काटा वजनाचा --७

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
30 Jan 2017 - 6:53 pm
गाभा: 

काटा वजनाचा --७
स्त्रियांच्या बाबतीत वजन फार पटकन वाढते असा अनुभव आहे. यात आयुष्याचे तीन कालखंड फार महत्त्वाचे आहेत.
१) पौगंडावस्था
२) गरोदरपण
३) रजोनिवृत्ती
पौगंडावस्थेत म्हणजेच वयात येण्याच्या आसपास आपल्या मुलीचे वजन फार पटकन वाढले असा बऱ्याच स्त्रियांचा अनुभव आहे. याचे कारण काय?
एक तर इतर सर्वाना आहे तशीच सुग्रास अन्नाची मुबलक उपलब्धता हे कारण आहेच. शिवाय या काळात मुलींचा शारीरिक व्यायाम कमी होतो. सामाजिक रचना अशी आहे कि वयात येताना मुलींनी मैदानी खेळ खेळू नयेत असेच बरेच आई बाप सुचवतात.त्यातून शहरे आणि निमशहरी भागात मैदाने नष्ट होत चालली असल्याने आणिअसलेल्या मोकळ्या जगात वाहने पार्क केली असल्याने खेळ कुठे खेळायचे हा प्रश्नहि उग्र स्वरूप धारण करीत आहे.
"मुलांबरोबर खेळणे या वयात शोभत नाही" , "मुलीच्या जातीला हे बरं दिसत नाही" अशी वाक्ये सहज कानावर पडतात.त्यातून हा काळ(आठवी ते दहावी) करियर च्या दृष्टीने महत्त्वाचा असतो यामुळे शाळा, क्लास आणि त्याचा अभ्यास यात मुलींचा खूप वेळ जातो( मुलांची परिस्थिती या काळात फार वेगळी नाही). पण साधारण पाचवी ते सातवी याकाळात मुलींची उंची वाढून जाते पण मुलांची उंची त्यामानाने उशिरा वाढत असल्याने(आठवी ते बारावी) मुलांमध्ये वाढलेले वजन वाढणाऱ्या उंचीमध्ये सामावून घेतले जाते.
यात आजकाल भ्रमणध्वनीची भर पडली आहे. म्हणजे पूर्वी दोन मजले चढून मैत्रिणीला बोलवायच्या ऐवजी सरळ फोन करतात किंवा मिस्ड कॉल दिला जातो. अशा मुळे शारीरिक हालचाल कमी होत जाते.
त्यातून शरीरात होणाऱ्या संप्रेरकातील बदल यामुळे मुलींच्या मांड्यावर चरबी चढू लागते. हल्ली त्यातून संतृप्त असे खाणे हे कूल समजले जाते. यात पिझा, पास्ता, केक, पेस्ट्री, मॅगी नुडल्स असे अति प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. बाहेर खाणे हा शिष्टाचार झाला आहे. निम्न वर्गात सुद्धा मुली वडापाव भजीपाव सारखे पदार्थ खाऊन लठ्ठ होताना आढळतात.
आयांनी आरडाओरडा केला तर त्या जुनाट बुरसटलेल्या विचारांच्या आहेत असे समजून नाक मुरडले जाते. स्वतःचा निवड करण्याचा हक्क हा अशा खाण्यामधून प्रस्थापित करण्याचा अंतर्मनाचा खेळही चालू असतो. आई बापानी सांगितलेल्या गोष्टी नाकारणे हा म्हणजे बंडखोरी करणे आणि अशी बंडखोरी म्हणजे तारुण्यातील मूलभूत हक्क या विचाराने मुली चालत असल्याने भाजीभाकरी/ फळे खा, दूध प्या हे सांगणे त्यांच्या पचनी पडत नसते.
त्यातून जर आईबाप हडेलहप्पी करणारे असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध खाणे /वागणे म्हणजे जाचातून सुटका असा गंड करून घेतला जातो.
मुलींच्या शरीरात होणारे बदल, त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण आणि त्याबद्दलची भीती अशा गोष्टींचा परिपाक त्यांच्या मनावर सारखा होत असतो. त्यातून दूरदर्शन सिनेमा सारख्या माध्यमातून होणारे पाश्चात्य संस्कार यातून आपण असे कपडे घातले, , असे खाणे खाल्ले तर आपण आधुनिक दिसू आणि असे नाही केले तर मागासलेल्या म्हणून शिक्का बसेल या न्यूनगंडातून वर्तणुकीत बदल होतो.
उदाहरणार्थ-- बाहेर गेले असताना फळाचा रस पिण्याऐवजी कोका कोला किंवा शीतपेये पिणे हे "इन" समजले जाते.
अशा स्थितीतून मुलींचे कुपोषण होत असते म्हणजे पालेभाज्यातील लोह मिळत नाही. काळ्या होऊ म्हणून उन्हात जाणे टाळले जाते शिवाय दूध फळे सारख्या पोषक आहाराऐवजी प्रक्रियायुक्त आहार घेतल्याने वजन फक्त वाढते पण अ , ड , इ सारख्या जीवनसत्त्वाची आणि लोह कॅल्शियम सारख्या द्रव्यांची कमतरता होते.

आई वडिलांनी आपल्या मुलीला वाढत्या वजनाचे दुष्परिणाम काय आहेत हे तिला समजेल अशा तर्हेने आणि तिच्या कलाने घेऊन समजावले पाहिजे म्हणजे पुढे होणाऱ्या अनेक शारीरिक व्याधी आजारापासून आणि न्यूनगंडातून मुक्तता मिळू शकेल. "मी जशी आहे तशी आहे". मग जग काय म्हणेल याची मला पर्वा नाही असे वारंवार अनेक मुली म्हणत असल्या किंवा असे म्हणणे म्हणजे आपण मुक्त झालो असे (गैर) समज करून घेत असल्या तरीही लठ्ठ मुलींमध्ये बहुतांशी न्यूनगंडाने पछाडलेल्या आढळतात. हा नियम केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही लागू होतो.

याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे स्त्रिया रजोनिवृत्ती कडे झुकतात तेंव्हा हि त्यांना आपले वजन फारच पटकन वाढते/ वाढले आहे असे जाणवते. साधारण चाळिशी पंचेचाळीशी नंतर स्त्रियांची मुले मोठी होतात त्यामुळे त्यांना आपल्या आईची गरज तेवढी भासेनाशी होते. त्यामुळे स्त्रियांना एक तर्हेचा शारीरिक आराम मिळू शकतो परंतु मुलांची काळजी तितकीच असल्यामुळे चिंता हि असतेच. वय वाढत असल्याने शरीर थोडे आळशी होते त्यातून इतकी वर्षे "केलं" हा विचार आरामाला प्रोत्साहन देत असतो. अशा परिस्थितीत असताना पाळी अनियमित होऊ लागते. मग याची चर्चा त्या आपल्या मैत्रिणींमध्ये करू लागतात. मैत्रिणी साधारण त्याच वयाच्या असल्यामुळे त्यांचे प्रश्न तेच असतात. पाळी जायची वेळ आली यामुळे स्त्रिया आतून खिन्न असतात. आपले तारुण्य आता राहणार नाही, आता आपण नवऱ्याला तेवढ्या आकर्षक दिसणार नाही हा विचार आतून पोखरत असतो. यावेळेस नवरा आपल्या करियरमध्ये चढ्या कमानीने वर जात असतो त्यामुळे बायकोची अशी परिस्थिती त्याच्या खिजगणतीत नसते. या सर्व परिस्थितीमुळे नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून स्त्रिया चिडचिड्याही होतात. हि चिडचिड मुलांवर काढली तर ती आपल्याच विश्वात मश्गुल असतात. अशा परिस्थितीत स्त्रिया सांत्वन म्हणून आधार शोधत असतात.आर्थिक परिस्थिती स्थिर असते मग सुग्रास अन्न समोर आले कि जरा "चार घास" जास्त खाल्ले जातात. आता मुलांचा मागे धावपळ करायची गरज नसल्याने थोडा आराम मिळू लागतो. म्हणजे मुलगी असेल तर बारीक सारीक घरातील कामे आणि मुलगा असेल तर येतायेता बाहेरची काही कामे सांगता येतात. हे सर्व छोटे छोटे घटक आपल्या वजनास हातभार लावीत असतात.
रजोनिवृत्ती झालेल्या बायका सांगतात कि डॉक्टर आम्ही काहीच जास्त खात नाही. हि वस्तुस्थिती असते मग असे का होते
जसे जसे दिवस जातात आणि पाळी अधिकच अनियमित होऊन शेवटी थांबते. पाळी थांबण्याचे कारण म्हणजे बीजांडकोशात स्त्रीबीज निर्मिती थांबते त्यामुळे तेथे तयार होणारी स्त्रियांची संप्रेरके पण बंद होतात. यामुळे शरीराला स्फुरण देणारी शक्ती कमी झाल्यासारखी होते. निरुत्साह वाटतो. सर्व गोष्टी संथ गतीने होतात. याबरोबरच आपली आतडी सुद्धा संथ होतात. यामुळे पूर्वी जर ४०० ग्रॅम अन्न खाल्ले असता त्यातील २०० ग्रॅम शरीरात शोषले जात असे आणि २०० ग्रॅम हे शौचाच्या वाटेने बाहेर टाकले जात असे. आता अन्न जास्त वेळ पोटात राहिल्यामुळे त्यातील जास्त अन्न शोषले जाते. हे जरी १० % अतिरिक्त गृहीत धरले तरीही रोज ४० ग्रॅम या दराने महिन्याला १ किलोने वजन वाढते. असे साधारण वर्षभरात ८-१० किलो वजन सहज वाढते. उरलेले १६० ग्रॅम अन्न पण पटकन "खाली" जात नसल्यामुळे जास्त वेळात आतड्यात राहून त्यावर जिवाणूंची प्रक्रिया होते आणि पोटात "वात" होतो आणि पोट फुगल्यासारखे वाटते. अन्न खाली जात नसल्यामुळे थोडे जास्त खाल्ले तरी आम्लपित्त(acidity) होते आणि जेवण वर येऊ लागते आणि छातीत जळजळ होते.
त्यातून जरा स्वास्थ्य आले असते आर्थिक परिस्थिती सुसह्य असते म्हणून लोक पर्यटन करतात. केसरी/ वीणा वर्ल्ड सारख्या संस्थाबरोबर पर्यटनाला गेलेल्या लोकांचे आठवड्या दहा दिवसात ३-४ किलोने सहज वजन वाढते. कारण सुग्रास अन्न चारी ठाव समोर असते. पैसे अगोदरच भरलेले असतात. मन घरच्या चिंतांपासून दूर असते बाहेरचे वातावरण उत्साही असते आणि बरोबर मित्र सवंगडी असतात त्यामुळे चार घास जास्तच खाल्ले जातात.
हे वाढणारे वजन/ चरबी स्त्रियांच्या नितंबावर कमरेवर आणि स्तनावर चढलेले दिसते.
याला उपाय काय? बाहेरून संप्रेरके देणे हा उपाय फार तर तात्पुरता आहे आणि तो सुद्धा शक्यतो केला जात नाही कारण अशा संप्रेरकांमुळे गर्भाशय आणि बीजांडकोषाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
मग आपल्या शरीराला आणि आतड्याना चेतवण्यासाठी स्त्रियांनी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. स्वतःसाठी रोज कमीत कमी अर्धा तास वेळ काढून त्या वेळात "भरभर" चालणे आवश्यक आहे. हे भरभर चालणे जास्त आवश्यक आहे अन्यथा वर्षानुवर्षे बायका "चालत" असतात पण वजन काही कमी होत नाही.
स्त्रियांची जोवर पाळी चालू आहे तोवर स्त्री संप्रेरकांमुळे हृदय विकार आणि पक्षाघात हे आजार खूप कमी प्रमाणात होतात. त्यामुळे ४०-५० या वयात पुरुषांच्या मानाने स्त्रियांना हे आजार सहसा होत नाहीत. पण एकदा पाळी थांबली कि हे कवच काढून घेतले जाते आणि ५० नंतर या आजारांचे प्रमाण पुरुषांच्या इतकेच होऊ लागते. वर सांगितलेला व्यायाम हा केवळ आपले शरीरात चैतन्य वाढवतो असे नाही तर या आजाराना प्रतिबंध करण्यास मदत करतो.
"गरोदरपण आणि वजन" हे पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

30 Jan 2017 - 7:53 pm | साधा मुलगा

वाचनीय आणि माहितीपूर्ण !
आधीचे भाग वाचले नव्हते , आता वाचतो.

उपयुक्त माहिती. पुभाप्र.

वेल्लाभट's picture

31 Jan 2017 - 4:02 pm | वेल्लाभट

"मी जशी आहे तशी आहे". मग जग काय म्हणेल याची मला पर्वा नाही असे वारंवार अनेक मुली म्हणत असल्या किंवा असे म्हणणे म्हणजे आपण मुक्त झालो असे (गैर) समज करून घेत असल्या तरीही लठ्ठ मुलींमध्ये बहुतांशी न्यूनगंडाने पछाडलेल्या आढळतात. हा नियम केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही लागू होतो.

फुल सहमत. निव्वळ स्वतःची फसवणूक असते ही. आणि मग ती एक दिवस 'अंगाशी' यायला चुकत नाहीच.

बाकी हा भाग वैज्ञानिक कमी आणि सामाजिक जास्त वाटला. पण उत्तमच, नेहमीप्रमाणे.

सिरुसेरि's picture

31 Jan 2017 - 3:51 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 9:07 am | पिलीयन रायडर

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख. काही प्रश्न

१. ट्रेडमिलवर चालणे भराभरा चालणे कॅटेगरीत येतं का? असं किती वेळ सलग चालायला हवं?

२. दिवसातुन एकदा थोडासा भात (वरणासोबत) खाल्ला, तर कितपत गिल्ट वाटुन घ्यावी? भात सोडण्याचा अगणितवेळा प्रयत्न केलाय. ते काही शक्य नाही. बाकी गोड बिड आवडत नाही. कित्येकदा तर दिवसेंदिवस साखरही पोटात जात नाही. (चहा पित नाही म्हणुन. आणि दुधात साखर घेत नाही) मग त्या ऐवजी थोडा भात खाल्ला तर चालेल का? किंवा (ह्याच चालीवर) ब्रेड खाल्ला तर चालतं का?

सुबोध खरे's picture

2 Feb 2017 - 9:47 am | सुबोध खरे

पिरा ताई
१ कॅलरी हि १ कॅलरी असते मग ती साखरेतून येवो कि पिठातून. अजिबात साखर ना खाता बटाटा/रताळं खाल्लं तरीही तेवढ्याच कॅलरी मिळतात.
एकंदर किती कॅलरी दिवसात पोटात जातात आणि किती कॅलरीचा व्यय होतो यातील फरका प्रमाणे आपले वजन वाढते कि कमी होते असा साधा हिशेब आहे.
रोज ४५ मिनिटे भरभर चालणे हा उत्तम व्यायाम आहे. मग तो ट्रेडमिलवर करा कि बाहेर मैदानात करा.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 7:51 pm | पिलीयन रायडर

म्हणजे मी जर कॅलरी हिशोब बसवत असेन तर भात खायला हरकत नाही थोडासा. गुड! कॅलरीजचा हिशोब मात्र एवढा सोप्पा नाही. कशात किती कॅलरीज हे मला कळत नाही. पण सर्व साधारण पोळी-भाजी-वरण-भात चांगला. त्यातही भाजी-वरण जास्त. तळलेलं कधी तरीच खावं.असा हिशोब मी करतेय.
खाण्याचं तरी ठिके. जिममध्ये मात्र १०० कॅलरीज जाळायलाही फार जीव निघतो.

डॉक तुमचे लेख परत वाचायला हवेत. तुम्ही पुर्वी बरेच मुद्दे मस्त सांगितले होते. ते सगळे विसरले गेलेत.
तुमचे लेख वाचुन वाटतंय की मोदकाने ७ दिवस पळण्याचे जे चॅलेंज टाकलंय, तसं ७ दिवस डाएट चॅलेंज सुद्धा करायला हवं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Feb 2017 - 7:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या थंडीचे दिवस आहेत. स्त्रीवादी-बंडखोरी कर, रीतभात टाकणारे कपडे घाल. थंडी वाजली की जास्त उष्मांक जळतात. एखादं फिटनेस गॅजेट - फिटबिट किंवा गार्मिन - आणून मोजून पाहा.

(अजूनही अमेरिकेत असलीस तर घराचं तापमान ६८-७० अं. फॅ.च्या वर ठेवू नकोस आणि आरामदायी वाटेल त्यापेक्षा किंचित कमी कपडे घाल. फार थंडी वाजायला लागली की उठून जागच्या जागी जॉगिंग किंवा स्क्वॉट्स किंवा तत्सम काही व्यायाम. या प्रकाराची वजन कमी व्हायला खूप मदत होते. स्वानुभव. शिवाय पैसेही वाचतात. ;-) )

खाताना शब्दशः मोजून, वजन करून खा. किती ग्रॅम भात खाल्ला वगैरे. उष्मांकांचा हिशोब करायला अॅप्स आणि तक्ते सहज मिळतात.

अजया's picture

2 Feb 2017 - 9:27 am | अजया

वाचतेय. पुभाप्र.

मनिमौ's picture

2 Feb 2017 - 10:44 am | मनिमौ

पुभाप्र

पैसा's picture

3 Feb 2017 - 10:21 am | पैसा

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

फेदरवेट साहेब's picture

3 Feb 2017 - 10:59 am | फेदरवेट साहेब

मला एक शंका होती.

मागे एक लेख वाचला होता. एका पाश्चात्य डायटीशियन बाईंनी तो लिहिला होता. त्यात 'मोनोफ्रुट डायट' नामक एक प्रकार वर्णन केला होता. म्हणजे ती बाई ७ दिवस फक्त केळं हे एकच फळ खाऊन राहिली होती. त्यानंतर म्हणे तिची पचनव्यवस्था, त्वचा उत्तम झाली असून तिला खूप फ्रेश वाटू लागले होते. कारण तिचे डिटॉक्स झाले होते, सादर डायट मध्ये पाणी सुद्धा भरपूर पिणे बंधनकारक असते.

हे मोनोफ्रुट डायट म्हणजे नक्की काय असते? ते शास्त्रीय असते का? की हे सगळे अशास्त्रीय टाळ्याखाऊ क्रॅश डायट सारखे प्रकरण असते?

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 8:13 pm | सुबोध खरे

http://www.indiatimes.com/health/healthyliving/a-woman-ate-only-bananas-...
तुमची ऊर्जेची गरज जर २००० कॅलरी असेल तर तुम्ही २० केळी दिवसात खाल्ली ( एक केळं = १०० कॅलरी) तर तुमची ऊर्जेची गरज पूर्ण होईल परंतु शरीराला फक्त उर्जेचीच गरज असते असे नव्हे तर शरीराची सतत होणारी झीज भरून काढण्यासाठी इतर अनेक अन्न घटकांची गरज असते.
केवळ केळं हाच आहार घेत राहिले तर काय होईल तुमच्या शरीरातील चरबी कमी होईल परंतु शरीराला लागणारे लोह, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे हे शरीराने साठवून ठेवलेल्या राखीव साठ्यातून वापरले जातील आणि कालांतराने यांची कमतरता झाल्याने होणारे रोग उदा. हाडे ठिसूळ होणे( कॅल्शियम कमतरता) ऍनिमिया ( लोहाची कमतरता) इ होऊ लागतील. आपल्या आहारातून स्नायूंना ( यात हृदयाचे स्नायू हि येतात) कॅल्शियम कमी मिळाले तर शरीर लागणारे कॅल्शियम हाडातून काढून घेतं.
या सर्व गोष्टींना फॅड डाएट म्हटले जाते. या फॅडमुळे माणूस आपल्या "मनाचे समाधान चांगले करू शकतो". त्यामुळे उत्साहित वाटतं इ इ. शेवटी मनाला समजवण्यासाठी माणसे किती युक्त्या प्रयुक्त्या करीत असतात.
म्हणजे काही माणसे मन रिचार्ज करायला मधून मधून सत्संग करतात तसे.
पण एखादि गोष्ट फॅड किंवा फॅशन म्हणून स्वीकारली कि त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केलं जातं.
१९७०-८० या दशकात एलिफन्ट बॉटम पँट्स फॅशन म्हणून आल्या होत्या. त्यामुळे रास्ता झाडला जात असे.
राहिली गोष्ट डिटॉक्स या फॅडची-- मुळात तुम्ही "टॉक्स" होताच कशाला हा एक प्रश्न आहे. काही लोक पनीर बटर मसाला, बटर चिकन होतो आणि कॅलरी जास्त झाल्या म्हणून डाएट कोक पितात तसा हा प्रकार आहे.
आमचा एक वर्ग मित्र आमच्या शेजारी एक जुन्या आयुर्वेदाचार्य आहेत त्यांच्या कडे पंचकर्म करायला आला होता. का आलास बाबा म्हणून विचारले तर तो म्हणाला कि वर्षभर कुकर्म केले ते आता स्वच्छ करायचे आहे. तोंडात गुटखा होताच.कधी कधी (आठवड्यात तीनदा) भरपूर दारू पितोच. त्याबरोबर सामिष जेवण हवेच. चांगला वजनदारही आहे (९५ किलो) मी त्याला म्हणालो हे सर्व करत असशील तर पंचकर्म काय उपयोगी होणार?
डिटॉक्स साठी साधा स्वस्त सुंदर आणि टिकाऊ उपाय म्हणजे रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी दात घासल्यावर एक लिटर कोमट पाणी त्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा चांगल्या दर्जाचा मध घालून घ्या आणि अर्ध्या तासाने मग तुमची न्याहारी करा. उरलेल्या दिवसात अजून २ लिटर पाणी प्या. एवढे केलेत तरी तुमची मूत्रपिंडे (किडन्या) आणि यकृत (लिव्हर) कृतकृत्य होतील. हे दोन्ही अवयव चांगले चालत असतील तर वर दिलेल्या शिवाय अजून कुठल्याही डिटॉक्सची गरज नाही.
अर्थात सकाळी डिटॉक्स करायचे आणि मग दिवसभर अरबट चरबट खायचं म्हणजे एक पाय ऍक्सिलरेटर वर आणि दुसरा ब्रेक वर ठेवून गाडी चालवल्यासारखी आहे.
पाल्हाळ फार झाले.

पिलीयन रायडर's picture

3 Feb 2017 - 8:29 pm | पिलीयन रायडर

१ लिटर पाणी नाही हो जात डॉक. एक ग्लास पाणी सुद्धा खुप होतं. :(

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 8:35 pm | सुबोध खरे

हळू हळू सवय करा. जेवढे जमेल तेवढे. आणि दिवसभरातहि जेवढे जमेल तेवढे जास्त पाणी प्या. आपोआप डिटॉक्स होईल.
साधा स्वस्त सुंदर आणि टिकाऊ उपाय आहे. जेवढ्या जास्त पाण्यात कपडे धुवाल किंवा भांडी धुवाल तेवढे स्वच्छ होतात.
नाही तर भेळवाला भय्या सुद्धा "प्लेट" बादलीत विसळून "स्वच्छ" कपड्याने पुसून देतोच कि.

तेजस आठवले's picture

3 Feb 2017 - 10:28 pm | तेजस आठवले

पाणी पिणे या बद्दल मला काही विचारायचे आहे.
तुमच्याप्रमाणेच हल्ली बरेच जणांकडून भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो. गरजेपेक्षा जास्त पाणी शरीरात गेले तर किडनीवर ताण वाढणार नाही का?

प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज वेगळी असणार. माझे स्वतःचेच उदाहरण घेतले तर मला घाम फार कमी येतो (हे बरे का वाईट ते मला माहित नाही) अगदी आपल्याकडे उन्हाळ्यात घामाच्या धारा लागतात बऱ्याच जणांना तरी मला त्या प्रमाणात घाम कधीच येत नाही. मला तहान पण फार कमी लागते. कारण नसताना ठराविक वेळाने उगीचच घोट घोट पाणी पीत राहणे मी करत नाही. जर माझ्या शरीराला पाणी हवे असेल, तर माझे शरीर मला तास संदेश देईलच की, उदा. घशाला कोरड पडणे वगैरे.

पूर्वी, साधारण ३० वर्षांपूर्वी तरी, बाटलीबंद पाणी ,पाण्याच्या बाटल्या तसेच वॊटरबॅग खूप जास्त बोकाळले नव्हते.लांबच्या प्रवासाला पाणी भरून नेत असत. पण थोड्या वेळचा प्रवास असेल तर पाणी नेले जात नसे. आम्ही मैदानावर खेळायला जात असू तेव्हा तहान लागल्यावर बिनदिक्कत दिसेल त्या घराची बेल वाजवून प्यायला पाणी मागत असू. घरून कधीच न्यायचो नाही.
अगदी शाळेत पण आम्हा सगळ्यांना वॊटरबॅग वर्गाच्या एका कोपऱ्यात ठेवायला सांगत असत, मधल्या सुट्टीतच पाणी प्यायचं असे सांगायचे.
सध्या आपल्याला प्रवासाच्या सोयी जास्त चांगल्या आहेत, भरपूर चालणे होत नाही(प्रवासानिमित्ताने), घरी/कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा असते. हे सगळे विचारात घेता पाणी भरपूर प्या(तहान लागली की प्या असे ना म्हणता) असे सर्वत्र ऐकू येते ते किती योग्य आहे हा प्रश्न आहे.

आपण आपले जेवण बघितले(युरोपीय अथवा अमेरिकन जेवणाशी तुलना करता - बर्गर, पिझ्झा, सॅन्डविच असे भोजन, अगदी रोज नसले तरी बऱ्याचदा ) तर रसभाज्या, पातळ भाजी, आमटी/वरण, ताक/मठ्ठा, कढी इत्यादी मार्गानी आपल्या शरीरात पाणी जातच असते.मग अजून वेगळे असे काही ग्लास पाणी प्यायलाच हवे का ?

अवांतर, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशात / वाळवंटात डिटॉक्स कसे होत असतील ?

सुबोध खरे's picture

4 Feb 2017 - 10:01 am | सुबोध खरे

गरजेपेक्षा जास्त पाणी शरीरात गेले तर किडनीवर ताण वाढणार नाही का?
रोज सहा लिटर पेक्षा जास्त पाणी प्यायले तर किडनीवर ताण पडू शकतो

प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज वेगळी असणार. माझे स्वतःचेच उदाहरण घेतले तर मला घाम फार कमी येतो (हे बरे का वाईट ते मला माहित नाही) अगदी आपल्याकडे उन्हाळ्यात घामाच्या धारा लागतात बऱ्याच जणांना तरी मला त्या प्रमाणात घाम कधीच येत नाही.
बारीक लोकांच्या अंगावर चरबीचा थर कमी असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागत नाहीत म्हणून बारीक लोकांना कमी उकडतं. आणि त्यांना थंडी जास्त वाजते कारण शरीरातील उष्णता लवकर बाहेर टाकली जाते.
याच्या विरुद्ध लठ्ठ लोकांना कायम घामाच्या धारा लागलेल्या असतात. कारण त्यांच्या शरीरावरील चरबीचा थर शरीरातील उष्णता सहज बाहेर पडू देत नाही. म्हणूनच त्यांना थंडी सुद्धा जास्त वाजत नाही.
मला तहान पण फार कमी लागते. कारण नसताना ठराविक वेळाने उगीचच घोट घोट पाणी पीत राहणे मी करत नाही. जर माझ्या शरीराला पाणी हवे असेल, तर माझे शरीर मला तास संदेश देईलच की, उदा. घशाला कोरड पडणे वगैरे.
शरीर संदेश देत असते पण आपण शरीराच्या संदेशाकडे दुर्लक्ष करायला शिकतो. उदा शौचास/ मूत्रास आले असता थांबवून ठेवतो. यामुळे शरीराच्या संदेशाकडे दुर्लक्ष करण्यास आपले मन शिकते.
पूर्वी, साधारण ३० वर्षांपूर्वी तरी, बाटलीबंद पाणी ,पाण्याच्या बाटल्या तसेच वॊटरबॅग खूप जास्त बोकाळले नव्हते.लांबच्या प्रवासाला पाणी भरून नेत असत. पण थोड्या वेळचा प्रवास असेल तर पाणी नेले जात नसे. आम्ही मैदानावर खेळायला जात असू तेव्हा तहान लागल्यावर बिनदिक्कत दिसेल त्या घराची बेल वाजवून प्यायला पाणी मागत असू. घरून कधीच न्यायचो नाही.
अगदी शाळेत पण आम्हा सगळ्यांना वॊटरबॅग वर्गाच्या एका कोपऱ्यात ठेवायला सांगत असत, मधल्या सुट्टीतच पाणी प्यायचं असे सांगायचे.
पूर्वी शाळेत शिस्तीला महत्त्व होते आता मध्ये मध्ये पाणी पिऊ नका कारण मुले तासाच्या मध्येच लघवीला जाऊ नये म्हणून. जसे जसे वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्तोम माजत आहे तसे तसे दुर्दैवाने शिस्तीचे महत्त्व कमी होत आहे
सध्या आपल्याला प्रवासाच्या सोयी जास्त चांगल्या आहेत, भरपूर चालणे होत नाही(प्रवासानिमित्ताने), घरी/कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा असते. हे सगळे विचारात घेता पाणी भरपूर प्या(तहान लागली की प्या असे ना म्हणता) असे सर्वत्र ऐकू येते ते किती योग्य आहे हा प्रश्न आहे.
वातानुकूलित यंत्रातून एक नळी निघालेली असते त्यातून हवेतील अतिरिक्त बाष्प बाहेर टाकले जाते. यामुळे वातानुकूलित खोलीतील हवा कोरडी होते. यामुळे आपला घाम पण पटकन वाळतो पण आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो. दुर्दैवाने तापमान कमी असल्याने आपल्याला तहान लागत नाही. यासाठीच आपल्याला जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
आपण आपले जेवण बघितले(युरोपीय अथवा अमेरिकन जेवणाशी तुलना करता - बर्गर, पिझ्झा, सॅन्डविच असे भोजन, अगदी रोज नसले तरी बऱ्याचदा ) तर रसभाज्या, पातळ भाजी, आमटी/वरण, ताक/मठ्ठा, कढी इत्यादी मार्गानी आपल्या शरीरात पाणी जातच असते.मग अजून वेगळे असे काही ग्लास पाणी प्यायलाच हवे का ?
युरोपीय अथवा अमेरिकन देशात तापमान अतिशय कमी असल्याने त्यांना घाम येत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरातून पाण्याचा व्यय कमी होतो. याउलट भारतात तापमान उष्ण असल्याने आपल्या शरीरातून पाणी बाष्पीभवन आणि घामावाटे जास्त जात असल्याने आपल्या पारंपरिक आहारात द्रव पदार्थान्चे प्रमाण जास्त असते.
अवांतर, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशात / वाळवंटात डिटॉक्स कसे होत असतील ?
वाळवंटात डिटॉक्स करण्यासाठी आपल्या शरीराला फार त्रास होतो . मी जोधपूरला गेलो असताना पहिल्या दिवशी आलेल्या ४५ रुग्णांपैकी जवळ जवळ २५ रुग्णांना मुतखडे आढळले. प्रथम मला वाटले कि सोनोग्राफी यंत्रात बिघाड आहे. नंतर मला रोजच्या रुग्णांपैकी ४० % लोकांना मुतखडे आहेत असे आढळले.
बाकी नंतर.

तेजस आठवले's picture

4 Feb 2017 - 2:53 pm | तेजस आठवले

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Feb 2017 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

माझ्याही मनात अगदी हेच प्रश्न होते.
मध्यंतरी टाचदुखी च्या निमित्ताने युरिक अ‍ॅसिड जास्त झाल्याचे निदान झाले त्यावेळी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. कधी कधी दोन वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यामुळे गोंधळ होते. उदा. मला सायकियाट्रिस्ट ने प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला. तर ऑर्थ्रो ने तो टाळण्याचा सल्ला दिला कारण त्यामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडची लेव्हल वाढते. शेवटी तारतम्या वापरले व दुखण असे पर्यंत प्रोटीन टाळले. नंतर थोडे चालू केले.
या गाउट च्या भयाने पाणी पिण्याचे वाढवले.

फेदरवेट साहेब's picture

9 Feb 2017 - 8:02 am | फेदरवेट साहेब

एक लिटर कोमट पाणी त्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा चांगल्या दर्जाचा मध घालून घ्या आणि अर्ध्या तासाने मग तुमची न्याहारी करा. उरलेल्या दिवसात अजून २ लिटर पाणी प्या.

>>>>>>>>>>

प्रयत्न करून पाहिला होता. एकतर लगेच वमन होते अन पाणी पडून जाते किंवा एखादा तीव्र जुलाब होऊन सगळे बाहेर पडते. जुलाब तरी समजू शकतो. ओकायला झालं की डोकं उठतं. दिवसभर आजारी आजारी फीलिंग येते.

सुबोध खरे's picture

9 Feb 2017 - 9:37 am | सुबोध खरे

साहेब
हा आतड्याचा व्यायाम आहे असे समजून चालू करा. पहिल्या दिवशी ३००-४०० मिली थंड पाण्याने सुरुवात करा. कोमट पाण्याला "चव" नसते. हळू हळू मात्रा वाढवत न्या. पहिल्या दिवशी जोरदार व्यायाम केला कि जसे सगळे शरीर आंबलेले होते तसेच इथे आहे.
प्रमाण हळू हळू वाढवत न्या. आणि जर एक लिटर होत नसेल तर जितके झेपेल तितके चांगले.
तीव्र जुलाब होऊन जर सगळं पाणी बाहेर पडलं "एखादा दिवस" तर ठीकच आहे. कोठा साफ झाला. पंच कर्मातील एक कर्म पार पडले हे समजा.

सस्नेह's picture

3 Feb 2017 - 11:38 am | सस्नेह

डॉक, आणखी एक सांगाल का ?
रजोनिवृत्तीनंतर पुरेशी संप्रेरके आणि जीवनसत्वे स्त्रियांना कोणकोणत्या आहारातून मिळतात ?

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 8:21 pm | सुबोध खरे

सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, राजमा इ कडधान्ये, मेथी, तीळ, सर्व तर्हेची फळे या गोष्टीमध्ये जीवनसत्त्वे तसेच फायटो इस्ट्रोजन हि नैसर्गिक संप्रेरके आढळतात. पाऊले या गोष्टी आपल्या आहारात अधिक समाविष्ट कराव्यात. अजून तरी फायटो इस्ट्रोजन याचा नक्की फायदा होतोच असे सिद्ध झालेले नाही परंतु या पदार्थतील इतर महत्त्वाच्या अन्न घटकांचा आपल्याला फायदा नक्की होईल.
https://en.wikipedia.org/wiki/Phytoestrogens

खटपट्या's picture

3 Feb 2017 - 12:57 pm | खटपट्या

खूप छान लेख.
चाळीशीनंतर पुरुषांमधे काही फरक पडतात का?

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 8:30 pm | सुबोध खरे

पुरुष वयात पण हळू हळू येतात तसेच त्यांची प्रजननक्षमता कमी व्हायला अनेक वर्षे/ दशके लागतात.
हे महाशय ९६ व्या वर्षी बाप झाले.
http://metro.co.uk/2012/10/18/worlds-oldest-dad-ramajit-raghav-96-father...
त्यामुळे स्त्रियांसारखे त्यांच्यात एकदम एक झटक्यात( रजोनिवृत्ती/ पाळी बंद होणे) बदल होताना दिसत नाहीत.
स्त्री हि एका महिन्यात साधारणपणे एकच स्त्रीबीज निर्माण करते. म्हणजे १३ ते ४७ या काळात साधारन फक्त ४०० स्त्रीबीजे तयार होतात. त्यामानाने पुरुषाच्या वीर्यात एका मिली मध्ये ४ कोटी शुक्राणू असतात. आणि एका संभोगात १०-१५ कोटी शुक्राणू वापरले जातात. म्हणजे पुरुषबीजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. स्त्रीला नऊ महिने पोटात आणि पुढे सहा महिने दुधाद्वारे बाळाचे पोषण करायचे असते त्यामुळे ती निरोगी आणि स्वस्थ असणे आवश्यक आहे म्हणून निसर्गाने ती केवळ सक्षम असतानाच गरोदर राहील अशी सोय केली आहे. म्हणून स्त्रीदेह असा मोठ्या प्रमाणावर अपव्यय टाळतो.

खटपट्या's picture

3 Feb 2017 - 10:29 pm | खटपट्या

छान माहीती

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2017 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सोप्या शब्दांत सुंदर माहितीपूर्ण लेख. बर्‍याच दिवसांच्या खंडानंतर लेखमाला सुरू झाली हे पाहून आनंद झाला.

रेवती's picture

3 Feb 2017 - 6:27 pm | रेवती

माहिती आवडली.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Feb 2017 - 9:35 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप छान लेख! धन्यवाद डॉक्टर!

अभिजीत अवलिया's picture

4 Feb 2017 - 9:12 pm | अभिजीत अवलिया

वाचतोय.

नीलमोहर's picture

8 Feb 2017 - 3:12 pm | नीलमोहर

खरंतर शाळा आणि कॉलेजांतच असे लेक्चर दिले गेले पाहिजेत, या खूप महत्वाच्या गोष्टी अनेकींना माहिती नसतात, त्यामुळे तब्येतीचे आणि त्या अनुषंगाने इतरही सायको सोमॅटिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
उपयुक्त लेखनासाठी धन्यवाद डॉक्टर.

रुपी's picture

9 Feb 2017 - 12:45 am | रुपी

लेख आणि प्रतिसाद फार माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद!

आंबट गोड's picture

31 Jan 2019 - 1:26 pm | आंबट गोड

लेख मालिका
कृपया ४५ नंतर वाढते वजन कसे घटवावे यावर लिहा अधिक विस्तृत पणे. आपण फास्ट चालायला सांगितले. पण माझे गुडघे दुखतात व स्पीड ने चालायला जरा प्रॉब्लेम होतो.
तसेच डाएट काय असावा? आयुर्वेदिक साप्ताहिकांतून (पक्षी : फॅमिली डॉक्टर!) तर सांगतात की तूप भरपूर खा, भात खा, गोड डिंकाचे लाडू खा, खारीक खजूर खा... !
आपली खाण्या पिण्याची शैली/ सवयी व गरजा, आयुर्वेदिक शास्त्रं व डाएटरी कंस्ट्रेंट्स यांचा मेळ कसा घालता येईल?

सुबोध खरे's picture

31 Jan 2019 - 7:22 pm | सुबोध खरे

गुडघे दुखतात व स्पीड ने चालायला जरा प्रॉब्लेम होतो.

हा आपल्या अति वजनाचा प्रश्न आहे कि गुढघ्यात काही आजार आहे याची तपासणी करून घ्या.

गुढघ्यात काही असेल तर वजन न येणारे व्यायाम करणे सहज शक्य आहे उदा. सूर्यनमस्कार, सायकल चालवणे, पोहणे.

अन्यथा चालायला सुरुवात तर करा

अमर विश्वास's picture

1 Feb 2019 - 3:25 pm | अमर विश्वास

गुडघे दुखतात व स्पीड ने चालायला जरा प्रॉब्लेम होतो.

डॉक्टरांनी वर सांगितले आहेच ....
पण एक सोपा उपाय सुचवतो ...
चालायच्या आधी स्ट्रेचिंग (Cold Stretching ) करा व भरपूर वॉर्मअप करा ... मग चालताना गुडघे दुखणार नाहीत