वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
8 Feb 2017 - 8:51 am

१९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर वर्ल्डकपचे यजमान म्हणून इंग्लंडची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८७ च्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे बहाल करण्यात आलं त्यामागे १९८३ मधल्या भारतीय विजयाचा फार मोठा हातभार होता. या वर्ल्डकपमधला आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या तीनही वर्ल्डकपप्रमाणे एका इनिंग्जच्या ओव्हर्स ६० वरुन ५० वर आल्या. तसंच इनिंग्जच्या मध्ये लंच आणि टी-टाईमला फाटा देण्यात आला.

९ ऑक्टोबर १९८७
चेपॉक, मद्रास

मद्रासच्या चेपॉक मैदानावर (आत्ताचं एम ए चिदंबरम स्टेडीयम) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती. अ‍ॅलन बॉर्डरचा ऑस्ट्रेलियन संघ मद्रासच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या इराद्याने मॅचपूर्वी तब्बल ९ दिवस तिथे मुक्काम ठोकून होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वत: बॉर्डर, डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स असे बॅट्समन होते. बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो क्रेग मॅकडरमॉटवर. त्याच्या जोडीला ब्रूस रीड, सायमन ओडोनेल असे बॉलर्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टीव्ह वॉ सारखा ऑलराऊंडर होता! टॉम मूडीला बॅट्समन म्हणून वन डे मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली होती.

कपिल देवचा भारतीय संघ वर्ल्ड्कप स्वतःकडे राखण्याच्या इराद्यानेच मैदानात या स्पर्धेत उतरला होता. भारतीय संघात गावस्कर, श्रीकांत, दिलिप वेंगसरकर, अझरुद्दीन, रवी शास्त्री असे बॅट्समन होते. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेला कपिलसारखा कॅप्टन होता. कपिलच्या जोडीला १९८३ च्या वर्ल्डकप मधला अनुभवी रॉजर बिन्नी, मनोज प्रभाकर आणि मणिंदरसिंग असे बॉलर्स आणि किरण मोरेसारखा विकेटकीपर होता. टॉम मूडीप्रमाणेच भारतानेही या मॅचमध्ये एका बॅट्समनला वन डे मध्ये पदार्पणाची संधी दिली होती. नवज्योत सिंग सिद्धू!

अवघ्या वर्षाभरापूर्वीच याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली मॅच टाय झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या संघातले बून, मार्श, जोन्स, बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मॅकडरमॉट, ब्रूस रीड आणि भारताचे गावस्कर, श्रीकांत, अझरुद्दीन, शास्त्री, कपिल, मोरे आणि मणिंदरसिंग टाय टेस्टमध्ये खेळलेले होते. टाय टेस्टचा हिरो ग्रेग मॅथ्यूज मात्रं ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्हता. मद्रासच्या कडक उन्हाळ्याची आणि वातावरणाची त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगली कल्पना होती.

डीन जोन्स म्हणतो,
"Having played the tied Test just over a year earlier had helped us to get used to the conditions. We learned how to play in the heat, and we actually had an affection for Madras because of it."

कपिलने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला. कपिल आणि प्रभाकरचे बॉल चांगले स्विंग होत असल्याने बून आणि मार्श यांनी सुरवातीला सावधपणे घेत भारतीय बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण पत्करलं. पण कपिलच्या जागी रॉजर बिन्नी बॉलिंगला आल्यावर मात्रं आक्रमक पवित्रा घेत बून - मार्शने फटकेबाजीला सुरवात केली. या दोघांनी शंभरावर रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर फिल्डींगचा कपिलचा निर्णय भारताच्या अंगाशी येणार अशी चिन्हं दिसत होती. अखेर रवी शास्त्रीला ड्राईव्ह करण्याच्या नादात बून एलबीडब्ल्यू झाला. ६८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह बूनने ४८ रन्स तडकावल्या. ऑस्ट्रेलिया ११० / १!

डीन जोन्सने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. खासकरुन शास्त्री आणि मणिंदरसिंगला फटकावण्याचं त्याने धोरण अवलंबलं होतं. शास्त्रीला त्याने लाँगऑनवर सिक्सही ठोकली. जोन्स - मार्श भारतीय बॉलर्सची धुलाई करत असतानाच...

मणिंदरसिंगचा बॉल जोन्सने क्रीजमधून पुढे येत मिडऑफ बाऊंड्रीच्या दिशेने उचलला..
मिडऑफ बाऊंड्रीवर असलेल्या शास्त्रीने हवेत उडी मारत त्याचा कॅच घेण्याचा प्रयत्नं केला..
बॉलचा टप्पा शास्त्रीच्या मागे पडला..
अंपायर डिकी बर्डला बाऊंड्री किंवा सिक्स याबद्द्ल शंका होती. त्याने शास्त्रीकडे विचारणा केल्यावर शास्त्रीने बाऊंड्री गेल्याची खूण केली!

डीन जोन्सला मात्रं आपला शॉट बाऊंड्रीपार गेल्याची पक्की खात्री होती. तो म्हणतो,
"I went down the pitch and hit Maninder over the straightish mid-off boundary. Ravi leaped but missed, and the ball carried over the rope by at least a metre. Dickie asked Ravi, who signalled it as a four. I had a word with Dickie, and he told me we'd talk about it after the innings."

ऑस्ट्रेलियाचा कोच बॉब सिंप्सन म्हणतो,
"I was very disappointed with Ravi over that. We were not very far from where that ball crossed the boundary. There was no doubt at all that it was a six."

किरण मोरेच्या मते मात्रं जोन्सचा शॉट बाऊंड्रीपार गेला नव्हता. तो म्हणतो,
"Dean liked to step out, and he was a good player of spin. That shot which he stepped out and hit off Maninder was outstanding. But from behind the wicket I was sure it was not a six."

मणिंदरसिंगलाच पुन्हा फटकावण्याच्या नादात लाँगऑफ बाऊंड्रीवर सिद्धूने जोन्सचा कॅच घेतला. ३५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि १ सिक्ससह जोन्सने ३७ रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया १७४ / २!

जोन्स आऊट झाल्यावर आलेल्या अ‍ॅलन बॉर्डरने फटकेबाजीच्या मोहात न पडता मार्शला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचं धोरण पत्करलं. मार्शने आक्रमक पवित्रा घेत शास्त्री - मणिंदरसिंग - बिन्नी यांना फटकावण्यास सुरवात केली. हे दोघं खेळत असतानाच...

शास्त्रीचा बॉल क्रीजमधून पुढे येऊन फटकारण्याचा बॉर्डरचा प्रयत्नं पार फसला...
विकेटकीपर किरण मोरेने बॉल कलेक्ट केला आणि बेल्स उडवल्या...
भारतीय खेळाडूंनी स्टंपिंगसाठी जोरदार अपिल केलं...
स्क्वेअरलेग अंपायर डेव्हीड आर्चरचं बोट वर झालं नाही.

टीव्ही रिप्लेमध्ये बॉर्डरची बॅट क्रीजमध्ये परतण्यापूर्वीच मोरेने बेल्स उडवल्याचं स्पष्टं दिसत असूनही अंपायरच्या कृपेने बॉर्डर वाचला!

मार्श - बॉर्डर यांनी ५४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर बिन्नीला फटकावण्याच्या नादात बॉर्डर बोल्ड झाला. आणखीन ९ रन्सची भर पडल्यावर मनोज प्रभाकरच्या बॉलवर मिडविकेट बाऊंड्रीवर अझरुद्दीनने जेफ मार्शचा कॅच घेतला. १४१ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि बिन्नीला मारलेल्या सिक्ससह मार्शने ११० रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया २३७ / ४!

जेफ मार्श म्हणतो,
"It was important to bat first and create pressure. For that, one of us had to stay there, which I managed to do."

मार्श परतल्यावर प्रभाकरला फटकावण्याच्या नादात कपिलने पहिल्याच वन डे मध्ये खेळणार्‍या टॉम मूडीचा कॅच घेतला. शेवटच्या ओव्हर्समध्ये कपिल आणि प्रभाकरच्या अचूक बॉलिंगमुळे स्टीव्ह वॉ आणि ओडोनेल यांना फारसं काही करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जच्या अखेरच्या बॉलवर वेंगसरकरच्या अचूक थ्रोमुळे दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात ओडोनेल रनआऊट झाला.

५० ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने २६८ रन्सपर्यंत मजल मारली होती.

ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपल्यावर बॉब सिंप्सन आणि मॅनेजर अ‍ॅलन क्रॉम्प्टन याने दोन्ही अंपायर्सची गाठ घेऊन जोन्सने मारलेल्या शॉटबद्दल तक्रार केली. जोन्सचा तो शॉट बाऊंड्री नसून सिक्स असल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला २ रन्स वाढवून देण्याची त्यांनी मागणी केली. दोन्ही अंपायर्सनी कपिलची गाठ घेऊन ऑस्ट्रेलियाची मागणी त्याच्या कानावर घातल्यावर कपिलने उदार मनाने ऑस्ट्रेलियाला २ रन्स बहाल करण्यास होकार दिला!

डीन जोन्सच्या ३७ रन्समध्ये २ रन्सची भर पडून त्याच्या नावावर ३९ रन्स नोंदवल्या गेल्या.
ऑस्ट्रेलियाचा स्कोर २६८ वरुन २७० करण्यात आला!

गावस्कर आणि श्रीकांत यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. श्रीकांतच्या तोडीस तोड फटकेबाजी करत गावस्करने मॅकडरमॉट - रीड यांना बाऊंड्री तडकावल्या. मॅकटरमॉटच्या पहिल्या ४ ओव्हर्समध्ये ३१ रन्स फटकावल्या गेल्यावर बॉर्डरने त्याच्या ऐवजी ओडोनेलला बॉलिंगला आणलं, पण गावस्कर - श्रीकांतला आवरणं त्यालाही जमत नव्हतं. पीटर टेलरच्या ऑफस्पिनवर गावस्करने लाँगऑनला दणदणीत सिक्स ठोकली.

डीन जोन्स म्हणतो,
"It was surprising to see Sunny take the lead, as he was not such a great one-day player. But on that day he set the tempo and got into a mood, and a whole wave of confidence and aggression lifted the Indian team."

अखेर टेलर फटकावण्याच्या नादात लाँगऑफ बाऊंड्रीवर ब्रूस रीडने गावस्करचा कॅच घेतला. ३२ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि टेलरला मारलेल्या सिक्सच्या जोरावर गावस्करने ३७ रन्स फटकावल्या. भारत ६९ / १!

गावस्कर आऊट झाल्यावर श्रीकांत आणि पहिल्याच वन डे मध्ये खेळणारा सिद्धू यांनी ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावण्याचंच धोरण अवलंबलं होतं. स्टीव्ह वॉ - ओडोनेल यांना आरामात फटकावत दोघांनी ६२ रन्स फटकावल्यावर स्टीव्ह वॉचा बॉल अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात श्रीकांत एलबीडब्ल्यू झाला. ८३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह श्रीकांतने ७० रन्स फटकावल्या. भारत १३१ / २!

श्रीकांत परतल्यावर बॅटींगला आलेल्या दिलीप वेंगसरकरने थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला. अर्थात दुसर्‍या बाजूने सिद्धूची फटकेबाजी सुरु असल्याने वेंगसरकरला कोणतीही रिस्क घेण्याची आवश्यकताही नव्हती. टेलर - बॉर्डर या दोघांना मिळून सिद्धूने ५ सिक्स तडकावल्या होत्या! सिद्धूच्या या आतषबाजीमुळे ३५ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २०२ / २! मॅच जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये केवळ ६९ रन्सची आवश्यकता होती.

नेमक्या याच वेळेला बॉर्डरने 'बिली द किड' मॅकडरमॉटला बॉलिंगला आणलं...

मॅकडरमॉटच्या स्लो यॉर्करचा अजिबात अंदाज न आल्याने सिद्धूचा ऑफस्टंप उडाला!
७९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि ५ सिक्स तडकावत सिद्धूने ७३ रन्स फटकावल्या.
भारत २०७ / ३!

डीन जोन्स म्हणतो,
"McDermott was a racehorse - once he got his confidence, he would grow an extra leg and become stronger and bigger and better. That's what happened in that second spell. All of a sudden he started showing his 'gorilla teeth', especially when he got a wicket. And those teeth were starting to show some bite."

सिद्धू आऊट झाल्यावर वेंगसरकर - अझरुद्दीन यांनी २२ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघे आरामात मॅच जिंकणार असं वाटत असतानाच मॅकडरमॉटने इनकटरवर अझरचा मिडलस्टंप उखडला! आणखीन ३ रन्सनंतर मॅकडरमॉटलाच फटकावण्याचा वेंगसरकरचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनला जोन्सने त्याचा कॅच घेतला. ४५ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह वेंगसरकरने २९ रन्स काढल्या. भारत २३२ / ५!

वेंगसरकर परतल्यावर बॅटींगला आलेल्या शास्त्रीने मॅकडरमॉटला मिडविकेटला २ बाऊंड्री मारल्या, पण मॅकडरमॉटच्याच स्लो बॉलवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात शास्त्रीने त्याच्याच हातात कॅच दिला! किरण मोरेने स्टीव्ह वॉला मिडविकेटला बाऊंड्री तडकावली, पण भारताला खरा हादरा बसला तो कपिल आऊट झाल्यावर. ओडोनेलला फ्लिक करण्याच्या नादात मिडविकेटला डेव्हीड बूनने कपिलचा कॅच घेतल्यावर भारताला हादरा बसला. भारत २५६ / ७!

ओडोनेलच्या त्याच ओव्हरचा शेवटचा बॉल बिन्नीने मिडऑनला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
मिडऑनला डीन जोन्सने बॉल पिकअप केला आणि दिसत असलेल्या एकमेव स्टंपचा अचूक वेध घेतला...
बिन्नी रनआऊट झाला!
भारत २५६ / ८!

जेफ मार्श म्हणतो,
"We had put so much emphasis on our fielding. We knew every single run we saved was going to create pressure. It wasn't just the bowling and the batting - our fielding made a difference. Dino hit bull’s eye from side on to run Roger Binny out and India panicked."

बिन्नी आऊट झाल्यावर मोरे आणि मनोज प्रभाकर यांनी ९ रन्स जोडल्या, पण...

४९ व्या ओव्हरचा ओडोनेलचा शेवटचा बॉल प्रभाकरने ड्राईव्ह केला आणि १ रनसाठी तो धावत सुटला...
मोरेने प्रभाकरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला असलेल्या बॉर्डरचा थ्रो अचूक स्टंपवर लागला तेव्हा प्रभाकर अर्ध्या पीचपर्यंतही पोहोचला नव्हता!
भारत २६५ / ९!

किरण मोरे म्हणतो,
"Border used to position himself at short extra-cover and short midwicket. That would always put you in two minds. Prabhakar played a shot to the area where Border was stationed and just took off when there was no run and ran himself out."

शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला मॅच जिंकण्यासाठी ६ रन्सची आवश्यकता होती.
स्टीव्ह वॉसमोर स्ट्राईकवर होता मणिंदरसिंग!

स्टीव्ह वॉचा पहिला बॉल मणिंदरसिंगने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि २ रन्स काढल्या!
दुसरा बॉल मणिंदरसिंगने बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये खेळला आणि पुन्हा २ रन्स काढल्या!

शेवटच्या ४ बॉलमध्ये भारताला जिंकण्यासाठी केवळ २ रन्स बाकी होत्या!

स्टीव्ह वॉच्या तिसर्‍या आणि चौथ्या बॉलवर मणिंदरला काहीच करता आलं नाही...
पाचवा बॉल टाकण्यासाठी रनअप घेताना अडखळल्यामुळे स्टीव्ह वॉ परत आपल्या मार्कवर गेला..

प्रेक्षकांच्याच काय, खेळाडूंच्या नजरेसमोरही वर्षाभरापूर्वी अशाच परिस्थितीत टाय झालेल्या टेस्टच्या स्मृती रेंगाळत होत्या!

डीन जोन्स म्हणतो,
"We started to think, 'God, we might have a tie here again.' It was a feeling of 'been there, done that'. We had bowled last in that game, and we didn't panic here in a similar situation. When Maninder took guard against Waugh with two runs to win, all I was thinking was, 'Hit the ball in the air to me.'!"

स्टीव्ह वॉचा पाचवा बॉल...
लेगला बॉल मारण्याच्या हेतूने मणिंदरसिंगने बॅट फिरवली पण...
बॅट आणि बॉलची गाठ पडलीच नाही...
मणिंदरसिंगचा ऑफस्टंप उडाला!

भारत २६९ ऑल आऊट!
अवघ्या १ रननी ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली!

किरण मोरे म्हणतो,
"I knew it was over. It was a disappointing finish, just like the tied Test."

बॉब सिंप्सन म्हणतो,
"In the end the six did make the difference. It may have seemed like good fortune for us, but it was right."

ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपल्यावर त्यांना वाढवून दिलेल्या त्या २ रन्सच अखेर निर्णायक ठरल्या होत्या!
कपिलच्या औदार्याचा भारताला असा फटका बसला होता!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

8 Feb 2017 - 9:53 am | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणे मस्तच लेख. हा सामना मला बर्‍यापैकी आठवतो असा माझा दावा असायचा.पण मला या लेखात लिहिले आहे त्याच्या १% ही लिहिणे जमले नसते त्यामुळे माझ्या दाव्याचा फेरविचार करायची वेळ आली आहे :)

१९८७ च्या रिलायन्स कपच्या वेळी मी ३ रीमध्ये होतो. ९ ऑक्टोबरच्या सामन्याच्या दिवशी सहामाही परीक्षेचा कुठचा तरी पेपर होता. परीक्षेचे पेपर नेमके अशा मॅचच्या दिवशी का ठेवतात असेही मला वाटले होते :) पेपर दुपारी अडीचला होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पूर्ण इनिंग बघून भारताच्या इनिंगमध्ये गावसकर आऊट झाल्यावर श्रीकांत-सिध्दूची पार्टनरशीप सुरू झाली आणि मी परीक्षेला गेलो होतो हे पण आठवते. त्या काळी परीक्षा असो की काही असो मॅच माझ्यासाठी जास्त महत्वाची असायची :) माझ्या एका मित्राने परीक्षेची तयारी करायची म्हणून ऑस्ट्रेलियाची इनिंग अजिबात बघितली नव्हती. पेपर सुरू व्हायच्या आधी त्याला ऑस्ट्रेलियाने २७० रन्स केल्या आहेत आणि गावसकर आऊट झाला आहे हे पण सांगितल्याचे लक्षात आहे :)

पेपरहून परत आलो त्यावेळी शेवटची दोनेक षटके बाकी होती. स्टीव वॉ चे शेवटचे षटक, त्यात मणिंदरची विकेट घ्यायच्या बॉलवर रन-अप घेताना तो अडखळला होता आणि त्याला परत रन-अप घ्यायला सुरवात करावी लागली होती तसेच मणिंदरचा त्याने उडविलेला त्रिफळा आणि त्याचबरोबर डीन जोन्सचा तो चौकार आहे ही रवी शास्त्रीने सीमारेषेवरून केलेली खूण या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत.

मला क्रिकेट समजायला लागल्यापासून शारजामध्ये जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर सिक्स मारली आणि पाकिस्तानला सामना जिंकून दिला तो पहिला एकदिवसीय चुरशीचा सामना आणि रिलायन्स कपमधील भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया हा दुसरा!! त्यामुळे हा सामना विशेष आठवणीत आहे.

या लेखमालेतले पूर्वीचे लेख १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकांमधले होते. माझा जन्मही त्यावेळी झाला नव्हता त्यामुळे अर्थातच हे सामने परिचयाचे नव्हते आणि त्यामुळे तितके 'रिलेटेबल' नव्हते. १९८३ च्या विश्वचषकाच्या वेळी मी खूपच लहान होतो त्यामुळे घरच्यांनी ते सामने बघितले असले तरी त्या सामन्यांची आठवण नाही. त्यामुळे त्या उत्तम लेखांवर काहीच प्रतिसाद लिहिले नव्हते. पण १९८७ ते २००३ हे सगळे विश्वचषक अगदी भक्तीभावाने बघितले होते. या विश्वचषकांमधील इतर सामने अविस्मरणीय आहेत. त्या सामन्यांविषयी लिहिता आले तर खूपच चांगले होईल. अर्थात माझ्यासारख्याने अशी काही अपेक्षा करणे म्हणजे 'उंटावरून शेळ्या हाकायचे' उत्तम उदाहरण झाले पण आपल्या मिपावर चांगल्या सामन्यांचा एक कोषच होईल.

१९८७
१. न्यू झीलंड विरूध्द झिम्बाब्वे मधील हैद्राबादचा सामना. या सामन्यात डेव्ह हॉटनने १३९ रन्स करून न्यू झीलंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटी मार्टिन क्रोने हॉटनचा एक अफलातून कॅच घेतला आणि तो सामना न्यू झीलंडने अवघ्या ३ धावांनी जिंकला. नाहीतर त्या सामन्यात न्यू झीलंडचा पराभव निश्चित होता.

२. पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिजमधील लाहोरमधील सामना. हा सामना शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानने जिंकला होता आणि तो पण कोर्टनी वॉल्शच्या खिलाडू वृत्तीमुळे. त्याला सलीम जाफरला 'मंकडेड' पध्दतीने धावबाद करायची संधी होती पण तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. याच सामन्यात आयत्या वेळी अब्दुल कादिरने सिक्स मारून हातातून निसटत चाललेला सामना पाकिस्तानच्या नियंत्रणात आणला.

३. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील बंगलोरमधील सामना. या सामन्यात भारताचा डाव बर्‍यापैकी चाचपडत चालला होता. पण कपिल देव आणि किरण मोरेने शेवटच्या ८ ओव्हरमध्ये ८२ धावा कुटल्या आणि त्यामुळे हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला.

४. भारत विरूध्द न्यू झीलंडमधील नागपूर येथील सामना. याच सामन्यात चेतन शर्माने हॅट-ट्रिक घेतली होती आणि सुनील गावसकरने वन-डे मधील एकमेव सेंच्युरी मारली.

१९९२
१. भारत विरूध्द ऑस्ट्रेलियामधील ब्रिस्बेनमधील सामना. हा सामना शेवटच्या बॉलवर भारताने एका धावेने गमावला होता.
२. भारत विरूध्द पाकिस्तानमधील सिडनीमधील सामना. हा सामना भारताने जिंकला होता. याच सामन्यात जावेद मियांदाद आणि किरण मोरेमध्ये थोडी चकमक उडली होती आणि मग जावेदने भर स्टेडिअममध्ये उड्या मारून किरण मोरेची नक्कल केली होती. या सामन्यात आमीर सोहेल खूपच चांगला खेळत होता. पण आयत्या वेळी सचिनच्या बॉलिंगवर श्रीकांतने त्याचा कॅच पकडला आणि मॅच आपल्या नियंत्रणात आली.
३. पाकिस्तान विरूध्द न्यू झीलंड हा ऑकलंडमधील उपांत्य फेरीचा पहिला सामना. या सामन्यात इंझमाम उल हकने ३७ बॉलमध्ये ६० रन्स तडकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तोपर्यंत पाकिस्तान हा सामना जिंकू शकेल असे वाटले नव्हते. पण इंझमाम न्यू झीलंडच्या बॉलर्सवर तुटून पडल्यावर न्यू झीलंडने पराभव मान्य केल्याप्रमाणेच खेळायला सुरवात केली आणि 'गिव्ह अप' केले.
४.दक्षिण आफ्रिका विरूध्द इंग्लंड हा सिडनीमधील उपांत्य फेरीचा सामना. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पावसासंदर्भाच्या विचित्र नियमामुळे पराभव झाला होता.
५. पाकिस्तान विरूध्द इंग्लंड हा मेलबर्नमधील अंतिम फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला इम्रान खान आणि जावेद मियांदादने पाकिस्तानला बर्‍यापैकी धावसंख्या उभी करून दिली होती. तसेच इंग्लंडच्या डावात अ‍ॅलेक स्टुअर्टला चुकीचे आऊट दिले गेले होते. त्यानंतर अ‍ॅलन लॅम्बने डाव सावरायचा प्रयत्न केला. पण वसिम अक्रमने अ‍ॅलन लॅम्ब आणि क्रिस लुईस या दोघांचा लागोपाठच्या बॉल्सवर त्रिफळा उडवला आणि इंग्लंडला फार डोके वर काढू दिले नाही.

१९९६
१. भारत विरूध्द श्रीलंका हा दिल्लीमधील साखळी सामना. या सामन्यात सनथ जयसूर्या म्हणजे नक्की काय चीज आहे हे भारताला समजले. जयसूर्याने या सामन्यात मनोज प्रभाकरची जी धुलाई केली होती ती केवळ अफलातून होती. त्या हार्ड विकेटवर चार-चार फास्ट बॉलर्स घेतले गेले होते आणि अनिल कुंबळे हा एकटा स्पिनर होता. त्यानंतर बिचार्‍या मनोज प्रभाकरला शेवटी ऑफस्पिन गोलंदाजी करावी लागली होती. तो मनोज प्रभाकरचा शेवटचाच सामना ठरला.

२. केनया विरूध्द वेस्ट इंडिज हा साखळीतला पुण्यातला सामना. या सामन्यात दुबळ्या केनयाने चक्क वेस्ट इंडिजला ७३ धावांनी धूळ चारली होती.

३. भारत विरूध्द पाकिस्तान हा बंगलोरमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना. या सामन्यात सुरवातीला सिध्दूची चांगली खेळी आणि नंतर अजय जाडेजाने वकार युनूसची केलेली धुलाई यामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली. पुढे नवज्योत सिध्दू आणि आमीर सोहेलने अस्सल पंजाबीत एकमेकांना शिव्या हासडल्या होत्या. त्याच्याच पुढच्याच बॉलवर वेंकटेश प्रसादने त्याला बाद केले. शेवटी आयत्या वेळी रशीद लतीफची बॅट तळपली आणि सामना आपल्या हातातून जातो की काय असे वाटायला लागले. पण सुदैवाने तसे काही झाले नाही.

४. ऑस्ट्रेलिया विरूध्द वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीचा मोहालीमधील सामना. हा सामना जिंकायची आशाच ऑस्ट्रेलियाने सोडली होती पण आयत्या वेळी शेन वॉर्नची जादू चालली आणि ऑस्ट्रेलियाने धक्कादायक विजय मिळवला.

१९९९
१. यातील माझ्या आठवणीतला एकमेव सामना म्हणजे एजबॅस्टनमधील ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका हा टाय झालेला सामना. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये दोन फोर मारून लान्स क्रूसनरने सामना जवळपास जिंकत आणला होता.पण नंतर गरज नसताना अ‍ॅलन डॉनल्ड धावायला निघाला आणि रन-आऊट झाला.

२००३
१. अर्थातच जोहान्सबर्गमधील भारत विरूध्द पाकिस्तान हा सामना. या सामन्यात सचिनने शोएब अख्तरची मस्त धुलाई केली होती.

२००७ मध्ये भारत पहिल्या फेरीतच गारद झाला त्यानंतर वर्ल्डकपमधील इंटरेस्ट गेला. २०११ पर्यंत क्रिकेटमध्ये तितका इंटरेस्ट राहिला नव्हता. आणि २०१५ मध्ये तर वर्ल्डकपमधील एकही सामना बघितला नव्हता. त्यामुळे त्याविषयी काहीही माहित नाही :(

असो. मान्य आहे की हा प्रकार उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा आहे आणि स्पार्टाकस लिहित आहेत त्याच्या १% ही लिहिणे मला जमत नाही. पण या सामन्यांविषयी स्पार्टाकस यांच्या सिध्दहस्त लेखणीतून कधीतरी वाचायला मिळाले तर तो मिपावरील एक मोठा ठेवा होईल हे नक्की.