अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक ३.......

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
3 Dec 2016 - 2:26 pm

आज खूद्द जयपूर मध्गे फेरफटका मारावा व उद्या शहराच्या जरा बाहेरील ठिकाणे पहावीत असा बेत सर्वानुमते ठरला. साधारण पावणेनउ चे सुमारास बाहेर पडलो. प्रत्येक हॉटेल समोर दोन चार रिक्षावाले दिवसभराचे पूर्ण गिर्‍हाईक मिळेल या आशेने उभे असतात. आम्ही बाहेर पडतो आहोत हे पहाताच एक़जण आला . आम्हाला अल्बर्ट हॉल संग्रहलयाच्या जवळ सोडणार का असे बोलल्यावर तो तयार झाला. दहा एक मिनिटात आम्ही अल्बर्ट हॉल परिसरात येऊन पोहोचलो. जयपूर मधील ही अतिशय सुरेख अशी इमारत आहे.
.
समोरून अल्बर्ट हॉल संग्रहालय व परिसर.
.
.
ही इमारत इन्डो सरसेनिक किंवा दुसर्‍या शब्दात इन्डॉ गॉथिक शैलीत बांधलेली असून तिचा आराखडा सॅम्यल स्वेन्टन जेकब या वास्तुविदाने तयार केला होता. १८८७ साली हे संग्रहालय खुले केले गेले व ते राजस्थान मधीला आद्य संग्रहालय आहे.आज ते राजस्थान सरकार चालवते. या शैलीत मिनार, कांद्याच्या आकाराचे घुमट, ओपन पॅव्हिलियन ( उदा दिवाण ए आम) असे अनेक मूलभूत गोष्टी यात समाविष्ट असतात. भारतातील गेट वे ऑफ इन्डिया,ताज हॉटेल. विक्टोरिया मेमोरिअल, सी एस टी, मद्रासा हायकोर्ट मैसूर राजवाडा ई वानगी दाखल उदाहरणे. अर्थातच नावावरून कळेल की अल्बर्ट हा सातवा एडवर्ड .त्याच्या नावाचे के संग्रहालय आहे.

आम्ही संग्रहालय प्रवेशाची तिकिटे खरेदी केल्यावर लक्षात आले की जयपूर मधे समावेशक प्रवेशाचे ३०० रूपयाचे तिकिट मिळते.
पण आता चूक तर झाली. पण जाउ द्या असे म्हणून . प्रवेशा साठी सज्ज झालो.
.
प्रवेश करतानाच कळले की फोटोग्राफी करण्याची परवानगी आहे. हे प्रवेशाचे दार. या लोखंडी दारात गिअर्स असलेले एक यंत्र बसविले आजे. हे व्हिजिटर मोजण्याचे एक जुने यंत्र आहे. दिवसभरात चक्र जितक्या वेळा फिरेल तितक्या वेळा आतील चक्रे फिरतात व त्यातून येणार्‍यांची संख्या मोजली जाते. हे जुने फॅसिट मशीन .

तळमजल्यावर इटालियन , तुर्की,जपानी, चायनीज तसेच भारतीय "ब्लू पॉटरी" चे विविध आकारात नमुने ठेवलेले आहेत.

.
तसेच सहा फूट उंचीची ही ढाल " रामायण ढाल " आहे. जिच्या दर्शनी भागावर रामायणातील काही निवडक प्रसंग कोरलेले आहेत.या ढालीच्या पाठीस पाठ लावून " महाभारत ढाल" ही आहे. काही गालीचे, शालू , अंगरखे यांचे सिल्कचे नमुने ही आहेत.
.
जिन्याने वर गेल्यावर वर एकामागे एक अशा तीन ग्यालर्या आहेत.गॅलरीच्या दोन्ही बाजूनी बाहेरून एक एक पॅसेज व आतल्या भागात मध्य भागी मोकळा भाग सोडून सभोवर पुन्हा एक पॅसेज अशी रचना आहे. आतील भागात भारतीय मिनिएचर मधे असलेली अगदी तजेलदार रंग व बारीक एक केसाच्या ब्रशाने केलेले काम दिसते. चित्रांत निरनिराळे ॠतू , राग, रागिण्या, दैनंदिन जीवनातील काही प्रसंग, नवरस, लढाया ई नाना विषय आलेले आहेत. अर्थात मिनिएचर मधील बारकावे उदा झाडात लपलेले पक्षी, पाण्यात दिसणारे मासे , गालिच्यावरची नक्षी ई पहाताना त्यातील परस्पेक्टीव्ह चा व प्रमाणबद्धतेचा अभाव नजरेला खटकतो. कदाचित असे होणे हेच या शैलीची " खासीयत असावी.
.
बाहेरील पॅसेजमधे संग्रहालयात असतात तसे महावीर, बुद्ध, अप्सरा ई ई चे अमुक वे शतक अशा तपशीलासह पाहायला मिळतात. या खेरीज अन्य संग्रहालयाप्रमाणे चिलखते, तलवारी , ढाली,जम्बिये , कट्यारी असा ऐवज ही पहावयास मिळतो.
.
ही ममी खरी असून तिचे एक्स रे फोटो देखील पहायला ठेवले आहेत.
.
विश्वास बसतो का ? वरील पॅनल केवळ सहा इंच उंचीचे आहे. मग त्या मधील जाळीचे काम कसे केले असेल कलाकाराने ?
आपल्या धाग्याला नाव आहे अश्मवैभव ... कलाकाराप्रमाणेच काही श्रेय संगमरवर या अश्म प्रकारालाही जाते.
.
ही पेटी हस्तीदंतात केली असून तिची लांबी ही केवळ सहा इंच आहे. इथे इतर अशा वस्तू ही आहेत.
.

येथील मिनिएचर संग्रहातील एक वेगळे चित्र . " चायवाला" काय करिष्मा करू शकतो हे आपण पहात आहोतच.
.
बॅटरी वर चालणारी " हलकी फुलकी" वाहन व्यवस्था.
दीडेक तास संग्रहालयाचा आनंद घेऊन बाहेर पडलो. बाहेर आल्यावर आता नाष्टा काय कुठे करावा असा विचार करून समोरच एक गाडीवर मिळणारे गरम गरम छोले भटोरे पोटात ढकलले. मटकी भेळ टाईप असलेली भेळ खाल्ली. व जवळच असलेले जयपुरचे प्राणी संग्रहालय पाहाण्यासाठी तिकिटे घेऊन आत शिरलो.
.
हे मोर अगदी चार फुटावर वावरत होते. पाउस यायचा नव्हता सबब मोराने पिसारा फुलवण्याचा प्रश्नच नव्हता तरीही त्याच्या मानेवरचा तो निळसर मोरपन्खी नैसर्गिक " डाय" डोळ्याचे पारणे फेडीत होता.
.
एक पिंजरा सुसरी व मगरी साठी ही होता. इथे मगरींची संख्या कशी वाढेल याचे काही संशोधन केले जाते अशी महिती मिळाली.
त्यातील या दोन - गन्स ऑफ नॅव्हरॉन

एक तास भर निरनिराळे प्राणी पहात. त्यांच्यावर काही कोट्या करीत. वेळ गेला. संग्रहालयाच्या बाहेर आलो. आता हवामहल ला जावे म्हणून रिक्षाची वाट पहातो तो ही रिक्षा समोर आली.बॅटरीवर चालणारी.रात्रभर चार्ज केली की दहा तास॑ चालते. यातही एकमेकाकडे तोंड करून चार माणसे आरामात बसू शकतात. जयपूरची बस व्यवस्था हे एक पर्यटन स्थळ आहे किंवा राज्याच्या राजधानीचे शहर आहे याचे प्रतिबिम्ब दखविणारी नाही. पुण्याच्या मानाने ती अगदीच तोकडी म्हणजे नाशिक मधे
आलो की काय असे वाटणारी आहे. त्यात काही मिनी बसेच व काही लोफ्लोअर बसेसचा समावेश आहे. पण एकूण बसचा आनंद आहे. याउलट चार सीटची प्याजो ही आटो ही येथील वहातुक व्यवस्थेचा कणा आहे. पुण्यात दुचाकीला जे स्थान आहे ते जयपूमधे प्याजो ला.

पाच मिनिटात हवामहल च्या द्वारापाशी आम्हाला रिक्षावल्याने आणून सोडले. आत आवारात काही दुकाने क्लोक रूम , तिकिट ऑफीस ई सोयी आहेत. इथे आम्ही प्रत्येकी ३०० रूपये देऊन प्रवेशाचे सर्वसमावेशक तिकिट घेतले .
व हवामहलच्या मुख्य इमारतीत शिरलो.

१७९९ मधे महाराजा प्रतापसिंग यानी ही वास्तू बांधून घेतली. त्यासाठी त्यानी लालचंद उस्ताद या वास्तुविदावर रचनेचे काम सोपविले होते. याचा आकार कृष्णाच्या मुकुटासारखा आहे. जसे वर जाल तसा निमुळता होत जाणार . वर जायला काही ठिकाणी उतरण तर काही अरूंद अशा जिन्यांमधे पायर्‍या आहेत. हवामहलमधील खिडक्या २फूट बाय २ फूट या आकारापासून लहानात लहान ६ इन्च बाय ६ इन्च अशाही आहेत.
.
.

काही जागी हे असे रंगीत काचांचे काम केलेले दिसते. ही संपूर्ण इमारत लाल व गुलाबी सॅन्डस्टोन मधे बांधण्यात आलीय. काही खिड्क्या रत्यावरील जनजीवन पहाण्यासाठी खुल्या असल्या तरी बहुतेकाना तारेने बांधण्यात आलेय.
.

हवामहलची पुढची बाजू जशी प्रेक्षणीय तसा या वास्तूचा मागील भाग देखील कमी पडत नाही.
.
हवामहल ही वास्तू समोरून पाहिली की वाटते की इमारत फारशी रुंद नसेल पण खरी स्थिती अशी आहे.
.
हवामहल वरून दूर नाहरगड असा दिसतो.
.
हवामहलला लागूनच मागे असलेले जंंतर मंतर व सिटी पॅलेस.
.
हवामहलच्या मागे सिटी पॅलेस.

हवामहल पाहून झाल्यावर त्याच्या जवळच एका जागी. भोजन केले. जयपूरमधे भोजन फारच महाग आहे. या वेळी नैनिताल च्या महाग जेवणाची मला याद आली. असे जेवण जयपूर येथील गरीब कामकर्‍याला बाहेर घेताच येत नाही असा अनुभव एका स्वयंपाक्याने सांगितला. इथे झुणका भाकर अशा सारख्या योजनाही कुठे दिसल्या नाहीत.

मी भारतात बरीच भटकंती केली पण जयपूर सारखा बाजार कुठेच नाही. येथे एकाच भागात जवळ जवळ ४ हजार दुकाने आहेत असे रिक्षावाल्याने सांगितले त्यातील आम्ही फक्त १ टक्का बाजार पाहू शकलो. असा बाजार कदाचित चांदनी चौक जुनी दिल्ल्ली येथेच असेल.
.
काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या व्यवसायांपैकी एक कल्हईवाला.

आता आजच्या दिवसातील प्लान मधे फक्त सिटी पॅलेस व जंतरमंतर ही ठिकाणे पहायची राहिली होती.
हवामहल ला लागूनच यांचे परिसर आहेत. सबब चालतच निघालो. व सरळ प्रवेशद्वारात आमचे सर्वसमावेशक तिकीट दाखविले तो काय? या तिकीटावर प्रवेश मिळणार नाही असे समजले. कारण काय तर आजही सिटी पॅलेस ही खाजगी मालमत्ता आहे. तिचे वेगळे तिकीट तब्बल १३० रू प्रत्येकी आहे. या पॅलेसचे दर्शन आपल्याला काही चित्रपटात झाले आहे. पण प्रत्यक्ष इथे पहाण्यासारखे फारसे काही नाही. प्रवेश घेतल्यावर डाव्या बाजूस वळले की त्यांचा तो सभा महल हॉल आहे त्यात प्रवेशल्यावर कळते फोटो ची परवानगी नाही. अर्थात त्या दरबारात फारसे काही पहाण्यासारखे ही नाही. पाचच मिनिटात बाहेर आलो.
.
या पॅलेस मधे आता फक्त मधल्या अंगणात एक चौथरा व त्यावर .. ही मुबारक महाल नावाची इमारत आहे . बाकीच्या कोणत्याही भागात आपल्याला प्रवेशच दिला जात नाही. अशा इमारतीत चंद्र महाल व महारानी पॅलेस यांचा समावेश आहे.
.
सिटी पॅलेसच्या दिवाण ए आम मधे ठेवलेले हे सहा ते आठ फूट उंचीचे पात्र.
.
बंदुकांचा " वॉलपीस"
सिटी पॅलेस ला रामराम करून लगतच्या जंतरमंतर ला गेलो. इथे मात्र सर्वसमेवेशक तिकिट चालले. पण तेथील प्रत्येक यंत्राची माहिती इतकी तोकडी दिलेली आहे . की अगोदर अभ्यास करून तिथे गेले नाही तर काहीही समजत नाही. बरेचसे प्रवासी या यंत्राच्या माहितीच्या भानगडीत न पडता ग्रूप फोटो व सेल्फी घेण्यातच मग्न होते. एका यंत्रात मात्र सावली वरून आता दुपारचे सव्वा चार वाजले आहेत हे उलगडत होते. जंतरमंतर आटपल्यावर मग महिलामंडळाच्या आग्रहाखातर एका बाजार गल्लीत ड्रेसेस खरेदी करण्यासाठी शिरलो. इथे काचेच्या बाहेर एका बाकावर बसलो. दुकानदार म्हणाला " साहेब आत या की " मी म्हटले ते महिलामंडळ आत आहे तेच बरे आहे. त्यांचा तो खरेदीच्या घोळ वेदना देणारा असतो मी बाहेरच
बरा आहे ! " हे ऐकून दुकानदारही हसू लागला. तिथे पाउणएक तास गेल्यावर हॉटेलवर परतलो . दिवस संपला.

प्रतिक्रिया

जबराट झालाय हा भाग. वर्णनशैली छानच आहे. हवामहल आतल्या बाजूने इतका अरुंद असलेला पाहून अपेक्षाभंग झाला. अल्बर्ट हॉल म्युझियम खूपच सुरेख आहे.

चौकटराजा's picture

3 Dec 2016 - 4:07 pm | चौकटराजा

हवा महालाचा मुकुट अरुंद असला तरी त्यामागे एक भक्कम व मोठी इमारत उभी आहे व त्या अरुंद अशा भागातून वर जाण्यात एक मजा आहे.

कंजूस's picture

3 Dec 2016 - 4:48 pm | कंजूस

झकास!
फोटो सर्व दिसताहेत.
तिकिटे हल्ली फारच वाढवल्याने आणि आतल्या वस्तुंचे फोटो इतरत्र चांगले पाहायला मिळत असल्याने कॅम्र्याचे तिकिट घेण्याचे टाळतो.

एस's picture

3 Dec 2016 - 6:15 pm | एस

झक्कास!