साक्षीदार .......
मी निर्दोष आहे हे कसे
सिद्ध करणार.....
तो किनारा सगळं पुसून
मूक बनून हसतोय,
समुद्राच्या लाटा
उलटच उत्तरे देतायत,
डोळेही हे नजरेला
नजर देत नाहीयेत ,
पारिजातकाची फुलेही
गंधांसकट कोमेजून गेलीत ?
सगळे साक्षीदार विरोधात जातील
कुणास ठाऊक होते ,
पण मी अजूनही हार मानली नाहीये ......
मला बंदिवासात अडकायचं नाहीये ....
प्रेम मी केलंच नाहीये
हेच सिद्ध करतीये ... ......
"खरंच " ?
....... .
पुरावे शोधत आहे मी अजूनही
भावनांचे गाठोडे उघडून पाहते ,
माळ्यावरच्या आठवणी झटकून पाहते,
अंगणातल्या मातीमध्ये उकरून पाहते ,
झाडावरच्या पक्षांना परत एकदा विचारून पाहते ,
मनातल्या पेटीमध्ये डोकावून पाहते ,
कुठेतरी सापडतीलच ........
........
काहीच न बांधू शकलेले ते तुटक धागे,
स्वतःच भिजलेल्या त्या पावसाच्या सरी,
तुझ्या वाटेकडे न पाहणारे पाणावलेले डोळे,
तुझ्या तळहातावर न ठेवता उमललेल्या कळ्या ,
तुला न दिलेली अबाधित वचने,
आणि याच्याशी काहीच देणं घेणं नसलेला 'तू' .....
'तू' भेटलास कि तूच देशील साक्ष
"अनोळखी " असल्याची ........
बस्स , आता उरले काय !
........
माफीचा साक्षीदार म्हणून
'माझे मन' घोषित केले जाईल ...... पण पर्वा नाही ....
आजकाल तसंही ते माझं काही ऐकत नाही ...... !!!
......... फिझा
प्रतिक्रिया
29 Sep 2016 - 10:11 am | मिसळलेला काव्यप्रेमी
भन्नाट...
29 Sep 2016 - 6:03 pm | अनुप ढेरे
छान!
29 Sep 2016 - 7:13 pm | एस
वा! कविता आवडली.
29 Sep 2016 - 10:44 pm | नीलमोहर
'तू' भेटलास कि तूच देशील साक्ष
"अनोळखी " असल्याची ......
- अगदी,