व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर
जीवना नाराज मी नाही तुझ्यावर
मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला
आठवांनो घाव घाला.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे टाळते मी
आठवांची वाट झाली खूप खडतर
तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या
या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर
आपले नाते सुगंधी राहिले ना
पण तरी सजवू फुलांनी आपुले घर
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला
सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर?
- प्राजू
प्रतिक्रिया
11 Dec 2016 - 8:53 am | मदनबाण
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)
11 Dec 2016 - 6:23 pm | रातराणी
_/\_ !!
11 Dec 2016 - 6:34 pm | मारवा
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
मनाचे व्यथेने गर्भार होणे.........
हे फारच सुंदर जमलयं
12 Dec 2016 - 8:13 am | रेवती
वाह! कविता आवडली.
12 Dec 2016 - 10:37 am | खेडूत
छान!