लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी
उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी
लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा
धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा
शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी
टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी
होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी
तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी
बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी
रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा
शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा
वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे
मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे
जे भुकेले भोवताली, पोरके असती किती
वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती
- शार्दुल हातोळकर
प्रतिक्रिया
27 Oct 2016 - 11:42 pm | गौरी कुलकर्णी २३
खुप छान कविता.... शेवटच्या चार ओळी ह्या दिवाळीचा खरा अर्थ सांगून जातात. सर्वांना दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ! आपणां सर्वांचे आयुष्य त्या दिव्यांप्रमाणे लख्ख उजळावे , हिच त्या परम मंगल ईश्वराला प्रार्थना !!!
27 Oct 2016 - 11:48 pm | सौन्दर्य
दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला.
28 Oct 2016 - 5:54 am | अत्रुप्त आत्मा
अप्रतिम.
28 Oct 2016 - 8:13 am | राजेंद्र देवी
एकदम मस्त...
दीपावलीच्या शुभेच्छा
28 Oct 2016 - 12:52 pm | शार्दुल_हातोळकर
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिवाळी आपणा सर्वास मंगलमय जावो आणि आपणास सुख, समृद्धी, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! __/\__
28 Oct 2016 - 12:56 pm | यशोधरा
धन्यवाद! आपणास व आपल्या कुटुंबियांनाही दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा!
29 Oct 2016 - 8:21 am | हतोळकरांचा प्रसाद
व्वा!! खूप छान! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!