किस्सा झाला ना राव!

नाटक्या's picture
नाटक्या in लेखमाला
21 Jan 2017 - 10:50 am

*/

नमस्कार मंडळी,
रंगकर्मी म्हणून रंगमंचावर काम करता असताना बऱ्याच वेळेला काहीतरी गफलत होते आणि त्यामुळे नाट्यगृह हसण्यात बुडून जाते, पण नटांसाठी नामुश्कीची वेळ ओढवते. पुलंच्या भाषेत "प्रेमपत्र कितीही गोड, 'गो'च्या पुढे शंभर नवग्रह काढून लिहिलेलं असलं तरी त्याचं जाहीर वाचन नेहमीच हशा पिकवतं". असेच काही किस्से.... स्वतः अनुभवलेले, पाहिलेले आणि काही दिग्गजांकडून ऐकलेलेदेखील.

१. खूप वर्षांपूर्वी मी 'प्रेमाच्या गावा जावे' हे नाटक बसवत होतो. नाटकाची रंगीत तालीम चालू होती आणि त्यासाठी बऱ्याच जाणत्या नाट्यरसिकांना आवर्जून बोलावले होते. ह्या नाटकात आजोबांच्या (जे काम अरविंद देशपांडे करायचे) तोंडी एक वाक्य आहे, "हा माझा मुलगाच नाही, तर माझा चांगला मित्र आहे." नेमके हे वाक्य म्हणताना आमचे आजोबा गडबडले आणि "हा माझा नुसताच मुलगा नाही, तर मुत्रा आहे" असे म्हणून गेले. सगळे प्रेक्षक तर सोडाच, रंगमंचावर हजार असलेले रंगकर्मीसुद्धा हसू लागले. नशिबाने रंगीत तालीम होती म्हणून बचावलो. अर्थात खरा प्रयोग खूपच छान झाला; पण ह्या वाक्याला जेव्हा गाडी आली, तेव्हा सगळ्यांच्या पोटात गोळा आला होता.

२. ठाण्याला गडकरीमध्ये एका संस्थेच्या मदतीसाठी एका ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग लावण्यात आला होता. करणारी सगळी हौशीच मंडळी, त्यामुळे नाटक यतातथाच बसले होते. या नाटकात एक असा प्रसंग आहे ही शिवाजीराजे आग्र्याला कैदेत आहेत आणि जिजाबाई अत्यंत निराश, हताश झालेल्या आहेत. आणि तेव्हा अमात्य त्यांना म्हणतात, "आऊसाहेब, जर आपणच असा धीर सोडू लागलात, तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?" आणि हे वाक्य अमात्य म्हणाले, "आऊसाहेब, जर आपणच असा धूर सोडू लागलात, तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?" झाले, जिजाऊसाहेब त्या नटाकडे समोर साक्षात औरंगजेब उभा आहे अशा खाऊ का गिळू नजरेने बघू लागल्या. गडकरीमध्ये हशा, टाळ्या, शिट्या, हुर्यो यांचा पाऊस पडला. शेवटी पडदा पाडला. दिग्दर्शकाने दिलगिरी व्यक्त केली आणि खेळ पुन्हा सुरू झाला.

३. एकदा अमेरिकेत एका नाटकाचा (एकांकिकेचा) प्रयोग चालू होता. त्यात एक प्रसंग असा होता की एक बाई रंगमंचावर मैफल करतात आणि मैफल संपल्यावर त्यांचा नोकर तानपुरा, तबला वगैरे आवरून ठेवतो. आणि नंतर तो नोकर बाईंना म्हणतो, "बाई, काहीही म्हणा, तुमच्या गळ्यात अगदी खवा आहे, खवा!" गडबडीत हे गृहस्थ म्हणाले, "बाई, काहीही म्हणा, तुमच्या गोळ्यात अगदी खवा आहे, खवा!" झाले... हशा, शिट्या, उपहास, संताप या सगळ्या प्रतिक्रिया एकदम ऐकू आल्या. पडदा पाडला आणि त्या बाई रंगपटात अगदी कापरासारख्या पेटल्या होत्या. त्या गृहस्थांनी चक्क पायावर डोके ठेवून माफी मागितली. अर्थातच ती एकांकिका रद्दच झाली.

४. कोकणातल्या दशावतारी नाटकांबद्दल सर्वांना माहीतच आहे. नाटकात काम करणारे सगळे गावातलेच आणि त्यातही गावातल्या प्रतिष्ठित मंडळींना नाटकात मुख्य काम करण्याची खाजही असते. असेच एकदा 'श्रावणबाळ - अर्थात मातृपितृभक्ती' असा विषय घेतला होता. दशरथाचे काम गावच्या सरपंचांनी हक्काने स्वत:कडे घेतले. नाटक चालू झाले. नाटकात श्रावण पाणी भरायला जातो आणि दशरथ त्याच्यावर बाण मारतो हा प्रसंग. दशरथाला बसायला एक फांदी आणि झाडाचा बुंधा वगैरे सगळी व्यवस्था होती. दशरथ महाराजांना आयत्या वेळेला झाडावर चढता येईना, म्हणून खाडाखाली एक छोटे स्टूल ठेवले आणि त्यावर परत थोडी झुडपे आच्छादून ठेवली. पडदा उघडला आणि महाराज झाडावर चढताना त्या झुडपांमध्ये महाराजांचे धोतर अडकले आणि महाराज वर, तर धोतर खाली असा सीन झाला. "मायझयाँ… त्या सुताराच्या! फांदी एव्हढ्या वर कित्याक केली? शिरा पडली त्या सुताराच्या...." अशा शिव्या देत महाराज परत विंगेत. धोतर वगैरे घट्ट बांधून पुन्हा सीनला सुरुवात. या खेपेला महाराज अगदी जपून व्यवस्थित फांदीवर चढले आणि लोकांनी टाळ्या-शिट्या वाजवल्या. श्रावणबाळ आला आणि त्याने आपल्याकडचा गडू पाण्यात बुडवला. दशरथ राजा कानोसा घेऊन पुढे झाला आणि तो बाण मारणार, इतक्यात फांदी तुटून दशरथच धारातीर्थी. "बाझवतो त्या सुताराच्या आयची!!!! @#$%^&*" अशा शिव्या देता सरपंच दात ओठ खात त्या सुताराच्या मागे पळत सुटले आणि सुतार जिवाच्या आकांताने गावातून पळत सुटला.

५. काहीही म्हणा, पुलंनी म्हटल्याप्रमाणे नाटक कंपनीत काही अहि-नकुल जोड्या असतातच. परीट आणि कपडेपट सांभाळणारा माणूस. स्टेज मॅनेजर आणि लाईटवाला, गायक आणि साउंडवाला, तसेच सुतार आणि मुख्य नट. असेच एकदा कोकणात 'लव-कुश अर्थात सीता परीक्षा' असा काहीतरी विषय होता. नाटकच्या आदल्या दिवशी रामाचे आणि धोब्याचे भांडण न होता रामाचे आणि सुताराचे भांडण झाले. सुतारही त्याचा गावचा आणि रामापेक्षा बेरकी. शेवटच्या सीनला सीता म्हणते, "मी जर पवित्र असेन, तर धरणीमाता मला पोटात घेईल." आणि सुतार एक विशिष्ट दांडी खेचतो, त्यामुळे ज्या ठिकाणी सीता उभी असते तो स्टेजचा भाग खाली सरकतो. पण त्या दिवशी सुताराची खोपडी सरकलेली असल्याने प्रयोगाच्या वेळी सीतेने ते विवक्षित वाक्य म्हटले आणि सीतेऐवजी रामच धरणीमातेच्या उदरात गुडुप झाले. कारण राम खड्ड्यात पडावा असेच सुताराने स्टेजचे सेटिंग जाणूनबुजून केले होते.

६. कोकणातला असाच एक दशावतारी प्रयोग, 'सीताहरण'. काम करणारी सगळी गावचीच मंडळी. आणि मुख्य म्हणजे सीतेचा पार्ट करायला गावातलाच पुरुष पार्टी. त्यात कोकणात नाटके कधीही वेळेवर सुरू होत नसल्याने सगळी नट मंडळी बेफिकीर. त्यात एकजात सगळे 'वाईच' घेऊन आलेले. कसेबसे नाटक सुरू झाले. सीता फुले तोडायला जंगलात जाते आणि मारिचाचे सुवर्णमृगाचे रूप बघून पर्णकुटीत येते, त्यानंतर मारिच पर्णकुटीसमोर येऊन बागडतो, असा प्रसंग होता. विंगेच्या एका बाजूला पर्णकुटी आणि दुसऱ्या बाजूला जंगल अशी व्यवस्था. सीता पर्णकुटीत परत धावत आली आणि वाट बघत बसली. विंगेच्या दुसऱ्या बाजूला मारिच आधीच झोकून आलेला, मस्तपैकी हातात विडी घेऊन झुरके मारत बसलाय. आपली एन्ट्री आली याची त्याला काही कल्पनाच नाही. इकडे सीतेने रामाऐवजी मारिचाचा धावा सुरू केला. सीता बनलेला पार्टी त्याला एका विंगेतून दुसऱ्या विंगेत हाका मारू लागला, आधी हळूहळू "मारिचा! ए मारिचा"... "ए मारिचा! अरे ए मारिचा, एन्ट्री आली तुझी!", "मारिचा!!!"... स्टेजवर बराच वेळ सामसूम असल्याने लोकही अस्वस्थ झाले आणि आधी कुजबुज, मग शिट्या-टाळ्या-हाळ्या सुरू झाल्या. इकडे सीता मारिचाच्या नावाने बोंबलत होती, "अरे ए मारीच्या!!' आणि शेवटी वैतागून स्टेजवर आली आणि जोरदार कचकून शिव्या देत सीतामाई म्हणाली, "अरे ए चुX मारिचा!!! बेवडो मारून येतां आणि नाटकाची वाट लावतां!!! भोXXच्या, वेंट्री इली ना तुझी."

७. 'मोरूची मावशी' नाटकाची गोष्ट. विजय चव्हाण मावशीचे काम करत होता. एका प्रसंगात मावशी धावत स्टेजवर येते आणि सोफ्यावर बसते आणि त्यानंतर त्याचे एक छोटेसे स्वगत आहे. तसा तो धावत आला आणि बसला, तर त्याच्या मागोमाग एक मांजर आली आणि स्टेजवर त्याच्याकडे तोंड करून (प्रेक्षकांकडे पाठ) बसली. विजय चव्हाण अगदी अस्वस्थ झाले आणि त्यांना पुढचे काही सुचेचना. मांजरही जाईना... त्यांनी डोळे वटारून पाहिले, शुकशुक केले, तरी ते मांजर ढिम्म. नाटक पुढे सरकतच नव्हते. शेवटी प्रेक्षकांतून कोणीतरी ओरडला "ए विज्या!!! तुझी मावशी आली बघ!!!" आणि सगळे हसायला लागले, टाळ्या-शिट्या वाजल्या आणि त्या आवाजाने मांजराने पळ काढला आणि नाटक परत सुरू झाले.

८. पुण्याच्या भानुविलासमध्ये 'खडाष्टक' हे नाटक चालू होते. चित्तरंजन कोल्हटकर त्यात ७५ वर्षांच्या आजोबांची भूमिका करत होते. आजोबा आणि त्यांची नात यांच्यात संवाद सुरू होता. आजोबा नातीला म्हणतात, "पोरी, कोणत्याही परिस्थितीत मी तुझे लग्न त्या सोकाजीरावांशी करून देणाराच! हा निर्णय झाला आहे आणि त्यावर अधिक चर्चा नकोय. काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही." एव्हढ्यात एक मांजर शांतपणे चालत एका विंगेतून दुसऱ्या विंगेत गेले. लोक पोट धरून हसू लागले, बराच वेळ प्रेक्षकांचे हसणे थांबत नव्हते. तेव्हा कोल्हटकरांनी उत्स्फूर्तपणे म्हटले, "मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण हा निर्णय मी कदापिही बदलणार नाही." या वाक्याला हशा तर पिकलाच, त्याचबरोबर लोकांनीही उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून कौतुकही केले.

९. एकदा नाट्यसंमेलनामध्ये गदिमा आणि पुलं दोघंही हजार होते. दोघेही ज्येष्ठ, त्यामुळे त्यांची स्वाक्षरी घायला एकच गर्दी झाली. कोणीतरी स्वाक्षरीसाठी पुलंसमोर वही धरली, तेव्हा पुलं म्हणाले, "पोरा, अरे माझी स्वाक्षरी का घेतोस? त्यापेक्षा माडगूळकरांची घे की." तो मुलगा म्हणाला, "अहो, मी त्यांची स्वाक्षरी गेल्या वर्षीच घेतली आहे." तेव्हा पुलं पटकन म्हणाले, "अरे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा माडगूळकरांचं अक्षर बरंच सुधारलंय रे!"

१०. अनुपम खेर हे मूळचे नाटकातले, शिमला इथले रहिवासी. शाळेत असताना त्यांनी 'पृथ्वीराज चौहान' नाटक केले. पृथ्वीराजचे काम अनुपमजींनी केले आणि जयचंदचे काम करणारा मुलगा होता नंदकिशोर नावाचा मुलगा. वातावरण सारे ऐतिहासिक. नाटकात जयचंदला मारण्याचा प्रसंग होता. दोन्ही बाजूंचे नातेवाईक अगदी खच्चून हजर होते. प्रसंगाला सुरुवात झाली. अनुपमजींनी नंदकिशोरला चांगलेच मारले. अर्थात जयचंद मरणारच असल्याने हे होणारच होते. पण दोन्ही बाजूंचे नातेवाईक टाळ्या वाजवून, घोषणा देऊन एकमेकांना चिथावत होते. तेवढ्यात प्रेक्षकांतून नंदकिशोरचे वडील उभे राहिले आणि म्हणाले, "नंदू, अब के गिरा तो घर ना आयओ." मग काय, नंदकिशोरने अनुपमजींना उचलून सरळ प्रेक्षकांतच फेकून दिले आणि इतिहासाबरोबरच नाटकही बदलले.

========================

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Jan 2017 - 11:42 am | यशोधरा

खुसखुशीत किस्से!

ग्रेंजर's picture

21 Jan 2017 - 12:11 pm | ग्रेंजर

मस्त किस्से!!!!!!!!!

विनिता००२'s picture

21 Jan 2017 - 12:36 pm | विनिता००२

भारी :खोखो:

ज्ञान's picture

21 Jan 2017 - 1:00 pm | ज्ञान

खो खो भारीच !!!!

पैसा's picture

21 Jan 2017 - 1:02 pm | पैसा

तुफान किस्से आहेत!

सिरुसेरि's picture

21 Jan 2017 - 1:08 pm | सिरुसेरि

मस्त

सस्नेह's picture

21 Jan 2017 - 1:29 pm | सस्नेह

धमाल किस्से !!

सामान्य वाचक's picture

21 Jan 2017 - 1:32 pm | सामान्य वाचक

भारी किस्से आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2017 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ही ही. भारी.

पोट धरून हसलो अगदी! धमाल किस्से! :D :D :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jan 2017 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी किस्से ! हहपुवा !

अजून असे आणि इतर अनुभव लिहा, वाचायला आवडेल.

यावर एक किस्सा आठवला जो प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांनी दूरदर्शनवरील 'चंदेरी रुपेरी' कार्यक्रमात सांगितला होता. त्यांचं एक नाटक होतं (नाव आत्ता लक्षात येईना!). तर त्यात 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या का लाजता' ह्या गाण्याचं संगीतकार अशोक पत्कींनी बसवलेलं व्हर्जन होतं. मागे पडद्यावर धबधब्याचं प्रोजेक्शन केलं जाई आणि गाणं सुरू झालं की मागे तो धबधबा वाहू लागे. तर एका प्रयोगाच्यावेळी हे गाणं सुरू झालं आणि प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी उसळली. प्रशांत आणि वर्षा बुचकळ्यात पडले, आपल्याकडून काही चूक झाली की काय! धबधबा चक्क वरून खाली वाहण्याऐवजी खालून वर वाहू लागला होता! मग थोड्या वेळाने बॅकस्टेजच्या लक्षात आलं काय घोटाळा झाला होता ते. त्याने घाईघाईने धबधबा परत उलटा सुरू केला, आणि ते पाहून परत एकदा प्रेक्षागृह हास्यकल्लोळात बुडाले! ;-)

यशोधरा's picture

21 Jan 2017 - 2:45 pm | यशोधरा

ब्रह्मचारी?

एस's picture

21 Jan 2017 - 3:42 pm | एस

हो, बरोबर.

इशा१२३'s picture

21 Jan 2017 - 4:31 pm | इशा१२३

धमाल भारी किस्से! !

मंजूताई's picture

21 Jan 2017 - 4:53 pm | मंजूताई

किस्से! हहपुवा

Ranapratap's picture

21 Jan 2017 - 6:37 pm | Ranapratap

हसुन हसुन पुरेवाट जाली

वरील किस्से वाचून हसून हसून डोळ्यात पाणी आलं.
मी ऐकलेले किस्से म्हणजे नटी स्टेजवर एन्ट्री घेण्यावेळी तिची खोटी वेणी कश्यात तरी अडकली व तिथेच राहिली. बाई मात्र तश्याच स्टेजवर गेल्या व दुसरा प्रसंग दशावताराचा आहे. नाटकात स्त्रीपार्ट करणार्‍याने त्याचे कपडे व्यवस्थित घातले नव्हते त्याचा. तेंव्हाही हसून मुरकुंडी वळली होती.

कौशी's picture

21 Jan 2017 - 7:02 pm | कौशी

आणखी येउ द्या..

प्रदीप's picture

21 Jan 2017 - 8:31 pm | प्रदीप

काही किस्से तर इतके महान आहेत की,, त्यांतील प्रत्येकावर ठसका लागेपर्यंत हसत राहिलो,

गेल्या वर्षी राहूल देशपांडेंनी त्यांच्या ऑडियो ब्लॉगवर असाच त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला एक किस्सा सांगितला होता. तो इथे आठवणीतून लिहीतोय. संगीत मानापमानाचा प्रयोग सुरू होता. धैर्यधर, समोर उभ्या असलेल्या भामिनीस उद्देशून गाणे म्हणत होता. देशपांड्यांनी स्वतःच धैर्यधराची भूमिका केली होती. प्रयोग अलिकडील असल्याने, त्यात नवे तंत्र वापरण्याची निर्माता- दिग्दर्शकांना हुक्की आली होती, तेव्हा मागे साधा रंगवलेला पडदा न वापरता, एक डेस्कटॉप वापरून, तिथे बॅक- प्रोजेक्शन केले होते. गाणे अर्ध्यावर आले असतांना अचानक ते बॅक- प्रोजेक्शन बंद पडले, व त्या पडद्यावर काळोख झाला. तेव्हा विंगेतून एकजण आला, व समोर ठेवलेल्या डेस्कटॉपला फक्त 'रीबूट' करून आत घाईने निघून गेला. ह्यानंतर तो पीसी रीबूट होऊन मग मागील पडद्यावर माक्रोसॉफ्ट् - विंडोजच स्टार्ट- अप स्क्रीन दिसू लागला. तेव्हा पुढील उचापत करण्यासाठी कुणीच बाहेर आले नाही. राहिलेल्या सबंध सीनमधे, त्या जुन्या नाटकाचे नायक- नायिका, विंडोजच्या स्टार्ट- अप स्क्रीनसमोर उभे राहून अभिनय करीत राहिले!

कानडाऊ योगेशु's picture

21 Jan 2017 - 9:49 pm | कानडाऊ योगेशु

सोलापूरात काही वर्षांपूर्वी एकांकिका स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा घडलेले हे दोन किस्से
पहिल्यात बहीणीला परत नांदवायला न्या म्हणुन जावयाकडे मेवणा जातो व बाचाबाची होऊन मेव्हणा जावयाचा खून करतो. जावई तिथेच कोलमडुन पडतो . नेपथ्य माळरान वगैरे सारखे होते व काही ठिकाणी धूळ माती ही पसरली होती. बहीण ही पाठलाग करत आलेली असते व आपल्या नवर्याचा खून झालेला पाहुन भावाला धारेवर धरते. अगदी सिरियस सीन चालु असताना आता शवाची अ‍ॅक्टींग करत असलेल्या नवर्याला आजुबाजुच्या माती/धूळीमुळे जोराची शिंक आली. इतकी जोराची कि तो अर्धवट उठुन पुन्हा पडला. तश्या मोकळ्याच असलेल्या प्रेक्षागृहात शिट्या टाळ्याचा कहर झाला.

दुसर्यात एका मुस्लीम फॅमिलीतल्या एका बेकार तरुणाची गोष्ट होती. सकाळी आळोखेपिळोखे देत उठतो असा पहीलाच सीन होता. करणारा हिंदू होता. उठल्यावर जोरात आळस देताना त्याच्या तोंडातुन नेहेमीप्रमाणे आई आई आई ग..असी सुरवात झाली. पण त्याला ते कळले मग तिथुन पुढे अम्मी अम्मी असा बदल केला. पण तो पर्यंत थिएटरमध्ये बाजार उठला होता.

यशोधरा's picture

22 Jan 2017 - 7:08 am | यशोधरा

=))

ज्योति अळवणी's picture

21 Jan 2017 - 10:19 pm | ज्योति अळवणी

जबरदस्त. मजा आली वाचताना

आम्ही पार्क चौकात पथनाट्य करत होतो, आमच्या वैष्णव चा डायलॉग होता बायकोबरोबर लग्नाला गेलो होतो,
वैष्णव म्हणाला लग्नाला गेलो होतो, माझ्या बायकोचं लगीन होतो,
पथनाट्यातली पोरं तीथंच हासुन हासुन गडबडली.

माझा फुटो दिसु र्हायला का?

सुखी's picture

21 Jan 2017 - 11:43 pm | सुखी

लै म्हंजे लै हसलो

बाजीप्रभू's picture

22 Jan 2017 - 2:15 am | बाजीप्रभू

धमाल किस्से !!

निल्या१'s picture

22 Jan 2017 - 11:43 am | निल्या१

आऊसाहेब जर आपणच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे अस म्हणणारा नट बामण असावा ! त्या शिवाय असा धूर्त पणा
कोण करकोण? अशा प्रतिक्रिया अजून अल्या नाहित आश्चर्य.

पियुशा's picture

22 Jan 2017 - 1:35 pm | पियुशा

मेले मी हसुन हसुन , माझा आत्मा प्रतिसाद लिहितोय ;)

गोळ्यात खवा? काय समज्ल नही ब्वा.

नाटक्या's picture

23 Jan 2017 - 11:46 pm | नाटक्या

बघा

वेल्लाभट's picture

23 Jan 2017 - 3:03 pm | वेल्लाभट

दोन तीन ऐकले होते... पण बाकी सगळेच कहर किस्से आहेत !मजा आली.

मोदक's picture

23 Jan 2017 - 3:09 pm | मोदक

+१११

शलभ's picture

23 Jan 2017 - 4:39 pm | शलभ

कहर किस्से..:)

खूप पुर्वीचा किस्सा आहे.
कोकणातील एक खेडे. नाटक - अर्थात दशावतारी. द्रौपदीची भूमिका करणा-या पुरुष नटाने (स्त्रीपार्टी) "पाव" घातलेले असतात . मध्यंतरात चहाच्या सुट्टीत तो ते बाजूला काढून ठेवतो. कुणीतरी नकळत ते पाव घेतो आणि चहाबरोबर खाऊन टाकतो. नाईलाजाने उरलेले नाटक द्रौपदीला विदाऊट पाव करावे लागते.

वेल्लाभट's picture

23 Jan 2017 - 5:14 pm | वेल्लाभट

मीही एक किस्सा ऐकला होता. जाणता राजा की कुठलंसं ऐतिहासिक नाटक होतं. आणि एक प्रेक्षक एका प्रसंगानंतर फार जोशात येऊन ओरडला, 'शिवाजी महाराजां'ची'!' ........... काही सेकंद पिन ड्रॉप सायलेन्स झाला होता.
अर्थातच शिवाजी महाराजांचा' असं म्हणायचं होतं आणि 'विजय असो' अशा सामुहिक प्रतिसादाची अपेक्षा होती. पण अतिउत्साहात चा चं ची झालं आणि आता फुटतो की काय आपण अशी परिस्थिती त्या प्रेक्षकाची झाली असावी.

जव्हेरगंज's picture

23 Jan 2017 - 7:08 pm | जव्हेरगंज

लै मस्त!!

चाणक्य's picture

23 Jan 2017 - 7:29 pm | चाणक्य

हहपुवा. भारी किस्से.

गामा पैलवान's picture

23 Jan 2017 - 7:48 pm | गामा पैलवान

च्यायला पण भामिनीसारख्या सुसंस्कृत, सालंकृत स्त्रीचा अभिनय विंडोजसारख्या नगरवधूच्या पार्श्वभूमीवर पहावा लागणे क्लेशकारक आहे.
-गा.पै.

चतुरंग's picture

23 Jan 2017 - 11:33 pm | चतुरंग

लै भारी किस्से =))

राज्यनाट्य स्पर्धेत नगरला बघितलेला एक किस्सा - घरातल्या एका खोलीचा दरवाजा, खिडकी, एक कपाट असा सर्वसाधारण सेट लावलेला होता. एका प्रसंगात नट खोलीचा दरवाजा उघडून आत जातो आणि पुढच्या प्रवेशाला कपाटाचं दार उघडून स्टेजवर येतो. प्रेक्षकांची हसून पुरेवाट, स्टेजवर इतर कलाकार हा इथून कुठून आला म्हणून बघत राहतात आणि तो बिचारा काही न समजून पुढचे डायलॉग प्रामाणिकपणे म्हणतोय!!

पणशीकरांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा हा देखील नगरलाच घडलेला. सहकार सभागृहात 'इथे ओशाळला मृत्यू'चा प्रयोग होता. पणशीकरांचा औरंगजेब म्हणजे खर्‍या औरंगजेबानेसुद्धा बोटे तोंडात घालावीत असा वठतो असे ऐकले होते. प्रयोग ऐन रंगात आला होता. एका प्रसंगात औरंगजेब विचारतो की "कुठे आहे तो संभाजी?"
एक टारगट प्रेक्षक जोरात ओरडला "हा काय इकडं!" प्रेक्षकांत हशा पिकला.
पणशीकर जराही न बावरता पुढे बोलत गेले. पुढच्याच संवादात "आणा त्या संभाजीला जेरबंद करुन माझ्यासमोर!" अशी ओळ होती त्याठिकाणी प्रेक्षकातून जिथून आवाज आला होता तिकडे बोट करुन त्यांनी ती ओळ म्हंटली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला!!

(नाट्यप्रेमी)रंगा

स्रुजा's picture

23 Jan 2017 - 11:39 pm | स्रुजा

हाहाहा

बादवे, सहकार सभागृहाचं रीनोव्हेशन झालं आणि त्याचं एवढ्यातच नव्याने उद्घाटन देखील झालं म्हणे.

रातराणी's picture

24 Jan 2017 - 12:26 am | रातराणी

लेखातले आणि प्रतिसादातून आलेले किस्से कहर आहेत अगदी! मजा आली!

दादू गुरवाच्या "संगीत वस्त्रहरणाची " सर्व तयारी जय्यत होती. स्टेजवर द्यूत खेळण्याचा प्रसंग आला . सहदेव घुश्श्यात रंगमंचावर आला आणि प्रेक्षकांची पर्वा न करता ओरडला "अर्जुना, तुमी चौघांनी बांगड्याचा तिखला संपयल्यात. आता मी भाकरे वांगडा खाव काय माय******, आवशीचो घोव तुमच्या?"

तेवढ्यात शकुनीने त्याला शांत केला. आणि फांसे टाकून "जितं ! जितं ! अशा आरोळ्या कौरव पार्टीने मारायला सुरवात केल्या. दुःशासन झालेला आडदांड पांडू साटम, द्रौपदीच्या भूमिकेतल्या दादू गुरवाला ओढत घेऊन आला. "कृष्णा धाव आता इकडे, नराधम सोडतो लुगडे" हे पद दादुने सुरू केले इकडे "द्रौपदी, तू आता आमची दासी आसय. मी तुझा वस्त्रहरण करतलय." असे दांत-ओठ खात पांडू ओरडला. दशावतारात त्याला दैत्याचा पार्ट करायची संवय होती. द्रौपदीचे वस्त्रहरण वास्तव दिसावे, म्हणून दादू गुरव एकावर एक अशा सात साड्या नेसला होता. त्यामुळे द्रौपदी ही कमनीय बांध्याची लावण्यवती ललना न वाटता, एखादया जाडजूड शेठाणीसारखी दिसत होती. त्या अवतारांत कौरवच काय, पण धृतराष्ट्राने पण तिच्याकडे मान वर करून पाहिले नसते.

इकडे पांडूने दादुच्या पदराला असा जबरदस्त हिसडा दिला की द्रौपदी धाडकन जमिनीवर आडवी झाली. ते पाहून प्रेक्षकांत बसलेली दादूची बायको कळवळून ओरडली "पांडग्या हळू ,ते जमनीर आपाटले रे मेल्या ! शिरा मारला तुज्या तोंडार" पण पांडूच्या अंगात दुःशासन संचारला होता. एकामागोमाग एक तो साड्या खेचून काढत होता. दादू "थांब! थांब!" असे त्याला सांगत असताना पांड्याने आणखी एक साडी खेचली आणि द्रौपदी वर ब्लाउज आणि खाली चटेरी पटेरी अर्धी चड्डी या वेशात रंगमंचावर राहिली. कौरव पांडव घाबरून हे सर्व पहात होते. तेवढ्यात द्रौपदीने दु:शासनावर उडी घेऊन त्याला लोळवला व त्याच्या कंबरड्यात एक लाथ हाणून ती ओरडली "मेल्या तुका सात लुगडी मोजूक येणत नाय माय*****?" द्रौपदीचा तो अवतार पाहून भेदरलेला दुःशासन विंगेत पळाला. तेवढयात विंगेत विडी ओढत उभ्या असलेल्या कृष्णाच्या पात्राला कोणीतरी स्टेजवर ढकलला. कृष्णाला पाहताच संतापाने द्रौपदी त्याच्या अंगावर धावली आणि त्याच्या मुस्कटात एक हाणून ओरडली, "आता कित्याक आयलय माय***** माजी लंगटी सोडूक?"
या सर्व गोंधळात प्रेक्षक हर्षवायू झाल्यासारखे ओरडत होते. महाभारताचा हा नवीनच आविष्कार त्या दिवशी त्यांना पाहायला मिळाला.

दुसऱ्या दिवशी गांवात ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय." दादू गुरवाचा वस्त्रहरण बगलय काल ? मेलो स्वताक बालगंधर्व समाजता !."

हा मेसेज व्हॉट्सपवर अनेक दिवस फिरत आहे आणि यातले अनेक संदर्भ मूळ पुस्तकात नाहीत. (सारे प्रवासी घडीचे - पान नंबर ११८ ते १२३)

रुपी's picture

24 Jan 2017 - 2:46 am | रुपी

मजेशीर किस्से!

सौन्दर्य's picture

24 Jan 2017 - 4:48 am | सौन्दर्य

खूप वर्षांपूर्वी आम्ही आमच्या कंपनीच्या एका रौप्य महोत्सवात पु.लं.च 'सदू आणि दादू' हे नाटक सादर केलं होतं. त्यातील ऑफिसातल्या शिपायाच्या तोंडी एक वाक्य आहे "सायबाच्या कपाटाला ताला तर ते काय मी फोडू ?" इथे 'फोडू' वर जोर देणे अपेक्षित होते, परंतु शिपायाचे काम करणारा कलाकार तालमीच्या वेळीस प्रत्येक वेळी 'मी' वर जोर द्यायचा. मग डायरेक्टर चिडून ओरडायचा, "तू नको मीच फोडतो' आणि मग हशा पिकायाचा. दहा पैकी नऊ वेळा असेच घडले त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगात आमच्या छातीत धडधड होत राहिली. पण गंमत म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगात त्या कलाकाराने वाक्य बरोबर म्हंटले आणि आम्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

शरभ's picture

24 Jan 2017 - 7:29 pm | शरभ

ओह पोट दुखायला लागलं राव..

- श

arunjoshi123's picture

25 Jan 2017 - 11:38 am | arunjoshi123

भारी किस्से.

स्मिता श्रीपाद's picture

25 Jan 2017 - 2:16 pm | स्मिता श्रीपाद

काय भारी किस्से आहेत एकेक
हासुन हासुन पोट दुखायला लागलं..

नूतन सावंत's picture

26 Jan 2017 - 4:24 pm | नूतन सावंत

मस्त ,मस्त,किस्से.