भाषेचे मूळ : चिंता आणि चिंतन

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Feb 2017 - 5:15 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

जानेवारी-फेब्रुवारी (२००३) महिन्यात भाषेविषयीच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी ‘अहिराणी भाषेचा प्रतिनिधी’ या नात्याने निमंत्रित म्हणून म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संशोधन संस्थेत गेलो होतो. दिवसभर परिसंवादातील चर्चा आणि रात्री विविध नाटके पाहायला मिळत होती. नाटकांना जाताना भाषेची निवड हा भाग दुय्यम महत्त्वाचा होता. म्हणून जास्त करून कानडी, एक हिंदी तर एक जेनु कुरुबा या आदिवासी जमातींवरील आणि आदिवासींकडूनच बसवल्या गेलेल्या नाटकाचा आस्वादही केवळ सादरीकरणाच्या गुणवत्तेमुळे कायमचा लक्षात राहील, असा मनःपटलावर कोरला गेला.
भीष्म साहनींचे मूळ हिंदी नाटक ‘माधवी’ पाहण्याचा योग आला नाही, पण म्हैसूरला या नाटकाचा कानडीतील अनुवादाचा प्रयोग पाहायला मिळाला. ‘यक्षगान’ या कानडी लोकपरंपरेतला प्रयोग पाहिला. ‘जेनु करुबा’ या नावाच्या आदिवासींच्या लोककथेवर आधारित आणि त्यांच्याच भाषेत मुख्य म्हणजे या आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन डॉ. केकरी नारायण यांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग पाहून तर मती गुंग झाली. ही भाषा आपल्याला अवगत राहिली असती तर काय बहार आली असती, असे वाटल्यावाचून राहिले नाही. अर्थात सादरीकरणावर तहान भागवून गप्प न बसता दुसर्‍या दिवशी लेखक डॉ. केकरी नारायण यांच्याकडून संहिता समजावून घेतली.
भाषा ह़ी संस्कृतीचे वाहन असते, याचा प्रत्यय म्हैसूर मुक्कामात वेळोवेळी येत होता. भाषा आणि लोकसंस्कृती या समातंरपणे व्यामिश्रतेने सादर होत असतात. विचारविनिमय आणि चिंतनात हे ही सुचले की आपल्याला सादरीकरण कळतंय, हावभाव कळतात, काह़ी शब्द सुध्दा कळतात; पण पूर्ण भाषा कळत नाह़ी. काश्म़ीपासून कन्याकुमारी पर्यंत पाय़ी प्रवास करत हळूहळू प्रांत ओलांडले तर आपल्याला भाषेची अडचण कुठेच निर्माण होणार नाही. कारण अमूक एक भाषा अमूक एका सीमेपर्यंत; नंतर दुसरी, असे भाषेबाबत होत नाही. भाषा हळूहळू आपल्याला जाणवणार नाह़ीत अशा पद्धतीने बदलत जातात. खरं तर आपण वेगाने प्रदेश पादाक्रांत करतो म्हणून भाषा आपल्याला खटकतात. भाषा मात्र केवळ एकेक उच्चार-एकेक शब्द याप्रमाणे बदलत जातात. म्हणून तर प्राचीन काळी पाय़ी यात्रा करणार्‍यांना भाषेचा प्रश्न कध़ी भेडसावला नसावा.
आज मात्र परभाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विशाल राहिलेला नाह़ी. जो तो आपल़ी भाषा बळजबरीने दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करतोय. एवढेच नव्हे तर आपण जी भाषा बालतो त़ी भाषा शुध्द-प्रतिष्ठित तर दुसरा बोलतो त़ी भाषा अशुध्द-गावढंळ, अश़ी भाषिक वगर्वाऱी़ विशिष्ट गट करू पाहतो, हे चित्र भयावह आहे. बोलींच्या बाबतीत तर हा प्रश्न अधिक जटील होत जातो. त्या त्या परिसरात बोलल्या जाणार्‍या बोली या कशा अशिष्ट असतात हे बिंबवण्याचा प्रयत्न काही लोक पडद्याआडून करत असतात.
विशिष्ट बोली ज्यांची मातृभाषा आहे असे आपल्याकडील काही विद्वान वक्‍तेही अशा विशिष्ट गटाला आपल्या भाषिक कृतीतून सहकार्य करीत असतात. आपले वक्तृत्व फुलविण्यासाठी ते ओढूनताणून जड व अनाकलनीय संस्कृत शब्दांची व्याख्यानातून अधूनमधून पेरणी करतात. भाषण म्हटले की, ते असेच असणार अशी श्रोत्यांचीही समजूत झालेली दिसते. म्हणून अगदी सर्वसामान्य मनुष्य सुद्धा संस्कृत जड अशा सौष्ठवपूर्ण भाषणांची तारीफ करताना दिसतो; आणि प्रवाही बोलीभाषेत बोलणार्‍यांचे भाषण ग्रामीण पार्श्वभूमी असणार्‍या लोकांनाही ‘अर्वाच्य’ वाटायला लागते. खरं तर ज्यांचं भाषण अस्सल बोलीभाषेतील असतं, ते ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात त्यांची बोलीभाषा त्यांच्या तोंडातून तिच्या लकबींसह, हेलांसह येत असते. म्हणून हे खरं वक्तृत्व ठरायला हवं. परंतु आपण तथाकथित वक्त्यांच्या अनुकरणाने मुद्दाम कमावलेल्या कृत्रिम भाषेलाच नावाजत असतो. संस्कृत शब्द वक्त्याने अपरिहार्यस्थानी वापरायला हरकत नाही; पण अशा शब्दांची फोड करून सांगणेही त्यांचे कर्तव्य असते. तसे ते करत नाहीत. कारण सोपी गोष्ट अवघड करून सांगणे, संस्कृत, जड, क्लिष्ट शब्द वापरले म्हणजे भाषणातील शब्दसौंदर्य वाढते अशी चुकीची कल्पना डोक्यात बाळगल्यामुळे वक्ते असं करत असावेत. व्याख्यात्यांमध्ये हे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यांचे संस्कृत वेड वाढत चालल्याचं लक्षात आल्यामुळे हा मुद्दा मांडला आहे.
परिभाषा शब्दकोशातही जाणूनबुजून संस्कृत भाषेला शरण जाऊन बोजड शब्द तयार केलेले असतात. असे शब्द सामान्य माणसांना उच्चारता येत नाहीत. उदाहरणार्थ, काह़ी व्यवसाय, कार्यालयीन व उत्सवाच्या नावाचं देता येईल.
फलोद्यान, फळवाटिका, कुक्कुटपालन, मृद संधारण, केश कर्तनालय, मत्स्यपालन, गणेशोत्सव, शारदोत्सव वगैरेंसाठी अशी बोजड नावे देण्याऐवजी अनुक्रमे फळबाग, फळबगीचा, कोंबडी पालन, जमीन संधारण, केस कापण्याचे दुकान, मासे पालन, गणपती उत्सव, शारदा उत्सव अशी सहजसोपी नावे दिल्याने कोणाचे काय बिघडणार आहे? पण सर्वसामान्यांवर दबाव आणून ते कसे दचकतील, असे भाषेविषयी धोरण अभ्यासकांनी अवलंबिल्यामुळे हे सर्व प्रश्न उपस्थित होतात.
काही दक्षिणात्य भाषा किंबहुना तमिळ भाषा सोडून आपल्याकडील सर्व भारतीय प्रमाणभाषा व बोली या संस्कृतोद्भव भाषा आहेत; हे भाषाशास्त्रातील जुनाट प्रमेयही आज नव्याने तपासून पहायची गरज निर्माण झाली आहे. ‘मराठी भाषेचे मूळ’ या विश्वनाथ खैरे लिखित पुस्तकात ‘मराठीचे मूळ फक्त संस्कृतमध्ये न शोधता तमिळ, तेलुगु, कन्नड आदी भाषातही शोधायला हवे’, असे त्यांचे प्रतिपादन आहे. ‘‘शेती व्यवसायात जे अनेक खास शब्द बोलीभाषेत प्रचलित आहेत, त्यांचा मागोवा घेऊन’ पाहिल्यास तमिळ प्रमाण भाषेतल्या शब्दांशी त्यांची संगती लागते.’’ हे विश्वनाथ खैरे यांचे प्रतिपादन प्रस्तुत अभ्यासकाला महत्त्वाचे वाटते. कोणत्याही भाषेचे मातृत्व संस्कृतपासून सुरू होते, असे विधान करण्यासारखी परिस्थिती नाही. असे काही उपोद्बलक पुरावे प्राप्त होत असले तरी स्पष्ट व ठोस पुरावे नाहीत.
‘उलसा’ या अहिराणी शब्दाचा अर्थ ‘लहान’, ‘छोटा’ असा आहे, तर तमिळ भाषेत याच शब्दाचा अर्थ ‘थोडा’ असा आहे. म्हणजे उच्चाराप्रमाणेच अर्थदृष्ट्यासुद्धा हा शब्द दोन्ही भाषेत खूप जवळचा आहे. चिधी, चिट्य, बिट्य, तमान, अडकित्ता, हाट, हाड्या, हाड, आंड, आंगण, अक्खा, अच्छेर, आघाडा, येरानयेर आदी शब्द अहिराणी भाषेत विपुल प्रमाणात आढळतात. म्हणून अहिराणी ही केवळ मराठीची बोलीभाषा नसून स्वतंत्र अथवा अनेक भाषांचे योगदान घेऊन निर्माण झाली आहे - घडली आहे, असे म्हणावे लागेल.
अमुक भाषा ही अमुक भाषेची बोली आहे, पोटभाषा आहे. किंबहुना अमुक भाषेपासून अमुक भाषेचा जन्म झाला आहे, असे तुटपुंज्या आधारांवर सिद्ध करत बसण्यापेक्षा कोणत्याही भाषेचे मूळ शोधू नये, हेच उत्तम!
(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व महाराष्ट्र शासनाच्या नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार प्राप्त ‘‍अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या माझ्या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

भाषालेख

प्रतिक्रिया

माहितगार's picture

16 Feb 2017 - 4:03 pm | माहितगार

लेख आवडला

sagarpdy's picture

16 Feb 2017 - 5:58 pm | sagarpdy

+१

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Feb 2017 - 5:14 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

गामा पैलवान's picture

16 Feb 2017 - 7:18 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुधीर राजाराम देवरे

लेख वाचनीय आणि चिंतनीय आहे. बोजड संस्कृत शब्द जसेच्या तसे आयात करू नयेत हे ठीक बोललात. मात्र देशी भाषेत जिथे शब्द अडतो तिथे संस्कृतकडे पाहणं अत्यंत नैसर्गिक आहे. याचं कारण म्हणजे संस्कृतमध्ये निरुक्त नावाचं शास्त्र आहे. अपरिचित संकल्पनेस मूर्त संज्ञा कशी योजावी याचं मार्गदर्शन करणारं हे शास्त्र आहे. हीच प्रक्रिया देशी भाषांत राबविणं थोडं खटपटीचं असलं तरी अशक्य नाही. त्यामुळे संस्कृत ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमीच राहणार आहे.

आ.न.,
-गा.पै.

'उलिसा' किंवा 'उलुसा' हा शब्द पश्चिम महाराष्ट्रातही ग्रामीण भागात बऱ्यापैकी प्रचलित आहे अजूनही. त्याचा अर्थही 'थोडा' असा आहे. 'लहान' किंवा 'छोटा' असा नाही. उदा. 'उलुसा भाकरतुकडा' हे बरोबर, पण लहानखुरा घोडा या अर्थाने 'उलुसा घोडा' असे म्हणता येणार नाही.

माहितगार's picture

16 Feb 2017 - 9:53 pm | माहितगार

या वरून 'इवलेसे' हा शब्द आठवला

माहितगार's picture

16 Feb 2017 - 9:54 pm | माहितगार

उलुसे> इउलुसे > इवलेसे ?

पैसा's picture

16 Feb 2017 - 8:26 pm | पैसा

लेख आवडला. विश्वनाथ खैरे यांचं पुस्तक मी वाचलं आहे. पण त्यांच्या म्हणण्याला फार मान्यता मिळाली नाही असं वाटतं.