मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं
मला बी पान्यात खिळू द्या की
अंगात वारं भिन्नू द्या की रं
मला बी पावसांत भिंजू द्या की
——-
(चाल क्र. १)
गच् झाकून टोपलं भाकार पिठलं
शेताकडं चालूया लप् लप्
लुगाड टाचून धोतार खोचून
लावनी करतिया लग् बग्
इरल्याखाली गानं घुमूं द्या SS
इरल्याखाली गानं घुमू द्या की रं,
मला बी कामावर यिऊं द्या की
——-
(चालीत बदल – चाल क्र. २)
सातारंगाचा पदर ओढून
आई अंबेगत लुगाड नेसून
बाप्पे डोंगर बाया जाले वो
नव्या नवरीचा शिणगार क्येला वो
आता उन्नाची हळ्ळद होऊं द्या SS
आता उन्नाची हळ्ळद होऊं द्या की रं,
मला बी झिम्माड खिळू द्या की
————–
(चालीत बदल – चाल क्र. १)
अंगानं लांबडा रंगानं तांबडा
झिंग झिंग पिंगतो चतू S रं S
नाजुक्क टाचनी लाखात द्येखनी
कशी हुनार त्येला फितू S र
नाकतुंड्याच्या मांगूस उंडू द्या SS
नाकतुड्याच्या मागूस हुडू द्या की रं,
मला बी गवतात धावूं द्या की
——-
(चालीत बदल – चाल क्र. २)
किती मऊ मऊ अंग तुझं गं
कशी घाबरून तू शंखात जाती गं
कशी लव्वाळ्याला चिकटून र्हाती गं
कशी चिखलामदे हळ्ळूच लपती गं
गोगलगायीला उचलून घिऊंन्द्या SS
गोगलगायीला उचलून घेऊ द्या की रं,
मला बी उन्णाड र्हाऊं द्या की
————-
(चालीत बदल – चाल क्र. ३)
बगू गार गार हिरवी झाडी
आन् व्हळ्यामंदी सोडू व्हडी
पावसाची होईल कडी
छत्रीची तुटंल काडी
चिखलात धप् थफ् करून्द्या SS
चिखलाशी मस्ती करून्द्या की रं,
बिळातून खेकाडं काढूं द्या की
——-
(चालीत बदल – चाल क्र. १)
काढून कापडं होऊन नागडं
हिरीत पोवूं द्या डूंब डंब
थेटरात घुसून घोळक्यानं बसून
शिणूमा बगूं द्या रम् पम्
आन् म्हैशीच्या पाठीवर बसूं द्या
आरं, म्हैशीच्या पाठीवर बसूं द्या की रं,
मला बी राजागत फिरूं द्या की
——-
(चालीत बदल – चाल क्र. २)
आज दोस्तांची लै आठव काढितो
लांब खाटेवरून पागोळ्या मोजितो
आन् बेडकाची डराव डराव ऐकितो
कदी वहीमदे चित्तूर रेखाटितो
आता कधीतरी बाहेर जाऊं द्या SS
आता कधीतरी बाहेर जाऊं द्या की रं,
मला बी वार्यात न्हाऊं द्या की
——-
(चाल क्र. २)
माय खाटेवरि उदास बैसते
जनू सन्नासुदिक सुत्तक ठेविते
बाप डाकतरच्या वार्या करिते
कोन्च्या जल्मांचि पापं त्ये भोगिते
औशिद अभ्यास जळ्ळं ऱ्हाऊं द्या SS
औशिद अभ्यास सारं ऱ्हाऊं द्या की रं…
मला बी मोरागत नाचूं द्या की
——-
मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं
मला बी पान्यात खिळू द्या की
अंगात वारं भिन्नू द्या की रं
मला बी पावसांत भिंजू द्या की
——-
(एका कॅन्सरग्रस्त लहानग्याचं मनोगत)
प्रतिक्रिया
5 Mar 2017 - 7:28 pm | अभ्या..
अर्ररर्र्,
नगा लावू असा चटका. :(
5 Mar 2017 - 9:56 pm | पैसा
हम्म...
5 Mar 2017 - 10:14 pm | जव्हेरगंज
शेवटचं वाक्य नको होतं हो :(
कवितेला 'जाम भारी' असं म्हणावं असा प्रश्न पडलाय.
6 Mar 2017 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा
प्लस वण. :(
6 Mar 2017 - 2:21 pm | प्राची अश्विनी
खरंच.+11
6 Mar 2017 - 11:57 am | प्रीत-मोहर
खरय. शेवटचं वाक्य नको होत. आवडली कविता
6 Mar 2017 - 2:33 pm | पद्मावति
अतिशय प्रभावी आणि अस्वस्थ करणारी रचना.
6 Mar 2017 - 3:00 pm | मितान
!
7 Mar 2017 - 1:15 pm | अजया
:(