आपण किती हसतो!

सुमेध रानडे's picture
सुमेध रानडे in जे न देखे रवी...
26 Jan 2016 - 9:06 pm

रोज आपण पुष्कळ हसतो,
कधी योग्य कधी वायफळ हसतो.

आईच्या भोळ्या प्रश्नावर प्रेमाने हसतो,
बाबांच्या लहानशा चुकांवर जोमाने हसतो.

मित्रांच्या घोळक्यात एकत्र हसतो,
मोबाइल मधे बघून दिवसरात्र हसतो.

साहेबाच्या जोकवर टाळी मारुन हसतो,
आणि नंतर साहेबावरंच मागे चोरुन हसतो.

कधी मोठ्याने तर कधी हळुवार हसतो,
एकाच विनोदावर शतवार हसतो.

कधी उशिराने तर कधी तात्काळ हसतो,
कधी निरागस कधी खट्याळ हसतो.

निर्लज्ज होऊन कोणाच्या तोंडावर हसतो,
कधी तोंड लपवूनही अनावर हसतो.

कधी मोजून मापून कधी मुक्त हसतो,
कधी गालातल्या गालात लुप्त हसतो.

नावडीच्या व्यक्तीवर पोटभर हसतो,
स्वतःवरच्या टिकेवर मात्र वरवर हसतो.

कोणाला तरी चिडवताना डोळा मारुन हसतो,
प्रेमाचं रागावताना डोळे वटारून हसतो.

अगदी नको झालं तरी खोटंसंं हसतो,
आपुलकीचा आव आणत मोठंसंं हसतो.

लागोपाठ विनोदांवर पोट धरुन हसतो,
हाहा हीही आणि खोखो करुन हसतो.

कोणी समोर येताच लाजून हसतो,
चेहऱ्यावरचे भाव वाचून हसतो.

कोणासमोर तर कोणाच्या पाठी हसतो,
कोणावर तर कधी कोणासाठी हसतो.

फोटोसाठी किती वेळ ओठ खेचून हसतो,
नंतर त्याच फोटोतून आठवणी वेचून हसतो.

मागे वळून बघताना स्वतःवर हसतो,
दुसऱ्याने हसण्याच्याही आगोदर हसतो.

आजूबाजूला होणाऱ्या घडामोडींवर हसतो,
प्रत्येकाने केलेल्या तडजोडींवर हसतो.

एकेका खुपणाऱ्या गोष्टीवर हसतो,
दृष्टी जाइल तिथे या सृष्टीवर हसतो.

पण अंधारातही एक दिवा लावून हसतो,
कोणाच्या तरी मदतीला धावून हसतो.

कोणाच्या दुखण्यावर फुंकर घालून हसतो,
चार शब्द प्रेमाचे सहज बोलून हसतो.

मनात मायेची ऊब जपताना हसतो,
याच ऊबदार दुलईत मग झोपताना हसतो.

हळुवार ऐकू येणाऱ्या गाण्यातून हसतो,
डोळ्यामधून ओघळणाऱ्या पाण्यातून हसतो.

कारण असो वा नसो, आपण सगळेच हसतो,
हसत राहू असेच, आपण हसण्यासाठीच असतो.

कविता

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 9:53 pm | संदीप डांगे

सुंदर...!

एस's picture

26 Jan 2016 - 10:28 pm | एस

कविता आवडली!