मिपाकर्स,
ऑइल पेंटिंग मध्ये काम सुरु करून तपे ओलांडली , ती तपे ओलांडताना पण मध्ये मध्ये काही काळ जात राहिला जेंव्हा इतर व्यापांमुळे हि कला जोपासणे शक्य नव्हते. पण पूर्णविराम न देता अल्पविरामावर विसावा घेत का होईना पण चालत राहिले. जेंव्हा जमत नव्हते तेंव्हा बंद केले , थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्या वेळेत होईल ते केले आणि भरपूर वेळ होता तेंव्हा झोकूनही दिले. त्यामुळे कशातच प्रभुत्व असे नसले तरी सगळेच थोडे थोडे जमू लागले , मग काही पेंटिंग्स केली , काही गिफ्ट दिली, काही विकली, काही exhibition मध्ये लागली.
या सर्व प्रोसेस मध्ये सर्वात जास्त काय मिळाले ते समाधान. आणि प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकायला मिळाले, अजूनही मिळते आहे. शिकणे सोडायचे नाही असे ठरवून आजही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत चालते आहे.... त्या शिकण्यातील थोडासा , माझ्या काही रंगांचा प्रवास मी इथे मांडते आहे.
माझी काही ऑइल - acrylic पेंटिंग्स शेअर करण्याचा मानस आहे जी मी इथे मिपा वर येऊन २-३ वर्षे झाली तरीही -करू- बघू- काय होईल केल्याने- कोणाला पडलय आणि कोणाचे अडलेय माझ्या पेंटिंग्सने- कुठे लिहीत बसणार मराठी मध्ये, तेवढ्या वेळात जग जिंकून येईन - असा काहीही विचार करत केली नाहीत.....आत्ताही अगदी विचार केलाय म्हणजे सगळे पटापट शेअर करेनच असे नाही पण माझ्या भोवर्यातून बाहेर यायचा प्रयत्न करेन म्हणतेय.
आवडले काही तर जरूर सांगा, इंटरेस्ट असल्यास किंवा सगळे काम बघावे वाटल्यास / लिंक हवी असल्यास व्यनि का काय म्हणतात तो करा. अगदी नाही आवडले तरी सांगा , क्रिटिकस कडूनही शिकायलाच मिळेल.
*****सांगण्याची आवश्यकता नसेल तरीही सांगणे इष्ट्य : ओरिजिनल फोटो आणि पेंटिंग्सचा copyright पूर्णत्वे माझा आहे.
धन्यवाद !!!
प्रतिक्रिया
27 Apr 2017 - 6:56 pm | संजय क्षीरसागर
पण या पोस्टवर माझा एकमेव टिकात्मक प्रतिसाद
विथ ड्यू रिजनींग
होता. अशा चित्रांचाकॉपी राईट
वगैरे माझ्या दृष्टीनं फारच आहे. त्यावर आधीच झुंबड उठायला सुरुवात झाली होती. त्यात तुमचा प्रोत्साहनात्मक प्रतिसाद म्हटल्यावर (जर चित्रगुप्तांचा नेमका प्रतिसाद आला नसता) तर सदस्यांनी आणखी मोहोळ उठवलं असतं.28 Apr 2017 - 1:27 pm | सप्तरंगी
झुंबड तुम्हीच उठवायला सुरुवात केली होती, बाकी कुणी नाही.
26 Apr 2017 - 3:11 pm | पियुशा
क्लास्स !!!!!!!!!!!!!!!!
27 Apr 2017 - 2:23 pm | कपिलमुनी
इथे तर दंगा झालाय , तरी म्हणले मिपाकर्स कलादालनात कधीपासून इंटरेस्ट घ्यायला लागले!
27 Apr 2017 - 3:39 pm | सूड
दोन वर्षांपूर्वी झालेल्या कलादालनीय दंग्यावरचं हे विडंबन आठवलं.
27 Apr 2017 - 6:55 pm | माहितगार
अभिव्यक्ती हि अभिव्यक्ती असते कुणाला आवडो ना आवडो, ती भयंकर असो वा सुमार असो आवड आपली आपली तसे कला आपली आपली. प्रत्येक न विकल्या जाणार्या कलाकृतीचा कॉपीराईट कुरवाळत बसावे काय हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे, पण स्वयंस्फुर्त कलाकृतीवरील कॉपीराईट (मग कलाकृती बाळबोध अक्षर गिरवणार्या किंडरगार्डन मधल्या मुलांची का असेना) त्यांचा कायद्याने मिळणारा जन्मसिद्ध अधिकार आहे. एखाद्या कलाकृतीला मागणी किती असेल हे पाहून कॉपीराईट मुक्त करण्याचा सल्ला देणे वेगळे, कलाकृतीच्या दर्जावरून कॉपीराईट बद्दल अपराधीत्वाची भावना रुजवण्याचे काहीच कारण नाही.
कलाकृतीस मिळणारा पैसा मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो, कलाकाराने परीश्रम करावेत त्याच्या कौशल्याचे मुल्यवर्धन होऊन त्यास मोबदला मिळण्याची संधी निर्माण व्हावी म्हणून कॉपीराईट कायद्याचे संरक्षण मिळते. १०० कलाकृतीती ९९ कलाकृती बेकार आहेत पण एक कलाकृती खूप छान आहे अशा कलाकाराच्या बाकी ९९ सुमार कलाकृतीलाही एखादा ग्राहक पैसे मोजण्यास तयार होऊ शकतो. आचार्याचा प्रत्येक स्वैपाक उत्तम होण्याची आणि प्रत्येकाला त्याचा प्रत्येक खाद्य पदार्थ आवडण्याची खात्री नसते तरीही विक्री होत असते आचार्याला पैसे मिळतात तसेच आहे तुम्हाला न आवडलेली कलाकृती इतरांना आवडून घेण्याचा आणि पैसे खर्च करण्याचा आधिकार असू शकतो.
टिकाकारांचे उर्वरीत मुद्दे पटले, तरीही कॉपीराईट बद्दल अपराधीत्वाची भूमिका न ठेवता कॉपीराईट अधिकार आग्रहाने नमुद करणार्या धागा लेखक/लेखिकेचे कौतुक.
27 Apr 2017 - 7:04 pm | पिलीयन रायडर
मलाही हा मुद्दा पटतोय. ठिके लेखिका अगदी प्राथमिक दर्जाची चित्रे काढत असतील. आणि कदाचित ही चित्रे चोरी जाण्याचा संभवही नसेल. पण म्हणुन तिने असे म्हणुच नये असेही नाही. मिपावरच्या पाकृसुद्धा फोटोसकट चोरलेल्या आहेत आणि त्यवरुन चेपुवर अनेकदा गदारोळही झाला आहे. त्या काही संजीव कपुरच्या पाकृ नव्हत्या की कुणी खास फुड फोटोग्राफी केलेली नव्हती तिथे. तरीही उचलल्या गेल्याच. लिहीणार्यांना दु:ख झालेच ना?
कलाकाराने नम्र असावे आणि मुळात कलेवर लक्ष द्यावे, ह्या भानगडीत इतक्यात पडु नये हे सर्व योग्यच सल्ले आहेत. पण कुणाकुणाला आपले भलेही साधेसे काम का असेना, खुप महत्वाचे वाटत असते. म्हणुन लिहीले असेल लेखिकेने.
28 Apr 2017 - 12:06 pm | प्राची अश्विनी
एक विचारू का? ओरिजीनल चित्रं असेल तर कोपीराईटचा मुद्दा बरोबर आहे, पण जर आपलं चित्र दुस-या कुणा चित्राची कोपी असेल तर मुळातच कोपीराईट डावलला गेलाय .नाही का?
28 Apr 2017 - 12:26 pm | संजय क्षीरसागर
कॉपी केलेल्या चित्रांचा कॉपी राइट वगैरे होत नाही.
28 Apr 2017 - 12:44 pm | सप्तरंगी
वरील दोन्ही पेंटिंग्स कोणत्याही दुसऱ्या आर्टिस्ट्सच्या पेंटिंग वरून रेफर केलेली किंवा कॉपी केलेली नाहीत तर माझी मीच करायचा प्रयत्न केला आहे. केवळ काही अंदाज बांधुन यावर सतत काहीही का लिहिता आहात ????
28 Apr 2017 - 1:52 pm | माहितगार
सप्तरंगींचा ओरीजीनॅलिटी क्लेम बद्दलचा प्रतिसाद सर्वांनी लक्षात घेतला असणारच आहे आणि आपण त्यांच्या क्लेमचा आदर करूयात. मला वाटते 'प्राची अश्विनी'ंचा प्रश्न अकॅडेमीक स्वरुपाचा आहे. तसे पहाता सं.क्षी.ंनी त्यांना उत्तर दिले आहे. तरीपण प्रश्न माझ्या प्रतिसादाला असल्यामुळे अधिक सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
संक्षेपात मुळातच कोपीराईट डावलला गेलाय किंवा कॉपी केलेल्या चित्रांचा कॉपी राइट वगैरे होत नाही. हे म्हणणे ठिकच आहे . अर्थात डिटेल मध्ये बघायचे झाल्यास याचे काही भाग करता येतील.
१) कलाकृतीच्या निर्मात्याचा मृत्यूनंतरचा कायदेशीर कॉपीराईट कालावधी (भारतता साधारणपणे मृत्त्यूनंतर ६० वर्षे) संपल्यामुळे अथवा कॉपीराईटचा कलाकाराने स्वतःहून पूर्णतः त्याग केल्यामुळे एखादे चित्र पब्लिक डॉमेन म्हणजे अधिकृतपणे सार्वजनिकरित्या उपलब्ध सार्वजनिक अधिक्षेत्रात असेल आणि अशा चित्राची कुणि हुबे हुब कॉपी केली तरी नवीन कॉपीराईट तयार होत नाही. उदाहरणार्थ राजा रविवर्माची चित्रे सार्वजनिक अधिक्षेत्रात आहेत त्याचे चित्र कुणि हुबेहुब कॉपी केले तर नवा कॉपीराईट तयार होत नाही राजा रव्विवर्माचे हुबेहुब कॉपी केलेले चित्रही पब्लिक डॉमेन मध्येच रहाते. अर्थात राजा रविवर्माचे श्रेय नमुद करणे आवश्यक असते, राजा रविवार्म्याचे चित्र स्वतःच्या नावावर (सहजी) खपवता येत नाही.
२) अजिंठा लेणितील चित्रे वर म्हटल्या प्रमाणे मुळात कॉपीराईट फ्री आहेत अर्थात त्यांचे छायाचित्र कुणि विशेष प्रकाशयोजना वापरून काढले अथवा त्यातील अस्पष्ट भाग कुणि सबस्टँसिअली स्वतःच्या स्टाईल मध्ये रंग भरून स्प्ष्ट केले तर नव्या कॉपीराईटची निर्मिती व्हावयास हवी असे वाटते.
३) जे कॉपीराईटेड चित्र आहे जसे ह्या धागालेखिकेचे चित्र कॉपीराईटेड आहे कुणी कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कॉपीराईट मिळणे दुरच कॉपीराईट कायद्याची उल्लंघन होण्याची शक्यता पुरेपूर असू शकते.
कायद्यात फेअर डिलची अपवाद व्यवस्था आहे ज्यात तुम्ही केवळ व्यक्तिगत वापरासाठी, संशोधनासाठी, तौलनीक टिका अथवा समिक्षणासाठी, आवश्यक तेवढ्याच प्रमाणात वापरलेल्या प्रमाणात शिक्षण प्रक्रीयेत सुयोग्य वापर करण्याची मुभा असु शकते. थोडक्यात उदाहरण द्यायचे झाल्यास व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवरून इतरांनी फॉर्वर्ड झालेली कलाकृती रिसीव्ह करण्यात तेवढा प्रॉब्लेम नसतो -प्रॉब्लेम ज्यांनी ज्यांनी अनधिकृत फॉर्वर्ड केले त्यांच्या त्यांच्या डोक्यावर- पण आपण स्वतः इतरांना फॉर्वर्ड करण्यापुर्वी त्यावर इतर कुणाचा कॉपीराईट नसण्याची खात्री करणे सयुक्तीक असावे.
उत्तरदायकत्वास नकार लागू
28 Apr 2017 - 2:00 pm | प्राची अश्विनी
ओके, Thanx .हीच माहिती हवी होती. पण नुसतं c (मला टायपता येत नाही) लिहिलं की copyright होतो की ते register करावं लागतं?
28 Apr 2017 - 2:40 pm | माहितगार
तुम्ही घरातल्या चिठोर्यावर पेन चालू आहे का तपासण्यासाठी जे ड्रॉईंग (स्क्रिबल) काढता त्यावर तुमचा; अथवा बालक मंदिरातील मुल पाटी पेंसीलवर पहिले गिरवणे (स्क्रिबल) शिकत असेल त्यावर त्याचा, नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट त्याच्या स्वतःच्या नकळत त्याच्या जवळच्या टचस्क्रीन फोनला लागले आणि त्यातून छायाचित्राची निर्मिती झाली तर त्यावर त्या नवजात बालकाचा कॉपीराईट चालू होतो.
C टाईप नाही केले रजिस्ट्रेशन नाही केले तरी कॉपीराईट आपोआप चालू होतो. C टाईपकरणे बाकीच्या पब्लिकला आठवण देणे आणि कॉपीराईट तुम्ही सिरीयसली घेता असा संदेश अधोरेखित करते पण C टाईप नकरताही कॉपीराईट चालू होतोच. तिच बाब रजिस्ट्रेशनची कॉपीराईट ऑफीसकडे रजिस्ट्रेशन करता येणे केवळ एक सुविधा आहे. रजिस्ट्रेशन न करताही कॉपीराईट चालू होतोच
रजिस्ट्रेशन करणे न्यायालयात दावे सादर करताना बर्याचदा सोईचे पडते रजिस्ट्रेशन केसेस मध्ये बळ देऊ शकते किमान त्या तारखेस तुम्ही तुमचा दावा आधीच सादर करून ठेवला एवढे तरी सिद्ध होते हा त्याचा फायदा.
उत्तरदायकत्वास नकार
28 Apr 2017 - 2:25 pm | माहितगार
समजा नवनीत नावाच्या कंपनीने चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी सरावाच्या चित्रांचे पुस्तक तयार करून बाजारात उपलब्ध केले आहे. (सहसा प्रकाशक कॉपीराईट मुक्त चित्रे यासाठी वापरत नाहीत, अशी चित्रे विशेष चित्रकारांकडून काढून घेतल्याची शक्यता अधिक असू शकते) त्याला इतर प्रकाशक अनधिकृतपणे कॉपी करुन वितरीत करु शकत नाहीत.
शैक्षणिक झेरॉक्सींगच्या बाबत अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्यापलिकडे झेरॉक्सींग करता येत नाही संदर्भ रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला (हि किंवा अशा प्रकारची केस अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेली नाही सर्वोच्च न्यायालयात गेलेली नाही, त्यामुळे खासगी शिकवणी क्लासने अथवा खासगी शिक्षण संस्थांनी झेरॉक्सिंग करवून विद्यार्थ्यांसाठी वापरले आणि केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलीच तर काय होईल माहित नाही एनीवे काही कायदेशीर डोकेदुखी असेल तर त्याचा विचार मुख्यत्वे झेरॉक्ससेंटर अथवा खासगी शिक्षण देणार्यांनी लक्षात घ्यावयाची आहे विद्यार्थी व्यक्तिगत उद्देशानी वापरकरते रिसिव्हर असल्यामुळे ते इतरांना वितरीत करत नाहीत तो पर्यंत विद्यार्थ्यांना काळजी नसावी)
आता समजा एखाद्या (कॉपीराईटेड पुसकातील) चित्रात बाहेरची आऊट लाईन दिली आहे आणि आत रंग भरावयाचे आहेत. रंग भरल्या नंतरचा कॉपीराईट कुणाचा असेल ? माझ्या व्यक्तिगत मतानुसार त्यावर जॉईंट कॉपीराईट तयार व्हावयास हवा मूळ आऊट लाईन चित्र काढणार्या चित्रकाराचा/ प्रकाशकाचा + रंगाने रंगवणार्या विद्यार्थ्याचा. आता आपल्याला जॉईंट कॉपीराईट मिळाला म्हणून ते चित्रकला शिक्षकांशिवाय इतर कुणाला पाठवता येईल किंवा प्रकाशित करता येईल का ? तर ज्याचा जॉईंट कॉपीराईट असलेल्या मूळ चित्रकाराची/ अथवा प्रकाशकाची लेखी अनुमती न घेता असे प्रकाशित अथवा वितरीत करू नये म्हणजे व्हॉट्सप वर पाठवू नये असे कायदा सांगतो. अर्थात अशी एखादी केस न्यायालयात गेल्यावर नेमके काय होईल ते माहीत नाही.
उत्तर दायकत्वास नकार
28 Apr 2017 - 2:26 pm | माहितगार
उत्तर दायकत्वास नकार लागू
28 Apr 2017 - 11:29 am | वाचूका
आमचे वाचुन होइपर्यन्त हे लोक टाईप कसे काय करतात????
28 Apr 2017 - 12:07 pm | विशाल कुलकर्णी
अप्रतिम !
28 Apr 2017 - 1:08 pm | मितान
सप्तरंगी, तुम्ही चित्रकार आहात. मस्त चित्र काढा.सर्व रंग वापरा. बाकी आपले गुण सांगणे आणि आढ्यता मिरवणे यातला फरक तुम्हाला समजला असेलच.
केवळ लाल रंग आवडणारे स्वघोषित एकमेवाद्वितीय जगात सर्वत्र असतात.त्यांना फाट्यावर मारा.
जिथे तिथे मी आणि मी च्या पिंका बघून आता उबग यायला लागला आहे. !!
28 Apr 2017 - 1:33 pm | सप्तरंगी
मी आता इथे थँक्स शिवाय बाकी काही बोलत नाही, नाहीतर परत कुणीतरी काहीतरी म्हणेल:))
28 Apr 2017 - 1:18 pm | सप्तरंगी
तुम्हा सर्वांच्या dissection मधला मुख्य मुद्दा- copyright- वरील दोन्ही पेंटिंग्स कोणत्याही दुसऱ्या आर्टिस्ट्सच्या पेंटिंग वरून रेफर केलेली किंवा कॉपी केलेली नाहीत तर माझी मीच करायचा प्रयत्न केला आहे. केवळ काही अंदाज बांधुन त्या जोरावर copyright बद्दल फारच उलटसुलट चर्चा, खरे तर वाद-प्रतिवाद सुरु आहेत असे दिसते. संजय क्षीरसागर यांनी तर मी ignore करण्याचा प्रयत्न करूनही काही गोष्टी उगीचच उचलून धरल्या आहेत.
काहींच्या मते copyright बद्दल लिहिण्याची गरज असो वा नसो पण तसे लिहिण्यामध्ये काय चूक आहे ते मला खरोखर कळले नाही. कारण ज्याचे स्वतःचे पुस्तक, लेख, पेंटिंग वगैरे असते त्याचा copyright त्याचाच असतो, त्या कामामागे त्या व्यक्तीची मेहनत असते, क्रेडिट त्याचेच असते. मग इतरांच्या मते ते काम चांगले असो वा वाईट !अर्थात बऱ्याचदा copyright हा by default असतोच त्यामुळे लिहिण्याचीही गरज नसते हे मान्य पण हे सर्वाना माहिती नसते. पण इथे सर्वांच्या चर्चेचा मुद्दा तो दिसत नाहीये. इथे नवोदित कलाकाराने copyright बद्दल बोलुच नये असा रोख दिसतो आहे. पण copyright तर सगळ्यांसाठीच असतो मग प्रत्येकानेच आपल्या कामाचा कुणी वापर करू नये किंवा केल्यास क्रेडिट द्यावे असा विचार केला तर काय हरकत आहे ?
माझी काही पेंटिंग्स करण्यासाठी मी माझे ३०-४० तास घातले आहेत. ते बाकी लोकांच्या दृष्टीने चांगले असे व नसो ते माझे स्वतःचे काम आहे. उद्या माझ्या अपरोक्ष त्याचे प्रिंट / ग्रिटींग कार्ड बनले तर?? असे नवोदित कलाकाराच्या बाबतीत होत नाही असे म्हणाल तर इंटरनेट च्या दुनियेत असे काही नसते.
28 Apr 2017 - 6:51 pm | राघव
ते कॉपीराईट वगैरे जरा बाजूला ठेवावे म्हणतो.
मला विचारायचे आहे ते तुमच्या चित्रांबद्दल. मुळात कुणी पेंटींग करत असेल तर मला फार आदर वाटतो.
कारण मला स्वतःला ते नीटसे जमत नाही. मी मुळात स्केचेस करणारा विद्यार्थी आहे. :-)
चित्र काढणे [स्केचेस, पेंटींग, फोटोग्राफी, विडिओ.. वगैरे] म्हणजे मुळात एक संवादच असतो. मग एखादे चित्र का काढायचे, त्यामागची विचार-धारणा काय, ते काढतांना आपण नेमके हेच रंग का निवडतो, चित्रातून काय अभिप्रेत आहे.. हे आपण थोडेसे मांडाल का? यामुळे चित्रांशी रिलेट होणं माझ्यासारख्याला सोपं होईल आणि जो आनंद/समाधान तुम्ही ते चित्र काढतांना अनुभवलात तेही समजून घेता येईल! :-)
हे सगळं विचारण्या मागचं कारण असं की, मी स्वतः चित्रगुप्त सर सांगतात त्याच्या अगदी विरोधात चित्र रेखाटतो; म्हणजे फोटो/चित्र बघून रेखाटतो. अजून तरी स्टील-लाईफ चित्र रेखाटून बघीतली नाहीत. त्यामुळे एखाद्या चित्रानं मोहून टाकलं की तसं काढून बघण्याचा प्रयत्न करायचा एवढा एकच विचार मनात असतो. त्या चित्रातली एखादी जागा इतकी अवघड असते की ते करून बघतांनाचं समाधान निरतिशय सुंदर असतं. कधी कधी ते समोरच्यालाही जाणवतं की हे भलतंच सुंदर जमलंय.. असो.
जरूर सांगावे. वाट बघतो.
-- राघव
30 Apr 2017 - 8:35 pm | सप्तरंगी
राघव- धन्यवाद राघव.
पण मी सुद्धा चित्रगुप्तकाकांनी सांगितल्यासारखीच अगदी शिस्तीत HB,2B, 4B, 8B, मग charcoal अशीच सुरुवात केली होती...मात्र जे काम मी सध्या करते आहे ती माझी आवड आणि प्रेफरन्स आहे.
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला जे समजते, वाटते त्याप्रमाणे मी लिहेनच. तोपर्यंत हवे तर चित्रगुप्तकाकांनाच विचारा, बघा त्यांचे नेमके काय म्हणणे आहे ते.
3 May 2017 - 2:10 am | राघव
मी तुम्हाला एक कलाकार म्हणून विचारतो आहे. माझ्या प्रश्नांबद्दल जे मला म्हणायचं होतं ते माझ्या दोन प्रतिसादात सरळ सांगीतलं आहे.
तुम्ही केव्हा, काय अन् कसं सांगायचं तो तुमचा पर्याय आहे. मी त्याबद्दल वाट बघतो एवढेच म्हणू शकणार.
बाकी कुणाला काय विचारावं हे मला कळतं. ते माझं मला ठरवू देत. धन्यवाद.
6 May 2017 - 11:11 pm | सप्तरंगी
@राघव
माझे अश्यात मिपावर येणे झाले नाही. तुम्ही परत विचारलेत हे दिसले म्हणुन मला जेवढे समजते ते लिहीते. मी सुद्धा पेंटिंग करणारी विद्यार्थिनी आहे :)
Realism:
कलेमध्ये सतत बदल होत आले आहेत. १९व्या शतकात काही कलाकारांनी रोमँटिसम मधील glorification अमान्य करून अदभुत, अविश्वसनीय कलेपासून हटके जाऊन रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे , लोकांचे जसेच्या तसे unidealized manner मध्ये वास्तववादी असे काम सुरु केले होते. तेंव्हापासून कित्येक कलाकार यात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. photorealism , hyperrealism / superrealism हि रिऍलिझमची भावंडे.
यात काही आर्टिस्ट्स तर ग्रीडसचा वापर करून, ब्लॅक-व्हाइट फोटो कॅनव्हास वर प्रिंट करून रंग भरतात. २००-३०० sq cm पेक्षाही मोठी पैंटिंग्स हे लोक त्यातील प्रत्येक गोष्ट keenly observe करून मग करतात. आणि त्यातील काही खूप कलाकार खूप नावाजले गेले आहेत. खर तर रिऍलिसम मध्ये स्टाईल ला वाव नाही / नव्हता पण तरीही काहींची आपली वेगळी अशी innovative styleही निर्माण केली आहे. तर काहींच्या कामात फिलिंग्स, रिऍलिटी या दोन्हीचा प्रभाव दिसतो. उदा. दाली हा एक surrealism मधला उत्तम आर्टिस्ट होता. काही प्रकारात इमॅजिनेशन चा अभाव असतो पण त्यांचे हे काम दुसरा कोणताही कलाकार ठरवले तरी तितक्या सहजासहजी कॉपीही करू शकणार नाही इतके अवघड आणि अफलातुन असते असे आपले मला वाटते. पण मग त्याला काही आर्टिस्ट चांगले आर्ट मानत नाहीत आणि काही त्यांना अक्षरश: डोक्यावरही घेतात मी. का?
ट्रॅडिशनल आर्ट follow करणारे काही आर्टिस्ट्स realism, photorealism, hyperrealism ला चांगले आर्ट मानत नाहीत कारण त्यात feelings, emotions, message पेक्षा skills, technique, observation, रंगांचा presize वापर, layers मध्ये तास न तास काम, प्रकाश आणि अंधाराचे effects हा भाग महत्वाचा ठरतो. आणि मग २D मधून एक 3D illusion create केले जाते. भावनेपेक्षा यात technical aspect आणि training जास्त असतं . फक्त पेंटिंगमध्येच नाही तर literature आणि sculpture मध्ये पण realism बघायला मिळेल. Ron Mueck ची hyperrealistic sculpture बघाच.
मी सुद्धा पेंटिंग करणारी विद्यार्थिनी आहे....सगळ्यांसारखीच मीही सुरुवात पेन्सिल ने HB, २B, ४B...मग चारकोल अशीच केली. मग निसर्ग, स्थिर-चित्र portrait वगैरे करता करता मग acrylic आणि मग ऑइल वर स्थिरावले. त्यातही ऑइल मधील व्हर्साटिलिटी जास्त आवडली. मग जसा जसा still-life मधील ग्लास, धातु, कपडा यांच्यातील फरक, प्रकाश अंधार यातील फरक, shade-shade मधील जास्त दिसु लागला तसे मग स्टील life वरच थांबले. कारण ते जास्त challenging वाटायला लागले (इतरांसाठी नसेलही कदाचित ) आता तेच आवडते. रिऍलिझम आणि हायपर-रिऍलिझम तर जबरदस्त आवडते पण हायपर-रिऍलिझमचा माझा अजुन तरी दूर दूरपर्यंतही संबंध नाही.
मला युरोप मध्ये ट्युलिप्स season मध्ये तर सहजासहजी मिळतात. त्यांचे विविध रंग आणि shades अक्षरशः मोहवून टाकणारे आहेत. एप्रिल-मे महिनात थोडा सूर्य वरती आला कि हि फुले अजून-अजून सुंदर दिसायला लागतात. म्हणून मी माझ्या काही पेंटिंग्स साठी हि फुले निवडली. मी स्वतः फोटोज काढुन ते रेफेरेंस म्हणुन वापरले . मला रिऍलिझम / stillife खास करून फळे , फूड, , ग्लास असे ऑब्जेक्टस आवडते. यासाठी ऑब्जेक्ट समोर असावेच लागते. व्यतिरिक्त फोटो वापरण्याची अजून दोन कारणे आहेत. एकतर मी फक्त रात्री काम करते जेंव्हा सूर्यप्रकाश जवळ जवळ नसतोच. आणि दुसरं म्हणजे मी माझे काम संपवायला ३०-४० तास लागतात आणि ते हि मी भरपूर गॅप घेत एक एक लेअर ड्राय करत करणार असते आणि मग माझे काम होईपर्यंत ते फुल कोमेजणार असते. पण मग म्हणुन फुल समोर नाही म्हणून मग ते कधी पेंट करून बघायचेच नाही हे मला मान्य नसते. त्यात इथे रोज एकसारखे weather नाही त्यामुळे stillife साठीही हवा तसा प्रकाश मिळत नाही. (पण या उन्हाळ्यात सुट्टी घेऊन स्टील-life ची मांडणी करून सलग काम करायचा विचार आहे. )
फुलांच्या रंगात खरे तर मला अजून बदल करायची गरजच नव्हती इतकी ती सुंदर आहेत पण कामात बदल व्हावा, अजुन नवीन काही शिकता यावे म्हणुन मी पेंटिंग काही मध्ये बदल करते.
उदा.: लाल फुल असेल तर ते बदलुन सगळे पिंक चे shades बनवते किंवा बॅकग्राऊंड बदलते, आकाश / पाने टाकते/ कापडा आणि त्यानुसार त्याचा समोरच्या फुलावर , ऑब्जेक्ट किंवा काचेवर कसा इफेक्ट होईल असा विचार करते. हे इमॅजिन करताना आणि त्यानुसार काम करताना मजा येते, काही चुकते. मग परत बदलते. प्रकाश आणि अंधाराच्या तर सगळ्या shades नजर खिळवून ठेवतात, दिसतात , पण नेहमीच ब्रशने त्या तितक्या परफेक्टली रंगवता येतात असे नाही. त्याचे कारण माझ्या लिमिटेशन्स आणि त्याबरोबरच मी फक्त १२-१३ कलर्समध्येच काम करते हे हि आहे.
हे करता करता कधी कधी तुम्ही म्हणता तास ''आहा '' चा क्षण येतो आणि हो खूपदा लोकांना पण हे काम आवडते आणि मुख्य म्हणजे yes, i could do it चे समाधान पण मिळते. म्हणूनच म्हणलं कि हि माझी choice आणि preference आहे.
काय अभिप्रेत आहे हे विचाराल या प्रकारात फीलिंग्स / message चे महत्व ना के बरोबर आहे. जे अवघड वाटते ते करून तर बघू यातून मी हे सुरु केलं . कुठलाही छंद जोपासताना ते आपण आवड म्हणूनच करतो, ऑफिसमध्ये, घरी दारी आपण इतरांचा विचार करतच असतो, छंद तरी आपण आपल्याला हवा तसा जोपासावा ना . इतर लोकांना काय आवडते काय आवडत नाही त्यानुसार बदल का करायचा ? तसे सतत केले तर आपण आपल्या आनंदाला मुकत तर नाहीये ना हे बघावेच लागेल. अर्थात त्यांचा सल्ला आपण आपल्या प्रगतीसाठी वापरावाच. ''असेच करायचे , हेच करायचे, हेच बरोबर " यातला 'च ' मला खटकतो. अशी restrictions बाळगून माझे तरी करणे मला थांबवायचे नाही म्हणून चांगल्या-वाईट च्या फंदात मी फारशी पडत नाही जे मला fascinating, challenging / आव्हानात्मक वाटते ते मी करतेय.
Personally पिकासो पेक्षा vermeer चे काम जास्त मला challenging वाटते आणि समजते म्हणून मग चांगले वाटते, ऍबस्ट्रॅक्ट, गायतोंडेंची पेंटिंग्स मिलिअन्स मध्ये कशी जातात अश्या काही गोष्टी मला कळत नाही. हे इतर जाणकारच सांगू शकतील.
7 May 2017 - 10:14 pm | राघव
सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
रिअॅलिझम बद्दल मलाही बरेच कुतुहल आहे. अनेक आर्टिस्ट आहेत जे इतके सुंदर काम करतात की नुसतं तासन् तास बघत राहावं. जसं एक नेचर रिअॅलिझम या थोड्या हटके विषयावर काम करणारा An Jung-Hwan हा कलाकार. अप्रतीम काम आहे. किती मेहनत घेत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.
मला स्वतःला स्केचेस आवडत असल्याने Xiaonan sun याची पोर्ट्रेट्स मला खास आवडतात. स्पीड विडिओज आहेत.. पण फक्त पेन्सीलनं तो जी काही कलाकारी करतो ते अद्भुत आहे!
साधारण ४-५ तासांची नियमित बैठक असल्यास बर्यापैकी काम करता येतं. पण आजकाल सगळा व्याप सांभाळून तेवढं शक्य होत नाही. तुम्ही आवडत्या कामात तेवढा वेळ घालवू शकताहात, हेच खूप अभिनंदनीय आहे!
ते हि मी भरपूर गॅप घेत एक एक लेअर ड्राय करत करणार असते
हे हळूहळू चित्र डेव्हलप होण्याचा प्रवास तुम्ही चित्रबद्ध करून ठेवलाय का? असेल तर कधी वेळ मिळाल्यास जरूर शेअर करावे. पेंटींग नाही तर कमीत कमी एक अनुभव तरी नक्की मिळतो त्यात!
स्केचेस मधेही हा प्रकार असतो. पण माझे प्राविण्य अजून तेवढे आलेले नाही आणि कंटाळा हा आपला सदासोबती! त्यामुळे बरेचदा चित्र पूर्णच होत नाही. असो.
काय अभिप्रेत आहे हे विचाराल या प्रकारात फीलिंग्स / message चे महत्व ना के बरोबर आहे. जे अवघड वाटते ते करून तर बघू यातून मी हे सुरु केलं . कुठलाही छंद जोपासताना ते आपण आवड म्हणूनच करतो, ऑफिसमध्ये, घरी दारी आपण इतरांचा विचार करतच असतो, छंद तरी आपण आपल्याला हवा तसा जोपासावा ना .
१००% सहमत! :-)
पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा!
-- राघव
29 Apr 2017 - 12:43 pm | माहितगार
खालील चर्चा केवळ अकॅडेमीक स्वरूपाची आहे.
राघव यांच्या उपरोक्त प्रतिसादातून त्यांना धागा लेखिकेची चित्र काढण्या मागची विचार-धारणा काय, ते काढतांना आपण नेमके हेच रंग का निवडतो, चित्रातून काय अभिप्रेत आहे.. इत्यादी जाणून घेण्यात रस असावा म्हणून कॉपीराईट विषय उगाळणे थांबवून चर्चा करु असे त्यांना म्हणायचे असावे आणि कदाचित धागा लेखिकेलाही कॉपीराईट विषय अधिक उगाळण्यापेक्षा बाकीच्या चर्चेत रस असावा.
आता पर्यंतच्या कॉपीराईट चर्चेतून किंवा त्यांच्या आधीच्या माहितीतून राघव यांना कॉपीराईटचे बारकावे माहित असतील असेही गृहीत धरावयास हरकत नसावी पण एक उदाहरण म्हणून इतर चित्रकारांची चित्रे काढून बघणे या बद्दल चर्चा केल्यास इतर वाचकांना कॉपीराईट बारकावे लक्षात घेणे सोपे जाईल असे वाटते.
राघव यांना इतर चित्रकारांची चित्रे पुन्हा जसेच्या तसे काढून बघणे आवडते आणि कॉपीराईट कायद्याच्या फेअरडील तरतुदीं अंतर्गत स्वतः पुरते ते असे करू शकतात. पण त्यांना त्यांच्या कला शिक्षकापलिकडे कॉपीराईटेड चित्राची कॉपी स्वतः बनवलेली असली तरी इतरांना वितरीत करणे कॉपीराईट कायद्यात बसेलच असे नाही म्हणजे इतरांना वितरीत केल्यास कॉपीराईट उल्लंघनाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आपण कॉपी केलेली कृती, बघा माझी कृती अथवा मी केलेली कॉपी असे म्हणण्याचा मोह होतो त्या क्षणी मी असे केल्याने कॉपीराईटचा भंग होणार नाही ना ह्या बारकाव्याचाही सोबतीने विचार केलेला उत्तम.
या धागा चर्चेत एक विषय आला नाही तो म्हणजे दुसर्या कलाकृतीची प्रेरणा घेऊन नवी कलाकृती बनवणे. समजा कुणा वाचकाने हा धागा बघीतला, धागा लेखिकेची चित्रे काही दिवसांनी पूर्ण विस्मरणात गेली पण ट्युलिप फुलांची चित्रे काढण्याची कल्पना तेवढी लक्षात राहीली वेगळी ट्युलिप फुले घेतली नव्याने स्वतःच्या स्वतंत्र शैलीतून चित्रे काढली तर त्यांचा तो स्वतंत्र कॉपीराईट तयार होऊ शकतो. ट्युलिप किंवा कोणत्याही फुलांची चित्रे काढणे हि एक आयडीआ आहे आणि आयडीआंवर कॉपीराईट नसतो.
दुसरा प्रकार मूळ चित्र विस्मरणातून गेले नाहीच पण त्या चित्राच्या प्रेरणेतून स्वतंत्र नवी कलाकृती निर्माण झाली आहे असे वाटते. ह्या ठिकाणी कलाकृती किती सबस्टँशीअली डिफरंट आहे हे मॅटर करते. हा कायद्याच्या दृष्टीने धूसर एरीआ होतो कायद्याचे उल्लंघन होण्या न होण्याच्या सिमारेषेवर येते.
मूळ चित्राचे स्ट्रक्चर तसेच ठेऊन केवळ रंग बदलले तर स्बस्टँशिअली डिफरंट होण्याची शक्यता कमी असावी आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन शक्य असावे पण मूळ चित्रातून स्वतःची नवी कल्पना जिवंत झाली जसे की अशा ट्यूलीप फुलांच्या गार्डनमध्ये बसलेली तरुण/तरुणी; चित्राचे मूळ स्ट्रक्चर रंग फुले वगैरे सगळेच बदलले, पण मनात तयार झालेल्या वातावरणाचा प्रभाव शिल्लक राहीला तर ती झाली प्रेरणा तयार होणारे चित्र स्वतंत्रपणे तयार होते आहे त्यामुळे अशा प्रेरणेतून तयार होणारे चित्रास स्वतंत्र कॉपीराईट उपलब्ध होऊ शकतो.
उत्तर दायकत्वास नकार लागू
29 Apr 2017 - 11:36 pm | राघव
माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मला यातले बरेचसे माहित नव्हते, त्यामुळे फायदाच झाला.
अर्थात् हे सगळं तेव्हा जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा -
मला मी काढलेली चित्रं मला विकायची ईच्छा होईल... अथवा
undue credit घेत स्वतःच्या कल्पना म्हणून प्रसिद्ध करण्याची ईच्छा होईल...
त्यामुळे जोवर हे सगळंं मी करत नाही तोवर कलाकृतीचा आस्वाद घेणे हेच श्रेयस्कर. सध्यातरी या धाग्यावर प्रतिसाद देताना दुसरा कोणताही हेतू नाही.
लेखिकेने जर स्वतःच्या चित्रांबद्दल लिहिले तर मला तरी खूप आवडेल. बाकीच्या गोष्टींकडे सध्या दुर्लक्ष करणेच बरोबर वाटते.
30 Apr 2017 - 8:32 pm | सप्तरंगी
माहितगार - असे काही नाही, तुम्ही लिहा उलट तुमच्या copyright बद्दल लिहिण्याने अजुन काही गोष्टी क्लिअर झाल्या. धन्यवाद !
1 May 2017 - 3:55 pm | प्रीत-मोहर
सप्तरंगी तुमची चित्रं खूप आवडली!!
3 May 2017 - 2:41 pm | जागु
अप्रेतीम. दुसरे खरेच वाटत आहे.
3 May 2017 - 8:07 pm | कवितानागेश
फक्त एक चित्रप्रेमी प्रेक्षक म्हणून मला काय वाटतंय ते लिहिते,
खरे तर मी कितीही प्रयत्न केला तरी या जन्मात असे काहीही करू शंकाणार नाही!
पण तरीही केवळ चित्र बघायला आवडतात म्हणून सहज मत मांडतेय.
कामात सफाई आणि मेहनत आहेच. ती स्पष्ट दिसतेय आणि नक्कीच कौतुकास्पद आहे.
पण रंग थोडे सॉफ्ट हवे होते. जास्त मोहक झाले असते.
पहिले पेंटिंग हे पेंटिंग सारखे दिसतंय पण दुसरे फोटो सारखे वाटतंय. दोन्हीच्या शैलीत फरक पडलेला आहे.
पण सट्रोक्स खरोखरच चांगले आहेत.
ओव्हरऑल सुंदर पेंटिंग्ज. मोठ्या आकारात असतील तर खरोखरच दिवाणखान्यात लावण्यासाखी आहेत.
6 May 2017 - 11:14 pm | सप्तरंगी
बाकी मतांकडे दुर्लक्ष करून तुम्ही इथे मत मांडत आहात हेच माझ्यासाठी खुप आहे.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पिवळे ट्युलिप रिऍलिझम नुसार केले आहे. दुसऱ्या फुलांची सुरुवात त्याच प्रकारे असली तरी काहीपानाफुलांचा भाग जसा त्यावेळी वाटलं तसा टाकला आहे. पाने, त्यावरचा प्रकाश / shades करेपर्यंत माझे patience बऱ्यापैकी संपले होते. ते ६०*९० cm आहे. मलाही पेंटिंग मध्ये पेस्टल shades चा सुथिंग इफेक्ट द्यायला नक्कीच आवडेल.