पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग
पुढे.. पुढे... अजून पुढे.... पण कुठवर जायाचे?
चांगला रस्ता लागल्यावर जनता झोपली. पहाटेचे पाच वाजत होते. रस्ते चांगले असले तरी धूळधाण उडत होती. ट्रक्सचा गराडा होताच. आता फार बाका प्रसंग येऊन ठाकला. मला चक्क झोप येत होती. पहाटेचे पाच ही काळझोपेचीच वेळ. अंथरुणात असाल, छान दुलईत गुरफटून असाल तर साखरझोप. स्टीअरींगव्हील हातात असतांना काळझोपच. ती टळत नाहीच. अजिबात नाही. जागृत असणे शक्य नसते. शक्य असते ते फक्त कायमचे झोपणे.
साडेपाचपर्यंत मी बराच दम धरला. वाटले निघून जाऊ. आता जवळच आले असेल. अजून अर्धातास तर आहे. मग उजाडेलच. खरे तर ही माझी भयंकर चूक होती. सतत दमवणारी ड्रायविंग केल्यावर एक फटीग येतो. तो ग्लानीत नेतो. मला डूलकी लागली नाही. पण माझ्या जागे राहण्याच्या हट्टीपणामुळे तीन-चारवेळा असे झाले की डोळे उघडे आहेत आणि मी चक्क झोपलो. अलगद स्वप्नात जातो बघा आपण, अंथरुणात पडल्या पडल्या. मी टक्क जागा आहे आणि झोपलेलोही. (या अनुभवानंतर मी शपथ घेतली की असे यापुढे कधीच करणार नाही. जिथे झोप येईल तिथे गाडी बाजूला घेऊन शिस्तीत दोन तास झोप काढेन. या शपथेनुसार परवाच मी घरापासून अवघा वीस मिनिटावर असूनही गाडी बाजुला घेऊन तासभर झोपून राहिलो. वाचकांनी याची नोंद घ्यावी. स्वतः वा कोणी ड्रायवर असल्यास, कोणालाही ह्यासाठी गरज पडल्यास असेच करावे ही विनंती.) तीन वेळा असे काही सेकंद अनुभवल्यावर मग मात्र मी शिस्तीत गाडी बाजूला घेतली आणि उतरलो.
लोखंडे जागा झाला होता. त्यालाच आता पुढे चालवायला सांगावे ह्या विचारात होतो. आम्ही जिथे थांबलो तो भाग हायवेवरचा चहा-टपर्यावाला भाग होता. तो ओळीने शंभरवाला नाही बरंका! सकाळचे सहा वाजलेले. थंडी होती. लोखंडे आणि मी मस्त स्पेश्यल चहा घेतला. बाकीचे झोपलेलेच होते.
त्या चहावाल्याला विचारलं, "अजून किती दूर आहे कुबेर?"
"यहांसे बस पंद्रह किलोमीटर... आगे जाके एक राइट मारना. बडासा पुतला आयेगा. वहांसे फिर लेफ्ट मारना. स्द्फ्ज्ल्क्स् ज्द्फ्ल्क् ज्ल्स्फ्ज्ल्क........." मी पुढचे काही ऐकले नाही. लोखंडेला सांगितले ऐकायला आणि लक्षात ठेवायला. मला पत्ता सांगता येत नाही आणि कुणी सांगितलेला लक्षात राहत नाही. त्यात अशी गुंगी. त्यामुळे योग्य माणसाला कामाला लावले.
गरमागरम चहाने झोप उडाली. तोंडावर गारेगार पाणी मारले. फ्रेश झालो. थोडक्यासाठी बट्टा नको म्हणून परत गाडी हातात घेतली. आता ह्या कुबेर नावाच्या देवस्थानाच्या दिशेने जाणार्या अनेक एमएच१५ दिसत होत्या. नाशिक-पासिंग हो. टेम्पो-ट्रॅवलर, क्रुझर्स, इनोवा, स्कॉर्पियो, सेडान्स, हॅचबॅक्स. सगळे सुसाट धावत होते. मीही त्यांच्या मागेच गाडी पिटाळली. हे नवे सहप्रवासी आपल्याच वाटेवरले आहेत हे बघून हुरूप आला. आपण योग्य रस्त्यावर आहोत हे कळले होते ना!
तांबडं फुटत होतं. एक काळरात्र संपत होती. नवी पहाट उगवत होती. नवा अनुभव वाट पाहत होता.
दोन-तीन वळने घेतल्यावर अचानक कच्चा रस्ता लागला. धूळ उडू लागली. छोट्या दर्या-खोर्यांतून जातोय काय असे वाटत होते. ते नर्मदेचे खोरे होते. आम्ही नर्मदेत घुसलो होतो. तिच्या प्रवाहांनी खोदलेल्या वाटांमधून प्रवास चालला होता. दहा मिनिटे अशीच गेल्यावर प्रकाश उगवता झाला. आसमंत भगव्याने भरले. त्याबरोबरच पुढ्यातले नर्मदेचे वाळवंटही. मी चक्क स्कॉर्पियो घेऊन नदीपात्रात होतो. तेही चांगला अर्धा किमी. ते एवढे विस्तिर्ण पात्र पाहून हरखून गेलो. वाहने जाऊन येऊन एक चाकोरी झालेली. त्यातून चालवत गाडी पुढे काढली. दोनेक किमीचे अंतर नदीपात्रातून कापून प्रत्यक्ष नदीजवळ आलो. दोन्ही बाजुने रांगेने गाड्या पार्क केलेल्या होत्या. किमान शंभर तरी असतील. खूप गर्दी होती. लहान मुलं, बायका, पुरुष, वयोवृद्ध. गरिब, श्रीमंत.
"साहेब, पैसे आहेत ना सोबत..?" रेडकर.
"नाही, इथे कुठे एटीएम आहे काय. एटीममधून काढून घेइन म्हणून राहून गेलं." मी
"आता इथे या वाळवंटात कसलं एटीएम मिळणार आहे तुम्हाला?"
"पण इथे? इथे लागणार आहेत का ते पैसे...?" मी.
"हो, इथेच चढवायचे आहेत. जेवढे चढवाल त्याच्या शंभरपट देइल कुबेरदेव. दहा हजार चढवा, दहा लाख मिळतील बघा पुढच्या सात दिवसात... बघा आता कसं ते, बाकी तुमची मर्जी. माझं सांगायचं काम."
डोक्याची मंडई ना आता...! हा रेडकर म्हणजे बोललो होतो ना, चक्रम आहे म्हणून.
"नाही, एकदम ११ हजार नसेल चढवायचे तर तुमच्या मर्जीने जे होईल ते चढवा. कुबेरदेव प्रसाद देतो बरं का?"
"................." मी त्याच्या तोंडाकडेच पाहत होतो.
आम्ही आमचे सामान घेऊन नदीजवळ जायला लागलो. एवढ्या मोठ्या पात्रात नर्मदा आक्रसून काहीशे फूटांच्या रुंदीने वाहत होती. पात्रालगत बरीच लगबग सुरू होती. लोकांना या तीरावरून त्या तीरावर ने-आण करणार्या मोठमोठ्या होड्या होत्या. त्यांची प्याशिंजर भरणे-उतरवणे ही कामे जोशात सुरु होती. आरडा-ओरडा, त्या डिझेल इंजिनांचे "घ्वाट, घ्वाट, घ्वाट" असा आवाज काढणे, प्याशिंजरांचे एकमेकांस मोठ्याने हाका देऊन बोलावणे, सर्व कुटुंबाने एकाच होडीत जाण्याचा हट्ट धरून ठेवल्याने खोळंबलेला होडीवाला, वृद्ध आणि बालकांनी पाण्यात जाऊन लोखंडी पायरीवर चढून हलणार्या होडीत चांगली बेंबीच्या वर टाच घेऊन पाय टाकणे, वैगेरे वैगेरे.....
आम्ही जवळ जाऊ लागलो तसे पाणी दिसले. नर्मदा ह्या डोळ्यांनी पाहिली पहिल्यांदा. पाणी निर्मळ होते. अगदी तळ दिसत होता स्वच्छ! आम्हीही सहाजण गोळा झालो. कुठल्या होडीत चढायचे ते ठरवले आणि एक एक करत चढत होतो. मला ते बेंबीपर्यंत पाय उचलणे न जमल्याने मी सरळ वाकून गुडघा होडीच्या काठावर टेकवला आणि त्याच वेळेस ती हलल्याने आता मी सरळ पाण्यात सूर मारतो का काय अशी अवस्था झाली. कारण झुकल्यामुळे चेहरा पाण्याच्या दिशेने खाली आलेला, एक पाय पाण्यात बुडालेल्या लोखंडी पायरीवर आणि दुसरा होडीच्या हलणार्या काठावर! हातात बॅग, दुसर्या हाताने आधार घ्यावा असे काहीच नाही. मघाची काळझोप चुकली ती इथे गाळ-झोप होते काय असा प्रसंग आला. पण थोडे खरचटवून निभावले.
सगळे होडीत बसले. आमचे पैसे सदाशेठने लगेच भरून टाकले, माणशी दहा रुपये. तरी होडीवाला थांबलेलाच. त्याची नजर माणसे आणि पैसे मोजत होती. "दो जन बाकी है, दो जन बाकी है..." असा हाकारा करत त्याने 'बाकी दो जन' हुडकलेच आणि पैसे हातात आल्यावर आमच्याही इंजिनाने 'घ्वाट, घ्वाट, घ्वाट' करायला सुरुवात केली. मी जरा नीट लक्ष दिले तेव्हा असे समजले की हे सुमारे पाचशे-सहाशे फूट अंतर पार करायला ते इंजिन फार डिझेल पित नव्हते. अक्षरशः घ्वाट, घ्वाटच, म्हणजे घोटभरच! कारण त्याने स्टार्ट मारल्यावर दहाबारा वेळा इंजिन फायर झाले. आणि तेवढ्याशा ढुशीवर हमरी नैय्या नर्मदामैय्या पार कर गयी! उणेपुरे दहा रुपयाचे डिझेल नसेल खात ती नैय्या.
नुकतंच उजाडलं होतं. पूर्ण थेट सुर्यप्रकाश नसण्याची ती वेळ, अथांग शांत पाण्यावर होड्यांच्या हालचालींमुळे उठणारे तरंग, त्यावर पडणारी प्रतिबिंबे, ते धुकेसे, ती काही मुले सुर मारुन त्या हिंदकाळणार्या पाण्यात अशी मधेच मुंडकी बाहेर काढून इकडे तिकडे बघत आहेत. कोणीतरी अर्घ्य वाहतोय. त्यांचीही प्रतिबींबे हलतायत पाण्यावर.. दूरपर्यंत बघितले तर नदी धुक्यात लुप्त झालेली. मोठमोठे बांबू रोवून होड्या इकडून तिकडे जातायत, काही फोकसमधे आहेत, काही डिफोकस झालेल्या. हे अर्धवट उजाडल्या अंधाराचं दृश्य कुठल्याही कॅमेर्यात पकडता येत नाही.
चला.. आम्ही धक्क्याला लागलो. मग समजले की डुबकी मारून जायचे मंदिरात. तेच. घरून घालून आणलेले जुने कपडे सोडून द्यायचे. कठड्यावर बॅग ठेवुन मी उतरलो पाण्यात. नर्मदेला मिठी मारली. थंडगार शिरशिरी सर्वांगात पसरली. जणू शरीराची सगळी धरणं फोडून नर्मदा माझ्या आत घुसली, हजारो प्रवाहांनी. तीन डुबक्या मारल्या. बाहेर आलो. कपडे बदलले. काही बाबतीत मन बदलायला मात्र कठिणच जातं. जुने कपडे असेच पाण्यात सोडणे पटतच नव्हते. ते तिथेच कठड्यावर घडी करून ठेवून दिले, त्यात अकरा रुपये ठेवून! बहुतेक ती मुलं लोकांनी सोडलेल्या पैशांसाठी सूर मारत असावीत नदीत..... बाकी तिथलं वातावरण तुम्ही समजून घ्या. जास्त वर्णन करत बसत नाही.
असो. मंदिर आणि एकूण व्यवस्था हा माझा डोकेदुखीचा विषय.
इथे डोके आणि भावना थोडा वेळ बाजुला ठेवून सांगाती जे करतील ते फॉलो करायचे ठरवले. आम्ही सगळे पायर्या चढून वर गेलो. तिथे उजव्या बाजुला मुख्य कमानीनंतर एकजण कोपर्यात फुलं, वैगेरे देत होता. कोंडाळं झालेलं, मीही टाचा उंचावून बघितलं काय चाललंय ते. त्या मुलाचं काम पार शिस्तीत सुरू होतं. शिवपिंडीवर वाहायला दूध बनवून देत होता तो. बनवून म्हणजे एका प्लास्टीकच्या बॅगेत दुधाचे पाणी, मध, अत्तर, गुलाबपाकळ्या, अजून कसले तरी भरडलेली काळी-बदामी पावडर, गुलाबजल, गोमुत्र(?) असे सगळे एकत्र टाकत होता. त्या एका बॅगचे साठ रुपये. ते घेऊन आम्ही पुढे वर चढलो. रांग होती. रेडकरने लगेच पेड-दर्शन ऑफिसकडे मोर्चा वळवला. प्रत्येकी अडीचशेची पावती फाडून आम्ही वेगळ्या प्रवेशद्वारातून पुढे झालो. रेडकरच्या म्हणण्यानुसार आज पेड दर्शनाला गर्दीच नव्हती. अन्यथा तीही लाईन सुमारे दोन-अडीचशे लोकांची असते. मी म्हटलं, खरंच की काय? त्यावर तो म्हणाला, "अहो ही दुसरी फ्री लाईन आहे ही तुम्हाला इथे इतकीच दिसत आहे. ही चार किलोमीटर इतकी लांबा आहे. आता आपल्या बाजूला जे फ्रीवाले उभे दिसत आहेत ते किमान रात्री दोन वाजल्यापासून लाईनमधे उभे राहिले असतील." पेडदर्शनाच्या रांगेत मी तिसराच असल्याने आज खरंच भगवंताला माझी भेट घ्यायची अनिवार इच्छा असल्याचे दिसून येत आहे असे माझ्या ध्यानात आले. कारण रेडकरने म्हटल्याप्रमाणे पेड-ला किमान पंचवीसलोकांचीही लाईन असती तरी मी उभा राहिलोच नसतो. देवाच्या दारी धक्काबुक्की खात लाईन लावणे इज आउट ऑ क्वेस्चन फॉर मी... यु नो? पण आज सर्व गुंडाळून ठेवायचे ठरल्याने, नो प्रिन्सिपल्स, नो अॅटीट्यूड टुडे..... भगवंताला बिचार्याला आज एवढा कळवळा आला ना.... आम्ही एवढ्या भक्तिभावाने, साठ रुपये भावाने विकत घेतलेलं, दुसर्याने कर्मभावाने बनवून दिलेलं दूध पुजार्याच्या हाती दिलं त्याने ते पिंडीवर न वाहता बाजूलाच अशाच बॅगच्या राशींवर निष्कामभावाने फेकून दिलं... गर्र्रर्र्रर्र... 'कंट्रोल.. कंट्रोल उदय'.
तर हे कुबेर मंदीर, कर्नाली गावाच्या बाजुला, बडोद्यापासून सुमारे ६०-७० किमी. नर्मदेच्या काठी वसलेलं भारतातलं कुबेराचं एकमेव मंदीर असावं. इथे लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांना अखंड धन-धान्याची, सुखाची प्राप्ती होते म्हणतात. सलग पाच अमावस्या जो इथे येऊन कुबेराचे दर्शन करेल त्यास लगेचच धनलाभ होऊन सर्व आर्थिक चिंता मिटण्याचा अनुभव येतो. जेवढे दान केले त्यापेक्षा शंभरपट अधिक मिळते. असेच काहीतरी सोबती ऐकवत होते बुवा...!
दहा दहा रुपये देऊन सगळ्यांसाठी घरी धान्यात ठेवायला कसल्यातरी बरकतीच्या पुड्या घेतल्या. आणि एक प्रदक्षिणा मारली. लोखंडे व मी पुढे आलो, दुसर्या मंदिरात शिरलो. तर ते मंदीर नव्हते. चक्क मॉल होता. धार्मिक वस्तू विक्रीसाठी. त्या पन्नास दुकानांच्या भाऊगर्दीत कुठेतरी मंदीर असलेच पाहिजे असे सारखे राहून राहून वाटत होते. शेवटी कळलेच, हे इतके तद्रुप झाले आहे की देऊळ आणि दुकान यांतला फरक नष्ट झाला आहे. धंदाच देव झाला, देवाचाच धंदा झाला. बाहेर आलो, काय करणार, डोके भंजाळून गेले हो!
परत त्या प्रवेशकमानीपाशी सगळ्यांची वाट बघत बसलो. एक एक करुन बिछडे यार मिले. आम्ही परत नदीच्या दिशेने निघालो तो मला लक्षात आले की मी चप्पल वरच मंदिराच्या आवारात विसरलो.
रेडकर म्हणाला, "जाऊ द्या, विसरले ना. जाऊ नका परत आणायला. ती जायचीच असेल निघून तुमच्यापासून...",
"हो, अॅक्चुअली मला कोणती चप्पल सोडून देऊ याचा संभ्रम होता सुरुवातीपासून",
"झाले तर मग, ती तुम्हाला अनलकी असेल..."
"असेल बुवा... जाऊ द्या. माझी खरंच त्या चपलेत काही इच्छा नाही. मरू दे."
मग रेडकर सगळ्यांना ह्या झालेल्या योगायोगाबद्दल मसाला लावून सांगू लागला.
आम्ही परत होड्यांच्या जागी आलो, फोटो-सेशन झाले. होडीत बसलो. नर्मदा पार केली. पाण्यातून बाहेर आलो आणि मग त्या विसरून आलेल्या चपलेला पायांनी टाहो फोडून आठवायला सुरुवात केली. कारण.....? नर्मदेतले गोटे!
ते अणुकुचीदार, टोकदार, गुळगुळीत, बोचणारे दगड पायाखाली येताच ब्रह्मांड आठवले. कुठून दुर्बुद्धी झाली आणि दहा पायर्या चढायचा कंटाळा आला म्हणून चप्पल सोडून दिली असे झाले. तरी काय होतं एवढ्याला म्हणून चालायला सुरुवात केली. बाकीचे पुढे निघून गेले. मी बराच मागे पडलो. काय करणार. चालताच येत नव्हते. मला मागनं आवाज आला, "साहेब, थांबा माझ्यासाठी." लोखंडे होता. महाशयांनी चांगला बूट मोज्यांसकट नर्मदेस देऊन टाकला होता. नर्मदेला ते आवडले नसल्याने ती शिक्षा करत होती. तो माझ्या पेक्षाही हळू हळू चालत होता.
न टाळता येण्यासारखी परिस्थिती आली की मग विपश्यना माझ्या कामी येते. मी एक एक दगडाच्या रुतण्याकडे पुर्ण ध्यान केंद्रीत केले. त्याबद्दल करवादणे बंद केले. असे अजून दहा मिनिटंच रुतणार त्यानंतर हे सर्व बंदच होईल ह्या निर्धाराने एक एक दगड साक्षीभावाने बघत गेलो. मनाचा त्रास बंद झाला तसा शरिरानेही नाटकं करणं बंद केले. गाडीजवळ पोचलो. शांतपणे आत बसलो. तळवे एका भयंकर अनुभवातून नुकतेच गेले होते. त्यांना आराम दिला. आता मी आणि लोखंडे विना-पादत्राणाचे होतो.
निरंजनशेठने गाडी हातात घेतली. भराभर पात्रातून बाहेर काढली. दूरवर आम्हाला शेकडो बसेसची पार्किंग दिसली. कुणीतरी म्हणाले ती मंदिराची रांग तिथून सुरु होते. सुमारे चार-पाच किमी अंतर असेल. इतकी गर्दी, इतके लोक. मला नाशिकच्या लोकांचे कौतुक वाटले. सगळी दुनिया तिकडे रामकुंडावर डुबकी मारायला गोळा होते. आणि हे नाशिककर इथे डुबकी मारायला येतात. खरे आहे, 'जिथे पिकतं तिथे विकत नाही.'
मुद्रा लोन देणारा असा कोणी अधिकारी नाही, आम्ही सूरतला जाणार नव्हतोच, हा प्रश्न आता निकालात निघाला होता. पण खरंच रेडकर, पंढरीनाथ, निरंजनशेठ, सदाशेठ यांनी प्रत्येकी अकरा हजार पाण्यात सोडले असतील काय हा प्रश्न मनात घोंगावत होता. ह्याच चौघांनी नाही तर तिथे येणार्या त्या हजारोंनी असे किती सोडले असतील...? मलाच का सोबत घेतले? एवढा बनाव रचण्याची काय आवश्यकता होती? एक प्रश्न सरत नाही तो दहा प्रश्न उभे राहतात. ही प्रश्नांची मालिका संपत नाही.
ही मालिकाही संपणार नाहीच कारण प्रवास अजून संपला नाही... सीट-बेल्ट बांधा.
आता सकाळचे साडेआठ वाजलेत. आमच्या दुसर्या सभेचा प्रारंभ होत आहे.
------------------------------------------------------------------------
क्रमश:
प्रतिक्रिया
25 Jan 2016 - 2:12 am | मास्टरमाईन्ड
असं बर्याच ठिकाणी असतं.
मस्त वेग आहे कथेचा.
येऊ द्यात पुढचे भाग
25 Jan 2016 - 2:59 am | मनोजगोसावी
बोअरींग आहे
25 Jan 2016 - 6:30 am | स्पा
जबराट
25 Jan 2016 - 10:07 am | शलभ
मस्तच
25 Jan 2016 - 10:47 am | अजया
वाचतेय.पुभाप्र.
मंदिर= धार्मिक माॅल. पटेश!!
25 Jan 2016 - 10:50 am | नाखु
चाल्लीय तुमची चक्र्धारी यात्रा
25 Jan 2016 - 11:03 am | पैसा
मस्त लिहिताय! सगळीच गंंमत जंमत आहे. कुबेराच्या मंदिरात शंकराची पिंडी का म्हणे?
25 Jan 2016 - 11:25 am | संदीप डांगे
ती पिंडी म्हणजे कुबेर भंडारी शिवलिंग. प्रत्यक्षात जिथे कुबेराचं मंदिर वा स्थान आहे तिथे आम्ही गेलोच नाही हे मला नंतर गुगलून पाहिल्यावर कळले.
जालावरून घेतलेले काही फोटो:
कुबेर भंडारी शिवलिङ्गः
मंदिराचा काही भागः
घाट व होड्या:
कुबेर महाराजः
25 Jan 2016 - 11:33 am | पैसा
पैसे नदीत टाकतात लोक? मला वाटले देवस्थानाला दान करत असतील.
25 Jan 2016 - 11:44 am | संदीप डांगे
नक्की काय ते मलाही कळले नाही. फारच कमी वेळ होतो तिथे त्यामुळे जास्त माहिती मिळवता आली नाही. एवढ्यात परत कधी जाणे झाले तर जरा सविस्तर माहिती काढेन. माझ्यासाठी तेव्हा सर्व सरप्राईज असल्याने भांबावल्यासारखी स्थिती होती. जालावरही फारशी माहिती नाही. लोक नदीत कपडे सोडून देत होते, सगळीकडे नुसत्या कपड्यांचा ढिगाने पसारा होता. मंदिर व्यवस्थापन त्याची काहीतरी विल्हेवाट लावत असणार.
25 Jan 2016 - 12:17 pm | पैसा
दहा हजार रुपये दान बिन करू नको! मला उत्सुकता एवढीच की पैसे दान केले किंवा नदीत टाकले तर ते पुढे कोण उचलतो?
25 Jan 2016 - 11:35 am | नीलमोहर
आमचे मातोश्री पिताश्री काही नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांच्यासोबत या कुबेर मंदिराचे दर्शन घेण्यास जाणार होते, त्यांना कसेबसे परावृत्त केले. या मंदिराविषयी जाणून घ्यायची उत्सुकता होतीच, तुमच्या लेखांमुळे अनायासे माहिती मिळत आहे त्यासाठी धन्यवाद.
मंदिर = धार्मिक माॅल अगदी बरोबर.
25 Jan 2016 - 12:20 pm | होबासराव
बास क्या गाववाले कितना पैसा दुप्पट करके लोगे :) (गम्मत करतोय)
जबराट लिहिलय..
26 Jan 2016 - 1:35 am | रातराणी
वाचतेय. उत्कृष्ट झालीये मालिका! पु भा प्र.
26 Jan 2016 - 4:50 am | बहुगुणी
पुढे काय घडलं असेल त्याची थोडीशी उत्सुकता आहेच, पण......
लोक नदीत कपडे सोडून देत होते, सगळीकडे नुसत्या कपड्यांचा ढिगाने पसारा होता.
इतक्या प्रचंड प्रमाणावर कपडे, पादत्राणं वगैरे नदीत सोडून जलप्रदुषण होत असतांना तुमच्यापैकी कुणालाच त्याविषयी काही वाटलं नाही?
26 Jan 2016 - 11:20 am | संदीप डांगे
बहुगुणीजी, आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हा व याप्रकारचा प्रश्न उपस्थित होणार हे आधीच माहित होते त्यामुळेच सुरुवातीला डिस्क्लेमर टाकले होते
>>(वाचकांना नम्र सूचना: येथून पुढे नियमबाह्य, कायदाबाह्य, घटनाबाह्य, नैतिकताबाह्य बरंच वाचायला लागणार असल्याने थोडावेळ आदर्शवाद बाजूला ठेवणे ;-) )
मी ज्या लोकांसोबत होतो ती अतिशय सामान्य माणसे होती, उच्च-विचार, संस्कृती असणारी नव्हती. ही तीच जमात आहे जी सिग्नलवर थांबत नाही, रस्त्यावर थुंकते, बिन-दिक्कत कचरा करते, भ्रष्टाचारास प्रोत्साहन देते. ह्यांना चुकीच्या, अयोग्य बाबी खटकत नाहीत, कारण हे स्वतःच त्यास कारणीभूत असतात. इथे कपडे सोडून देणार्यांमधे अनेक सुशिक्षित, श्रीमंत लोकही होते. अशा लोकांसोबत असतांना मी तिथे फक्त निरिक्षकाची भूमिका घेतली. काय चाललंय ते फक्त नोंद करत होतो. लेखात त्याबद्दल कुठलीही टिप्पणी करण्याचे त्याचमुळे टाळले. कदाचित जर दुसर्या खेपेला गेलोच तिकडे तर हा सगळा नक्की काय प्रकार आहे आणि नर्मदेची स्वच्छता कशी राखली जाते याबद्दल शोध घेईन. कारण ज्याप्रमाणात तिकडे गर्दी होते ते बघता नर्मदा पाण्याची नाही तर कपड्यांची नदी झाली असती.
दुर्दैवाने भारतात स्वच्छता, पर्यावरण, आदर्श नागरी-व्यवहार याचा प्रचंड दुष्काळ आहे, या दुष्काळात गरिब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा कुठलाही भेद नाही ह्याचाही खेद आहे.
माझ्याबाबतीत म्हणाल तर मला माझे स्वतःचे कपडे असे नदीत सोडणे पटले नाही. मला हा प्रकार पटला नाही व यानंतर कधी असे माझ्याकडून होणार नाही.
26 Jan 2016 - 8:12 pm | बहुगुणी
स्पष्टीकरणाची अपेक्षा नव्हतीच, पण वाचून नक्कीच खूप बरं वाटलं.
26 Jan 2016 - 9:04 pm | संदीप डांगे
आपण मिपाचे एक सन्मानिय सदस्य आहात. आपले प्रतिसादही फार दुर्मिळ असतात. अशा परिस्थितीत आपल्यासारख्या सदस्याने आवर्जून उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देणे मला आवश्यक वाटले. हे स्पष्टीकरण नव्हे तर लेखात न आलेली बाजू आहे.
आपणास बरे वाटले हे वाचून खरंच मलाही बरे वाटले. :-) धन्यवाद!
26 Jan 2016 - 6:01 am | रेवती
क्षेत्राचे ठिकाण नजरेसमोर आले. त्यातून आपण कधी एकदा बाहेर पडतो असे होते. हे वाचतानाही तसेच वाटले.
26 Jan 2016 - 9:26 pm | तर्राट जोकर
उत्कंठावर्धक लिखाण. अजून येऊद्यात.
28 Jan 2016 - 1:30 am | विलासराव
डांगे साहेब नर्मदा परिक्रमेत मी तेथे भेट दिली आहे.
मलाही बाजार आवडला नव्हता.
फक्त श्री अरविंद महर्शी यांनी तेथे साधना केलिये म्हणून उत्सुकता होती.
बाकी भन्नाट लिहिताय.