इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड
लंडन ... थेम्स नदीच्या काठावर वसलेले जगातील एक फार मोठे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र. आतापर्यंत झालेल्या दोन्ही महायुद्धांमध्ये जर्मनीने लंडनवर प्रचंड बॉम्बफेक करून शहर बऱ्यापैकी उद्ध्वस्त केले होते. तरी देखील त्यातून फिनिक्स प्रमाणे भरारी घेत हे दिमाखदार सुंदर शहर जगभरातील लोकांना त्याच्याकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी झालेले आहे.
लंडनमध्ये तुम्हाला विनासायास फिरायचे असेल तर फक्त 4 गोष्टींची गरज आहे
1) 'ऑयस्टर कार्ड' - जे लंडनची ट्यूब ट्रेन, बस सगळीकडे चालते. किंबहुना हे कार्ड नसेल तर तुम्ही प्रवास करूच शकत नाही. कारण बसमध्ये कंडक्टर नावाचा मनुष्यच नसतो.
2) लंडन ट्यूबचा एक मॅप.
3) तो मॅप समजावा ह्यासाठी इंग्लिश भाषेचे ज्ञान.
बस. एवढ्या गोष्टी असल्या आणी अंगात पायपीट करण्याची ताकद असली की तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय लंडन फिरू शकता.
लंडनमध्ये जाऊन काय बघावे ह्याचे एक ठराविक असे उत्तर नाही. एखाद्या लहान मुलाला खेळण्यांच्या दुकानात घेऊन गेलात आणी 'तुला ह्यातले काय काय हवे ?' असे विचारलेत तर काय उत्तर येईल? तसेच लंडनचे आहे. दिवसभर बसने फिरत बाहेरच्या सुंदर इमारती बघत बसलात तरी मन भरेल. कुठल्याही स्टॉप वरून मिळेल त्या बसमध्ये बसा, मधेच कुठे तरी उतरून आजूबाजूच्या गल्ल्यांमधून फिरा. कुठेतरी एखादा कलाकार त्याच्या प्रेयसीसाठी व्यायोलिन किंवा गिटार वाजवत बसला असेल ते १० मिनिटे ऐका. तुमची पण एखादी जुनी 'आठवण' जागी होईल. किंवा एखादी चुणचुणीत मुलगी गाणे म्हणत किंवा नाच करून दाखवत असेल तो पहा. आणी तिथून निघण्यापूर्वी मन मोठे करून (Pound vs INR कॅल्क्युलेशन न करता) त्यांच्या हॅट मध्ये एखादा पाउंड बक्षीस द्या. कॅमेरा घेऊन मादाम तुसाँ मधल्या निर्जीव पुतळ्यांबरोबर सेल्फी काढण्यात जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा थोडा वेळ कॅमेरा बाजूला ठेवा आणी ह्या शहराचा वरीलप्रमाणे मनमुराद आस्वाद घ्या. खूप मजा येईल.
मुख्य गोष्ट सांगून झाल्यावर आता तिथल्या अन्य भटकंतीचे काही फोटो.
टॉवर ब्रिज. ह्याच्या बाजूला थेम्स नदीच्या काठावर असलेल्या हिरवळीवर दिवसभर पडून राहिले तरी कंटाळा यायचा नाही ह्याची गॅरंटी. (लंडनच्या शेवटच्या भेटीत ती वेळ आली देखील माझ्यावर.)
लंडन आय
लंडन आय मधून दिसणारी यू.के. पार्लमेंट
टॉवर ऑफ लंडन
पिकॅडिली सर्कस जवळचा एक फोटो
लहानपणी क्रिकेट हा धर्म होता आणी मोहम्मद अझरूद्दीन म्हणजे गळ्यातला ताईत. तो गळ्यात ताईत घालतो म्हणून मी पण एक ताईत घरी बनवला होता एवढा अझरवर जीव. पण 1999-2000 साली जे वादळ आले त्यात काय झाले ते माहीतच आहे सर्वाना. तिथून पुढे ह्या खेळावरचे प्रेम थोडे कमी झाले. त्यामुळे ह्या ठिकाणी जायचे नाही असा विचार बऱ्याचदा मनात आलेला. पण कितीही विसरायचे म्हटले तरी पहिले प्रेम नाही विसरता येत. बरोबर ना ? सर्व कटू आठवणी बाजूला सारून शेवटी गेलोच ह्या ठिकाणी.
जिथे कपिल पाजीने ध्यानीमनी नसताना विश्वचषक उंचावला होता आणी दादाने शर्ट काढून गरागरा फिरवला होता त्या गॅलरीत बराच वेळ बसलो. ड्रेसिंग रूमच्या प्रत्येक खुर्चीवर बसून घेतले. नंतर खाली जाऊन स्टेडियम पाहिले आणी नंतर कौंमेंट्री बॉक्स. एखादे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बघण्याची आमची पहिलीच वेळ. सगळे पाहून झाल्यावर शेवटी तिथले छोटेखानी म्युझियम बघितले. (जणू भरपेट जेवण झाल्यावर त्यावर जसे आईस्क्रीम)
म्युझियम मध्ये ठेवलेला मूळचा ऍशेस चषक
भारताने जिंकलेला 1983 चा विश्वचषक
लॉर्ड्सची माहिती देणारे आमचे उत्साही गाईड
1827 साली खेळल्या गेलेल्या एका सामन्याचे स्कोरकार्ड
लंडन मधले अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे 'मादाम तुसाँ '. बरेचसे पुतळे चांगले आहेत. पण एकाही भारतीयांचा पुतळा नीट नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
'चेंज ऑफ गार्ड' हा फार भंपक प्रकार असावा असे वाटते. मी तर तो बघण्याच्या भानगडीत न पडता बाजूच्या जेम्स गार्डनमध्ये फिरत बसलो होतो.
ह्या सर्व ठिकाणी भेट द्यायला तिकीट आहे. पण साऊथ वेस्ट ट्रेन किंवा नॅशनल एक्स्प्रेस बसने गेल्यास सर्व ठिकाणी एकाच्या तिकिटात दोघांना एंट्री मिळते.
लंडनमध्ये काही उत्तमोत्तम म्युझियम्स आहेत. आणी बहुतेक सर्व म्युझियम्स फ्री आहेत. Science Museum, Natural history, National Galary वगैरे. तसेच ''फोटोग्राफर्स गॅलरी' नावाचे एक ठिकाण आहे जिथे सतत फोटोग्राफीवरची प्रदर्शने चालू असतात.
(पाय गळ्यात येणे म्हणजे नक्की काय प्रकार असतो तो ही म्युझियम्स बघताना तुमच्या लक्षात येईल.)
तर अशा प्रकारे दिवसभर मनमुराद भटकंती करा आणी पाय गळ्यात आले की कुठल्या तरी पार्क मध्ये जाऊन आडवे पडा थोडा वेळ.
आणी हो लंडनमध्ये विनासायास फिरण्यासाठी लागणारी चौथी गोष्ट सान्गायची राहून गेली ना. ती म्हणजे तथाकथित 'Summer season' ला लंडनला गेलात तरी स्वेटर किंवा जर्किन न घालता जाण्याचा विचार मनात आणू नका. तो त्यांच्यासाठी 'Summer season', तुमच्यासाठी नाही. इथली बोचरी थंडी आणी त्यात भर म्हणून सतत जोरदार वाहणारे थंड वारे तुमचे जिणे हराम करू शकतात. त्यामुळे चांगला स्वेटर किंवा जर्किन, कानटोपी घालायला मुळीच विसरू नका.
फिरत राहा.
प्रतिक्रिया
25 Aug 2016 - 9:27 am | वेल्लाभट
वा वा ! उपयुक्त टिप्स ! :) सुरेख फोटो आणि मस्त वर्णन.
25 Aug 2016 - 9:48 am | महासंग्राम
पिकॅडली सर्कस जवळचा मोनोक्रोम फोटो जबरदस्तच ....
25 Aug 2016 - 3:02 pm | मोदक
झकास धागा.. मस्त फटू...
25 Aug 2016 - 10:32 am | प्रभाकर पेठकर
वाचतो आहे. लंडन शहर वर्णन आवडले.
25 Aug 2016 - 3:30 pm | जगप्रवासी
सुरेख फोटो आणि मस्त वर्णन.
26 Aug 2016 - 6:53 am | अभिजीत अवलिया
सर्वांचे धन्यवाद.
@मंदार भालेराव,
मोनोक्रोम फोटो मनासारखा येणे ह्या सारखे दुसरे सुख नाही.
3 Sep 2016 - 10:26 am | पैसा
फोटोही आवडले.
13 Sep 2016 - 4:42 pm | सुहास बांदल
लंडन बस्स नाम ही काफी है. आवडेश आणि फोटोस झकास आहेत.
13 Sep 2016 - 4:55 pm | पद्मावति
+१
13 Sep 2016 - 6:36 pm | पगला गजोधर
१+
14 Sep 2016 - 3:41 am | बहुगुणी
उपयुक्त टिप्स, धन्यवाद!
(मला काही फोटो दिसले नाहीत: लंडन आय, यु के पार्लमेंट आणि टॉवर ऑफ लंडन)
14 Sep 2016 - 10:26 am | महामाया
फोटो आवडले
24 Apr 2017 - 2:57 pm | प्रसन्न३००१
लंडन काय पूर्ण युके मध्ये ड्राइवर हाच कंडक्टरच पण काम करत असतो. बस मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला १ टिल मशीन असते, त्यातून ड्राइवर इच्छित जागेच तिकीट देतो.
ऑयस्टर कार्ड चा फायदा हा कि, हे कार्ड असेल तर तिकीट दर कमी बसतो आणि ट्रेन, ट्राम, बस आणि ट्यूब या चारही ठिकाणी ते वापरू शकता
24 Apr 2017 - 2:57 pm | प्रसन्न३००१
लंडन काय पूर्ण युके मध्ये ड्राइवर हाच कंडक्टरच पण काम करत असतो. बस मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला १ टिल मशीन असते, त्यातून ड्राइवर इच्छित जागेच तिकीट देतो.
ऑयस्टर कार्ड चा फायदा हा कि, हे कार्ड असेल तर तिकीट दर कमी बसतो आणि ट्रेन, ट्राम, बस आणि ट्यूब या चारही ठिकाणी ते वापरू शकता