्या १००% पेशी शस्त्रक्रियेने काढल्या जाण्याची १००% खात्री कोणी शल्यचिकित्सक देऊ शकत नाही व (आ) कर्करोगाची सुरुवात एकाच पेशीत होते व तिची अनेकानेक विघटने झाल्यावरच कर्करोगाची निदान करण्याजोगी वाढ होते, हे पण ध्यानात ठेवायला हवे.
२. स्त्रीमध्ये असलेली रोगिष्ट जनुके तिच्या मुलांमध्ये संक्रमित होऊ नये यासाठी करायची प्रक्रिया :
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/woman-with-oncogene-gets...
ही बातमी या दुसर्या प्रकारात मोडते. या स्त्रीने स्वतःचा कोणताही अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतलेली नाही. तिच्यात वापरलेली वैद्यकीय प्रणाली सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अश्या सोप्या शब्दात अशी सांगता येईल :
१. एका वेळेत अनेक बिजांडे (अंडी) तयार व्हावी यासाठी स्त्रीला औषधे (हॉर्मोन्स) दिली जातात व तयार झालेली बिजांडे शरीराबाहेर साठवली जातात.
२. त्यातली अनेक निरोगी बिजांडे निवडून, वीर्यातून निवडून घेतलेले निरोगी शुक्राणू, प्रत्येकी एक असे बिजांडात टोचले जातात. याला इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) असे म्हणतात.
३. अशी फलित बिजांडांपासून निर्माण झालेल्या गर्भांची स्त्रीच्या शरीराबाहेर ठराविक पायरीपर्यंत (ब्लस्टोसिस्ट) वाढ केली जाते व त्यानंतर त्या प्रत्येक गर्भातील काही विशिष्ट पेशी वेगळ्या करून त्यांची डीएनए तपासणी केली जाते (PGD/S उर्फ preimplantation genetic diagnosis/screening).
४. ज्या गर्भांच्या पेशींत रोगकारक उत्परिवर्तने नसलेली BRCA1 व BRCA2 ही जनुके असतात, त्यापैकी एक किंवा जास्त (निरोगी) गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रोपीत केले जातात व त्यांची नैसर्गिकरित्या वाढ होऊन बाळ जन्माला येईपर्यंत काळजी घेतली जाते.
थोडक्यात,
१. IVF व PGD/S या तंत्रांच्या सहाय्याने फक्त निरोगी जनुके असलेल्या गर्भाची निवड करून त्याचे रोपण मातेत केले जाते व अश्या तर्हेने बाळातील त्या आजाराची शक्यता सर्वसामान्य जनतेइतकी कमी केली जाते*.
२. अश्या मुलांमध्ये निरोगी जनुके असल्याने (जनुकांत रोगकारक उत्परिवर्तने नसल्यामुळे), त्यांच्या पुढच्या पिढीतही निरोगी जनुकांचे संक्रमण होऊन, रोगसंक्रमणाची साखळी तुटते.
जनुके व रोग यांचे सुस्पष्ट संबंध असलेल्या इतर अनेक जनुकाधारीत रोगांतही हे तंत्र वापरले जाते.
उदा : Cystic fibrosis, Tay-Sachs disease, Spinal muscular atrophy (SMA), Hemophilia, Sickle cell disease, Duchennes muscular dystrophy, Thalassemia, वगैरे.
===================
* : रोगकारक उत्परिवर्तने असलेले BRCA1 व BRCA2 ही जनुके मुख्य असली तरी, इतर काही जनुकिय/अजनुकिय कारणांनी स्तन (स्त्री व पुरूष दोघांत), गर्भाशय (स्त्रीयांत) व प्रोस्टेट (पुरुषांत) यांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे, बाळामध्ये ते रोग होण्याची शक्यता शून्य होत नाही तर, इतर BRCA1 व BRCA2 मध्ये रोगकारक उत्परिवर्तने नसलेल्या सर्वसामान्य जनतेत असू शकते इतके कमी होते.
29 Jul 2018 - 10:36 pm | मार्मिक गोडसे
धन्यवाद डॉक्टर,
अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच केस आहे.
29 Jul 2018 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
BRAC1 & 2 ची ही डॉ पारीख यांची पहिली केस आहे असे बातमीत . मात्र, इतर रोगांत डॉ पारीख यांनी हे तंत्र भारतात आधीही वापरले आहे, असे त्या बातमीतच लिहिलेले आहे. जालावर थोडी चौकशी केल्यावर PGD / PGS with IVF हे तंत्र भारतात इतर अनेक संस्था वापरत आहेत असे दिसते.