उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
8 Sep 2016 - 8:44 pm

डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअ‍ॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अ‍ॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अ‍ॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे.

एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ.

तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं!

upma

म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्‍याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु.

ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला.

उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते..

"एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.."

आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..!

अखेर बर्‍याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा.

सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक!

Modak Ladu

------------------------------------------------------------------------------------

ताजा कलमः-

मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.

आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!

बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

a

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 9:55 pm | पिलीयन रायडर

कारण मीच दंगा घालत फिरते तिथे! बाकी काही विशेष नाही त्यात!! ;)

सतिश गावडे's picture

9 Sep 2016 - 10:37 pm | सतिश गावडे

"अमेरीकेतील" मोदक पुराण भारीच आहे.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 10:40 pm | पिलीयन रायडर

फायनली!! कुणाला तरी झैरात कळाली!! =))

किसन शिंदे's picture

9 Sep 2016 - 10:45 pm | किसन शिंदे

+१

गावडे सर, तुमच्या 'मी गावी होतो' पेक्षा आम्रिकेतले हे मोदकपुराण सरस की. तुम्हाला नाही जमले एवढे गेम खेळायला.

पिलीयन रायडर's picture

9 Sep 2016 - 10:54 pm | पिलीयन रायडर

त्याला डँबिसपणा लागतो.. सर निरागस आहेत..

स्मिता.'s picture

10 Sep 2016 - 12:02 am | स्मिता.

लेख अगदी तळलेल्या मोदकांसारखा खुसखुशीत झालाय (मी तेच बनवले होते हे वे सां न)
तरी तू एवढ्या उत्साहाने उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केला हेच भरपूर झाले. मी आजपर्यंत कितीतरी वेळा उकडीचे मोदक करेन म्हणून तांदळाचे पीठ आणले आणि ते उतप्प्याच्या सारणात वापरून संपवलेय. अजूनही हिंमत झालेली नाही.

तुझे मोदक प्रथम बिघडले असले तरी तू ज्यांना ज्यांना ब्लेम केलं आहेस त्या सर्वाना धन्यवाद! त्यामुळे इतके छान विनोदी लेखन आम्हाला वाचायला मिळाले. :) पुढील प्रत्येक 'साहसी' पाकृ साठी तुला खूप खूप शुभेच्छा!

इरसाल's picture

10 Sep 2016 - 10:26 am | इरसाल

उकडीची छोटी पारी करण्यापेक्षा त्या उकडीची भाकरी लाटुन सारण त्यात भरुन त्याचा फ्रँकीसारखा रोल करुन वाफवुन घ्यायचा आणी मग त्याचे जापनीज सुशी सारखे गोल गोल वड्या/चकत्या कापायच्या.

नवा प्रकार म्हणुन मिपावर खपवायचा " इंडो-जॅपनीज स्ट्फ्फ्ड विथ कोकोनट-जॅग्री स्वीट अ‍ॅन्ड स्टीम्ड राईसरोल सुशी.......मॅड इन अमेरिका" (ते मॅडच आहे)
इंडो- जॅपनीज - दोन संस्क्रूत्या एकत्र.... वाह वाह आंतर्राष्ट्रीय प्रकार
कोकोनट-जॅग्री स्ट्फ्फ्ड........ओय प्राठे वरगी शकल
राईसरोल स्वीट स्टीम्ड.......स्टीम्ड म्हणजे आरोग्यासाठी उत्तम, मुल्यवर्धित
सुशी म्हणजे परत......आंतर्राष्ट्रीय प्रकार

आणी अमेरिका म्हणजे.......बोलायला हवे का काही ???????

रातराणी's picture

10 Sep 2016 - 1:15 pm | रातराणी

उकडीच्या मोदकाचे वर्णन तळलेल्या मोदकासारखे खुसखूशीत झालेय हो! पण सिरीयसली उकडीचे मोदक ओवर हायपड़ आहेत. :)

पण सिरीयसली उकडीचे मोदक ओवर हायपड़ आहेत.

हे फक्त विदर्भ-मराठवाड्यातच का ऐकू येत असावं याचा विचार पडलाय.

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2016 - 6:03 pm | पिलीयन रायडर

अहो कारण उकडलेल्या गोष्टीपेक्षा तळलेली गोष्ट खमंग लागते ना! नाजुक प्रकार वगैरे फार दिसत नाहीत मराठवाड्यात. म्हणुन असेल.

नाजुक प्रकार वगैरे फार दिसत नाहीत मराठवाड्यात.

हे बाकी खरं!! तिकडे सगळंच कसं जाडंभरडं =))

अद्द्या's picture

10 Sep 2016 - 3:03 pm | अद्द्या

माते ,

मोदकाचे फोटो टाकलेत .. आता आपल्या पायाचे पण टाका .. काय लिहिलंय _/\_

ते पहिल्या फोटोतलं उप्पीट बघूनच फुटलो मी .

पैसा's picture

10 Sep 2016 - 3:06 pm | पैसा

एवढंच राहिलं होतं! =)) =)) =))

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:01 pm | सपे-पुणे-३०

पिरा, जवळ जवळ सगळ्यांचाच उकडीच्या मोदकांचा पहिला अनुभव थोड्याफार फरकाने असाच असतो. पण त्या निमित्ताने तू 'उकडीचे लाडू' ह्या एका नवीन पदार्थाची ओळख करून दिलीस.. :-))
मी शक्यतो तांदळाच्या पिठापेक्षा अर्धी वाटी पाणी कमी घालते. म्हणजे २ वाट्या पिठाला दीड वाटी पाणी घ्यायचं. शक्यतो उकड गरम असताना मोदक वळले तर तडे न जाता चांगले वळता येतात. त्यासाठी उकड गरम असताना मळून, एकसारखे गोळे करून केसरॉल मध्ये ठेवते. किंवा गोळे करून त्यांत बोटाने थोडा खड्डा करून त्यात पाणी घालून झाकून ठेवले तरी चालेल.
फोटो टाकण्याचा प्रयत्न करून बघते पण फोटोंची खात्री नाही.

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:12 pm | सपे-पुणे-३०

ukdiche modak

सूड's picture

12 Sep 2016 - 6:34 pm | सूड

कातील झालेत!!

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:15 pm | सपे-पुणे-३०

ukdicha ganpati

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:16 pm | सपे-पुणे-३०

modkanche dive

पैसा's picture

12 Sep 2016 - 2:20 pm | पैसा

माझी आजी डबलडेकर मोदक करायची त्याची आठवण झाली.

सपे-पुणे-३०'s picture

12 Sep 2016 - 2:40 pm | सपे-पुणे-३०

चला म्हणजे फोटो दिसतायत तर....
डबल डेकर मध्ये आपण वेगवेगळे रंग पण वापरू शकतो. पण या साठी वेळ पाहिजे.

दिसतायत फोटो व तेही एकसारख्या झालेल्या सुबक मोदकांचे.

पिलीयन रायडर's picture

12 Sep 2016 - 6:19 pm | पिलीयन रायडर

अगं कसलं सुंदर आहे हे!!!! मोदकात दिवे!! उच्च!!

__/\__

कोकणस्थ लोकं ना म्हणुनच मला फार आवडतात.. कसले नाजुक नाजुक भारी प्रकार करता तुम्ही! नजाकतदार वगैरे!

आता मिशन मोदक नसुन.. "मोदकातले दिवे" झालेलं आहे! हे जमायला हवं आयुष्यात असं वाटलं तुझा फोटो पाहुन..

टवाळ कार्टा's picture

12 Sep 2016 - 6:29 pm | टवाळ कार्टा

चूकून मोदकाने लावलेले दिवे असे वाच्ले

सपे-पुणे-३०'s picture

13 Sep 2016 - 8:51 am | सपे-पुणे-३०

अगं पिरा, यात 'कोकणस्थीपणा' नसून 'कोकणीपणा' आहे. सरावाने कुणालाही जमू शकतात. मी वयाच्या ९ व्या वर्षांपासून मोदक करतेय, पण तेव्हा उकड काढायला आणि मळायला दोघी असायच्या. आम्ही ५-६ मुली फक्त मोदक वळायचो. लग्नानंतरच स्वतः उकड काढून मोदक वळले.

पियुशा's picture

12 Sep 2016 - 2:48 pm | पियुशा

अरे काया धागा आहे का कहर ;)
ह.ह.प.वा. झालिये वाचुन ==/\==

इशा१२३'s picture

12 Sep 2016 - 2:50 pm | इशा१२३

फारच सुंदर दिसताहेत मोदक!

तुषार काळभोर's picture

12 Sep 2016 - 2:51 pm | तुषार काळभोर

वर कुणीतरी शनिपारजवळच्या गौरव स्नॅक्सचा उल्लेख केला होता.
परवा कुटुंबासह गणपती बघायला गेलो होतो, तेव्हा ट्राय केलं.

उकडीचा जम्बो मोदक
मटार करंजी
अन् सुरळीच्या वड्या.

उकडीचे मोदक आमच्या 'घाटी' घरातपण मस्तच होतात, पण हा एकदम हुच्च होता. मऊसूत पारी आणि तोंडात विरघळणारं गुळ-नारळाचं सारण!

-
-
जन्नत!!!

(घरात तळलेले अन् बाहेर उकडीचे मोदक खाणारा) घाटी पैलवान

इशा१२३'s picture

12 Sep 2016 - 2:51 pm | इशा१२३

फारच सुंदर दिसताहेत मोदक!

स्मिता श्रीपाद's picture

12 Sep 2016 - 3:50 pm | स्मिता श्रीपाद

पिरा, साष्टांग वंदन ग बयो तुला..
पुढच्या वर्षी नक्की जमतील गं मोदक...वरी नॉट...

अंतरा आनंद's picture

12 Sep 2016 - 5:12 pm | अंतरा आनंद

मोदकांचा असा 'पिराब्लेम' झाला ते बरचं झालं म्हणायचंं, मजा आली वाचायला. एकाच लेखातली मोदकांची प्रगती चांगलीय. हळू हळू जमतील. माझ्यासारख्या क्वचित-सुगरणीलाही येतात मग तुला जमतीलच.

आजी/आई फुलके आणि मोदक करताना मी एवढ्या वेळा बघीतलय की करून बघीतले तेव्हा जमले. कान तयार असणार्^याला संगीत लवकर शिकता येतं म्हणतात तसं स्वयंपाकाच्या बाबतीत ज्या पाककृती बनताना तुम्ही (निव्वळ टाईमपास म्हणूनसुद्धा ) लहानपणापासून बघत असता त्या तुम्हाला पटकन जमतात असा अनुभव आहे.

चंपाबाई's picture

13 Sep 2016 - 8:53 am | चंपाबाई

छान

मानस्'s picture

23 Sep 2016 - 6:48 pm | मानस्

जबरदस्त लिहिलंय ...हसून हसून डोळ्यात पाणी आला :):):)

दिपक.कुवेत's picture

26 Sep 2016 - 2:54 pm | दिपक.कुवेत

मी देवाला साकड घालतो कि असं विनोदी लिहिण्यासाठि तरी तुझ्या पाकृ फसूदेत....

अतिशय सुरे़ख... मज्जा आली मला वाचताना..!!
आता मोलाचा सल्ला..
बाकी सगळ सोडा, पण स्रुजा च्या शब्द-फुलोर्याला भुलुन बकरा बनलेली या जगात माझ्यानंतर तुच.. (आय ब्लेम यु :-))
बाकी ते ताक आणि असेच अनेक माझे झालेले पोपट आपण स्रुजा च्या च तोंडून ऐकु. :)

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2016 - 6:04 pm | पिलीयन रायडर

शब्दफुलोरा!! =))

सांगच तू किस्से! प्लिझच!

प्रीत-मोहर's picture

28 Sep 2016 - 7:18 pm | प्रीत-मोहर

अतिप्रचंड सहमत. किस्से वाचनोत्सुक

का ? का? का मला गरीब बिचारीला बदनाम करताय? कुणीही माझे सल्ले गांभीर्याने घेणार नाही तुमच्यामुळे.

प्रीत-मोहर's picture

28 Sep 2016 - 9:18 pm | प्रीत-मोहर

मी घेईन ना, मग माझाही द्विशतकी धागा येईल. =))

पिलीयन रायडर's picture

28 Sep 2016 - 9:32 pm | पिलीयन रायडर

हो मग काय.. म्हणलं ना.. स्रुजामुळे चुकलेल्या पदार्थांचे लेख करावेत.. चांगले होतात!!!

स्रुजा's picture

28 Sep 2016 - 6:38 pm | स्रुजा

ताक .... महालोल .. तो महाभयंकर प्रॅक्टिकल जोक होता तुझ्यावर.

केया's picture

29 Sep 2016 - 10:42 am | केया

आपण अस म्हणुया की अनेक महाभयंकर जोक पैकी एक... :(
पण स्रुजा एक खास धागा व्हायलाच हवा.. खास लोकाग्रहास्तव.. :-)

स न वि वि's picture

24 Nov 2016 - 4:33 pm | स न वि वि

मोदक गेले तेल लावत .. पण काय लिहिलंय यार पिरा तू. ... हासूनहसून लोळली ना ग मी. मी नेहमी कोणतेही लिखाण जसे लिहिलंय त्या टोन मधेय वाचते. मगच मज्जा येते त्याला . जब्राट जब्राट जब्राट !

सामान्य वाचक's picture

25 Aug 2017 - 7:05 pm | सामान्य वाचक

हा धागा परत वाचला

lol आहे

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2017 - 4:14 am | पिलीयन रायडर

दरवर्षी मोदक चुकतील कसे? चांगले ५-५० व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि आई सोबत रिव्हिजन करुन झाल्यावर मोदक चुकणार नाहीतच. तळपत्या आत्मविश्वासाने उकड करायला घेतलीये. बरोब्बर मोजून मापून पाण्यात पीठ टाकलंय. घड्याळ लावून ५ मिनिटं वाफ काढलीये. गॅस बंद केलाय. उकड करेक्ट्ट व्हिडीओ मध्ये दाखवतात तशी झालीये. मस्त जोर लावून मळलीये. पहिला मोदक करायला घेतलाय........ आणि त्याला दुसर्‍याच मिनिटाला ५६७ चिरा पडल्यात..

ओक्के... वरी नॉट.. हाताने जमत नाही? दोन प्लास्टीकच्या मध्ये पारी टाकुन लाटून पाहू .ती उचलतानाच तुटली? किंचित रडायला येतंय? नो प्रॉब्लेम.. आपण छान मांडी घालून बसू आणि मन लावून मोदक करु....

गेले दहा मिनिटं झाले मोदकाचा लाडूच बनतोय? चिराच चिरा पडताएत? अरे अरे अरे, अशी फरशीवर लोळण घ्यायची नाही.. चिरा भिंतीला सुद्धा पडतात.. मग लोक भिंतीत सिमेंट भरतात. आपण पण भरु. घ्या ते तांदुळाचं कोरडं पीठ.. ओता त्या उकडी मध्ये. मळा त्याला. घ्या आता मोदक करायला. करा त्याची पारी.. नाही नाही नाही, कळ्यांच्या नादाला लागायचंच नाही. भरलं त्यात सारण? करा तिला बंद. लाडूच झाला? मग ओढा त्याचं नाक, वाटतोय की नै मोदक?! हं आता लावा पाण्याचा हात आणि द्या वरुन कळ्यांचा आकार. झाला मोदक! अरे असं तर आपण सारण भरलेला उकडीचा गणपती सुद्धा करु. हाय काय नाय काय!

modak

तुषार काळभोर's picture

26 Aug 2017 - 6:57 am | तुषार काळभोर

राईस बॉल्स पासून नाक ओढलेल्या सारणयुक्त लाडवापर्यंत बरीच प्रगती झालीये. अनंत चतुर्दशी पर्यंत उकडीचे सुबक गणपती बनवून त्याचे पण फोटो टाका :)

इरसाल's picture

26 Aug 2017 - 11:16 am | इरसाल

तुम्ही पुन्हा तितक्याच उत्साहाने........
तांदळाच्या पिठाचे गोड मोमोज बनवलेत.

संजय पाटिल's picture

26 Aug 2017 - 1:31 pm | संजय पाटिल

लोल =))

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2017 - 5:08 pm | पिलीयन रायडर

=))

उत्साह महत्वाचा!!

एस's picture

26 Aug 2017 - 6:08 pm | एस

कीप इट अप!

मुक्त विहारि's picture

14 Apr 2022 - 10:09 pm | मुक्त विहारि

कितीही वेळा वाचली तरी, कंटाळा येत नाही...