आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते
शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते
शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण
विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान
गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार
त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद
शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल
रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ
शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे
शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे
नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे
भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे
विखुरलेले ब्रम्हांड सारे आज विलीन होउदे
आज पुन्हा अंधाराला शून्य होऊन राहूदे
नऊ रसाचे भाव विश्व आज गोठून जाऊ दे
शून्य विचार असण्याची आज अनुभूती घेऊ दे
तुरीय अवस्तेचा हा प्रवास समाधीत आज संपू दे
ह्या जीवाला त्या शिवात एकरूप होऊन जाऊ दे
शून्य होऊनि शून्य तेची शून्य अवस्था मिळू दे
शून्यातल्या हि शून्यतेचा प्रवास शून्य होऊ दे
----© ओंकार जोशी