माझा sky diving चा अनुभव

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in जनातलं, मनातलं
25 Jun 2016 - 5:33 am

जिंदगी मिलेगी ना दोबारा हा चित्रपट मी २०११ मध्ये पहिला आणि तेव्हापासून sky diving करायची इच्छा मनात होती. माझ्या पत्नीला ही इच्छा बोलून दाखवल्यावर ती पण यायला तयार झाली आणि हा योग मागच्या आठवड्यात आला. ह्यासाठी थोडी तयारी करावी लागली आणि हे सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहे जेणेकरून ज्यांना हा अनुभव घायची इच्छा आहे त्यांना मदत होईल आणि ह्याच बरोबर जाणकार ह्या माहितीत त्यांची भर घालतील. हे लेख म्हणजे आमचा अनुभव + टिप्स असा आहे.

पूर्वतयारी :
------------
आमची ही पहिलीच वेळ असल्याने मला Tandem जम्प हाच पर्याय होता. ह्यात तुमच्या बरोबर इन्स्ट्रक्टरपण उडी मारतो आणि तोच पॅराशूट वगैरे गोष्टी हाताळतो. सर्व प्रथम sky diving कोठे करावे आणि कोणाकडून करावे ही माहिती काढली. गूगलवर अनेक तास घालवून शेवटी ठिकाण आणि कंपनी निश्चित केली. हे ठरवताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या :

*. घरापासून त्या ठिकाणापर्यंत जायला लागणार वेळ : जितका कमी तितका बरं
*. किती वर्ष ती कंपनी हे काम करते आहे आणि अपघाताचा काही इतिहास आहे का ?
*. लोकांचे reviews आणि अनुभव : ह्यात महत्वाचे म्हणजे ताज्या (recent ) अनुभवाला जास्त महत्व.
*. किती पैसे ? Groupon सारख्या कुपन्स घेतात का ?
*. उड्डाण काही कारणास्तव रद्द झाल्यास काय पर्याय आहेत ? : उदा: पुन्हा दुसरा एखादा दिवस देतात की पैसे परत की कंपनी क्रेडिट की vouchers ?

हा सर्व विचार करून पॉईंट ऑफ एलिमिनेशनने शेवटी एक कंपनी ठरवली.

कधी करावे ?
---------------
दिवस आणि वेळ ठरवताना खालील मुद्दे विचारात घेतले :

*. त्या दिवसाचे हवामान : ढगाळ , पाऊस इ ची शक्यता असल्यास उड्डाण रद्द होण्याची भीती असते.
*. शक्यतो वीकडे कारण वीकेंडला प्रचंड गर्दी असल्याने ४-५ तास आपला नंबर येईपर्यंत वाट बघावी लागू शकते. वाट बघण्याची जागा ही हँगरच्या बाजूलाच असल्याने सतत विमानाचे मोठे आवाज , खायला / प्यायला फक्त छोटी व्हेंडिंग मशीन, बसायला छोटे लाकडी बाक ह्यामुळे ४-५ तास वाट बघणे त्रासदायक होऊ शकते .
*. कुपन्स (जसे की Groupon ) वपणार असू तर त्याची मर्यादा उदा. काही कुपन्स फक्त वीकडेलाच / विशिष्ठ दिवशीच चालतात वगैरे.
*. थोड्या बातम्या वाचून बघाव्यात. एखाद्या नेत्याचा त्या भागात त्या दिवशी दौरा असल्यास सुरक्षिततेच्या कारणावरून एयर ट्रॅफिक कंट्रोल उड्डाण रद्द करू शकतात.
*. शक्यतो सकाळची वेळ घ्यावी कारण वातावरण चांगले असते , उन्हाचा तडाखा वाढलेला नसतो आणि गर्दी कमी असते त्यामुळे वाट बघण्यात वेळ जात नाही., शिवाय आपणही फ्रेश असतो. ह्या उलट उशिराची वेळ घेल्यास उन्हामुळे दमल्यासारखे होऊ शकते शिवाय जेवण करू की नको, काय करू, हलकं की नॉर्मल , कधी करू, किती वेळ आधी करायचे इ. प्रश्न येतात.

एकदा दिवस आणि वेळ ठरल की मग पुढची तयारी !

त्या दिवशी :
--------------

*. आदल्या रात्री कमीत कमी ७-८ तास झोप घ्यावी. तुम्ही जर फ्रेश नसाल तर इतका सुंदर अनुभव एंजॉय करू शकणार नाही.
*. सकाळी शक्यतो हलका आणि कोरडा नाश्ता करावा. फ्री फॉलच्या वेळी पोटात खूप अन्न असेल किंवा खूप द्रव्य पदार्थ असतील तर उलटी येण्याची शक्यता असते आणि तसे झाले तर सगळ्या अनुभवाचा विचका होऊ शकतो.
* शक्यतो जीन्स आणि टी - शर्ट घालावा. बर्मुडा , ३/४ , ब्लॅझर , लूज फिटिंगचे शर्ट घालणे टाळावे. कारण सरळ आहे, ११००० फूट उंचीवरून घाली येणार हवा जवळ जवळ १६० kmph वेगाने तुमच्या अंगावर येणार असते. शिवाय हवेत तुम्ही गिरक्या खाण्याची शक्यता असते. फोटो काढायचे असल्यास हवेने फुगलेले लूज शर्ट , बर्मुडा अतिशय खराब दिसतं.
* पायात स्पोर्ट शूज घालावेत. सँडल / फ्लोटर , चप्पल अजिबात वापरू नये.
* कमीत कमी मौल्यवान वस्तू असाव्यात. मी फक्त फोन, Govt. ID आणि काही पैसे इतकंच घेऊन गेलो होतो. तिथे त्यांचे लॉकर्स असतात पण त्यासाठी पैसे मोजायला लागतात शिवाय लॉकर्स अतिशय लहान असतात आणि शिवाय डुप्लिकेट किल्ली ही त्यांच्याकडे असतेच.
*. घरून निघण्याआधी फोन करून निश्चित करावे की आज आपली जम्प होणार आहे. बऱ्याचदा एयर ट्रॅफिक कंट्रोल कडून आलेली माहिती आपल्याला इंटरनेट वर उपलब्ध नसते.

इतके सगळे करून शेवटी तिथे पोहोचल्यावर पुढे काय ?

Aerodrome वर :
--------------------

*. प्रथम आपण आलेलो आहोत हे पार्किंग मधून फोन करून कळवावे लागते. अश्या जागा तुलनेने छोट्या असतात आणि रनवे हा जवळच असल्याने एका विशिष्ठ मर्यादेबाहेर आपल्याला स्वतःचे स्वतःच फिरत येत नाही. एयरपोर्ट ऑथॉरिटीचा माणूस आपल्याला घ्यायला त्यांच्या विशिष्ठ गाडीतून येतो. ID चेक केला जातो आणि मग फक्त त्याच्या गाडीतूनच आपल्याला हँगरमध्ये जाता येते. एकदा तिथे पोहोचलो की आपल्याला चेक-इन करून घेतात आणि मग काही व्हिडिओ दाखवतात . त्यात sky diving मधले धोके कोणते आहेत उदा: विमानातील बिघाड , पॅराशूट मधील बिघाड इ. गोष्टी सांगितलेल्या असतात. हे सगळे बघून झाल्यावर आपल्याकडून अनेक फॉर्मवर सह्या करून घेतात . ह्या सगळ्या फॉर्म मध्ये साधारणपणे एकाच गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही हे करताना मेलात तर आम्ही जबाबदारी नाही. आणि हे तुम्हाला मान्य आहे, करा सही !

*. सह्या करून झाल्यावर आपल्याला आपला इन्स्ट्रक्टर कोण आहे ह्याची माहिती दिली जाते. मग आपल्या इन्स्ट्रक्टर कडे जाऊन त्याची ओळख करून देतात. माझा इन्स्ट्रक्टर विनोदी होता. कदाचित काही लोकांना टेन्शन आलेलं पाहून वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी असे विनोद केले जात असावेत. थोडं खेळीमेळीचं वातावरण तयार झाल्यावर त्याने काय करायचे आणि काय करायचे नाही ह्या सूचना द्यायला सुरवात केली. ह्यात कसे बसायचे, कशी जम्प मारायची , हात कसे ठेवायचे इ. सांगितले. जम्प मारल्यावर फ्री फॉल दरम्यान वारा प्रचंड वेगाने वाहत असतो त्यामुळे बोललेले ऐकू येत नाही. अश्या वेळी आपल्याला काही त्रास होत असल्यास कोणती खूण करायची, आल्याला मजा येत आहे हे सांगायला कोणती खूण करायची इ. सांगितले. काही त्रास होत असल्यास अगर भीती वाटत असल्यास इन्स्ट्रक्टर स्मूथ आणि लवकर लँडिंग करतो ह्या उलट आपल्याला मजा येत आहे आणि आणखी adventure हवं आहे तर तो आपल्याला उलट सुलट करतो, गोल गोल फिरवतो किंवा ३६० अंशातून ( पाठ जमिनीकडे ) फिरवतो इ.

*. तोंडी सूचना देऊन झाल्या की मग छोटे प्रात्यक्षिक केले जाते. जसे की आता विमानाच्या दारात आहात , तर कश्या पद्धतीने बसणार ? उडी मारताना पाठीला कश्या पद्धतीने आधार द्यायचा ? लॅन्ड होताना पाय कसे ठेवणार ? तुमच्या परफॉर्मन्स वर इन्स्ट्रक्टर समाधानी झाला की मग तुम्हाला विमानाची बॅच सांगतात असे की तुम्ही ३ नंबर बॅचमध्ये जाणार इ. एकदा बॅच नंबर मिळाला की मग तो येईपर्यंत प्रतीक्षा करत बसावी लागते.

विमानात बसण्याअगोदर माझा आणि माझ्या पत्नीचा फोटो काढण्यात आला. विमानाच्या प्रोपेलरमुळे खूप वेगाने हवा येत होती.

View from the plane

विमानात :
------------

एकदाचा माझा नंबर आला आणि विमानात बसलो. हे छोटे विमान होते, ६ जम्प मारणारे आणि त्यांच्या बरोबर असणारे ६ इन्स्ट्रक्टर असे १२ लोकांना (+ पायलट) घेऊन जाणारे. विमानाने हळू हळू अपेक्षित उंची गाठली

View from the plane

पायलटने थंब्स अप केल्यावर विमानाचे दार उघडले. दार उघडताच हवेचा एक वेगवान झोत आत आला आणि त्याच्या आवाजाने बोललेले काहीच ऐकू येईनासे झाले . आता त्या शिकवलेल्या खाणाखुणा किती महत्वाच्या आहेत हे लक्षात आलं . एक एक करून प्रत्येक जण आपापल्या इन्स्ट्रक्टर बरोबर जम्प करत होता. माझ्याआधी माझ्या पत्नीने जम्प मारली

Moment of truth

आणि त्या मागोमाग माझा नंबर आला.

Moment of truth

दरवाज्यात जाऊन शिकवल्या पॉसिशन मध्ये बसलो आणि एक नजर खाली टाकली . ११००० फूट उंचीवरून झाडे, नद्या, शेती अगदी खेळण्यातील वाटत होते. जोडीला भन्नाट , नव्हे सोसाट्याच्या वेगाने वाहणारा वारा आणि विमानाचा आवाज ... आणि एकदम पोटात गोळा आला. इन्स्ट्रक्टरने उडी मारायची की मागे फिरणार असे विचारणारी खूण केली. हे प्रत्येकालाच विचारतात आणि मागे फिरायची ही शेवटची संधी असते. moment of truth ! क्षणभर विचार आला , राहू दे नको उगाच रिस्क घ्यायला , पॅराशूट नाही उघडल तर ? पण मग जिंदगी मिलेगी ना दोबारा मधला हा सीन आठवला आणि एकदम भीती कुठल्या कुठे पळून गेली. आणि मग मी थंब्स अप ची खूण केली आणि इन्स्ट्रक्टरने रबर स्ट्रॅप घट्ट केले आणि "Now" असे ओरडला आणि सोबत "Don't forget to smile at the camera!" हे ही सांगितले. दुसऱ्या क्षणाला आम्ही विमानाबाहेर उडी मारली. आता पुढचे 50 सेकंद फ्री फॉल म्हणजे पॅराशूट न उघडता करायचा प्रवास !

मी खाली येतोय असं वाटतंच नव्हतं. असा वाटत होत की आहे तिथेच तरंगतोय. इंस्ट्रक्टरने खूण करून कसा काय असा विचारलं आणि मी ऑल गुड ची खूण केली , तसं त्याने असं काही केलं की मी (आम्ही ) गोल गोल , उलट सुलट गिरक्या घेऊ लागलो आणि प्रचंड वेगाने येणारी हवा माझा आवाज, ओरडणे अगदी दाबून टाकत होती. कान जवळ जवळ बंद झाले होते. क्षणात सूर्य क्षणात जमीन अश्या काही गिरक्या घेऊन थोडे स्थिर झाल्यावर कळलं खाली दिसणारी शेत जमीन आणि नद्या , डोंगर ह्यातील अंतर झपाट्याने वाढत आहे.

360 डिग्री फ्लिप

आणि हळू हळू माझ्या लक्षात आले की श्वास घेतला नाहीये. श्वास रोखून धरणे ह्या वाक्प्रचाराचा चांगलाच प्रत्यय मला येत होता. अश्या वेळी survival instinct नुसार मी मोठ्याने श्वास घ्यायला सुरवात केली , फुफ्फुसात जितकी हवा भरून घेता येईल तितकी घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग काही क्षणातच ह्या नवीन आणि सुंदर अनुभवाला सरावलो . माझे दोन्ही हात जे इतका वेळ छातीच्या बेल्टला घट्ट पकडून होते ते मी बाजूला केले आणि पूर्ण सरळ करून एखाद्या पक्ष्यासारखा अनुभव घेऊ लागलो. आकाश जणू माझ्या बोटांच्या फटीतून एखाद्या म्हातारीच्या कापसासारखं निसटून जात होतं. मी त्या छोट्या दिसणाऱ्या नद्या, झाडे, पर्वत, शेती ह्या सगळ्याकडे जणू एक नव्या नजरेने बघू लागलो. इतक्यात माझ्या खांद्याला जरा झटका बसला आणि मांडीला आवळलेल्या स्ट्रॅपनी ते तिथे असल्याची जाणीव करून दिली आणि प्रचंड वेगाने येणाऱ्या हवेचा झोत अचानक थांबला ! पॅराशूट उघडले होते (आणि कानही ). आता कसलाही आवाज नव्हता , सर्वत्र शांतता आणि मी अक्षरशः स्वप्नात असल्याप्रमाणे हवेत अलगद तरंगत होतो. इतक्यात मला माझ्या इंस्ट्रक्टरचा आवाज आला, त्याने माझा गॉगल थोडा ढिला करून सगळे ठीक आहे ना असा विचारले. मी हो म्हटल्यावर त्याने पॅराशूटची दोरी माझ्या हातात दिली. डावीकडची दोरी खेचली की आम्ही डावीकडे वळत होतो आणि उजवीकडची खेचली की उजवीकडे. दोन्ही एकदम खेचल्या तर पॅराशूट एक दिशेने आणि खाली खाली येत होते. (हे सर्व जमिनीवर असतानाच सांगितलेले होते) पण प्रत्यक्ष हे करताना जणू आपण एखादा पक्षी आहोत आणि आपल्याला हवे तसे आपण उडत आहोत असे वाटू लागले. स्वातंत्र्य , स्वच्छंद , निसर्ग हे शब्द जणू मी अनुभवत होतो.

bird view

अश्यात जमिनीच्या जवळ कधी आलो ते कळलंच नाही. इंस्ट्रक्टरने पुन्हा पॅराशूटचा ताबा घेतला आणि लँडिंगसाठी योग्य पोसिशनमध्ये आणू लागला. मी खाली उभ्या असलेल्या लोकांकडे बघून हात हलवला आणि लोकांनी देखील हात हलवून प्रतिसाद दिला. खूप छान वाटले. बघता बघता आम्ही लँडिंग पॅडच्या जवळ येऊ लागलो. लँड करताना दोन्ही पाय सरळ ठेवायचे हे आधीच सांगितले होते. त्याप्रमाणे मी केले आणि एकदम स्मूथ लँडिंग झाले (लँडिंग ऑन हीप्स) आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. खरं तर त्या लोकांसाठी हे रोजचंच, पण त्या क्षणी त्या टाळ्या ऐकताना खूप भारी वाटलं. आपण एखादा पराक्रम गाजवून आलोय आणि हे लोक त्यासाठीच टाळ्या वाजवत आहेत असे वाटले. उठून उभा राहिलो, पुन्हा थोडे फोटो काढले

bird view

आणि अश्या रीतीने अनेक दिवस गाजत असलेला sky diving चे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले होते. डर के आगे जीत है असे वाटले.

sky diving धोकादायक आहे का ? हो नक्कीच , कारण तुम्ही विमानातून उडी मारत असता. मग हे कारण worth आहे का ? निर्णय आपला ,पण sky diving मध्ये दर वर्षी जितकी लोकं दगावतात त्यापेक्षा किती तरी पटीने जास्ती लोकं कार अपघातात दगावतात. मग कार चालवणे बंद करणार का ? मरायचेच असेल तर घरच्या घरी बाथरूममध्ये पाय घसरून डोक्याला लागून लोक दगावतात आणि मोठ्या भूकंपात लहान बालके वाचतात. शेवटी काय जिंदगी मिलेगी ना दोबारा हेच खरं ! Enjoy life whenever you can !!

मौजमजा

प्रतिक्रिया

भन्नाट आणि इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.एकदा हे करायलाच पाहिजे हे ठरवून टाकलंय.

उगा काहितरीच's picture

25 Jun 2016 - 6:38 am | उगा काहितरीच

वा क्या ब्बात है ! अगदी अप्रतिम लिखाण + फोटो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 7:47 am | कैलासवासी सोन्याबापु

सुंदर अनुभव तितक्याच सुंदरपणे मांडलेला! आवडला

हाईला ! हे करायचं आहेच. सुंदर मांडलत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2016 - 8:09 am | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !

Jack_Bauer's picture

27 Jun 2016 - 6:13 am | Jack_Bauer

@कंजूस, उगा काहितरीच, सोन्याबापु, स्रुजा, डॉ सुहास म्हात्रे
अनेक धन्यवाद. आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा मला नवीन लेख लिहायला हुरूप देतात.

सत्याचे प्रयोग's picture

25 Jun 2016 - 8:34 am | सत्याचे प्रयोग

भन्नाट तर आहेच sky diving चे फोटो पण काढलेत हे विशेष आवडले.
Sky diving ला स्वस्त पर्याय para gliding आहे का. पुण्याजवळ कामशेत मध्ये करतात ते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 9:52 am | कैलासवासी सोन्याबापु

हे बरंय नाहीतर च्यायला एका उडीचे 45 हजार वतायचे म्हणले की पाहिले डोळे वटारलेला बायकोचा चेहरा दिसतो डोळ्यापुढे

अभ्या..'s picture

25 Jun 2016 - 2:28 pm | अभ्या..

हा ना राव,
एक पीसी येतय तेवढ्या पैश्यात.

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 2:42 pm | टवाळ कार्टा

४५००० नसावेत...माझ्या एका मैत्रिणीने ३०० युरोमध्ये केलेले...पण ती स्पेनमध्ये होती तेव्हा

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 3:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

देवा आता स्वस्त उडी ठोकायला स्पेनच्या तिकिटाचा बी खर्च लावताल व्हय!!! इथे आपल्याच पुण्यनगरीत आहे एक स्काय डायविंग अकादमी!! खाशा कोथरुडात!! एक उडी ₹ ४४,५०० /- फक्त!

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 4:33 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 5:31 pm | धनंजय माने

दुपारी १ ते ४ पॅराशुट बंद राहील.

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 5:46 pm | टवाळ कार्टा

अगदी उडी मारल्यावर हवेत असलात तरी =))

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 5:50 pm | धनंजय माने

१.इतर वेळेत न उघडल्यास परत आणून द्यावे. आपण पॅराशूट भाडेतत्त्वावर घेत आहात, विकत नाही.
२. ते उघडतंय किंवा नाही हे आधीच तपासून घ्यावे. वेळेत उघडलं नाही अशी तक्रार करत येऊ नये.

महासंग्राम's picture

31 Aug 2016 - 3:13 pm | महासंग्राम

बाप्पू कुठून ढकलतात म्हणे, यमायटी च्या टेकाडावरून कि चांदणी चौकाच्या ब्रिजवरुन

महासंग्राम's picture

25 Jun 2016 - 2:52 pm | महासंग्राम

पण इथे येणारा अनुभव जगा वेगळा असतो, नेहमी प्रतिसादाला पंख लागतात, इथे चक्क आपल्याला पंख लागल्याचे जाणवते

Jack_Bauer's picture

27 Jun 2016 - 8:04 pm | Jack_Bauer

तुम्ही दिलेली लिंक पाहिली. एका उडीचे 45 हजार हे सोलो जम्पचे असावेत कारण त्यामध्ये ट्रैनिंग राहणें इ. गोष्टी आहेत. मी केली ती टँडम जम्प ज्यात कोणतेही ट्रैनिंग, राहणें वगैरे लागत नाही. मला माणशी 12000 पर्यंत खर्च आला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2016 - 9:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

अच्छा!!! असंय तर ते! सही आहे मग हे 12 हजार वाईट डील खचितच नाही जॅक सर!

Sky diving ला स्वस्त पर्याय para gliding माझ्या मते तरी नाही. मी आधी महाबळेश्वर ला para gliding केले आहे आणि आता Sky diving . त्यामुळे मला असे वाटते की 11000 फूट उंचावरून दिसणारे दृश्य , 180 km वेगाने येणारी हवा हे सर्व para gliding मध्ये नसल्याने तितकी मजा येणार नाही.

झेन's picture

25 Jun 2016 - 9:47 am | झेन

आयुष्य खूप छोटं आहे, करायच्या अनेक गोष्टी आहेत, sky diving करायची इच्छा लहानपणापासून आहे. सहज सुंदरपणे.अनुभव सांगितलात धन्यवाद.

महासंग्राम's picture

25 Jun 2016 - 9:51 am | महासंग्राम

फोटो आणि वर्णन सुंदरच पुन्हा एकदा स्काय डायविंग ची इच्छा मनात जागवली जॅक राव तुम्ही धन्यवाद, यंदाच्या ऍडव्हेंचर च्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये आला आता हे.

देशपांडे विनायक's picture

25 Jun 2016 - 10:16 am | देशपांडे विनायक

अप्रतिम वर्णन आणि फोटो
धन्यवाद ! !

मेघना मन्दार's picture

25 Jun 2016 - 10:29 am | मेघना मन्दार

मलाही हे करायचंच आहे एकदा. मला फोटो दिसत नाही आहेत हो पण :(

Jack_Bauer's picture

28 Jun 2016 - 12:07 am | Jack_Bauer

आपल्याला मिपा वरच्या बाकीच्या लेखातील फोटो दिसतात का ? नसतील तर कदाचित तुमच्या ब्राऊजरच्या सेटिंग असल्यामुळे असेल. असो, मी हाच लेख माझ्या ब्लॉगवर पण टाकला आहे तिथे तुम्ही फोटो बघू शकाल अशी अपेक्षा आहे.

माझा ब्लॉग इथे वाचा

जबराट अनुभव. करुन बघणारच आहे एकदा स्कायडायव्हिंग.

जगप्रवासी's picture

25 Jun 2016 - 11:31 am | जगप्रवासी

हे सर्व फोटो ती कंपनीचं (इंस्ट्रक्टर) काढत असेल ना???? एकदम जबराट आणि इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

हो. इंस्ट्रक्टरच्या हाताला Go -Pro कॅमेरा बांधलेला असतो आणि त्यातून तो फोटो काढतो. विमानात बसण्याआधी, जम्प मारायच्या आधी तुमचा इंटरव्यूपण घेतात आणि ते सर्व रेकॉर्डपण करतात. फोटो आणि व्हिडिओ यांच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.

रातराणी's picture

25 Jun 2016 - 12:04 pm | रातराणी

ये मैने किया हय!! ही हा हा!
अनुभव छान लिहिला आहे.

एस's picture

25 Jun 2016 - 12:18 pm | एस

भन्नाट!

पद्मावति's picture

25 Jun 2016 - 1:05 pm | पद्मावति

अरे वाह! क्या बात है! मस्तं अनुभव.

अभिरुप's picture

25 Jun 2016 - 2:14 pm | अभिरुप

हा अनुभव भारतात घेता येइल का आणि कुठे ? जाणकारांनी माहिती पुरवावी. हा अनुभव घेण्याची तीव्र इच्छा आहे.

व्वा अतिशय उत्तम. कुठल्या देशात उडी मारली? साधारण किती खर्च आला?

पक्ष्यांना कुठला आलाय उडायचा अन आभाळातून खाली यायचा खर्च? ;)

लोल... वाटलंच अजून कसा कोणी काही बोल्ला नाही

Jack_Bauer's picture

29 Jun 2016 - 8:20 am | Jack_Bauer

कदाचित पहिल्या फोटोत आपण लोगो पाहिला असेल , न्यूजर्सी मध्ये Sky dive jersey नावाच्या कंपनीकडून केले. माणशी 12000 खर्च आला. व्हिडिओ आणि फोटो चे वेगळे.

बाबा योगिराज's picture

25 Jun 2016 - 2:35 pm | बाबा योगिराज

एकच शब्द

"इनो"

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 2:49 pm | धनंजय माने

लै भारी!

विजुभाऊ's picture

25 Jun 2016 - 3:57 pm | विजुभाऊ

माझाही असाच काहीसा अनुभव.
जंप केली त्यावेळेस काही गोष्टी जाणवल्या नाहीत पण नंतर व्हीडिओ बघताना गम्मत कळाली. त्याहीपेक्षा माझ्या मित्राने माझ्या नंतर उडी मारली होती. त्याच्या व्हिडीऑत मी मारलेली उडी किती वेगाने खाली आलो ते समजले. अक्षरशः गार उभी राहिली.
प्रत्येकाने हा असा अनुभव कधितरी घ्यायलाच हवा.
जोहान्सबर्ग मधे मी हे २५०० रँड ( साधारण १५००० रुपये ) मधे केले होते.

महासंग्राम's picture

25 Jun 2016 - 4:01 pm | महासंग्राम

अजून फोटो असतील तर येऊ द्यात

जय२७८१'s picture

25 Jun 2016 - 5:13 pm | जय२७८१

झकास....

तिमा's picture

25 Jun 2016 - 5:28 pm | तिमा

अनुभव, लेखनशैली आणि फोटो, तिन्ही छान. कुठल्या देशांत केले ते लिहावे.

साधा मुलगा's picture

25 Jun 2016 - 7:49 pm | साधा मुलगा

सुंदर अनुभव आणि लिखाण ! कधीतरी नक्की करून बघणार आहे हा प्रकार!

निशाचर's picture

25 Jun 2016 - 8:10 pm | निशाचर

भारी अड्रेनलिन रश येत असेल! फोटोही छान.

जव्हेरगंज's picture

25 Jun 2016 - 8:13 pm | जव्हेरगंज

व्वा!!!

मेघवेडा's picture

26 Jun 2016 - 1:39 am | मेघवेडा

मस्त, झब्बू दिला तर चालेल का जॅकराव?

मेघवेडा's picture

26 Jun 2016 - 1:39 am | मेघवेडा

मस्त, झब्बू दिला तर चालेल का जॅकराव?

खटपट्या's picture

26 Jun 2016 - 1:53 am | खटपट्या

वा मस्त अनुभव

विजुभाऊ आणि मेघवेडा तुमचेही कौतुक

Jack_Bauer's picture

30 Jun 2016 - 8:26 pm | Jack_Bauer

@रातराणी, एस ,पद्मावति , अभिरुप, पक्षी, बाबा योगिराज, धनंजय माने , विजुभाऊ , मंदार भालेराव, जय२७८१ , तिमा , साधा मुलगा, निशाचर,जव्हेरगंज ,कंजूस
अनेक धन्यवाद. आपल्या प्रोत्सहानपर प्रतिसादाने मला नवे नवे लेख लिहिण्यासाठी हुरूप येतो.

@मेघवेडा : हा हा हा. अवश्य. आपला अनुभव कसा होता ते वाचायला आवडेल.

नगरीनिरंजन's picture

26 Jun 2016 - 8:23 am | नगरीनिरंजन

मी न्यूझीलंडमध्ये केलं स्कायडायव्हिंग. ओव्हरहाईप्ड प्रकार आहे. एकट्याने केलं तरच मजा आहे. दुसर्‍या माणसाच्या पोटाला बांधलेल्या अवस्थेत स्वतःला करण्यासारखे काहीही नसते; सगळं तो माणूस करतो. आपण फक्त हात पाय पसरुन, डोकं वर करुन ठेवायचं. त्यामुळे फार काही थ्रिलिंग वाटले नाही. उंचावरुन दिसणारे दृष्य एवढाच काय तो दिलासा.
त्यापेक्षा मला बंजी जंपिंग जास्त थ्रिलिंग वाटले.

360 अंशात वरून दिसणारा तो नजारा, तो वेग , वाऱ्याचा भन्नाट आवाज आणि गार स्पर्श हे सर्व सोडून आपल्याला आपल्या पाठीमागे असलेल्या इंस्ट्रुक्टर ची आठवण झाली म्हणजे कमाल आहे. बाकी बंजी जम्पिंग केलेलं नसल्यामुळे त्याबाबतीत पास देतो.

नगरीनिरंजन's picture

21 Aug 2016 - 9:08 pm | नगरीनिरंजन

आठवण व्हायची गरज काय? सगळे कन्ट्रोल्स त्याच्याकडे आहेत हे माहित असल्याने आपण फक्त नजारा पाहणे इतकेच काम उरते. नजारा सुंदर असला तरी ॲडव्हेंचर स्पोर्टमधले निम्मे ॲडव्हेंचर निघून जाते त्याचे काय?

खरोखर श्वास रोखून ठेवणारा अनुभव... सिनेमा पाहून एवढी उत्कटता वाटली नाही पण हा अनुभव वाचून एकदा तरी हा अनुभव घ्यायलाच पाहिजे असे वाटत आहे.

पियुशा's picture

26 Jun 2016 - 11:37 am | पियुशा

लैच जबराट !

नपा's picture

26 Jun 2016 - 11:42 am | नपा

नुकताच इकडे (कतारला) स्कायडायव्हिंग चे session आटोपले.....ज्याला मी नाही जाऊ शकलो.. :(
आता हा लेख वाचून अजूनच वाईट वाटतंय की चांगली संधी गेली...
पुढच्या वेळी नक्की करणार...

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2016 - 9:48 am | श्रीरंग_जोशी

अनुभव तर खास आहेच पण तो कथन करण्याची शैली खूप आवडली.

स्वीट टॉकरीणबाई's picture

27 Jun 2016 - 1:29 pm | स्वीट टॉकरीणबाई

इन्स्ट्रक्टरनी कितीही 'स्माइल फॉर द कॅमेरा' असं सांगितलं तरी पोटात भलामोठा गोळा आलेला असताना अवघडंच असेल नाही? तरीही तुमच्या सौंनी मस्त स्माइल दिलं आहे! कौतुक आहे.

मी आणि स्वीट टॉकरनी मुलीच्या लग्नानंतरच असले प्रकार करायचे असं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे थायलंडला गेलेलो असताना जम्प बुक केली. हवामान बिघ़डल्यामुळे कॅन्सल झाली. भारतात परतल्यावर नक्कीच करायचं असं ठरवलं. त्यानंतर दोन महिन्यानी मद्रासच्या जवळच्या क्लबमध्ये पॅरॅशूट न उघडल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी आली!

आता त्या प्लॅनवर भलीमोठी फुल्ली मारली आहे!

सुपर्ब अनुभव असणार हा.. लेखात दिलेली सगळी माहिती सुद्धा खुप छान. धन्यवाद माहितीपुरर्ण लेखासाठी.
लेख वाचुन आपणही करावे असे वाटतेय. आता इथे मला शोधायला पाहिजे कुठे आहे ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2016 - 2:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं मस्त अनुभव. भन्नाट फोटो, आणि वृत्तांतही भारी. सालं जगणे म्हणतात ते हेच. फक्त हे स्काय डायव्हिंग स्वस्त असलं पाहिजे. नै तर ल्याण्डिंग केलं की आता पैसे कसे फिटायचे हा विचार नको यायला. :)

-दिलीप बिरुटे
(काटकसरी)

मोदक's picture

27 Jun 2016 - 4:12 pm | मोदक

एक नंबर लेख आहे..

तुमचा लेख वाचून माझ्या लिस्टमधला हा प्रकार पुन्हा वर आला.. बघु कधी योग येतो आहे.

अभिनंदन..!!!!

सस्नेह's picture

27 Jun 2016 - 4:24 pm | सस्नेह

लेखनातसुद्धा थ्रिल पुरेपूर उतरलंय.

अंतु बर्वा's picture

27 Jun 2016 - 9:32 pm | अंतु बर्वा

मस्त अनुभव! मी फॉल सीजन चालु असताना केली होती. अहाहा, फारच सुंदर आणि थ्रिलिंग अनुभव होता.
माझ्या आधी जंप करणारा माणसाने जंप केली तेव्हा आत्ता आपल्यासमोर असणारा साडेपाच फुटी माणुस एका सेकंदात एखाद्या ठिपक्या एवढा होउन जातो हे पाहुन ग्रॅविटी क्या चीज है हे चांगलच समजलं :-)

बाजीगर's picture

28 Jun 2016 - 1:26 pm | बाजीगर

बास ठरलंं.संंधी मिळताच मी हे करणार.सौ.बिचारी घाबरते,बघु US टूर मध्ये जमतय का.
तुमची सारासार विचार करण्याची पध्दत आणि वर्णन खूपच मोहक आहे.मन प्रसन्न झाले.

मस्त वाटलं वर्णन वाचतांना. वाचून संपल्या वर जाणवले की ठोके वाढले आहेत..."करायलाच पाहिजे" लिस्ट मध्ये add केलेले आहे.

सुधीर कांदळकर's picture

13 Jul 2016 - 8:04 am | सुधीर कांदळकर

झक्क्क्कास. मस्त.

धन्यवाद.

साती's picture

13 Jul 2016 - 9:30 am | साती

वा!
मस्तच!
एक आगळावेगळा अनुभव अगदी यथासांग लिहिलायत.
धन्यवाद!

इल्यूमिनाटस's picture

21 Aug 2016 - 10:11 pm | इल्यूमिनाटस

जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये तो सीन बघताना पोटात गोळा आला होता, तुमचा अनुभव वाचून सुद्धा आला
नादाड खच्ची खवाट! येकदा करनार ह्ये

भन्नाट. दुसरा शब्दच नाही :)

हँग ग्लायडिंग, पॅरा सेलिंग, आणि स्काय डायव्हिंग यांचं थोडंसं मिश्रण असलेला विंगसूट फ्लाईट हा प्रकार आठवला.

पाटीलभाऊ's picture

29 Aug 2016 - 3:05 pm | पाटीलभाऊ

झक्कास..आणि थरारक
बंजी जम्पिंग आणि पॅराग्लायडिंग करून झालंय..आता स्काय डायव्हिंग बाकी आहे..!

मास्टरमाईन्ड's picture

31 Aug 2016 - 2:36 pm | मास्टरमाईन्ड

तुमचा अनुभव कथन आणि फोटो सुंदरच.
वाचून बर्याच शंका फिटल्यासारख्या वाटताहेत.

असं ऐकलय की भारतात स्काय डायव्हिंग तितकंसं सुरक्षित नाही?
तुम्ही कुठे केलंत?

मास्टरमाईन्ड's picture

1 Sep 2016 - 5:33 pm | मास्टरमाईन्ड

वरचे सगळे प्रतिसाद न वाचताच प्रश्न विचारल्याबद्दल.
लैच excited झालो होतो. आणि पटापट प्रतिसाद टंकला.