*/
नमस्कार मंडळी,
रंगकर्मी म्हणून रंगमंचावर काम करता असताना बऱ्याच वेळेला काहीतरी गफलत होते आणि त्यामुळे नाट्यगृह हसण्यात बुडून जाते, पण नटांसाठी नामुश्कीची वेळ ओढवते. पुलंच्या भाषेत "प्रेमपत्र कितीही गोड, 'गो'च्या पुढे शंभर नवग्रह काढून लिहिलेलं असलं तरी त्याचं जाहीर वाचन नेहमीच हशा पिकवतं". असेच काही किस्से.... स्वतः अनुभवलेले, पाहिलेले आणि काही दिग्गजांकडून ऐकलेलेदेखील.
१. खूप वर्षांपूर्वी मी 'प्रेमाच्या गावा जावे' हे नाटक बसवत होतो. नाटकाची रंगीत तालीम चालू होती आणि त्यासाठी बऱ्याच जाणत्या नाट्यरसिकांना आवर्जून बोलावले होते. ह्या नाटकात आजोबांच्या (जे काम अरविंद देशपांडे करायचे) तोंडी एक वाक्य आहे, "हा माझा मुलगाच नाही, तर माझा चांगला मित्र आहे." नेमके हे वाक्य म्हणताना आमचे आजोबा गडबडले आणि "हा माझा नुसताच मुलगा नाही, तर मुत्रा आहे" असे म्हणून गेले. सगळे प्रेक्षक तर सोडाच, रंगमंचावर हजार असलेले रंगकर्मीसुद्धा हसू लागले. नशिबाने रंगीत तालीम होती म्हणून बचावलो. अर्थात खरा प्रयोग खूपच छान झाला; पण ह्या वाक्याला जेव्हा गाडी आली, तेव्हा सगळ्यांच्या पोटात गोळा आला होता.
२. ठाण्याला गडकरीमध्ये एका संस्थेच्या मदतीसाठी एका ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग लावण्यात आला होता. करणारी सगळी हौशीच मंडळी, त्यामुळे नाटक यतातथाच बसले होते. या नाटकात एक असा प्रसंग आहे ही शिवाजीराजे आग्र्याला कैदेत आहेत आणि जिजाबाई अत्यंत निराश, हताश झालेल्या आहेत. आणि तेव्हा अमात्य त्यांना म्हणतात, "आऊसाहेब, जर आपणच असा धीर सोडू लागलात, तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?" आणि हे वाक्य अमात्य म्हणाले, "आऊसाहेब, जर आपणच असा धूर सोडू लागलात, तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?" झाले, जिजाऊसाहेब त्या नटाकडे समोर साक्षात औरंगजेब उभा आहे अशा खाऊ का गिळू नजरेने बघू लागल्या. गडकरीमध्ये हशा, टाळ्या, शिट्या, हुर्यो यांचा पाऊस पडला. शेवटी पडदा पाडला. दिग्दर्शकाने दिलगिरी व्यक्त केली आणि खेळ पुन्हा सुरू झाला.
३. एकदा अमेरिकेत एका नाटकाचा (एकांकिकेचा) प्रयोग चालू होता. त्यात एक प्रसंग असा होता की एक बाई रंगमंचावर मैफल करतात आणि मैफल संपल्यावर त्यांचा नोकर तानपुरा, तबला वगैरे आवरून ठेवतो. आणि नंतर तो नोकर बाईंना म्हणतो, "बाई, काहीही म्हणा, तुमच्या गळ्यात अगदी खवा आहे, खवा!" गडबडीत हे गृहस्थ म्हणाले, "बाई, काहीही म्हणा, तुमच्या गोळ्यात अगदी खवा आहे, खवा!" झाले... हशा, शिट्या, उपहास, संताप या सगळ्या प्रतिक्रिया एकदम ऐकू आल्या. पडदा पाडला आणि त्या बाई रंगपटात अगदी कापरासारख्या पेटल्या होत्या. त्या गृहस्थांनी चक्क पायावर डोके ठेवून माफी मागितली. अर्थातच ती एकांकिका रद्दच झाली.
४. कोकणातल्या दशावतारी नाटकांबद्दल सर्वांना माहीतच आहे. नाटकात काम करणारे सगळे गावातलेच आणि त्यातही गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना नाटकात मुख्य काम करण्याची खाजही असते. असेच एकदा 'श्रावणबाळ - अर्थात मातृपितृभक्ती' असा विषय घेतला होता. दशरथाचे काम गावच्या सरपंचांनी हक्काने स्वत:कडे घेतले. नाटक चालू झाले. नाटकात श्रावण पाणी भरायला जातो आणि दशरथ त्याच्यावर बाण मारतो हा प्रसंग. दशरथाला बसायला एक फांदी आणि झाडाचा बुंधा वगैरे सगळी व्यवस्था होती. दशरथ महाराजांना आयत्या वेळेला झाडावर चढता येईना, म्हणून खाडाखाली एक छोटे स्टूल ठेवले आणि त्यावर परत थोडी झुडपे आच्छादून ठेवली. पडदा उघडला आणि महाराज झाडावर चढताना त्या झुडपांमध्ये महाराजांचे धोतर अडकले आणि महाराज वर, तर धोतर खाली असा सीन झाला. "मायझयाँ… त्या सुताराच्या! फांदी एव्हढ्या वर कित्याक केली? शिरा पडली त्या सुताराच्या...." अशा शिव्या देत महाराज परत विंगेत. धोतर वगैरे घट्ट बांधून पुन्हा सीनला सुरुवात. या खेपेला महाराज अगदी जपून व्यवस्थित फांदीवर चढले आणि लोकांनी टाळ्या-शिट्या वाजवल्या. श्रावणबाळ आला आणि त्याने आपल्याकडचा गडू पाण्यात बुडवला. दशरथ राजा कानोसा घेऊन पुढे झाला आणि तो बाण मारणार, इतक्यात फांदी तुटून दशरथच धारातीर्थी. "बाझवतो त्या सुताराच्या आयची!!!! @#$%^&*" अशा शिव्या देता सरपंच दात ओठ खात त्या सुताराच्या मागे पळत सुटले आणि सुतार जिवाच्या आकांताने गावातून पळत सुटला.
५. काहीही म्हणा, पुलंनी म्हटल्याप्रमाणे नाटक कंपनीत काही अहि-नकुल जोड्या असतातच. परीट आणि कपडेपट सांभाळणारा माणूस. स्टेज मॅनेजर आणि लाईटवाला, गायक आणि साउंडवाला, तसेच सुतार आणि मुख्य नट. असेच एकदा कोकणात 'लव-कुश अर्थात सीता परीक्षा' असा काहीतरी विषय होता. नाटकच्या आदल्या दिवशी रामाचे आणि धोब्याचे भांडण न होता रामाचे आणि सुताराचे भांडण झाले. सुतारही त्याचा गावचा आणि रामापेक्षा बेरकी. शेवटच्या सीनला सीता म्हणते, "मी जर पवित्र असेन, तर धरणीमाता मला पोटात घेईल." आणि सुतार एक विशिष्ट दांडी खेचतो, त्यामुळे ज्या ठिकाणी सीता उभी असते तो स्टेजचा भाग खाली सरकतो. पण त्या दिवशी सुताराची खोपडी सरकलेली असल्याने प्रयोगाच्या वेळी सीतेने ते विवक्षित वाक्य म्हटले आणि सीतेऐवजी रामच धरणीमातेच्या उदरात गुडुप झाले. कारण राम खड्ड्यात पडावा असेच सुताराने स्टेजचे सेटिंग जाणूनबुजून केले होते.
६. कोकणातला असाच एक दशावतारी प्रयोग, 'सीताहरण'. काम करणारी सगळी गावचीच मंडळी. आणि मुख्य म्हणजे सीतेचा पार्ट करायला गावातलाच पुरुष पार्टी. त्यात कोकणात नाटके कधीही वेळेवर सुरू होत नसल्याने सगळी नट मंडळी बेफिकीर. त्यात एकजात सगळे 'वाईच' घेऊन आलेले. कसेबसे नाटक सुरू झाले. सीता फुले तोडायला जंगलात जाते आणि मारिचाचे सुवर्णमृगाचे रूप बघून पर्णकुटीत येते, त्यानंतर मारिच पर्णकुटीसमोर येऊन बागडतो, असा प्रसंग होता. विंगेच्या एका बाजूला पर्णकुटी आणि दुसऱ्या बाजूला जंगल अशी व्यवस्था. सीता पर्णकुटीत परत धावत आली आणि वाट बघत बसली. विंगेच्या दुसऱ्या बाजूला मारिच आधीच झोकून आलेला, मस्तपैकी हातात विडी घेऊन झुरके मारत बसलाय. आपली एन्ट्री आली याची त्याला काही कल्पनाच नाही. इकडे सीतेने रामाऐवजी मारिचाचा धावा सुरू केला. सीता बनलेला पार्टी त्याला एका विंगेतून दुसऱ्या विंगेत हाका मारू लागला, आधी हळूहळू "मारिचा! ए मारिचा"... "ए मारिचा! अरे ए मारिचा, एन्ट्री आली तुझी!", "मारिचा!!!"... स्टेजवर बराच वेळ सामसूम असल्याने लोकही अस्वस्थ झाले आणि आधी कुजबुज, मग शिट्या-टाळ्या-हाळ्या सुरू झाल्या. इकडे सीता मारिचाच्या नावाने बोंबलत होती, "अरे ए मारीच्या!!' आणि शेवटी वैतागून स्टेजवर आली आणि जोरदार कचकून शिव्या देत सीतामाई म्हणाली, "अरे ए चुX मारिचा!!! बेवडो मारून येतां आणि नाटकाची वाट लावतां!!! भोXXच्या, वेंट्री इली ना तुझी."
७. 'मोरूची मावशी' नाटकाची गोष्ट. विजय चव्हाण मावशीचे काम करत होता. एका प्रसंगात मावशी धावत स्टेजवर येते आणि सोफ्यावर बसते आणि त्यानंतर त्याचे एक छोटेसे स्वगत आहे. तसा तो धावत आला आणि बसला, तर त्याच्या मागोमाग एक मांजर आली आणि स्टेजवर त्याच्याकडे तोंड करून (प्रेक्षकांकडे पाठ) बसली. विजय चव्हाण अगदी अस्वस्थ झाले आणि त्यांना पुढचे काही सुचेचना. मांजरही जाईना... त्यांनी डोळे वटारून पाहिले, शुकशुक केले, तरी ते मांजर ढिम्म. नाटक पुढे सरकतच नव्हते. शेवटी प्रेक्षकांतून कोणीतरी ओरडला "ए विज्या!!! तुझी मावशी आली बघ!!!" आणि सगळे हसायला लागले, टाळ्या-शिट्या वाजल्या आणि त्या आवाजाने मांजराने पळ काढला आणि नाटक परत सुरू झाले.
८. पुण्याच्या भानुविलासमध्ये 'खडाष्टक' हे नाटक चालू होते. चित्तरंजन कोल्हटकर त्यात ७५ वर्षांच्या आजोबांची भूमिका करत होते. आजोबा आणि त्यांची नात यांच्यात संवाद सुरू होता. आजोबा नातीला म्हणतात, "पोरी, कोणत्याही परिस्थितीत मी तुझे लग्न त्या सोकाजीरावांशी करून देणाराच! हा निर्णय झाला आहे आणि त्यावर अधिक चर्चा नकोय. काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही." एव्हढ्यात एक मांजर शांतपणे चालत एका विंगेतून दुसऱ्या विंगेत गेले. लोक पोट धरून हसू लागले, बराच वेळ प्रेक्षकांचे हसणे थांबत नव्हते. तेव्हा कोल्हटकरांनी उत्स्फूर्तपणे म्हटले, "मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण हा निर्णय मी कदापिही बदलणार नाही." या वाक्याला हशा तर पिकलाच, त्याचबरोबर लोकांनीही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून कौतुकही केले.
९. एकदा नाट्यसंमेलनामध्ये गदिमा आणि पुलं दोघंही हजार होते. दोघेही ज्येष्ठ, त्यामुळे त्यांची स्वाक्षरी घायला एकच गर्दी झाली. कोणीतरी स्वाक्षरीसाठी पुलंसमोर वही धरली, तेव्हा पुलं म्हणाले, "पोरा, अरे माझी स्वाक्षरी का घेतोस? त्यापेक्षा माडगूळकरांची घे की." तो मुलगा म्हणाला, "अहो, मी त्यांची स्वाक्षरी गेल्या वर्षीच घेतली आहे." तेव्हा पुलं पटकन म्हणाले, "अरे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा माडगूळकरांचं अक्षर बरंच सुधारलंय रे!"
१०. अनुपम खेर हे मूळचे नाटकातले, शिमला इथले रहिवासी. शाळेत असताना त्यांनी 'पृथ्वीराज चौहान' नाटक केले. पृथ्वीराजचे काम अनुपमजींनी केले आणि जयचंदचे काम करणारा मुलगा होता नंदकिशोर नावाचा मुलगा. वातावरण सारे ऐतिहासिक. नाटकात जयचंदला मारण्याचा प्रसंग होता. दोन्ही बाजूंचे नातेवाईक अगदी खच्चून हजर होते. प्रसंगाला सुरुवात झाली. अनुपमजींनी नंदकिशोरला चांगलेच मारले. अर्थात जयचंद मरणारच असल्याने हे होणारच होते. पण दोन्ही बाजूंचे नातेवाईक टाळ्या वाजवून, घोषणा देऊन एकमेकांना चिथावत होते. तेवढ्यात प्रेक्षकांतून नंदकिशोरचे वडील उभे राहिले आणि म्हणाले, "नंदू, अब के गिरा तो घर ना आयओ." मग काय, नंदकिशोरने अनुपमजींना उचलून सरळ प्रेक्षकांतच फेकून दिले आणि इतिहासाबरोबरच नाटकही बदलले.
========================
प्रतिक्रिया
27 Jan 2017 - 5:25 am | मदनबाण
हा.हा.हा... सगळेच किस्से मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran
28 Jan 2017 - 12:23 am | अमितदादा
खूप भारी..हलके फुलके अनुभव..
29 Jan 2017 - 10:52 pm | गामा पैलवान
लोकहो,
हा माझा किस्सा आहे. माझा म्हणजे मी घडवलेला. पण रंगमंचावर नाही, तर प्रेक्षकांत बसून.
कोणे एके काळी ठाण्यात नाट्यगृह नव्हतं. तेव्हा मो.ह.विद्यालयाच्या रंगमंचावर व्यावसायिक नाटके व्हायची. अशाच एका नाटकाला माझे आईवडील मला सोबत घेऊन गेले. माझं वय असेल दोन अडीच वर्षं. एव्हढं लहान मूल जितक्या वेळात कंटाळेल तितक्या वेळेत मी कंटाळलो. मग चाळा म्हणून पात्रांचे संवाद जसेच्या तसे बोलायला सुरुवात केली. अगदी जमेल तशा चढउतारांसहित! मग प्रेक्षकांत जी खसखस पिकायची तिने नाटकात व्यत्यय येऊ लागला. साहजिकंच व्यत्ययाच्या मूळ कारणांस अभिव्यक्ती आवरती घ्यावी लागली.
हे सगळं आमच्या मातोश्री सांगतात. मला यातलं काहीही आठवंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
30 Jan 2017 - 1:38 pm | नाटक्या
आणखीन एक किस्सा आठवला.
एकदा एका नाटकात असा सिन होता कि एक राजा आणि प्रधान बोलत असतात आणि प्रधान राजाला राजकन्येच्या प्रेमाबद्दल सांगतो. राजा रागाने लालबुंद होतो पण प्रद्वन त्याला सांगतो कि तुमचा होणारा जावई खूप शूर आणि हुशार आहे. तो संध्याकाळी तुमच्या राजकन्येच्या महालाबाहेरील बागेत येतो तेव्हा त्याला पारखून घ्या. त्याप्रमाणे राजा त्याला बागेत नेमका पकडतो आणि मग पुढे राजकन्येबरोबर लग्न लावून देतो वगैरे. थोडी विनोदी आणि लोकनाट्याच्या अंगाने जाणारी हि छोटीशी नाटिका होती.
महालाच्य प्रवेशानंतर अंधार होतो आणि समोर एक बाकी आणि आजूबाजूला झाडे ठेवलेली असा बागेचा सिन होता. ऐन प्रयोगात गम्मत झाली. अंधारात राजेसाहेबांना बाहेर जायची वाटच सापडली नाही. लाईटस परत आलेत तेव्हा राजेसाहेब घोरपडीसारखे भींतीला चिकटून बाहेर जायची वाट चाचपडत होते. लाईट आलेले बघून पटकन तो बागेतल्या बाकड्यामागेच बसला. डायलॉग सुरु झालेत आणि राजेसाहेबांची एंट्री आली पण राजाचा पत्ताच नाही. राजकन्या आणि तिचा प्रियकर तेचतेच डायलॉग मारून चातका सारखी राजाची वाट बघताहेत. शेवटी राजेसाहेबांचा पण धीर सुटला आणि ते बाकड्यामागून उभे राहिले आणि डायलॉग बोलायला लागले. राजकन्या आणि प्रियकर एकदम दचकून बाकावरून पडले आणि नाट्यगृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
5 Feb 2017 - 11:51 am | अभिजीत अवलिया
खुप मजेदार लेख होता.
5 Feb 2017 - 4:20 pm | भिंगरी
मी हसतेय आणि मुलं आणि सुना माझ्याकडे पहात आहेत, म्हातारी भरसांडली अशा नजरेने.