एकटेपणाच्या कविता

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
22 Jan 2016 - 12:09 pm

1..

सगळीकडून कोसळतय
आभाळ एकटेपणाचे
अन ते दडलेत
झाडाआड
अजाणतेपणाची झूल पांघरून,
मी उदासगीत गात
प्रकाशकवडसे टिपत
रस्ता कापतो
जावून येऊन
काय त्या सावलीची सोबत.

तसं सारं शरीरच
भेगाळलयं
उन्मादी लस स्त्रवतेयं
सगळीकडून,
झडत जाणारे सारे अवयव
अन्
मनाने खचलेला मी
सारं सारं सामावून जाव ह्या
कराल अंधारात
अन् जाणीव उरावी
काही नसण्याची.

तिनं देलेला डाग
आजही चरचरतो मनात
जेव्हा काहूर उठते
फेसाळण्याचे,
ती ढसाढसा रडलीपण होती
मला पदराआड घेवून
कुशीत असून नसल्याचं
ते एकटेपण
आजही उठवते झोपेतून,
घामेजला मी
दचकून पांघरुणात शिरतो,
आजूबाजूला कुणीच नसतं
ती सुध्दा.

विजयकुमार.........
०९.१२.२००९, मुंबई
_______________________________________________

2…

काळ्या आकाशचुंबी इमारतीत
सातव्या मजल्यावर
अगदी पाळण्यात
झुलल्यासारखं वाटतं,
एकटेपणाबरोबर सगळं
शहर झुलत असतं
मात्र ती नसते
झोका द्यायला,
एकाकी झुंबरासारखं वाटतं
एकाकी झुलतेपण.

लिफ्टमधून वर जाताना
तीन, चार, पाच व सहा,
बटनं पेटतात,
ना कुणी आत येतं
ना मला तिथं उतरायचं
असतं,
उरला सुरला प्रकाश
गोळा करून
लिफ्टचा दरवाजा बंद होतो,
कुणीतरी प्रकाशतिरीप
खाली खेचतं,
पण खालीतर कुणीच नसतं.

मनाच्या समाधानासाठी मी
बेल दाबतो,
सवयीप्रमाणे दार कुणीच
उघडणार नसतं तरीही,
खोट्या समाधानाने
दार उघडतोच
चावीशिवाय.
एकटं एकटं घर
माझ्याकडे बघून हसतं
त्राण हरवून
मी ढसाढसा रडायला
लागतो,
तेही
एकटाच.

विजयकुमार.........
०९.१२.२००९, मुंबई

________________________________________________

3…

सातव्या मजल्यावरून
खाली बघताना
सगळ्या गाड्यांमध्ये ती
तेवढीच जागा
रिकामी असते पार्किंगची,
ठसठशीतपणे
उठून दिसणारी.

त्याला Airport वर सोडून
आल्यावर
मी गाडीचा सौदा
केला होता,
आता एकटेपणाबरोबर हा सौदा,
नमाझी अली रखवालदार सांगत होता
गुढग्यावर बसून,
“वहा कोई गाडी नही लगाता,
कहते है,
नापाक जगह है !
XXXX साले,
मी खिन्नपणे हसतो.

सब कुरिअर आया है !
तीन,चार,पाच व सहा
प्रकाशतिरीपा लांघत
मी घरात,
Box च्या आत बटनाएवढी
राखी, लाल रंगातली,
“ह्यावेळी यायला जमणार
नाही म्हणून कुरिअर ने पाठवली.......
पुढच न वाचताच
मी डायनिंग टेबलवर बसतो,
भिंतीवरची राजारवीवर्म्याची
दमयंती
कुणाच्यातरी प्रतीक्षेत
माझ्याकडे बघत असते.

दारातून आत सरकलेल्या
प्रकाशकवडश्याला
खोकला थोडा हेंदकाळतो,
आत जावून मी
पांघरून नीट करतो,
डब्यात कारल्याची भाजी
"ती" गुळ घालायची
ह्यात नसतो,
मी छद्मीपणे हसतो,
ताट करतो
एकटं.

फोन ...
‘माझं बरं चाललय!
पण इथे कुणी कुणाशी
बोलतच नाही,
एकटं एकटं वाटतं
बर ! मी म्हणतो,
माझी तब्येत बरीच आहे
हातातला डॉक्टरचा रिपोर्ट
चुरगाळून स्वत:शीच बोलल्यासारखं
बोलतो,
भयान रिपोर्टवर
खोकला,
मी पाण्याबरोबर घास गिळायला
लागतो,
किमान त्या खोकल्यासाठी
काही वर्षे तगवायला हवीत.

सुकलेला हार टांगलेल्या
तसबीरीतून ती माझ्याकडे
बघत असते
आधाराने
लटका तरीही हवाहवासा
तो आधार,
मी पुन्हा खाली
बघतो,
पार्किंगची जागा आता
काळोखाने व्यापलेली असते,
मी सिगारेट शिलगावतो
एकटी.

विजयकुमार.........
०९.१२.२००९, मुंबई

_______________________

4…

रात्र हळूच काढता
पाय घेते
पण उजाडत ते नाही
अभ्राच्छादित गढूळ
वातावरण
सा-या एकट्या शहरावर
पसरून राहते,
मग हळूच आकाशातून
शिडकावा
सुरु होतो
काळ्या कळ्या उमलून
छत्र्यांची कमळफुले
फुलतात
अन रस्ता दिसेनासा होतो.

सा-या पावसाला भिवून
माझी छत्री निपचित
कोप-यात एकटीच
पावसात धाडस
गळून गेलेला मी,
अवसानं एकवटून
खिडकीबाहेरचा पाउस
अनुभवत असतो
हात आक्रसून.

एकेक माणूस घर
सोडून गेल्यावर
घर रिकामं व्हावं तसं
गाड्या निघून गेल्यावर
कंपाउंड रिकाम होतं,
सा-या एकटेपणाच्या
केंद्रबिंदू मध्ये मी
तारेवरची कसरत
करत,
तारा मोजत असतो,
तारांच्या जाळ्यात अडकलेला
एकटा पक्षी
घाबरून पंख फडफडवून
जाळ्यात जास्तच
गुंतत जाणारा.

फुर्रकन काडी
जळते
अन
तिने भेट दिलेल्या
देवदास दिव्यातली वात
प्रज्वलीत होते
एकटी
भान हरपून मी ज्योतीकडे
बघत बसतो
अन
काडीची आग बोटापर्यंत
येते
आठवणींच्या भानातून
बाहेर येत मी
पुन्हा एकटाच
देवदासासारखा.
"गगन मै आवाज हो रही ही
झिनी झिनी ! कुमार आर्ततेने
गात असतात,
आणि गगन आर्ततेने
फुटायला लागते
एकटे एकटे.

आज जावू नकोस
मला भीती वाटते
आहे !
खोकल्यातला आवाज
साद घालतो,
पण मी कुणालाच सांगू शकत
नाही.
मलापण भीती वाटते
काचा बंद करून
खिडकीच्या मार्बलवर
मी गारढोण
पडतो
पाळणा किरकिरायाला
लागतो,
तेल लावायला पाहिजे !

तिने हौसेने लावलेल्या
तुळशी वृंदावनातली माती
कधीची सुकून गेलेली
अन सुकल्या काड्यांचा
सांगाडा उभा एकटा
कधी न फुलणारा ,
एकटेपणात
ना कशाला तेल लागले
ना कुणाला पाणी
मिळाले,
खरखरीत केसांवर हात
फिरवत
मी एकटा पाउस अनुभवत
डोळे मिटून घेतो.

विजयकुमार.........
१६.१२.२००९, मुंबई

______________________________________

5…

अंतकरणावरची नैराश्याची पकड
सुटता सुटत नाही
मग ढगांसारखे दुख
गोळा होते
डोळ्याच्या आकाशात
अन
धीमासा पाउस सुरु होतो
क्षारयुक्त,
खंगत चालले गाल
तात्पुरते का होईना
गोबरे होवून
चमचमायला लागतात.

पेटले झुंबर मग
सावल्या नाचवायला लागते
अंतहीन पसरल्या भिंती
कधी थोड्या पांढ-या
कधी थोड्या काळ्या
भासू लागतात.

घोग-या आवाजात जगजीत
गायला लागतो
"अपनी मर्जी से कहां अपने
सफर के हम है,
रुख हवाओका जिधर का है
उधार के हम है "

सारा मद्याचा सैलाब
पसरतो अन
पैलूदार ग्लास लकाकायला
लागतो,
सारी शिसारी तोंडावाटे
अंगात उतरते,
गार वारे अंगावर
कोरडे ओढायला लागतात,
मदिरेची आवर्तने
शीतआत्मशरीरास
गरम करू लागतात.

अंधार दाटल्या संध्येस चिरत
हॉर्न,
प्रकाशमार्ग दाखवत
आपापली जागा गाठतात
अन नेमकी तीच जागा
रिकामी राहते
काळोखाने व्यापलेली
एकटी ! एकटी !

आता जगजीतचा आवाज
फार दूरवरून यायला लागतो
खोलसर,
पायांना जमिनीचे भान
राहत नाही
मग सा-या शरीराचा भार
जमीन वाहत राहते.

खोकल्याचा जोर वाढत
गेला तरी
जगजीतचे सूर सर्वदूर पसरतात,
भानावर आलेले शरीर
पलंगावर झोकून देते
स्वत:ला
तेव्हा
एकटी रात्र सा-या
शहरावर कोसळणा-या पहाटेशी
झगडत राहते
गात्र गात्र शिणून जाई पर्यंत.

सरकत्या दिवसाचा डोळा
चुकवत काही किरणे
एकट्या सूर्यास हूल देत
खिडकीच्या तावदानाना भेदून
चेह-याशी लगट करतात
तेव्हा
आळसलेले भोग जागृत
होवून
नवा एकटा दिवस
एकट्या आयुष्यात एकटाच येतो...........

विजयकुमार.........
२३.१२.२००९,मुंबई

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Jan 2016 - 1:14 pm | पैसा

.

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 1:40 pm | पालीचा खंडोबा १

तुमची प्रतिक्रिया कळली नाही

पैसा's picture

22 Jan 2016 - 2:51 pm | पैसा

वाचून खूप उदास वाटलं, त्यामुळे काही लिहिलं गेलं नाही. खूप कौतुक आहे तेवढ्या प्रतिक्रियेत.

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 3:11 pm | पालीचा खंडोबा १

काही अनुभव असतात हो असे. मग शब्द बनून उतरतात कागदावर. खरं सांगू का मी पण टाळायचा प्रयत्न करतो पण लिहिल्याशिवाय निचरा तो कसा होतच नाही मग माणसाने करावे तर काय ?

मयुरMK's picture

23 Jan 2016 - 3:29 pm | मयुरMK

जे ''शब्दात'' सांगता येत त्यात सांगण्यासारख काही नसत ...

नीलमोहर's picture

22 Jan 2016 - 2:24 pm | नीलमोहर

अपनी मर्ज़ी से, कहा अपने सफ़र के हम हैं
रुख़ हवाओंका जिधर का हैं, उधर के हम हैं

पहले हर चीज थी अपनी
मगर अब लगता हैं
अपने ही घर में
किसी दूसरे घर के हम हैं

वक़्त के साथ हैं मिट्टी का सफ़र सदियोंसे
किसको मालूम, कहा के हैं, किधर के हम हैं

चलते रहते हैं, के चला है मुसाफिर का नसीब
सोचते रहते हैंकिस राह गुजर के हम हैं

पालीचा खंडोबा १'s picture

22 Jan 2016 - 2:41 pm | पालीचा खंडोबा १

वा वा मस्तच