जोवर ना ती तेज दुधारी
कट्यार दु:ख्खाची मज चिरते
तोवर माझे शोकगीतही
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना ती रिमझिमणारी
श्रावण सर मज चिंब भिजविते
तोवर माझे पाऊसगाणे
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
जोवर ना मज दुमदुमणारी
हाक अनाहत ऐकू येते
तोवर रचिले सूक्त जरी मी
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
प्रतिभेचे लखलखते लेणे
जोवर या झोळीत न येते
तोवर स्फुरला मंत्र जरी मज
शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
प्रतिक्रिया
7 Feb 2017 - 11:10 pm | Snow White
छान कविता...
8 Feb 2017 - 8:55 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद, स्नो-व्हाइट!