- डॉ. सुधीर रा. देवरे
मी तेव्हा इयत्ता सातवीत असेन. मराठी विषय शिकविण्यासाठी आम्हाला रौंदळ आडनावाचे शिक्षक होते. आमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ ह्या पुस्तकातील एक धडा समाविष्ट झालेला होता. शिक्षक त्या धड्यातील एकेक उतारा वाचून आमच्या चेहर्यावरील प्रतिक्रिया न्याहाळत होते. धड्यातील उतार्यात ‘बटाट्याची चाळ’ असा उल्लेख येत होता व त्याला अनुसरून लेखकाचे जे भाष्य होत होते, ते ऐकून आम्ही हसून प्रतिसाद द्यावा अशी शिक्षकाची अपेक्षा होती. तसा प्रतिसाद आमच्याकडून मिळत नव्हता म्हणून शिक्षक वैतागले. त्या वैतागातच ते म्हणाले, ‘‘तुम्हाला विनोद कळतो की नाही? तुमच्या चेहर्यावरची तर रेषाही हलत नाही. अरे, ही विनोदी भाषा आहे, एवढं तरी कळतं का तुम्हाला?’’ आमच्या शिक्षकांचा वैताग जितका खरा होता तितकीच विशिष्ट शब्दामुळे अशा विनोदाला दाद देता येत नसल्याची आमची अडचणही साहजिक होती. तो शब्द म्हणजे ‘बटाट्याच़ी चाळ’. कारण आम्हाला परिचयाचा शब्द होता, ‘कांदानी चाळ’. शेतातून कांदे काढल्यानंतर ते बाजारात घेऊन जाण्याआधी व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी आमच्याकडील अहिराणी भागातील शेतकरी ‘कांद्यांची चाळ’ तयार करतात. ग्रामीण झोपडीसारखी ह्या चाळीची रचना असून ती झोपडीपेक्षा खूप लांबट असते. दोन्ही बाजूंना झोपडीसारखा उतार देऊन वर उसाचे पाचट टाकले जाते. म्हणजे पावसात कांद्यांवर पाणी गळत नाही. आजूबाजूला कपाशीच्या सोट्यांच्या कवाड्या (ताट्या) करून ती उघडता-लावता येईल अशी सोय केलेली असते. अशा या विशिष्ट वास्तूला ‘कांद्याची चाळ’ म्हणतात. खेड्यातील शेतकरी कितीही गरीब असला, तरी या चाळीत तो घरासारखे राहायला जात नाही. राहण्यासाठी त्याचे वेगळे घर असते.
म्हणून ‘बटाट्याची चाळ’ हा शब्द आम्ही ऐकताच आमच्या डोळ्यांसमोर ‘कांद्याची चाळ’ उभी राहिली. ‘कांद्यांची चाळ’ असते तशी ‘बटाट्यांची चाळ’ असावी, असा साहजिक आमचा समज झाला आणि यात हसण्यासारखे वा विनोदासारखे आम्हाला काहीच वाटले नाही. उलट अचंबा वाटला की, धड्यातील वर्णनानुसार या पात्रांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती चांगली असूनही मुंबईसारख्या मोठ्या शहरात हे लोक ‘बटाट्याच्या चाळीत’ का राहात होते!
हा धडा शिकविण्याआधी, शहरात ‘चाळ’ नावाचा एक ‘घर’ प्रकार आहे, तो कसा? कशाला चाळ म्हणतात? हे आम्हाला स्पष्ट करून सांगणे शिक्षकाचे कर्तव्य होते. ते त्यांनी केले नाही म्हणून हा सर्व गोंधळ होत होता. जेव्हा प्रौढ वयात शहरात आल्यावर ‘चाळ’ नावाचा घरांचा प्रकार आम्हाला समजला तेव्हा तर आमचे आख्खे खेडेच एक ‘चाळ’ असते असेही लक्षात आले.
‘बटाट्याची चाळ’च्या समजावरूनच इयत्ता पहिलीतील मुळाक्षरे शिकण्याच्या वेळी माझा झालेला गोंधळही आठवला. मुळाक्षरे शिकविण्याच्या पद्धतीतील शहरी दृष्टिकोन ग्रामीण मुलांवर लादल्यामुळे ग्रामीण मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. अभ्यासाविषयी त्यांच्या मनात आकस निर्माण होतो. उदाहरणार्थ, ‘अननस’ हे कोकणातील फळ आज सर्वत्र पाहायला मिळत असले तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील विरगाव या ठिकाणी हे फळ पाहायला मिळणे कधीच शक्य नव्हते. तरीही शाळेत ‘अ - अननसाचा’ असेच आम्हाला म्हणावे - शिकावे लागत होते. ‘अननस’ हे काय असते, कसे असते, हे वडील धाडील मंडळीलाही सांगता येत नव्हते. फक्त ‘अ’ शिकताना ‘अ - अननसाचा’ म्हणण्यापुरतेच अननसाचे स्थान आहे का? हेही स्पष्ट होत नव्हते. शिक्षक आपण होऊन असे शंकानिरसन करत नव्हते. ग्रामीण भागात तेव्हा शिक्षकांबद्दल इतका धाक असायचा की दहावीत शिकणारे विद्यार्थीसुद्धा शंका विचारणे टाळत असत तर पहिलीतल्या मुलाची कल्पनाच केलेली बरी.
ग्रामीण व शहरी भागात सर्वत्र जी वस्तू (फळ, पदार्थ, धान्य, पशू, पक्षी) माहीत असेल अशा गोष्टींचा उल्लेख करून पाठ्यपुस्तके तयार व्हायला हवीत. पण तसे होताना दिसत नाही. खरे तर ‘अ’ शिकवताना ‘अ - अडकित्त्याचा’ म्हणता येऊ शकले असते. अथवा ‘अ – अजगराचाही’ म्हणता आले असते. ‘अडकित्ता’ व ‘अजगर’ ग्रामीण व शहरी ह्या दोन्ही भागात पाहायला मिळू शकतात. पण आम्ही पहिलीत होतो तेव्हा असे घडले नाही.
अजून काही उदाहरणे देता येतील.
मुळाक्षरे पुस्तकातील वस्तूंची नावे सार्वत्रिकेसाठी काय हवे
अ अननस अडकित्ता/अजगर
आ आगगाडी आरसा/आई
इ इजार/इरले इस्तरी/इमारत
ई ईडलिंबू ईश्वर/ईद
ए एडका एक
अं अंबारी अंग/अंगण/अंजीर
ज जहाज जव/जमीन
फ फणस फराळ/फटाके
भ भजन भगर/भवरा (भजन सुध्दा इथे चालेल)
म मगर मका/मध
य यज्ञ यम/यळकोट
र रथ रवा
श शहामृग शरद
ह हरण हरबरा
क्ष क्षत्रिय क्षण
सार्वत्रिक समजतील अशा वस्तूंची नावे पुस्तकात दिली तर प्राथमिक शिक्षण सोपे होऊन विद्यार्थ्यांना शिकायची आवड निर्माण होऊ शकते. अजगर, आरसा, आई, इमारत, अंग, अंगण, अंजिर, भवरा, मका, मध, शरद, क्षण हे शब्द अलीकडील काही गाईड अंकलिप्यांमध्ये मूळ जड शब्दांना पर्यायी शब्द म्हणून दिलेले दिसत असले तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. म्हणून आमच्या पिढीतील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या मुलांची खूप कुचंबणा झाली. ‘अननस’ सारख्याच आगगाडी, इजार, इरले, ईडलिंबू, एडका, अंबारी, जहाज, फणस, मगर, यज्ञ, रथ, शहामृग, हरण, क्षत्रिय या गोष्टी आमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक नव्हत्या आणि बर्याचशा पाहण्यातही नव्हत्या. शिक्षक म्हणतात म्हणून आम्ही म्हणायचो, ‘श - शहामृगाचा’ अथवा ‘आ - आगगाडीचा’. पण ‘आगगाडी’ कशी असते? तर पुस्तकातल्या चित्रात दिसते तशी. या पद्धतीने दुधाची तहान आम्हाला ताकावर भागवावी लागत असे.
या अनुभवांती आजच्या ग्रामीण-आदिवासी मुलांना मनःपूर्वक आणि मूलभूत शिक्षण द्यायचे असेल तर त्यांच्या रोजच्या परिचित वस्तूंपासून व त्यांच्या मायबोली भाषेतूनच ते सुरू करायला हवे, तरच शिक्षणाची गोडी लागेल व आपण त्यांना शिक्षित करण्यात यशस्वी होऊ शकू.
(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या माझ्या पुस्तकातून साभार. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
2 Oct 2016 - 2:27 pm | मारवा
सुधीरजी
तुम्ही जे कांद्याची चाळ माहीत असलेल्या मुलांना बटाट्याच्या चाळीत ते तस खर असेल असे "समजण्यात" काहीच अडचण आली नाही. त्यात मोठी गंमत आहे. यात दुसरी बाजु आली.
ग्रामीण कांदा चाळ माहीत असलेला मुलगा - बटाटा चाळीला वास्तव समजुन विनोदाला दाद देऊ शकत नाही.
शहरी कांदा चाळ माहीत नसलेला मुलगा- बटाटा चाळीला कल्पित समजुन विनोदाला दाद देऊ शकतो.
हे उदारहरण तुम्ही सांगितलेल्या खालच्या अक्षराच्या उदाहरणा संदर्भात उलट मर्यादा दाखवणार झाल. इथे पुलंकडुन सर्वसमावेशक सार्वत्रिक समजेल असा विनोद लिहा अशी अपेक्षा करणे म्हणजे अतिच होइल.
बाकी अक्षरांसाठीचा कोणती कशी उदाहरणे हवीत यावर विचार केलेला तुमचा पॉइंट फार मार्मिक आहे खुप आवडला. ही तीच तीच उदाहरणे अनेक वर्षांपासुन आपल्या कडच्या तक्त्यात आढळतात याचाच अर्थ आपली शिक्षणव्यवस्था व त्यातल्या शिकवण्याच्या पद्धती किती जुनाट क्रिएटीव्हीटीचा अभाव असलेली आहे हे दिसुन येते.
आता बाकी तरी ठीक आहे पण शहामृग हल्ली अगदी अलीकडे इमुपालन वगैरे आहे म्हणुन शहामृग थोडा दिसतो वगैरे पण हे कैक वर्षापासुन आहे तर कोणत्या महाराष्ट्रातल्या बालकाने कधी पुर्वीच्या काळी म्हणतोय शहामृग बघितला तरी असेल का ही शंका आहे. त्या एवजी श शहाळ्याचा तरी घ्यायला हवा होता शहाळं बघायला प्यायला मिळत तरी. तो ही ठीक आहे पण किस माइके लाल ने
क्षत्रिय बघितला असेल ? हा बघ आई तो बघ तो बघ क्षत्रिय आम्हाला शिकवलेल आहे शाळेत क्ष क्षत्रियाच तला मधला. अर्थात क्ष ला पर्याय शोधणे आव्हानात्मक आहे याची कल्पना आहे तरी म्हणुन काय क्षत्रिय इतकी अॅबस्ट्रॅक्ट उदाहरणे का घ्यावीत. थोडातरी नीर-क्षीर विवेक करायला हवा असे वाटते.
अंबारी तही बसणारे कितीतरी वर्षापासुन फरार आहेत कोणत्या मुलाने अंबारी बघितली असेल त्या एवजी अंबाडा तरी घ्यावा ताई माई चा अंबाडा तरी बघितला असेल.
अजुन एक ख म्हणजे खटारा हे ही एक भारीच कोणी आजकालच्या कुठल्या मुलाला खटारा लक्षात येइल ? खर म्हणजे खटारा शब्द मुळ एका विशिष्ट वाहनाचा कधी काळी असला तरी त्याच डिग्रेडेशन होउन तो सध्या एखादी न चालणारी जुनी बेकार वस्तु या अर्थाने आता प्रचलित आहे खटारा उच्चारल्यावर मुलाच्या नजरेसमोर बापाने कॉम्प्युटर मोटरसायकलला वैतागाने म्हटलेला खटारा शब्द डोळ्यासमोर उभा राहील. ओरीजनल खटारा नजरेसमोर आणण अवघड आहे. यज्ञ तरी कुठे असा बघता येतो शिवाय भटजी त्या चित्रातला सारखा तरी सध्या कुठे असतो नेहमीच ?
जुना तक्ता टराटरा फाडुन नव्या जमान्याचा सर्वसमावेशक सार्वत्रिक आधुनिक कलात्मक तक्ता तात्काळ बनवला पाहीजे.
2 Oct 2016 - 5:07 pm | डॉ. सुधीर राजार...
मारवा जी खूप छानो धन्यवाद
2 Oct 2016 - 8:23 pm | पैसा
लेख आवडला. पण महाराष्ट्रातच इतके वैविध्य आहे की पुन्हा सर्वांना सगळे समजेल असे एकच एक मॉडेल तयार करणे अशक्य आहे.
2 Oct 2016 - 9:59 pm | संदीप डांगे
माझ्या मुलाच्या शाळेत हा 'अ अननसाचा' प्रकारच नाही. त्यांच्या शाळेत मुळाक्षरे शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे. त्या पद्धतीने माझ्या मुलाला जो आता पहिलीत आहे, सहा वर्षाचा होईल, रोज वर्तमानपत्र वाचायला लागला आहे. जोडाक्षरे, मुळाक्षरे, कानामात्रा सर्व नीट वाचतो आणि स्वतःच्या मनाने एखादं वाक्य लिहितो देखील. त्याला आवडलेल्या कविता, गाणी तो झरझर लिहूनही काढतो. त्यास सुटेबल अस चित्रही रेखाटतो.
ही पद्धत म्हणजे अ - अननसाचा अशी नसून अननसात काय काय मुळाक्षरे आहेत ते शोधा, म्हणजे 'अ, न, स' असे. रोजच्या ओळखीतल्या वस्तू, शब्द घेऊन त्यातून अक्षरे ओळखायची. मुलांना छंद लागतो आणि ती रट्टा न मारता चटाचटा लिहायला वाचायला शिकतात, माझ्या मुलाला सहा महिन्यात हे सगळे यायला लागले पण त्याची अप्रत्यक्ष तयारी गेले दोन वर्षे सुरु होती, तीही कुठलीही जबरदस्ती न करता, अगदी हसत खेळत.
मला वाटते, पारंपरिक शिक्षणाबद्दल, आहे त्यात बदल करण्यापेक्षा, मूळातूनच अगदी वेगळा विचार केला गेला पाहिजे.
3 Jan 2017 - 11:41 pm | diggi12
मनातलं लिय तुमि