हरिश्चंद्रगड – उत्तरार्ध : साधले घाट

हकु's picture
हकु in भटकंती
8 May 2016 - 9:20 pm

हरिश्चंद्रगड – पूर्वार्ध : नळीची वाट
आता पुढे -
आज माझा दिवस हरिश्चंद्रगडावर उशिराच उगवला. आजसाठी सकाळचा काहीही कार्यक्रम ठरलेला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी आलो होतो तेव्हा तारामती शिखर बघून झालं होतं. सकाळी उठून चहा नाश्ता करून साधले घाटा मार्गे उतरायचं, एवढंच ठरलं होतं. या ट्रेकचा मूळ उद्देश 'नळीची वाट' एवढाच होता मुळी. त्यामुळे बाकी काहीही कार्यक्रम नव्हता. मात्र आज झोपेतून जागं होतानाच एक मजेशीर गोष्ट घडली. कसं कुणास ठावूक, पण अचानक माझ्या तोंडात कालचं "गापू ची गापू ची गम गम ……" गाणं आलं होतं. काल प्रयत्न करूनसुद्धा हे शब्द आठवायला काही तयार नव्हते आणि आज झोपेतून जागा झाल्या झाल्या माझ्या तोंडात हे गाणं बसलं होतं. आता तोंडातल्या टेप रेकॉर्ड च्या कॅसेट ची ‘बी’ साईड चालू झाली होती. बाहेर आल्या आल्या सिडनी, मेलबर्न च्या दिशेने पळालो. या हरिश्चंद्रगडावरच्या माझ्या काही आवडत्या जागा आहेत, जिथे सकाळी मी "बॅटिंग" करायला जातो. मग पटापट आवरलं आणि बाकीच्यांनाही आवरायला लावलं.

तुकाराम चे पोहे खायला बसलो, तेव्हा तिथे पुण्यातला एक अनुभवी ट्रेकर भेटला. हरिश्चंद्रगडाविषयी त्याच्याकडून बरंच काही काही ऐकायला मिळत होतं. टोलार खिंडीतून येणाऱ्या आणि पाचनई वरून येणाऱ्या या दोन वाटा सामान्यतः माहित असतात, पण त्याशिवाय गडावर येणाऱ्या इतर कित्येक वाटांची माहिती त्याच्या तोंडून मिळत होती. काल आम्ही आलो होतो ती नळीची वाट, त्याच्या समोर म्हणजे कोकण कड्याच्या डाव्या बाजूने वर येणारी आणि अति तीव्र उताराची माकड वाट, जुन्नर दरवाज्यामार्गे जाणारी वाट, आज आम्ही जाणार होतो ती कोकण दरवाज्यामार्गे जाणारी वाट अश्या एक ना अनेक वाटा गडावर येतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा किल्ला असावा. लांबी रुंदीच्या बाबतीत हा गड प्रचंड पसरला आहे. निसर्गतःच याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे असलेला कोकण कडा आणि अतिशय उंच असं तारामती शिखर, या गोष्टी लाभल्या आहेत. पूर्वीच्या काळी गडावर राबता चांगलाच होता हे नक्की. त्याशिवाय हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाची आणि पुष्करणीची शिल्पकला बहरली नसती. समोरच्या खोदीव गुहा तर त्याही पूर्वीच्या असाव्यात. संपूर्ण गडावरच्या शिवलींगांची मोजणी केली तर शेकड्यांच्या घरात सापडतील. खालचं केदारेश्वराचं शिवलिंग तर अतिशय सुंदर. नाही म्हंटलं तरी गडावर अजून 'किल्ला' म्हणण्याजोगं असं बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. बालेकिल्ल्याचे काही अवशेष आहेत. कोकण दरवाजा, जुन्नर दरवाजाच्या कमानींच्याही काही खुणा शिल्लक आहेत. एकूणच गड बघायचं म्हंटलं तर आठवड्याभराची सुट्टी काढून यायला हरकत नाही असं त्या ट्रेकर च्या बोलण्यातून कळून येत होतं. आपल्या पुरातत्व खात्याच्या उत्साहामुळे सध्या आहे तेवढंही बांधकाम गायब व्हायच्या आत लवकरात लवकर हे सगळं पाहून घ्यायचा विचार मनात आला. गप्पा मारता मारता चहा पोहे संपवले आणि एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला निघालो.

घड्याळात दहा वाजून गेले होते. तुकाराम आमच्या सोबत बेलपाड्यापर्यंत येणार होता. तो म्हणे इथून तिथे तीन तासात पोहोचतो. आम्हाला साडे चार किंवा फार फार तर पाच तास लागतील असा सरळ सोपा अंदाज आम्ही बांधला होता. कारण तोपर्यंत 'कोकण दरवाज्यामार्गे साधले घाट' हे काय प्रकरण आहे हे आम्हाला कळलं नव्हतं. त्यामुळे उशिरात उशिरा म्हणजे दुपारी तीन वाजता कमाच्या घरी पोहोचू अशी आमची अटकळ होती. म्हणून जेवणाची सोय तिथेच करायला सांगितली होती. आमच्या जवळचं खाण्याचं साहित्य अजूनही थोडं शिल्लक होतं. पोहेही पोटभर झाले होते, त्यामुळे वेगळं काही जेवण बांधून घ्यायची गरज वाटली नाही. तुकाराम ही निर्धास्त होता. केदारेश्वराला नमस्कार करून त्याच्या उजव्या बाजूने वर आलो आणि त्या पठारावरून साधारण ईशान्येकडे चालू लागलो. काही पावलं चालून गेल्यावर काही नैसर्गिक रित्या तयार झालेल्या पायऱ्या लागल्या. ह्यांना सात पायऱ्यांची वाट असं म्हणतात असं तुकाराम ने आम्हाला सांगितलं. आता त्या सगळ्या दगडांमध्ये नक्की सात पायऱ्या कोणत्या आणि कुठपासून कुठपर्यंत धरायच्या असा विचार करत होतो, तेवढ्यात बाकीची मंडळी पुढे निघून गेली आणि मग मी ही तो नाद सोडून दिला. सुरुवातीपासूनच किरण चा काल दुखावलेला एक पाय आज चांगलाच ठणकत होता. त्यामुळे उतारावरून चालायला तिला वेळ लागत होता. तरी नजर पडत राहील इतकं अंतर एकमेकांपासून ठेऊन सर्व जण चालत होतो. माझ्या तोंडून 'गापू ची गापू ची गम गम' ची आवर्तनं चालू झाली होती. अधूनमधून बाकीचेही मला साथ देत चालत होते. साधारण ३०-४० मिनिटं चालून गेल्यावर तुकाराम एकदम वाट सोडून डावीकडे खाली झाडा-झुडपांच्या दिशेने वळला. आत्तापर्यंत आम्ही पठारावरच चालत होतो. आता एक एक टेकाड उतरत आम्हाला कोकण दरवाज्याच्या दिशेने जायचं होतं. 'इथे या ठिकाणी वाट आहे' असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही, अश्या ठिकाणी तुकाराम झाडाझुडपांमध्ये घुसला.
1
त्याच्या मागोमाग आम्हीही घुसलो. अतिशय दाट झाडी. आमच्या डोक्याच्याही वर जाणारी.
2
आमच्या पाठीवरच्या बॅग्ज ना आम्ही आमच्या झोपण्यासाठीच्या मॅट्स आडव्या बांधल्या होत्या. त्या दोन-अडीच फुट रुंदीच्या मॅट्स सुद्धा त्या झाडांमधून जाऊ शकत नव्हत्या. बॅग्ज काढून हातात घेऊन न्याव्या लागत होत्या. सरळ-सोट उभं राहून चालताही येत नव्हतं. तसंच कसंबसं एकमेकांना हाकारे देत देत समोरचा जाईल त्याच्या मागे त्या दाट झाडांमधून पुढे जात होतो. अगदी अपेक्षितपणे एक जण चुकला आणि त्याच्या मागचे तसेच त्याच्या मागे मागे गेले. अगदी काहीच पावलं चालून गेल्यावर वाट चुकल्याचं कळलं आणि पुन्हा माघारी यायला निघालो. अशातच त्या चुकलेल्या वाटेवर नेहाचा एक पाय मुडपला आणि चांगलाच लचकला. नेहा बॅग टाकून खालीच बसली. तिला उभंच राहवेना. थोडा वेळ ती तिथेच बसली. बाकीच्यांना एक एक करून परत पाठवलं आणि शेवटी नेहा ला घेऊन उठलो. तश्या त्या झाडांमध्ये आणि दगडांमध्ये ती लंगडत, कण्हत पायाला घट्ट रुमाल बांधून चालू लागली. उतार तीव्र होता पण आजूबाजूला गच्च झाडी होती. ती पार करून, खरचटवून, ओरबाडून घेऊन खाली उतरलो. मागे वळून बघितलं तर इथून आपण आलो असा विश्वास सुद्धा बसत नव्हता.
5
असंच थोडं अजून खाली गेल्यावर कोकण दरवाजा लागला. दरवाज्याची कमान आता काही शिल्लक नाहीये, पण बाजूच्या बुरुजाचं भक्कम बांधकाम शाबूत आहे.
3
4
त्या बुरुजावरून उजवीकडे चालत गेलो तर समोर कलाडगड आणि कोंबडा हे दोन किल्ले दिसत होते. त्याच्या डावीकडे साधले घाट जिथून उतरतो ती जागा दिसत होती. सगळा विस्तीर्ण परिसर पटकन नजरेखाली घालून मागे वळलो आणि दरवाजाच्या दिशेने चालत आलो. तेवढ्यात बुरुजावरच्या वाळलेल्या गवतावरून माझा पाय घसरला आणि माझ्या पुढे चालणाऱ्या नाना ला माझ्याकडून साष्टांग नमस्कार घडला. माझे गुडघ्यापासून पुढचे पाय बुरुजाच्या बाहेर होते आणि बाकीचे शरीरही त्या दिशेने घसरत होते. तसाच पटकन उठून दोन पायांवर उभा राहिलो. त्या नादात माझ्या एका हाताच्या बोटाचं नख तुटलं. नाना डोळे विस्फारून माझ्याकडे बघत होता. केवळ २-३ सेकंदांचा वेळ लागला हे सगळं घडण्यात, पण आज माझी पालखी होता होता राहिली होती.

या कोकण दरवाज्यातून उतरताना काही वेळ आपल्याला उजव्या हाताला बांधीव तटबंदी सोबत करते. आम्ही वर जाऊन आलो होतो त्याच बुरुजाची ही तटबंदी. पुढे तटबंदी संपून सरळसोट उभा कातळ आपल्या उजव्या हाताला लागत राहतो. तसंच डाव्या हातालाही थोडं अंतर सोडून एक उभा कडा आहे. डोंगराच्या एका गचपणात सहजासहजी दिसणार नाही असा हा दरवाजा बांधलेला आहे. दोन्ही बाजूचे मूळ कडेच उंच उंच आहेत.
6
त्यामुळे कदाचित दरवाजा आणि त्या बाजूच्या बुरुजांची आणि तटबंदीची उंची फारशी वाढवली नसावी. पुढे काही अंतर दगडांच्या वाटेने पार केल्यावर या संपूर्ण टेकाडाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. भरपूर मोठी सपाटी दृष्टीस पडत होती. अर्ध्या लोकांना तर वाटलं की पोहोचलोच आपण बेलपाड्यात. मलाही काही विशेष अंदाज येत नव्हता. फक्त आपल्याला अपेक्षित ठिकाण अजून लांब असावं हे कळत होतं. मी भरभर चालत सर्वात पुढे चालणाऱ्या तुकारामला गाठायला निघालो. तो एका झाडाखाली बसून आमची वाट बघत थांबला होता. (म्हणून सापडला.) मग आम्हाला बघून उठला आणि पुढे चालायला लागला. मी ही त्याच्यासोबत चालू लागलो. त्याला पहिला प्रश्न केला, "तुकारामदादा, आता कसा रस्ता आहे बेलपाड्यापर्यंत?"
तुकारामदादाने समोरच्या एका V आकाराकडे बोट केलं. "त्ये तिथं त्या दोन डोंगरांच्या मधून आपल्याला खाली उतरायचं हाय. त्यो साधले घाट."
म्हणजे साधले घाट अजून आलाच नव्हता! तो V सुद्धा चांगलाच लांबवर दिसत होता.
मी आता थेट मुद्द्यावर आलो, "बेलपाड्याला पोहोचायला अजून किती वेळ लागेल?"
त्यावर तुकाराम उद्गारला, "अजून लई येळ हाय. साधले घाट उतराया लागल्यावर आपल्याला अडीच-तीन तास तरी लागतील."
मी घड्याळात बघितलं, सव्वा वाजला होता. अजून अडीच-तीन तास म्हणजे ४ वाजणार हे नक्की. त्यानंतर जेवण. तोपर्यंत काही नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आधीच तीन तास चाल झाली आहे. त्यातच नेहाचा पाय मुरगळलाय. किरणचा ही पाय दुखतोय. आणि अशातच एवढ्या उन्हात अजून तीन तास? ते ही हा सरळ तोंडाने सांगतोय, म्हणजे प्रत्यक्षात किती लागतील? मी जरा काळजीतच पडलो. सकाळी निघताना ह्याच्या तीन तासांना आमचे साडे चार - पाच तास असा आम्ही हिशोब लावला होता, पण गुणोत्तर आता जरा चुकल्यासारखंच वाटत होतं.

मी तसाच त्याच्यासोबत चालत गेलो. थोडा वेळ गप्पा मारल्या. मग पुढे एक कच्ची सडक लागली. जाड खडी असलेली. हा रस्ता पाचनईपासून महामार्गाकडे जातो. ह्या रस्त्यावर थोडावेळ गाणी म्हणत म्हणत चाललो आणि पुढे रस्ता सोडून एका ओढ्यावर बांधलेल्या बांधाकडे वळलो. तिथे सर्वांनी आपापल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भरण्यासाठी बाहेर काढल्या. मागून सर नेहाची बॅग घेऊन येत होते. नेहा बिचारी थकून गेली होती. कशीबशी लंगडत चालत होती. पाणी भरून झाल्यावर तुकाराम उठला आणि जंगलाच्या दिशेने चालू लागला. पाणी भरून झाल्यावर आळीपाळीने सर्व जण फार न थांबता निघाले. आता नेहाची बॅग मी हातात घेऊन चालत होतो. तुकाराम पुढे जाऊन एका जंगलात घुसला. थोडा आतपर्यंत चालून गेल्यावर एका ठिकाणी थांबला. मला म्हणाला, "इथून साधले घाट चालू. सर्वांनी वेवस्थित या." मी "बरं" म्हंटलं. मनगटाच्या घड्याळात दोन वाजले होते. मी मागून येणाऱ्यांची वाट पाहत जरा पाणी पिण्यासाठी बसलो. तुकाराम ला पुढे व्हायला सांगितलं. गायकवाड साहेब ही त्याच्या सोबत होते. लगेचच मागची मंडळी गाणी म्हणत म्हणत येऊन पोहोचली. त्यांनाही साधले घाट सुरु होतोय हे सांगितलं आणि निघालो. तिथून काही पावलं चालून गेल्यावरच आम्ही एका मोठ्या तीव्र उताराच्या खिंडीच्या तोंडाशी येउन पोहोचलो. जंगल आता आमच्या पाठीमागे होतं. दोन्ही बाजूला उंच कडे आणि त्यांच्या मधून ही वाट उतरत होती. नळीच्या वाटेसारखी. नळीच्या वाटेवर पहिला रॉक पॅच आणि दुसरा रॉक पॅच च्या मध्ये जशी वाट आहे तशीच.
7
माझ्या हातात नेहाची बॅग होती. उतार तीव्र होता; त्यामुळे पावलं जपून टाकावी लागत होती. मागून येणाऱ्या किरण चा एक पाय आधीच दुखत होता. त्यामुळे या वाटेवरून उतरणं तिला जरा जड जात होतं. थोड्या वेळासाठी तीने तिची बॅग विनीत च्या हातात दिली आणि काळजीपूर्वक उतरू लागली. हा साधारण २००-३०० मीटर्स चा सरळसोट उतार होता. पुढे ही वाट उजव्या बाजूच्या कड्याला खेटून खाली उतरत होती. आता ह्या वाटेवर सर्वांचीच गाणी (अजून समर्पक शब्द - बोलती) बंद झाली होती. फक्त एकच घोष चालू होता, ‘गापू ची गापू ची गम गम’. बाकी अक्खा आसमंत शांत होता.

ह्या घाटाचा खरं नाव 'सादडे घाट'. कारण हा भाग अर्जुन-सादड्याच्या झाडांनी भरलेला आहे. पण त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन आता ‘साधले घाट’ हेच नाव गावकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. दोन कड्यांच्या मधली वाट संपल्यानंतर हे जंगल सुरु झालं होतं. उतार अजूनही होताच, पण त्याच्या जोडीला आता पायाखाली दगडांच्या ऐवजी भुसभुशीत माती आली होती. इतकी भुसभुशीत की त्यात एखादा मोठाला दगड बघून आपण त्यावर जरी पाय ठेवला तरी आपण त्या दगडासकट खाली घसरत जाऊ. म्हणजे कितीही काळजी घेतली तरी घसारा नशिबी होताच. एका जागी पाय ठहरणे कठीण जात होते. त्यामुळे इथेही सर्वांच्या पायांची गती ही मंदच होती. दर दोन मिनिटांनी कोणी तरी घसरून पडत होतंच. घड्याळ पुढे पुढे धावत होतं, वरती ऊन 'मी' म्हणत होतं आणि ही घसरडी वाट काही संपायचं नाव घेत नव्हती. किरण आणि नेहा अक्षरश: कश्या बश्या उतरत होत्या. एक एक पाउल पुढे टाकताना घाबरत होत्या. किरण चा दुखावलेला पाय त्या मातीच्या रस्त्यात काही फार चांगली साथ देत नव्हता. तरीही ती पाठीवर बॅग घेऊन चालत होती. नेहाची बॅग माझ्याकडेच होती. एका ठिकाणी मी किरण ला बॅग विनीत कडे द्यायला सांगितली. ती 'नाही' म्हणाली. बॅगेशिवाय चालणं जरा सोपं होईल, असं ही सांगून बघितलं, पण तरीही नाही म्हणाली. पण तिच्या मागे बरेच जण खोळंबून राहिले होते आणि तिला वेग वाढवणं काही जमेना. दोन मिनिटांनी मी पुन्हा तिला तेच सांगितलं, पण "माझ्यामुळे इतरांना वजन उचलायला का लागावं?" असं मनाशी म्हणत तिने पुन्हा नकार दिला. आता मात्र मला नाईलाजाने माझा आवाज थोडा वाढवावाच लागला. नाखुषीने तिने शेवटी बॅग विनीत कडे दिली, पण आपल्या डोळ्यातले अश्रू काही ती मानी मुलगी थांबवू शकली नाही. साधले घाटाने आत्तापर्यंत नेहा-किरण च्या डोळ्यात पाणी आणलं होतंच, पण बाकीच्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. मयुराचीही बॅग आता पिके च्या हातात आली होती. पायाखालची भुसभुशीत जमीन, त्यामुळे पडल्यावर लागणारे दगड-गोटे आणि त्यावर कहर म्हणजे अजिबात न संपणारा असा हा लांबलचक रस्ता. त्यात मोठी गम्मत म्हणजे इतके उतरून सुद्धा आम्ही जमिनीच्या सपाटीपासून अजूनही बरेच वर होतो. ही घाटाची वाट अजून किती लांब उरली आहे हे तुकाराम सोडून कोणालाही माहित नव्हतं. अगदी आमच्या सरांनाही नाही. रस्ता लांब असण्याबद्दल किंवा खडतर असण्याबद्दल काही तक्रार नाही, पण हा असा प्रकार आणि तो ही त्या विशिष्ट वेळी अगदी म्हणजे अगदीच अनपेक्षित होता. ट्रेकचा मुख्य उद्देश हा 'नळीची वाट' हा होता आणि तो पूर्ण झाला होता. त्यामुळे घरी जाताना आता काही विशेष कष्ट नाही करावे लागणार, अगदी आरामात जायचं, असा सर्वांचा अंदाज होता. पण समोर जे दिसत होतं ते त्या समजुतीच्या अतिशय विरुद्ध होतं. 'नळीच्या वाटेसारखा' खडतर प्रकार सर्वांनी अगदी लीलया पूर्ण केला होता, कारण तशी प्रत्येकाला पूर्व कल्पना होती आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची मनाची तयारी होती. इथे असं काहीच नव्हतं. सगळं अनपेक्षितपणे आणि इच्छा नसताना अंगावर येउन पडलं होतं. बराच वेळ चुपचाप राहिल्यानंतर शेवटी न राहवून नाना म्हणालाच, "च्यायला, काल नळीच्या वाटेने जितका कॉन्फिडंस आला होता त्या सगळ्याची आई माई एक केली या वाटेने!"

दोन वाजता उतरायला सुरुवात केलेला साधले घाट, अजून चार वाजले तरीही आम्ही उतरतच होतो. मध्येच एका ठिकाणी तुकाराम आणि गायकवाड साहेब बसलेले आम्हाला दिसले. ते आमची वाटच बघत होते. एका ओढ्याच्या समोर आम्ही येऊन पोहोचलो होतो. ओढा पावसाळ्यात. आता फक्त बाजूला पाण्याचं एक छोटंसं डबकं होतं. वरच्या बाजूने पाणी झिरपत होतं आणि खालच्या बाजूला एक छोटासा ओघळ वाहत होता. बाकी सगळे ओढ्यातले दगड-गोटे खालच्या बाजूला पसरलेले दिसत होते. आधी मी आणि पिके, नानाच्या वाक्यावर हसत हसत तिथे येऊन पोहोचलो. तुकाराम आणि गायकवाड साहेबांनी आमचं हसत हसत स्वागत केलं. आमच्या मागून आळीपाळीने एक एक जण येऊन पोहोचला. गायकवाड साहेब येणाऱ्या प्रत्येकाची भलावण करत होते. "शाब्बास शाब्बास" म्हणत होते. रडवेल्या तोंडाच्या मुली, थकलेला तुषार, आदित्य, कैवल्य असे सगळे खांद्यावरची बॅग अक्षरशः फेकून खाली बसले. तुषार दुसऱ्याच क्षणाला आडवा पडून घोरायला लागला. 8
बाजूला डबक्यात तळाशी थोडं पाणी होतं. ते वाघासारखं थेट तोंड लावून आणि झोपून प्यावं लागणार होतं. आमच्यातल्या काहींनी ती हौस पूर्ण करून घेतली. पण अर्थात जे खूप थकले होते ते काही जागचे हलले नाहीत. त्यांच्यासाठी मोठ्या तोंडाच्या बाटल्यांमध्ये त्या डबक्यातलं पाणी अलगद भरून घेतलं आणि त्यांना नेऊन दिलं. सकाळी साडे नऊ - दहा वाजता तुकारामकडे जो नाश्ता झाला होता त्यानंतर कोणीही काहीही खाल्लं नव्हतं. माझ्या बॅगेतलं शेझवान स्टिक्स चं पाकीट मी बाहेर काढलं. हा सद्यपरिस्थितीतला आमच्याकडचा अन्नाचा शेवटचा स्रोत होता. त्या पलीकडे कोणाकडेही काहीही नव्हतं. पाव किलोची ती पिशवी अर्थातच थोड्याच वेळात रिकामी झाली. सर, पिके, गायकवाड साहेब, विनीत, नाना असे आम्ही काही जण वातावरण हलकं करण्यासाठी गप्पा मारत होतो. सर अधून मधून काही जुन्या गोष्टी, विनोद वगैरे सांगत होते. "मी लाडू आणलेत. खायचे का?" असं म्हणून त्यांच्या पुतण्याची - आदित्य ची गम्मत करत होते. वातावरण खरंच थोडंसं निवळत होतं. गप्पा, खाणं, पाणी करता करता शेवटी पुन्हा महत्वाचा विषय निघालाच. "अजून किती वेळ?" तुकारामला प्रश्न गेला. यावेळी दुपारचे चार वाजून गेले होते. ओढ्याच्या दिशेला काही झाडांच्या मागे दिसणाऱ्या दरीकडे पहात पहात (अजूनही समोर दरीच दिसत होती! आम्ही अजूनही डोंगरावरच!) तुकारामने उत्तर दिलं, "अजूनबी लई येळ हाय. कमीत कमी तास - दीड तास!" तुकारामच्या या उत्तराने घोरणारा तुषार खडबडून उठला! सगळ्यांच्या तोंडातल्या शेझवान स्टिक्स ची कुरकुर अचानक थांबली!! झोपलेल्या पोरींनी सुद्धा चक्क डोळे उघडले!!! अजून तास - दीड तास? 'या तुकाराम नावाच्या माणसाने आज फक्त आपली मस्करीच करायला तर इथे आणलं नाही ना?' अश्या नजरेने सगळे त्याच्याकडे बघायला लागले. तुकारामसाहेब निर्विकार चेहऱ्याने उठले आणि चालू लागले. "चला. आता कुठंबी थांबायचं नाय!" असंही जाता जाता ऐकवून गेले.

आलीया भोगासी…… म्हणता म्हणता एक एक जण उठत होता. सर्वात तरुण आणि तंदुरुस्त असे पन्नाशीचे गायकवाड साहेब तुकारामच्या मागे मागेच निघून गेले होते. सर ही उठून आमची निघण्याची वाट बघत थांबले होते. किरण ने निश्चयाने आपली बॅग उचलून पुन्हा खांद्यावर घेतली आणि कोणाचीही वाट न बघता पुढे निघून गेली. कितीही नाही म्हंटलं तरी त्या थोड्याश्या विश्रांतीने सुद्धा थोडंसं बरं वाटत होतं. आता आम्हाला निदान आमच्या आत्ताच्या परिस्थितीवर हसायची तरी ताकद मिळाली होती. उतार अजूनही संपत नव्हताच. मध्येच चालता चालता तुषारचा फोन वाजला. तो त्याच्या बॅगेत होता. त्याने दुर्लक्ष केलं. तरी फोन दोनदा तीनदा वाजतच राहिला. आता मात्र तुषारचा संयम संपला. त्याने तो फोन कोणी केला हे न बघताच त्याला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. अक्ख्या दिवसभराचं फ़्रस्ट्रेशन हे असं बाहेर निघत होतं. आम्ही ते बघून जोरजोरात हसत होतो. सगळेच कमी अधिक प्रमाणात वैतागले होतेच. सरांबरोबर विनीत आणि पिके ने शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर हसू टिकवून ठेवलं होतं. त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक वाटलं. माझ्या ‘गापू ची गापू ची गम गम’ ने सुद्धा पूर्ण वेळ वातावरण हलकं ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. इतका की हे गाणं आता आयुष्यात पुढे कधीही ऐकलं तरी समोर ही कोकण दरवाजा आणि साधले घाटाची वाट उभी राहील. पण आता मलाही चालायचा मनापासून कंटाळा यायला लागला होता. सर्व जण कंटाळले होते, पण तरीही चालतच होते, ते फक्त एका कारणामुळेच. ते म्हणजे 'दुसरा पर्याय नव्हता'!

तो डोंगरउतार एकदाचा संपला. घाट संपवून आम्ही सपाटीवर आलो होतो. डोंगर मागे पडत चालला होता आणि आम्ही गावाच्या दिशेने चाललो होतो. चारचे पाच आणि पाचा चे साडे पाच सुद्धा झाले होते, पण गाव म्हणावं अशी कुठलीही खूण अजूनही दिसत नव्हती. तरीही पाय ओढत सर्व जण चालतच होते. सूर्य देव मावळतीला आले होते. निदान सूर्यास्ताच्या आधी तरी कमाच्या घरात पोहोचावं असं आम्हाला वाटत होतं. आजचा सूर्यास्त हा असा अर्धवट वाटेत बघण्याची कोणाचीही इच्छा नव्हती आणि काल मात्र आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी कोकण कड्यावर जागा पकडून आणि कॅमेरे सरसावून बसलो होतो. काल हवाहवासा वाटणारा सूर्यास्त आज आम्हाला नकोनकोसा होता. कष्ट कालही नळीची वाट चढताना घेतले होते आणि आजही साधले घाट उतरताना घेतले होते; मात्र कालचा दिवस आमच्यासाठी जितका विशेष होता तितकाच आजचा दिवस खडतर होता. काल याच वेळी आमचे चेहरे जितके शांत आणि समाधानी होते तितकेच आज त्रासलेले आणि रडवेले झाले होते. सूर्य तोच होता, सूर्यास्ताची वेळही तीच होती, मात्र बदलली होती ती आमची जागा! ‘NOTHING IS PERMAMANT IN LIFE - आयुष्यात सर्व काही अशाश्वत आहे’, हेच महान तत्व मूकपणे हे सूर्य देव आम्हाला शिकवून त्यांच्या पुढच्या प्रवासाला चालले होते.

बऱ्याच वेळाने गावाची म्हणावी अशी पहिली खूण दिसली, ती म्हणजे पाण्याची टाकी. जीव थोडासा भांड्यात पडला. पावणे सहा झाले होते. तो प्रचंड हरिश्चंद्रगड आता आमच्या पाठीमागे राहिला होता. पण बेलपाड्यातून अगदी सरळ समोर कोकण कडा दिसतो, त्याचा तर इथे कुठेही मागमूसही दिसत नव्हता. आम्ही मागच्या डोंगराला वळसा घालून डावीकडे चाललो होतो, पण एवढा सहज दिसेल असा कोकण कडा काही दृष्टीस पडत नव्हता. अजूनही तासभर तर चालायचं नाही ना? विचारानेच छातीत धस्स झालं. गाव जवळ येत चाललं होतं. आमच्या डाव्या हाताला अजूनही टेकड्याच दिसत होत्या. गावच्या वस्तीत शिरलो. आजूबाजूला काही पाट्यांवर 'वालीवरे' असं काहीसं लिहिलेलं दिसत होतं. आमच्या बरोबरच्या कैवल्य आणि आदित्य ला आम्ही सांगायला सुरुवात केली, "बेलपाडा अजून बरंच लांब आहे, हे वालीवरे आलं!" त्यांना खरंच वाटलं. ते दोघेही बिचारे तोंड पाडून इकडेतिकडे बघू लागले. एका ठिकाणी समोर चालणारा प्रत्येक जण उजवीकडे वळण घेऊन नाहीसा होत होता. आम्हीही त्या जागेवर आलो. मी उजवीकडे वळलो आणि समोर दिसलं ते बेलपाड्यातलं कमाचं घर! हेच मी आजच्या दिवसात पाहिलेलं सर्वात सुंदर दृष्य! मागे वळून कैवल्यकडे कडे पाहिलं, त्याने तर अक्षरशः लगान मधल्या आमिर खान सारखे- तो जेव्हा शेवटचा चेंडू मारतो आणि तो सिक्सर आहे हे जाहीर होतं, तेव्हा तो देतो, अगदी तसेच एक्स्प्रेशन्स दिले. फक्त गुडघ्यावर बसायचा बाकी होता कैवल्य. सर्व जण हाश्श-हुश्श करत अंगणातच फतकल मारून बसले. बरोब्बर आठ तासांच्या अतिशय खडतर आणि पूर्णपणे अनपेक्षित पायपिटीनंतर आम्ही सर्व जण इच्छित स्थळी पोहोचलो होतो. हात पाय ओरबाडले गेले होते, मुरगळले होते, डोळे निस्तेज झाले होते पण तरीही प्रत्येकाने स्वत:च्या पायाने चालत हा ट्रेक पूर्ण केला होता ह्याचंच आम्हाला मोठं समाधान होतं. आमच्यासाठी कमाच्या घरी स्वयंपाक करून ठेवला होता. दुपारचं जेवण झालंच नव्हतं, तरीही फार कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. अजून कल्याण पर्यंत पोहोचायला चार तास तर सहज लागणार होते. त्यामुळे बळजबरीने प्रत्येकाला धरून धरून जेवायला बसवलं. जितके जातील तितके दोन दोन घास सर्वांनी खाऊन घेतले. दिवसभराच्या सगळ्या दगदगीनंतर ते संध्याकाळी साडेसहा वाजता केलेल्या जेवणातले दोन घास सुद्धा खूप गोड लागत होते. जेवण झाल्यावर फार वेळ न घालवता जीपने मुरबाड च्या दिशेने निघालो आणि सर व आदित्य, गायकवाड साहेबांच्या गाडीतून (ज्या गाडीमुळे हा साधले घाट करायचा प्रसंग आला) पुण्याकडे रवाना झाले.

माझ्या आयुष्यातला हरिश्चंद्र गडावर जाण्याचा हा पाचवा प्रसंग आणि नळीच्या वाटेने जाण्याचा दुसरा. 'राहिलेल्यांसाठी पुन्हा एकदा नळीची वाट' हाच खरं तर या ट्रेक चा उद्देश होता. पण साधले घाटाने उतरणे हा कार्यक्रम त्यात आयत्या वेळी ठरवला गेला. दोन दिवसांचा एक ट्रेक होण्याच्या ऐवजी एक दिवसाचे दोन ट्रेक झाले होते. एकावर एक फ्री! त्यामुळेच मात्र आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की नळीची वाट आणि साधले घाट आम्ही एकाच ट्रेक मध्ये केला. तसं बघायला गेलं तर या वाटेचा एवढा बाऊ करायची काही आवश्यकता नाही. जशी नळीची वाट तशीच ही साधले घाटाची वाट. कमी अधिक प्रमाणात सारखीच. पण स्वतःहून विहिरीत उडी मारणे आणि कोणीतरी मागून धक्का देऊन विहिरीत पाडणे यात जो फरक असतो तोच फरक आम्ही केलेल्या नळीच्या वाटेमध्ये व साधले घाटाच्या वाटेमध्ये. आपल्याही आयुष्यात सगळंच काही आपल्याला अपेक्षित असेल असं घडतंच असं नाहीच! अश्या वेळी 'शो मस्ट गो ऑन' म्हणत आपल्याला त्यातूनही मार्गक्रमणा करत जावं लागतंच की. हा ट्रेक आम्हाला त्याच गोष्टीची एक छोटीशी झलक देऊन गेला. आणि अर्थात शिकवण ही! त्या दिवशी आणि त्यानंतरही साधले घाटाच्या नावाने आम्ही कितीही ओरडा केला तरीही हा ट्रेक, नळीच्या वाटेपेक्षा मुख्यत्वे लक्षात राहील तो साधले घाटामुळेच!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 May 2016 - 10:21 pm | कंजूस

ये कुछ काम का है।

बोका-ए-आझम's picture

8 May 2016 - 10:44 pm | बोका-ए-आझम

अशा वेळी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकदच जास्त उपयोगी पडते.

क्या बात है! फार भारी ट्रेक झाला तुमचा. यालाच तर म्हणतात ट्रेक!

सुरेख आणि तपशीलवार लिहिले आहे.

हकु's picture

8 May 2016 - 11:45 pm | हकु

धन्यवाद कंजूस साहेब , बोका साहेब, एस. साहेब आणि प्रचेतस साहेब!

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 May 2016 - 5:42 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त झालेला दिसतोय हा पण ट्रेक. दोन्ही भाग एकदम वाचले. साधले/सादडे घाट प्रकरण एकदा बघायलाच पाहिजे.

नक्कीच बघायला पाहिजे.

mahesh d's picture

9 May 2016 - 6:34 pm | mahesh d

kharokhar avaghad aahe ha prakar

हो. आपलाही याच्याबद्दल काही अनुभव असेल तर वाचायला आवडेल.

mahesh d's picture

10 May 2016 - 1:01 pm | mahesh d

majha anubhav kahi nahi, tumcha lekh vachun aani photo pahun bhiti vatate aahe.

जगप्रवासी's picture

10 May 2016 - 2:03 pm | जगप्रवासी

जबरदस्त वर्णन… खूप छान ट्रेक झाला वाटत. बघूया आमच कधी जाणं होतंय या "पंढरीला".

तिमा's picture

11 May 2016 - 10:48 am | तिमा

छान वर्णन व फोटो. प्रत्येकाने(ट्रेकरने) आयुष्यांत एकदा तरी पाहिलेच पाहिजेत असे जे गड आहेत, त्यांत हरिश्चंद्र्गडाचा नंबर खूप वरचा.

प्रमोद देर्देकर's picture

11 May 2016 - 11:17 am | प्रमोद देर्देकर

अजुन हरिश्चंद्र्गड केला नाहीये बघुया कधी योग येतोय तो. तुमचा थरारक प्रवास झाला. मस्त वर्णन.

इरसाल कार्टं's picture

18 Oct 2016 - 2:16 pm | इरसाल कार्टं

नोव्हेम्बर मधे मिप्मझ्या ग्रुप बरोबर जतोय हरिश्चन्द्रगड्ला.

वैयक्तिक संदेश पाठवतो.

कृपया 'साधले घाट' हा चुकीचा उल्लेख बदलून 'सादडे घाट' असा उल्लेख करावा ही विनंती. कृपया सासंनी इथे लक्ष द्यावे.

भटकंती अनलिमिटेड's picture

19 Oct 2016 - 2:45 pm | भटकंती अनलिमिटेड

अनुभवी ट्रेकरचे नाव समजून घ्यायलाही आवडेल.

माफ करा, पण प्रश्नाचा रोख कळला नाही.

सिरुसेरि's picture

19 Oct 2016 - 4:02 pm | सिरुसेरि

सुरेख ट्रेक

स्पार्टाकस's picture

20 Oct 2016 - 8:49 pm | स्पार्टाकस

हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीतला एकमेव किल्ला असावा जो किमान ९ वाटांनी चढता - उतरता येऊ शकतो. त्यातलीच ही एक वाट म्हणजे सादडे घाटाची. खरंतर बेलपाड्याहून सादडे घाटाने चढून जाणारी वाट ही कलाडच्या पायथ्याकडे जाणारी, पण खिंडीतून उजवीकडे वळल्यावर मधल्या जंगलातून चढत ही वाट नळीच्या वाटेने चढून दुसरा रॉकपॅच चढून आल्यावर येणार्‍या वाटेला मिळते. दुसरा मार्ग म्हणजे खिंडीतून पाचनईपर्यंत पायपीट करुन गडावर येणारी वाट.

रायगडाप्रमाणे हरिश्चंद्रगडाची प्रदक्षिणा करण्याचा अचाट प्रकार मी माझ्या काही मित्रांबरोबर केला होता. रायगडाच्या तुलनेत आकाराने अवाढव्य असलेल्या या प्रकरणाची प्रदक्षिणा करण्यास पूर्ण दोन दिवस लागतात.

हरिश्चंद्रावर जाणार्‍या वाटा -

१. खिरेश्वर - तोलार खिंड मार्गे (या मार्गाने देवळापर्यंत येण्यासाठी दोन मार्ग आहेत - ७ टेकड्यांवरुन किंवा बालेकिल्ला मार्गे)
२. कोथळे - तोलार खिंड मार्गे
३. खिरेश्वर - जुन्नर दरवाजा मार्गे (राजदरवाजाची वाट)
४. गणेश धारेची वाट
५. विठ्ठल धार
६. पाचनई मार्गे
७. नळीची वाट
८. सादडे घाट - पाचनई (किंवा मधल्या जंगलातून सरळ वर)
९. कोकणकडा चढून सरळ वर येणारी वाट

हरिश्चंद्रगडाला प्रदक्षिणा? अबबब!!!! हा अनुभव ऐकवा ना एकदा.
बादवे नळीची वाट आणि कोकणकडा सरळ चढून येणारी वाट या दोन्ही वेगळ्या असतील तर मग ही कोकणकडा चढून येणारी वाट नक्की कुठली ? कुठून येतो आपण ?

स्पार्टाकस's picture

28 Oct 2016 - 12:06 pm | स्पार्टाकस

कोकणकडा सरळ चढून येणारी वाट म्हणजे बेलपाड्यातूनच कोकण कड्याचा पायथा गाठायचा आणि रॉक क्लाईंबिंगच्या तंत्राचा वापर करत सरळ कड्याच्या मधोमध आणि पुढे किंचित उजव्या बाजूने वर चढून येणारी वाट. अर्थात या वाटेने येताना रॉक क्लाइंबिंगचं प्रशिक्षण आणि सर्व साहित्यं अत्यावश्यक. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत दोन की तीन ग्रूप्सनेच कोकणकढा चढ्लेला आहे.

नळीच्या वाटेने चढून बरेचजण जातात पण खिरेश्वरहून चढून नळीच्या वाटेने उतरुन येण्याचा अचाट प्रकार आम्ही तीन जणांनी केला होता तो अनुभव जन्मात न विसरण्यासारखा.

हरिश्चंद्राची प्रदक्षिणा हा एक भन्नाट अनुभव होता. पायांची परिक्षा पहायची असेल तर २ नाहीतर ३ दिवसात करता येते. आम्ही बेलपाडा - सादडे घाट - पाचनई - कोथळे - तोलार खिंड - खिरेश्वर - बेलपाडा असा प्रकार केला होता.