"व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर
जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर,
त्या सुरांवर, त्या मधुर आवाजावर, त्या अभिनयावर
एकूणच त्या साऱ्या बेभान कलाकृतीवर,
आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर
भान हरपून स्वत्वही हळुवार निसटावं अगदी स्वतःच्याही नकळत,
पार आत खोलवर कुठेतरी काहीतरी कधीतरी असं भिडावं
नसलेल्यातलं असणं डोळ्यासमोर उभं राहावं, असलेल्याच्याही नकळत,
आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर
बंद डोळ्यांच्या पडद्याआड सगळे संदर्भ, स्पष्टीकरणासहित लागावेत,
संवेदनशीलतेच्या परिसीमा तिची हद्द ओलांडून जाव्यात,
पंचेंद्रियांच्या जाणीवा तृप्ततेच्या साधनेत बुडाव्यात,
आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर
या रमण्याचे पाश इतके खोलवर रुजावेत की,
व्यावहारिक देण्याघेण्याची ओळख ते विसरावेत
नशिबाने असे क्षण वारंवार यावेत,
आयुष्याच्या लांबीची मोजपट्टी ते व्हावेत
बस्स, एवढंच काय ते जगणं, बाकी निव्वळ वयाची गणितं
अश्विनी वैद्य
प्रतिक्रिया
30 May 2016 - 6:50 pm | शिव कन्या
लेखाजोखा आवडला.
सुंदर.
31 May 2016 - 3:30 am | अश्विनी वैद्य
Thank you very much...!