अशी कल्पना करा की हे जग एक रंगमंच आहे. इथले सगळेच लोक तसे कलाकार आहेत. प्रत्येक जण फक्त आपणच कसे उत्तम कलाकार आहोत हे इतरांना पटवून देण्यासाठी धडपडत असतो. काही आपली कला लीलया दाखवतात असेच तसेच त्यांची आजूबाजूची माणसे त्यांना प्रोत्साहन देत असतात. मात्र काहीजण नुसतेच आयुष्यभर त्यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवत राहतात याचं कारण त्यांना दिशा आणि मार्गदर्शन मिळतच नाही .
ज्यांना इतरांचा पाठींबा मिळतो, लोकप्रियता मिळते त्यांचा हा प्रवास खूप सुसह्य होतो. आपण जे काही करतोय त्याचा अंदाज आजूबाजूच्यांच्या वागणुकीवरून म्हणजे आई, वडील, बहिण, भाऊ,बायको ,मुलं किंवा गेला बाजार शेजारी ह्यांच्यामुळे बांधता येतो. एक प्रकारचा आरसाच तो … इतरांकडून येणाऱ्या प्रतिसादावर आपण आपली वागणूक ठरवतो. आरसे आपल्याला आपलेच प्रतिबिंब दाखवतात पण ते योग्य असेलच ह्याची खात्री नसते…. अशा वेळी कामाला येतो तो आपला आत्मविश्वास…! होकारार्थी आरसे पाहून आत्मविश्वास वाढलेली माणसं फार कमी दिसतात. मात्र सतत ज्यांना आपली नकारात्मक प्रतिमाच दाखवली जाते ती माणसे आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि कंटाळून त्यांचे वागणे किंवा आयुष्य नाईलाजाने बदलतात मग भले ते चूक आणि त्यांच्या मनाविरुद्ध का असेना ….
प्रश्न असा आहे की मुळात माणसाचा आत्मविश्वास आजूबाजूचे नकारात्मक आरसे सतत पाहून डळमळीत होऊ शकतो का ? इतर लोकांनाही समजा त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच करायचं होतं पण ह्या अशा आरशांमुळे त्याचं ते स्वप्न विरून गेलं असं होत असेल ना ? तुम्ही आज जसे आहात तसेच तुम्हाला व्हायचं होतं की तुमची अशी काही वेगळी स्वप्नं होती जी सत्यात उतरली नाहीत ? जी स्वप्नं सत्यात आणण्याची धडपड करूनही सोडावी लागली त्याची टोचणी आजही तुमच्या मनाला कधी लागते का ? ह्यावर उपाय काय ?
प्रतिक्रिया
15 May 2016 - 1:05 pm | संजय पाटिल
माझितरी अजुन पर्यंत स्वप्नेच वरचढ ठरली आहेत ब्वा..
15 May 2016 - 1:10 pm | टवाळ कार्टा
:(
15 May 2016 - 1:23 pm | चंद्रनील मुल्हेरकर
माणुस हा स्वप्न पाहतो,त्यात गैर काही नाही.पण परिस्थीतीच्या आणि संभावनेच्या खवळलेल्या महासागरात तो त्यांची स्वप्नांची नाव लोटतो आणि आयुष्यभर गटांगळ्या खात कुठल्यातरी अनोळखी किनार्याला लागतो,जिथे पोचायचे असते तिथे पोचतच नाही ,हीच तर शोकांतीका आहे माणसाची.
15 May 2016 - 1:32 pm | कानडाऊ योगेशु
बाकी माझे मत विचारात तर असे म्हणतात कि कवितेचे नियम पाळून कविता लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष कविता लिहिणे जास्त सोपे असते असे वाचले होते. तद्वत इथेही तेच जगण्याचे नियम पाळत जगण्यापेक्षा प्रत्यक्ष जगणे सोपे असावे.
बाकी माझी वरील भाषा वाचुन मला त्या सरांची आठवण आली. वैसेही ये धागा तो उनका होमपीच बनताच है!
15 May 2016 - 3:20 pm | आनन्दा
मी रोज नवीन स्वप्न पाहतो, त्यामुळे किती स्वप्न खरी झाली आणि किती खोटी, याची गणती नाही.
किती स्वप्ने खरी होऊन देखील अपेक्षित सुख मिळतेच असे नाही. त्यामुळे अपेक्षा हे सार्या दुक्खाचे मूळ आहे. पण म्हणून मी स्वप्न पाहणे सोडणार नाही. कारण स्वप्न न पाहणारा माणूस आयुष्यात काही करूच शकत नाही असे माझे मत आहे.
15 May 2016 - 4:19 pm | विवेकपटाईत
आपण तर बुआ रोज स्वप्ने पाहतो. कधी खरी ठरतात तर कधी ठेस लागते. यालाच जीवन म्हणतात. आजकाल सर्व गोष्टीना तटष्ट नजरेने पाहतो.
बाकी स्वप्न पाहताना, स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणार्या सर्व बाबींची पण पूर्ण तैयारी करावी लागते. अधुरी तैयारी मुळे स्वप्न भंगतात.
15 May 2016 - 7:55 pm | धनंजय माने
आमचं आमच्या घराचं स्वप्न होतं. अर्धवट राहिलं. :(
15 May 2016 - 9:53 pm | रातराणी
आतापर्यंत सत्य.