हळवा कप्पा..

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
15 Oct 2016 - 11:44 am

आपल्या मनात एक ‘कप्पा’ असतो. ‘आठवणींचा कप्पा’!.. उभ्या आयुष्यातल्या असंख्य आठवणी त्या कप्प्यात खचाखच भरलेल्या असतात. भरपूर साठवणक्षमता असलेल्या एखाद्या ‘पेन ड्राइव्ह’मध्ये वेगवेगळा ‘डाटा’ आपण ‘सेव्ह’ करून ठेवतो, तशा.. कधीतरी आपण तो पेन ड्राइव्ह ओपन करतो आणि जुना डाटा समोर येतो. तोपर्यंत या साठवणुकीतल्या अनेक गोष्टींचा आपल्याला पत्ताही नसतो. अचानक एखादी सेव्ह करून ठेवलेली ‘फाइल’ समोर येते, आणि ती न्याहाळताना आपण हळवे होतो..
आठवणींच्या या कप्प्याचेही तसेच असते. या कप्प्यात इतक्या आठवणी भरलेल्या असतात, हेच आपल्याला आठवत नसते. अचानक त्या कप्प्यातल्या आठवणींच्या एखाद्या फाइलवर नकळतच ‘क्लिक’ होते. ती आठवण लख्खपणे समोर येते आणि आपणच अचंबित होऊन जातो.. ही आठवण आपल्या मनाच्या कप्प्यात जशीच्या तशी, ताजी टवटवीत आहे, याचं आश्चर्यही वाटतं.
..आणि आपण त्या आठवणीत रमून जातो.
बालपणीच्या आठवणींनी या कप्प्याचा एक कोपरा अधिकच हळवा झालेला असतो. आपणही अनेकदा या हळव्या कप्प्यात सेव्ह केलेला बालपणीच्या आठवणींचा डाटा अनुभवत पुन्हा लहानपणात रमून जातो.
कुणा एखाद्याच्याच बाबतीतच असं घडतं, असं नाही. असं घडण्याला वयाचं बंधन नसतं. बालपण सरून तारुण्यात पदार्पण केलेल्या, तारुण्यातून वार्धक्याच्या उंबरठय़ावर पाऊल टाकलेल्या किंवा त्याही पुढचा वयाचा टप्पा गाठलेल्या प्रत्येकाच्या मेंदूतला हा, लहानपणीच्या आठवणींचा कप्पा प्रत्येकानंच जिवापाड जपलेला असतो.. तो आपल्या उभ्या आयुष्याची जणू शिदोरीच असतो..
एखाद्या वेळी, आसपासच्या गर्दीतही, आपण आपले एकटेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, तेव्हा हा कप्पा अगदी हमखास उघडतो. गर्दीतूनच, या कप्प्यावर क्लिक करणारं काहीतरी घडून जातं. शेजारीच बसलेल्या कुणाला खूप दिवसांनंतर बालपणीचा कुणीतरी अचानक भेटतो आणि ते दोघं लहानपणीच्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर झोके घेऊ लागतात.. मग आपल्या मनातल्या त्या आठवणींच्या कप्प्यावर आपोआप क्लिक होतं..
..परवा बसमधून प्रवास करताना, बाकडय़ावरच्या शेजारच्या रिकाम्या बाकावर बसण्यासाठी कुणीतरी मला खुणेनंच थोडं सरकण्यास सांगितलं. मी आणखी आत सरकलो, तो माणूस शेजारी बसला. तिकीट काढण्यासाठी त्यानं खिशात हात घातला आणि चिल्लर बाहेर काढली. बरीचशी नाणी त्याच्या हातात होती. त्यानं कंडक्टरकडे तिकीट मागितलं आणि मोजून काढलेली काही नाणी कंडक्टरच्या हातावर ठेवली.
नाणी देणारा प्रवासी भेटल्यानं कंडक्टर खूश झाला होता. त्यानं चिल्लर मोजायला सुरुवात केली आणि त्याचा चेहरा आंबट आंबट होऊ लागला. काही नाणी बाजूला काढून त्यानं त्या प्रवाशाला परत दिली.
‘काका, ही नाणी चालत नाहीत आता.. रुपयाचं नाणंसुद्धा केवढंस झालंय बघितलंत ना.. चवलीपावलीला किंमत नाही आता. ठेवा तुमच्याकडेच’.. कंडक्टर खिल्लीच्या सुरात म्हणाला आणि त्या प्रवाशाचा सुरकुतला चेहरा ओशाळा झाला. त्यानं ती सारी नाणी परत घेतली आणि खिशातून नोट काढून कंडक्टरला दिली. माझ्याकडे बघून कसंनुसं हसत त्यानं तिकीट खिशात ठेवलं.
..आणि ती नाणीही नीट, जपून पुन्हा खिशात ठेवली. त्यांना पैशाचीही किंमत नाही, हे कळूनसुद्धा!
मी त्याच्याकडे पाहात होतो. त्यानं खिशात ठेवलेल्या सुट्टय़ा नाण्यांमध्ये पंचवीस पैशांचं एक गोल नाणं होतं. एका बाजूला वाघाचं चित्र असलेलं. वीस पैशांचंही एक नाणं होतं. जुनं. चकचकीत तांब्यापितळ्याचं.. बाकीची नाणीही अशीच.
ती नाणी दिसली आणि आठवणींच्या कप्प्यावर क्लिक झालं.
घरी आलेल्या एखाद्या पाहुण्यानं, निरोप घेताना चार आण्याची दोन-चार नाणी हातावर ठेवली, की ती दप्तरात ठेवताना आपण कोण श्रीमंत झाल्यासारखं वाटू लागायचं.
एखाद्या वेळी त्यातलं एखादं नाणं देऊन घेतलेले खिसाभर चणे-शेंगदाणे, मास्तरांची आणि मित्रांची नजर चुकवून खाता खाता शाळा सुटायची वेळ व्हायची.. कधीतरी मधल्या सुट्टीत, शाळेबाहेर आइस कांडीवाल्याची गाडी घंटा वाजवत खुणावायची आणि खिशातले चार आणे बाहेर यायचे. मस्त मलईदार कुल्फीची कांडी खाताना आपण कुणीतरी विशेष आहोत, असं आपलं आपल्यालाच वाटत राहायचं.. खिशात चार आणे असले आणि कधीतरी मोठय़ांची नजर चुकवून मिसळ, कांदाभजीही खावीशी वाटली तरी जगाची पर्वा नसायची.. एखाद्या सुट्टीच्या दिवशी, मित्रांबरोबर गावाजवळच्या एखाद्या निवांत जागी सहल ठरवताना, चारचार आण्यांची वर्गणी पोटभर भेळीसाठी भरपूर व्हायची.. चार आण्यांच्या त्या नाण्याचं बऱ्याच दिवसांनी घडलेलं हे दर्शन मला पुन्हा हळवं करून गेलं.
आज चलनाबाहेर गेलेल्या त्या चार आण्यांची किंमत आपल्या आठवणीच्या हळव्या कप्प्यात खूप मोठी आहे, असं वाटून गेलं. आपलं अवघं बालपण त्या चार आण्याच्या नाण्याभोवती अनेक अंगांनी गुंफलं गेलंय, हे जाणवलं.. मन हळवंहळवं होऊन गेलं.
प्रवास संपेपर्यंत ही हळवी आठवण मनात रेंगाळलेलीच होती. घरी पोहोचल्यावर सहज कॅलेंडरवर नजर गेली.
पुन्हा एकदा मनाच्या कप्प्यावर क्लिक झालं.
३० जून.. पाच वर्षांपूर्वी, ३० जून २०११ या तारखेलाच पंचवीस पैशांचं ते नाणं रिझव्‍‌र्ह बँकेनं अधिकृतपणे चलनातून हद्दपार केलं होतं.
त्याच्या निर्मितीचा खर्च त्याच्या किमतीपेक्षा जास्त होतो, म्हणून! तरीही ते नाणं त्यानं जपलं होतं.. पैसा म्हणून त्याला किंमत नसेल, पण त्याच्यासाठी ते नाणं किमती होतं.
बसमधल्या त्या सहप्रवाशाचा मला उगीचच हेवा वाटून गेला!

मुक्तक

प्रतिक्रिया

सतोश ताइतवाले's picture

15 Oct 2016 - 12:39 pm | सतोश ताइतवाले

खूप छान योग्य मांडणी
प्रत्येकाच्या आठवणींचा एक आनंदी एक दुखी कप्पा असतोच

एस's picture

15 Oct 2016 - 2:15 pm | एस

मुक्तक आवडले.

पद्मावति's picture

15 Oct 2016 - 3:19 pm | पद्मावति

छान लिहिलंय. आवडलं.

Aashu's picture

15 Oct 2016 - 5:04 pm | Aashu

खूप छान..!!

पैसा's picture

15 Oct 2016 - 5:32 pm | पैसा

छान लिहिलंय

यशोधरा's picture

15 Oct 2016 - 6:27 pm | यशोधरा

छान लिहिलंय.

खुप छान लिहिले आहे. लेख आवडला.

सस्नेह's picture

17 Oct 2016 - 12:20 pm | सस्नेह

छान लिहिलंय.