मी एक ढग - एकटाच ...... !!!
सखे सोबती जरी कितीक गर्दी
गडगडणाऱ्या त्या ढगांची वर्दी
कधी चिंब ओल्या पावसात
कधी लख्ख कोरड्या उन्हात
तरी ,
मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!
मनात माझ्या जुनेच सवंगडी
नव्या देशातले जरी वारे सभोवती
कधी हर्षुन जाई तर कधी उदास
ना कसली खंत ना कसली आस
तरी ,
मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!
नकळत देतो जीवा दिलासा
स्वतःच गिळून घेतो उसासा
वाऱ्याविना ही फिरतो उगाच
ना जाणतो वाट जुनी कि नवी आज
तरी ,
मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!
कधी शुभ्र कापूस सात्विक सदरा
कधी सोनेरी कडांचा मुकुट न्यारा
बरसूनही नेहमी गच्चं च भरलेला
सर्व जिंकूनही सगळंच हरलेला
तरी ,
मी फिरतो, हसत जगतो, असतो एकटाच !!
-----------फिझा !
प्रतिक्रिया
28 Sep 2016 - 7:11 am | अभिजीत अवलिया
कवितेचा सूर निराशावादी वाटला.