काही अपूर्ण कविता....

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
14 Mar 2016 - 11:46 pm

मला ना
काही कळतच नाहीये
काय करू त्या अर्धवट राहिलेल्या कवितांचं
.
.
.
आता हेच बघ ना
त्या दिवशी माझ्या जवळून जाताना
तुझ्या अोढणीचा झालेला तो निसटता स्पर्श....
कागदावर उतरवून तर घेतलाय
पण पुढे काय करू त्याचं ??
काही कळतच नाहीये मला
.
.
.
आणि नविन कानातलं घालून एकदा
मान किंचीत तिरपी करून
आरश्यात पाहत होतीस तेव्हा,
ते तुझं तसं बघणंही लिहून ठेवलंय मी
माझ्या कवितेच्या वहीत...
अगदी आरश्यातल्या तुझ्या सकट
पण मग त्या मीटरमधे बसणारं
काही सुचलंच नाहीये अजून पुढे
त्यामुळे ती पण एक अपूर्ण राहिलीये
सुचेल कधीतरी...
कारण,
तुझ्या पर्स मधे एक छोटासा आरसा असतो ना नेहमी
ठाउक आहे मला!
.
.
.
आपलं भांडण झाल्यावर
हक्काने आपल्या घरात राहणारा
तुझा अबोला,
तोही आहे माझ्या वहीत
काफिया म्हणून घेतलाय एका गझलेत
पण पुढचे शेर काही केल्या सुचत नाहीयेत
अवघड आहे काफिया जरा
त्याचंही काय करावं कळत नाहीये
एकदा वाचशील का तो शेर ?
म्हणजे निदान
ती गझल तरी पूर्ण होईल.
.
.
.
कुठे बाहेर जायचं असलं
की सगळं आवरून झाल्यावर
तू जो मानेला एक हलकासा झटका देउन
केस मागे घेतेस
ते एक,
आणि सुसाट वारा सुटलेला असताना
अस्ताव्यस्त होत असलेले केस नीट करत असतेस
ते एक
अशी दोन कडवी लिहून झालीयेत एका कवितेची
बरेच दिवस झाले...
त्याच्यापुढे काही जाऊ शकलो नाहीये
कदाचित यंदा वळवात होईल ती पूर्ण
.
.
.
अजून एक कविता आहे मुक्तछंदातली.........

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

15 Mar 2016 - 2:21 am | बहुगुणी

सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल!

किंचित अवांतरः या मुक्तकाव्यातील वर्णनं इतकी चित्रदर्शी आहेत की प्रत्येक कडव्याला वेगवेगळ्या कलाकारांनी चित्ररूप दिलं तर काय बहार येईल असं वाटलं. मिपा रंगभूषा मंडळातील व मिपावरील इतर कलासक्त लोक, म्हणजे अभ्या, जयंतराव, चित्रगुप्त, संदीप डांगे, स्पा, नीलमोहर, चौकट राजेसाहेब, एस, बबनराव, सूड, पिवशी, आनंदिता वगैरे मंडळी हे मनावर घेतील का? अशी इतरही मुक्तके/ अशा कविता इथे आहेत; मिसळलेला काव्यप्रेमी, आनंदमयी, सांजसंध्या, विशाल कुलकर्णी ही काही चटकन आठवणारी उदाहरणे....

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2016 - 11:58 am | अत्रुप्त आत्मा

@सुरेख! असे निसटते क्षण गोळा करून महाकाव्य होईल! >> +++१११

सटक's picture

15 Mar 2016 - 3:34 am | सटक

कवितेची कल्पनाच काय सुंदर आहे!

प्रचेतस's picture

15 Mar 2016 - 5:27 pm | प्रचेतस

क्या बात है चाणक्या....!!!
निव्वळ अप्रतिम.

भाऊंचे भाऊ's picture

15 Mar 2016 - 5:36 pm | भाऊंचे भाऊ

.

यशोधरा's picture

16 Mar 2016 - 5:38 am | यशोधरा

सुर्रेख!

प्राची अश्विनी's picture

16 Mar 2016 - 8:42 am | प्राची अश्विनी

सुंदर!!!

नाखु's picture

16 Mar 2016 - 9:29 am | नाखु

काय मस्त झुळुक आणली या वैशाख वणव्यात.

झक्कास

मनमौजी नाखु

तुषार काळभोर's picture

16 Mar 2016 - 10:25 am | तुषार काळभोर

0

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2016 - 10:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच सुंदर झालीये.. आवडली.
अवांतरः माझी आठवण काढल्याबद्दल धन्यवाद हो बहुगुणी..

मित्रहो's picture

16 Mar 2016 - 8:18 pm | मित्रहो

कवितेची कल्पना आवडली

सूड's picture

16 Mar 2016 - 8:26 pm | सूड

सुंदर!!

जव्हेरगंज's picture

16 Mar 2016 - 9:17 pm | जव्हेरगंज

ह्या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या
हा आडोसा शोधत पाऊस आलेला
हे तेव्हाचे वर्णन , हा तेव्हाचा तो क्षण
ही तेव्हाची कविता .. कोरी
अजूनही ना सुचलेली
अजूनही नाही प्रिये

-वैभव जोशी

अभ्या..'s picture

16 Mar 2016 - 9:30 pm | अभ्या..

अहाहाहाहाहा, अप्रतिम.
बहुगुणीसाह्यबांचेच मत परत. मिक्याची आठवण झालीच. ओय मिक्का तुस्सी कित्थे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Mar 2016 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तरच त्यातला रस, अर्थ आणि आनंद कायम राहतो !

अभ्या..'s picture

16 Mar 2016 - 9:41 pm | अभ्या..

आणि बघ ना,
तू बसतेस समोर, मला लिहिताना पाहायला आवडते म्हणून.
टक लावलेले डोळे, कधी माझ्याकडे, कधी कोर्‍या वहीकडे.
काय लिहू आता तुला पाहायचे सोडून.
बर्‍याच भेटी झाल्या अशा,
तू असलीस की शब्द पळून जातात,
नसलीस की ते पण गोंधळून जातात.

एक एकटा एकटाच's picture

17 Mar 2016 - 10:56 pm | एक एकटा एकटाच

वाह

रातराणी's picture

17 Mar 2016 - 11:36 am | रातराणी

सुरेख!

एक एकटा एकटाच's picture

17 Mar 2016 - 10:55 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2016 - 10:39 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त आणि मस्तच

इतक्या संदर कवितेला नक्की कशी दादा द्यावी ते समजत नाहीये.

अप्रतिम केवळ अप्रतिम.....

पैजारबुवा,

चाणक्य's picture

18 Mar 2016 - 10:15 pm | चाणक्य

धन्यवाद सर्वांना.

@जव्हेरभाऊ, वैभव जोशी माझ्याही आवडत्या कवींपैकी आहे.
@अभ्या, लय भारी ओळी रे
@बहुगुणी, कल्पना छान आहे.

शलभ's picture

22 Mar 2016 - 7:36 pm | शलभ

खूपच मस्त..एक नंबर..

धनावडे's picture

11 Feb 2019 - 11:06 pm | धनावडे

फारच सुंदर कल्पना..