गॅरेज युनिव्हर्सिटी...१
(सर्व पात्रे व घटना काल्पनिक)
"विज्या कुठे आहे रे?"
"अरे तो काल रात्रीच गोव्याला गेलाय, येईल तीन चार दिवसांनी, पण तू कसा काय आज सकाळी सकाळी उगवलास?" बाबू शेठचा परिचित आवाज ऐकून फियाट च्या खालूनच कुठलेतरी नट बोल्ट टाईट करता करता अज्या दादा विचारता झाला.
"आयला पहाटे माझा सासरा गचकला, बायको आणि मेव्हण्याला अर्जंट पुण्याला सोडून यायच होतं. विज्या आला असता ना रे पटकन जाऊन."
आता मात्र पाठीवर सरपटत अज्या दादा गाडीच्या खालून बाहेर येत म्हणाला " काय झालं रे त्यांना अचानक? आणि तू नाही का जाणार?"
"हार्ट अटॅक आला होता रात्री... पहाटे खपला. माझ्या केस ची आज फायनल हिअरिंग आहे निर्दोष सुटलो तर मी कोर्टातून डायरेक्ट पुण्याला जाईन नाहीतर जेल मध्ये." बाबूशेठ हसत हसत म्हणाला.
"सुटशील लेका ह्या वेळी पण. आता तू काय पहिले सारखा गावगुंड राहिला नाहीयेस, नामचीन बिल्डर आणि राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहेस. बस दहा मिनिटं, रामजीला बोलवून घेतो, तो येईल त्यांना सोडून, तो पर्यंत चहा मागवू."
अज्या दादानी गणपतला रघुमामा च्या टपरीवर चहा सांगून येताना रामजी ला बोलवायला पाठवला. चहा घेऊन रघुमामा आणि त्याच्या पाठोपाठ रामजी पण आला. मग बाबूशेठनी ५५५ चं पाकीट काढून सगळ्यांना सिगरेट वाटल्या. चहा सिगरेट चा आस्वाद घेताना रामजी ला सगळी स्टोरी ऐकवली आणि त्याला पुण्याला जायची विनंती केली जी त्याने लगेच मान्य केली. ह्या बाबूशेठचं एक वैशिष्ठ्य होतं, तो आज कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या जुन्या मित्रांना विसरला नव्हता, हां आता पूर्वी सारखं त्याला रोज गॅरेजवर येऊन चकाट्या पिटायला वेळ नसायचा पण अधून मधून त्याची चक्कर हमखास असायची.
बाबूशेठची अँबॅसेडर घेऊन तो आणि रामजी निघून गेल्यावर अज्या दादा परत एकदा पाना घेऊन फियाट च्या खाली घुसला.
-----:-----:-----
माझं नाव श्याम, आटपाट नगरात मी राहत असलेल्या पांडुरंग निवास ह्या आमच्या बिल्डिंगला लागूनच असलेल्या चाळीत, माझ्या जन्माच्याही कैक वर्षे आधी १९७० च्या आसपास कृष्णा फोंडेकर यांनी सुरु केलेले, रेल्वे स्टेशन च्या अगदी जवळ, रेल्वे लाईनला समांतर रोड वर नेहरू बागेच्या समोरच असलेले हे 'अजय ऑटो गॅरेज' त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले अजय फोंडेकर आणि विजय फोंडेकर हे सांभाळत होते. मूळचे गोव्याचे असलेले कृष्णा फोंडेकर निष्णात मेकॅनिक होते आणि त्यांच्या हाताखाली दोन्ही मुलं पण छान तयार झाली होती त्यामुळे कामाची अजिबात कमतरता नव्हती. अगदी लुना पासून ते ट्रक पर्यंत कुठलीही गाडी इथे रिपेअरिंगला यायची. त्यात अज्यादादा आणि विज्यादादा हे जगमित्र त्यामुळे दिवसभर गिऱ्हाईकांचा आणि मित्र मंडळींचा राबता असायचा. पुढे १० x १० चा दुकानाचा गाळा आणि त्याला लागुनच असलेल्या ३ खोल्यांमध्ये आई, २ बहिणी आणि हे २ भाऊ असे पाच जणांचे फोंडेकर कुटुंब त्यांच्या दोन कुत्र्यांसह राहत होते. त्या छोट्याशा गाळ्यामध्ये फक्तं भलामोठ्ठा टूलबॉक्स, एक स्टील चे कपाट आणि एअर कॉम्प्रेसर एवढंच सामान आणि पुढच्या मोकळ्या जागेवर पत्र्याची भलीमोठी शेड असे त्या गॅरेज चे स्वरूप होते.
मी आणि शेजारच्या कर्णिकांच्या वाड्यात रहाणारा माझा बालमित्र सुनील शाळा सुटल्यावर घरी जाऊन जेवण झालं रे झालं कि लगेच गॅरेज वर हजर व्हायचो. वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरायला मिळणे, कुत्र्यांना घेऊन समोर बागेत फिरायला जाणे, शेडच्या एका कोपऱ्यात स्टँड वर ठेवलेल्या चॅम्पियन बोर्ड वर कॅरम खेळणे, तिथे जमणाऱ्या आमच्यापेक्षा वयाने बऱ्यापैकी मोठ्या मंडळींच्या धमाल गप्पा ऐकणे अशा अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी यायला आकर्षित करायच्या. मात्र संध्याकाळ नंतर तिथे जायला आम्हाला आमच्या घरच्यांची परवानगी नव्हती, कारण संध्याकाळ नंतरचे तिथले वातावरण वेगळे असायचे. संध्याकाळी सहा-साडेसहाला गॅरेज बंद झालं कि ताडपत्र्या लावून शेडचा दर्शनी भाग झाकला जायचा आणि मग आत दारूकाम सुरु व्हायचे. कधी पिता पिता पत्ते खेळायचे तर कधी बोनी एम च्या कॅसेट लागायच्या, कधी नुसत्याच गप्पा चालायच्या, कधी आपआपसात त्यांची भांडणे व्हायची तर काहीवेळा मारामाऱ्याही व्हायच्या. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात तशी एवढ्या वेगवेगळ्या स्वभावाची, पेशातली आणि सामाजिक स्तरातली मंडळी एकत्र आली कि अशा गोष्टी व्हायच्याच, पण कौतुकाची बाब अशी कि, दुसऱ्या दिवशी मात्र आदल्या संध्याकाळी किंवा रात्री घडलेल्या कटू प्रसंगाची कोणाला आठवण पण नसायची, रात गयी – बात गयी ह्या म्हणीप्रमाणे नव्या संध्याकाळी परत नव्या उत्साहात मैफिल जमायची. गॅरेजवर जमणाऱ्या मित्रमंडळीं मधली प्रत्येक व्यक्ती हि एकेक वल्लीच होती, त्यातल्याच एकाच्या म्हणजे पम्यादादा च्या भाषेत सांगायचे तर इथे येणारी सगळी माणसे ‘ओवाळून टाकलेली’ अशी होती. आणि त्याच्या म्हणण्यात काही अतिशयोक्ती पण नव्हती.
काय पण एकेक कॅरेक्टर्स होते, स्वतः गॅरेजचे मालक ‘अज्यादादा’ आणि त्याचा लहान भाऊ ‘विज्यादादा’, (हा त्यामानाने गॅरेजवर कमी असायचा कारण तो पट्टीचा ड्रायव्हर होता आणि त्याकाळी स्मगलिंग जोरात चालू असल्यामुळे मालाची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या स्मगलर लोकांचा फेवरीट होता त्यमुळे बऱ्याचदा तो बाहेरगावीच असायचा.)
तीन घरं सोडून पुढे रहाणारा, अँबॅसेडर भाड्यानी देणारा चालक-मालक ‘रामजी’, पूर्वाश्रमीचा गावगुंड, पण आताचा यशस्वी बिल्डर आणि एका राजकीय पक्षाचा शहरप्रमुख ‘बाबुशेठ’, सूट-बुट घालून फिरणारा आणि मोठ्या आवाजात बोलणारा सिमेन्सचा मॅनेजर हेमंत उर्फ ‘हेम्या’, श्री दत्त हेअर कटिंग सलून वाला प्रकाश चव्हाण उर्फ ‘पक्या’, सतत पान खाऊन कायम रंगलेले तोंड घेऊन फिरणारा रिक्षावाला ‘नानू’, न्यू जनता बॅग हाऊस वाला फकरुद्दीन शेख उर्फ ‘फकरु’, हेरंब गणेशमूर्ती कारखाना वाले महेश आणि मंगेश हे वेदक बंधू, स्टार ऑटो स्पेअरपार्टस वाला किरण उर्फ ‘बॉस’, सुवर्णा ज्वेलर्स वाला सुधीर धोत्रे, महाराष्ट्र बँकेत काम करणारा सतीश चित्रे उर्फ ‘सत्या’, फ्रांसिस टेलर, आर्कीटेक्ट प्रशांत कुलकर्णी, मटक्याचा अड्डेवाला ‘बाबाजी’, स्टोव्ह रिपेअरिंग वाला एकनाथ, समाधान उडपी हॉटेलवाला दिनकर उर्फ ‘दिन्या’, कानिफनाथ रसवंती गृह वाला गंगाधर उर्फ ‘गंग्या’, साईनाथ आर्ट्स वाला अशोक पेंटर, वडापाव आणि चहाची टपरीवाला राघुमामा, सतनाम टायर्स वाला करणबीर सिंग उर्फ ‘ग्यानी’ हा धिप्पाड सरदारजी, श्रीकृष्ण दुग्धालय वाला रामानुज तिवारी उर्फ ‘भय्या’, ए-वन पान सेंटर वाला कमल उर्फ ‘छोटू’ अशी हि बिनधास्त, जगाची पर्वा न करणारी नानाविध प्रकारची पात्रे आपापल्या सवडीनुसार हजेरी लावायची.
माझ्या आणि सुनील साठी हे गॅरेज म्हणजे एक विद्यापीठच होते. कॉलेज शिक्षण पूर्ण होउन कामधंद्याला लागेपर्यंत आम्ही ह्या विद्यापीठाचे नियमित विद्यार्थी होतो. ह्या युनिव्हर्सिटी मध्ये अशा अनेक गोष्टी ज्या कुठल्याही शाळा आणि कॉलेजात शिकवल्या जात नाहीत त्या आम्हाला शिकायला व बघायला मिळाल्या.
तर अशा ह्या आमच्या गॅरेज युनिव्हर्सिटीत घडलेल्या काही गमतीशीर घटना या लेख मालिकेतून आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
-----:-----:-----
टिप: माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे जर कुठे काही चुकलं असेल, काही त्रुटी असतील तर आपल्या प्रतिसादा द्वारे जरूर कळवा.
आपला,
टर्मीनेटर.
प्रतिक्रिया
5 Oct 2016 - 9:11 pm | खेडूत
वाचतोय.
पात्रे भरपूर आहेत, किस्सेही असणार.
येऊद्या पुढचा भाग लवकर. शेवटी (क्रमशः ) लिहायला विसरु नका!
6 Oct 2016 - 8:06 am | टर्मीनेटर
नक्की...
5 Oct 2016 - 10:06 pm | शलभ
मस्त सुरुवात..
5 Oct 2016 - 10:33 pm | एस
वाचतोय.
5 Oct 2016 - 10:38 pm | यशोधरा
वाचते आहे...
5 Oct 2016 - 11:46 pm | सुखी
वाचतोय....
6 Oct 2016 - 8:07 am | टर्मीनेटर
धन्यवाद...
6 Oct 2016 - 10:21 am | वरुण मोहिते
बराच काही तपशीलवार पणे येउद्या पुढे .
6 Oct 2016 - 4:17 pm | टर्मीनेटर
येस बॉस.
6 Oct 2016 - 4:23 pm | आनन्दा
पु भा प्र.
6 Oct 2016 - 5:53 pm | राजाभाउ
मस्त सुरुवात. पुभाप्र.
6 Oct 2016 - 6:18 pm | जावई
वाचायला आवडेल.
6 Oct 2016 - 10:59 pm | निशदे
छान सुरुवात. पुभाप्र.
6 Oct 2016 - 11:26 pm | रातराणी
आवडले! पुभाप्र!
6 Oct 2016 - 11:52 pm | सही रे सई
नावावरूनच उत्सुकता वाटली आणि पूर्ण वाचल्यावर आता वाढली आहे की पुढे काय काय गोष्टी मिळतील वाचायला. हा भाग थोडा मोठ्ठा चालला असता. अगदीच पात्रांची ओळख होत्ये न होत्ये तो संपला पण.
पुढचे भाग थोडे मोठे टाका म्हणजे झाल.
आवडले आहे हे वेगळे सांगायला नकोच.
पहिला प्रयत्न असला तरी लिहिण्याची कला चांगली अवगत आहे तुम्हाला असे वाटते आहे.
18 Oct 2016 - 8:36 pm | टर्मीनेटर
धन्यवाद.
18 Oct 2016 - 3:38 pm | रंगीला रतन
चांगली सुरुवात , पुढे वाचायला आवडेल.
18 Oct 2016 - 8:35 pm | टर्मीनेटर
धन्यवाद.
18 Oct 2016 - 4:00 pm | सस्नेह
औत्सुक्य वाढवणारी सुरुवात.
बाकी 'गॅरेज युनिव्हर्सिटी.' हे नाव लाईकल्या गेले आहे.
18 Oct 2016 - 8:35 pm | टर्मीनेटर
धन्यवाद.
25 Jan 2022 - 5:06 pm | विजुभाऊ
पुढचे भाग कुठे आहेत?
27 Jan 2022 - 5:57 pm | चौथा कोनाडा
मस्त सुरुवात..आवडले.
पुढचे भाग ?
27 Jan 2022 - 8:04 pm | Nitin Palkar
खूप मोठ्ठा कॅनव्हास दिसतोय. चित्र नक्की रंगणार असं आत्ताच जाणवू लागलंय...
28 Jan 2022 - 2:49 pm | टर्मीनेटर
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार 🙏
सव्वा पाच वर्षांपूर्वी लेखनाचा कुठलाही पूर्वानुभव नसताना मिपावर एखादा लहानसा लेख/कथा वगैरे लिहायचे सोडून थेट लेखमालिका लिहायला घेण्याची चूक मी 'गॅरेज युनिव्हर्सिटी' च्या रूपात केली होती.
तीन भाग 'Word' मध्ये लिहून झाल्यावर पहिला भाग प्रकाशित केला आणि दुर्दैवाने माझ्या संगणकाची हार्डडिस्क क्रॅश झाली.
त्यानंतर पुन्हा ते दोन भाग आणि पुढचे भाग लिहिण्याचा माझा उत्साह मावळला. इतकेच नाही तर दीर्घलेखन करणे हे आपले काम नसून आपण केवळ वाचत राहावे आणि अगदीच काही लिहावेसे वाटल्यास मिपावर आणि फेसबुकवर छोट्या पोस्ट्स लिहाव्यात असे ठरवून टाकले 😀
मिपावर उत्तमोत्तम लेखन करणाऱ्यांची अजिबात कमतरता नसल्याने माझी वाचनयात्रा मजेत चालू होती.
अशातच इजिप्त सफरीवर असताना दोन व्यक्ती सातत्याने संपर्कात असायच्या त्यातली एक व्यक्ती म्हणजे माझी मैत्रीण (मिपा सदस्या) ज्योति अळवणी आणि दुसरी माझी बायको!
त्या सफरीत मी काय पाहतोय, काय करतोय ह्यात माझ्यापेक्षा ह्या दोघींनाच जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे डायरी लिहिल्या सारखे व्हॉटसऍपवर त्यांना लाईव्ह किंवा दिवसा अखेरीस अपडेटस देणे आणि फोटो पाठवणे त्यावेळी सुरु होते.
त्या पंधरा-सोळा दिवसात चॅटिंग मधून फार मोठ्या प्रमाणावर मजकूर लिहिला गेला होता. त्याच्या आधारावर एक प्रवासवर्णनपर मालिका मिपावर लिहावी असा आग्रह (आग्रह कसला हट्टच 😀) त्या दोघींनी धरला होता.
चॅट मेसेजेसच्या रूपात संदर्भ आणि टाईमलाईन तयार होती आणि मुख्य म्हणजे काल्पनिक काही लिहायचे नसल्याने विचार वगैरे करत बसण्याची आवश्यकता नव्हती, जे जे घडले, पाहिले तेच लिहून काढायचे होते, फोटोही भरपूर काढलेले होते अशा सर्व जमेच्या बाजू विचारात घेऊन अखेरीस दीर्घ लेखन न करण्याचा आधीचा विचार मोडीत काढून ते प्रवासवर्णन लिहायला घेतले!
एक एक भाग लिहून प्रकाशित करत सुमारे तीन महिन्यात ती 12 भागांची मालिका लिहून पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढला असला तरी 'गॅरेज युनिव्हर्सिटी' हे काल्पनिक लेखन असल्याने ते लिहिताना विचार करण्यासाठी भरपूर वेळ दयावा लागेल हे नक्की! ही मालिका अपूर्ण राहू नये असे मनोमन वाटत असले तरी पुढचे भाग लिहिता येणे सध्यातरी शक्य नाही आणि इतक्या अंतराळाने आता ते लिहिणे योग्य वाटत नाही असे खेदाने नमूद करतो.
धन्यवाद.